सोन्याच्या ताटाचे हे अनमोल मोती हिरवी असतांनाच ती आगटीत निखाऱ्यावर भाजून खातात तेव्हा त्याला हुरडा म्हणतात. तुम्ही कधी गेलात का एखादा शेतकऱ्याकडे हुरडा खायला. तिथे या बरोबरच भाकरी. सोलाण्याची झणझणीत आमटी. त्यात भाकरीच्या तुकड्यांचा लहान द्रोण करुन भरुन ताव मारता येतो. लसणाच्या पातीची चटणी. शेंगदाण्याची चटणी आणि दह्यची वाटी. आणि हो एक सांगायचं आहे ते म्हणजे झाडाची कोवळी वांगी त्या निखाऱ्यावर भाजून देतात. पण तुम्हाला माहित आहे का ते वांगेआपण सोलून त्याचे दोन भाग करून त्याचा वास घेतला आहे कधी. अहाहा नुसता वास घेतला तर मन तृप्त होत. ज्वारीचे प्रकार खूप आहेत. पिवळी. लाल. हायब्रिड वगैरे वगैरे. भूम परांडा येथील ज्वारी प्रसिद्ध आहे. लाह्याची ज्वारी लहान असते आकाराने. गुळभेंडीचा हुरडा खायला एकदम मस्त…
भाकरी करताना पीठ तिंबून ठेवायची नसते. परात किंवा काटवट मध्ये पीठ घेऊन लागेल तेवढेच पाणी घालून दोन्ही हातांनी खूप एकजीव करावे लागते. घसाटे मारुन मारुन मग भाकरी थापावी लागते. कुणी एका हाताने थापून तव्यावर टाकतात तर कुणी दोन्ही हातांनी. मग त्यावर पाणी लावून त्याच्या कडा सोडवून दुसऱ्या भागावर भाजून घ्यावी लागते.
चुलीवरची भाकरी एका बाजूला भाजून झाल्यावर ती लगेचच निखाऱ्यावर भाजली तर टम्म फुगलेली अशा भाकरीवर साजूक तूप मीठ लावून खाल्ले तर स्वर्ग सुख. नुकतेच जेवणाऱ्या बाळाला वरचा पापुद्रा काढून तूप मीठ लावून गुंडाळी करून दिली तर दाताला व्यायाम होतो आणि हिरड्या मजबूत होतात. आणि पचायला हलके. आणि आजारात पीठाची पेज. उकड. उकडशेगोंळे. पापड्या.शिळ्या भाकरीचा कुट्टा फोडणी घालून किंवा भाकरी हाताने कुस्करून पाण्यात धुवून त्यात दही. बारीक चिरलेला कांदा आणि वरुन हिंग घालून फोडणी करुन राजाराणी म्हणतात. ती पण छान लागते ज्वारी प्रमाणेच बाजरी.
कळणी. नाचणी व तांदूळाची भाकरी करतात मात्र मी केले नाही व खाल्ली पण नाही. धपाटे. थालीपीठ यासाठी तर ज्वारीचे पीठ हवेच. आणि भाकरी बद्दल बहिणाबाईनी एक चांगली शिकवण दिली आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. खरच आहे ना त्रास सहन केला तरच सुख मिळते. तरीही माणूस मोहात गुंतून जातो आणि आहे त्यात आनंद न मानता हाव सोडत नाही. एका भारुडात म्हटले आहे ना वर तेलाची धारच नाही. मला नवरा नको ग बाई.
तर मंडळी चला तर मग तुमच्या सोसायटीत जागा असेल तर चूल मांडा. भाकरी पिठले. झुणका भाकरी बरोबर कांदा ठेचा याचा मस्त बेत करा. फार फार तर एखाद्या मावशीबाईंना पैसे द्यायचे आणि सगळे मिळून गेट टु गेदर आणि धमाल मजा येते. आणि मुख्य म्हणजे आताच्या पिढीला हे सगळे समजले पाहिजे पद्धत व चव. श्री गजानन महाराज यांना देखील पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्ही कधी शेतकरी कामगार यांच्या जेवणाचे बघितले आहे का फडक्यात भाकरीची चळत एकेका भाकरी वर लाल तिखट लसणाची चटणी. मोकळी डाळ. त्यामुळे तेल सुटते बरोबर कांदा. शेंगदाणे असतात. एखादी लोणच्याची फोड. हे पाहून वाटते की पंचतारांकित हॉटेलमधील सगळे पदार्थ फिके पडतात. आणि माझी अशी ही आवडती भाकरी माझे सर्वस्व आहे.
सोलापूरला कडक भाकरी शेंगदाण्याची चटणी विकत मिळते आणि बरेच दिवस टिकते. अशा कोरड्या चटण्या वर तेलाची धार खाऊन बघाच एकदा.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply