जगभरात बहुतेक गोष्टी या देवाच्या अथवा नावाने चाललेल्या आहेत.सर्वच देशात, धर्माच्या नावाने अनेक कर्मकांड सुरू आहेत, उलथापालथ सुरू आहे, कोणताही देश अथवा धर्म यामध्ये मागे नाही, अनेक तर्कहीन अशा गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जाते. देव या संकल्पनेचा जगभर पसारा आहे.देव आहे किंवा असतो किंवा असू शकतो असे जरी मान्य केले तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात, त्याचेही उत्तर देवाला मानणाऱ्या आस्तिक किंवा धार्मिक लोकांकडे उपलब्ध असते.कुणी आस्तिक नसेल तर तो आस्तिक लोकांना शत्रू वाटतो, परंतु कुणी आपल्या आस्तिकपणाचा काही तर्क देऊ शकत नसेल, हजारों अशा गोष्टींना खतपाणी घालत असेल ,ज्या तर्कहीन आहेत,त्यांचे काय? बरं गंमत अशी आहे की प्रत्येक देशाचा, धर्माचा, जातीचा देव वेगळा,त्यांचे राहणीमान,भाषा, इतिहास वेगळा.हे वेगळेपण देवांचे आहे की अनुयायांचे? जगात जो काही उत्पात माजलेला आहे,तो देवाच्या मर्जीने का? सर्व देवांवर ढकलून आपण नामानिराळे व्हायचे,हा मानवजातीचा पळपुटेपणा नाही का? एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे देव त्या पक्षाचे प्रमुख आहेत का, त्यांचे अनुयायी त्यांचा प्रचार आणि प्रसार करतात, उदोउदो करतात.
आज जगाच्या कानाकोपऱ्यात हजारों कर्मकांड सुरू आहेत,ते देवाच्या नावाने, देवाच्या आदेशाने किंवा देवासाठी! विज्ञानयुगात असल्या खुळचट गोष्टी समाजाचे अतोनात नुकसान करत आहेत,तर्क आणि विवेक त्यांना नको आहे,या अंधभक्तांना कोणताही प्रश्न नको आहे, त्यांना जे काही करायचे आहे, तिथे देवांचे नाव हवे आहे, पुन्हा प्रश्न धार्मिक आहे म्हणून कुणाचा हस्तक्षेप नको, राजकारणी तर मताच्या मागे असतात, जास्त लोक ज्या विचार आचाराचे तशा गोष्टींना खतपाणी घालून आपला स्वार्थ साध्य करायचा इतकेच त्यांना ठाऊक असते. माजात जे काही प्रबोधन करणारे साधू संत आहेत, तेही देवांचे नाव घेतात, भक्ती वगैरेचे सांगतात, त्यामुळे तर देव ही संकल्पना खुपच रुढ होते.
देवाच्या नावाने बळी दिला जातो, तीर्थयात्रा केली जाते.उपवास ,जप,तप केले जातात.व्रत वैकल्ये उरकले जातात.
आपण धार्मिक आहोत, आस्तिक आहोत म्हणजे सद्गृहस्थ आहोत, सज्जन आहोत असेच समजले जाते, परंतु हे कितपत खरे आहे, धर्माच्या नावाने संघटन करायचे आणि ताकद तयार करायची आणि मग हवा तसा छळ करायचा.
आज ज्या देशात बहुसंख्य जे लोक आहेत, म्हणजे धर्म या संकल्पनेत सर्व मानव हे मानव नाहीत, अल्पसंख्य आहेत आणि मग छळ सुरू होतो.जगातील बहुतेक भांडणे किंवा युद्ध या बहुसंख्य आणि अल्पसंख्य भोवती दिसतात. देवाबद्दलच्या ज्या धारणा आहेत, त्या आपल्या सोयीनुसार बनवून,इतर मानवांना बहिष्कृत करायचे, वाळीत टाकायचे किंवा त्यांचा छळ करुन त्यांना संपवून टाकायचे यामागे हे कुटिल कारस्थान असते.जगात हे धर्म नसून, हे खरे आस्तिक नसून केवळ त्या नावाने उभ्या असलेल्या संघटना आहेत,ज्या आपले अनुयायी वाढवून आणि इतरांना इतर मानून त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत.
तुम्ही जर ईश्वरवादी असाल तर यामध्ये कुणाला आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु जेव्हा यांचे संघटन तयार होते आणि समाजात स्तोम माजवले जाते आणि सामाजिक सौहार्द धोक्यात येते, तेव्हा देवाच्या नावाने चाललेला हा
उपद्रव थांबवणं गरजेचे असते.धर्म हा धर्मविरोधी का आहे,कारण अनुयायी आपले वर्चस्व इच्छितात, त्यातून स्पर्धा आणि संघर्ष अटळ आहे.देवाच्या नावाने उभ्या असलेल्या या संघटना आहेत,देव हा जर एकच असेल तर धर्म वेगळे का,एक नसेल तर तेही या लोकांनी समजावले पाहिजे.धार्मिक तेढ का निर्माण होते,हा विचार करावयास हवा.
देवी देवतांच्या नावाने अनेक खुळचट गोष्टी समाजात सुरू आहेत,त्या संपुष्टात येण्याऐवजी त्यास खतपाणी घालण्याचे काम, त्यामध्ये हितसंबंध गुंतलेले लोक करत असतात, पुन्हा इतर धर्म आणि जात यांचे भय दाखवून आपले संघटन अधिक मजबूत केले जाते.धार्मिक संघटन महत्त्वाचे की सामाजिक संघटन हे ठरवले पाहिजे.
धार्मिक बाब ही व्यक्तिगत असली पाहिजे,त्यांचे संघटन कशासाठी?
अंधश्रद्धा पसरविणारे बुवा गल्लीबोळात आहेत.जागोजागी त्यांचे अनुयायी आहेत.अर्थहीन, तर्कहीन गोष्टी ते करायला भाग पाडत आहेत.लोकही त्यांना बळी पडत आहेत. देवाच्या नावाने काहीही करून घेता येते हे या चालाक लोकांनी ओळखलेले असते.अनेक संतांनी या अंधभक्तांना समजावले आहे तरी ते ऐकत नाहीत, ते त्यांनाही त्याच रांगेत बसवतात आणि त्यांचीही पूजा करतात, त्यांच्या नावाने कर्मकांड करतात, मात्र त्यांचा विवेक आणि तर्क स्विकारत नाही.
देव ही संकल्पना कुणी समजून घेत नाही, त्यामध्ये एकवाक्यता नाही.कुणाकडेही त्याचा काही तर्क नाही, फक्त कर्मकांडासारखा सोपा मार्ग सांगायचा आणि आपण धार्मिक असल्याचा , आस्तिक असल्याचा गवगवा करायचा.
आज बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची गरज आहे.विवेकवादी विचार आवश्यक आहेत.तर्कात न बसणाऱ्या गोष्टींना समाजात वाव नसला पाहिजे,तरच हा समाज सुखाने जगू शकेल,केवळ भाबड्या आशेवर किंवा कल्पनेवर तो कदापि सुखी होणार नाही.देवाची इच्छा, देवाने जन्म दिला तो सर्व बघून घेईन अशा आशेवर शेकडो वर्षांपासून मानव दळभद्री जीवन जगत आहे, प्रत्येक मनुष्य सुखाने जगू शकेल, निर्भय राहू शकेल असे वातावरण समाजात निर्माण व्हायला हवे, त्यासाठी सर्वच धार्मिक लोकांनी देवाच्या नावाने चालवलेला खेळ आणि छळ थांबवला पाहिजे.
– ना.रा.खराद
Leave a Reply