
सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड होत असताना तिच्या पृष्ठभागावर कवच निर्माण झाले. जणू दुधावरची साय. तिचा पृष्ठभाग थंड झाला, घन बनला. कवच्याच्या खोलगट भागात पाणी साचले. तिथे महासागर निर्माण झाले. उरलेला भाग म्हणजे भूखंड. थोडक्यात कवचावर जमीन आणि पाणी अशी वाटणी झाली. जमीन असलेले शिलावरण आणि पाणी असलेले जलावरण! शिलावरणाचे नाव होते पांगेआ (Pangea). तर आजही पृथ्वीचा अंतर्भाग शिलारसाने भरलेला आहे.
आणि एके दिवशी भूगर्भातील अनाकलनीय घटनेमुळे ह्या भूकवचाचे दोन तुकडे झाले. परत ह्या तुकड्याचे आणखी सहा मोठे व बारा-तेरा लहान तुकडे झाले. हे तुकडे हालचाल करू लागले. एकमेकांपासून दूर सरकू लागले. त्यामुळे आताचे ऑस्ट्रेलिया व भारत हे देश आफ्रिकेपासून सुटून दूर गेले. भारत ज्या भूकवचावर आहे त्या कवचाचे नाव गोंडवन. हा गोंडवन उत्तर दिशेला असलेल्या युरेशियन ह्या भूकवचाच्या तुकड्याकडे सरकू लागला.
सुमारे ९० कोटी वर्षांपूर्वी युरेशियन व गोंडवन ह्यांच्या सीमा ‘टेथिस’ समुद्राने निश्चित केल्या होत्या. ह्या दोन्ही भूखंडावरून येणाऱ्या नद्या आपल्या बरोबर गाळ आणत होत्या व टेथिस समुद्रात आपल्या बरोबर आणलेला गाळ समर्पित करत होत्या. शेवटी एके दिवशी ह्या गाळाने हा समुद्र उथळ झाला.
गोंडवन उत्तरेकडे सरकतच होते आणि ५-६ कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसाच्या प्रचंड शक्तीने हे दोन्ही भूखंड दोलायमान झाले. भारत ज्या भूखंडावर आहे तो भूखंड उचलला गेला व युरेशियन भूखंडावर आदळला. बिचारा टेथिस समुद्र या भूखंडांच्या मधे चिरडला गेला. तळाच्या गाळासह टेथिस समुद्र दुमडला व त्याचा तळ उचलला गेला. त्याच्या तळाला असंख्य वळ्या पडल्या आणि हिमालयाचा जन्म झाला. ह्या वळ्या म्हणजेच हिमालयाच्या पर्वतरांगा! आजही हा तळ दुमडला जात आहे. त्यामुळे वर्षास ९ ते १५ सें.मी. वेगाने पूर्व दिशेला हिमालयाची वाटचाल सुरू आहे तर दरवर्षी १.५ ते ५ सें.मी.ने त्याची उंची वाढत आहे.
दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे उलटत होती. वातावरणात बदल होत होते. हिमालयाचे रूप बदलत होते. पर्वत शिखरे बर्फात हरवू लागली. उन्हाने बर्फ वितळून प्रवाह वाहू लागले. उंच कड्यावरून खोल दऱ्यात ते झेपावू लागले. वृक्ष-वल्लीत परिसर नटू लागला. हिरवाईत हरवू लागला तर निरनिराळ्या फुलात खुलू लागला. ह्या सौंदर्याचे वर्णन सर्वांना सांगण्यासाठी झरे, नद्या वाहू लागल्या. पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.
आणि एके दिवशी मानवाची पावले ह्या परिसरात पडली. निसर्गाचे हे वैभव पाहून तो थक्कच झाला. एका वेगळ्याच अनुभूतीने त्याला भारून टाकले. त्याची प्रतिभा खुलू लागली. विचारात प्रगल्भता आली. त्याने राहण्याची, विचार करण्याची, आचाराची, उच्चाराची एक धारा निश्चित केली व एका संस्कृतीचा उदय झाला. एका धर्माचा उदय झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यात हिंदू धर्माचा उदय झाला. आपले प्रगल्भ विचार, कल्पना त्याने हिमालयाच्या कुशीत वेद, उपनिषदे, पुराणाच्या रूपात सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी तो हिमालयाला विसरला नाही. वेदात तर तो हिमालयाची केवळ स्तुती करून थांबला नाही तर त्याला देवत्व दिले आहे व हवी अर्पण करून त्याची आराधना केली आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात म्हटले आहे की, ज्याचा महिमा विशाल हिमवान म्हणून गायला जातो त्याचे महानत्व समुद्र व धरती गात आहे. अनंत दिशा ज्यांचे विशाल बाहू आहेत, असा हा हिमालय आहे.
काही ऋचांवरून किंवा संदर्भातून एक निष्कर्ष निघतो की हिमालय हे अनेक औषधी वनस्पतींचे आगर आहे. अथर्ववेदातील काही ऋचांचा अर्थ हिमालयात उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या आम्हाला औषधी वनस्पती देतात, असा निघतो. रामायणातील एका प्रसंगी लंकानिवासी वैद्यराज सुर्पणानेही ‘संजीवनी १४/ हिमशिखरांच्या सहवासात औषधीचे स्थान’ म्हणून हिमालयाचा उल्लेख केला आहे. वस्तुतः हिमालय ही अगणित औषधी वनस्पतींचा खजिना आहे.
वेदात, उपनिषदात तसेच वायुपुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण इ. जवळ जवळ सर्वच पुराणात हिमालयाचा उल्लेख खूप ठिकाणी आढळतो. मार्कंडेय पुराणात हिमालयाचे वर्णन करताना, ‘हा पर्वत पूर्व व पश्चिम समुद्रापर्यंत धनुष्याच्या खेचलेल्या दोरीसारखा दिसतो.’ असे केले आहे. तर विष्णुपुराणात भारतीयांची ओळख करून देताना पुराणकारांना हिमालय आठवला आहे तो असा:
उत्तरे यत्समुद्रस्य हिमाद्रे श्चैव दक्षिणम् ।
वर्ष तद भारतं नाम भारती यत्र सततिं ।।
स्कंदपुराणाच्या केदारखंडात तर हिमालयातील नदी-नाले, सरोवरे, पर्वत-शिखरे व गुहांची तसेच अनेक स्थानांची पवित्रता सूचित करण्यासाठी विविध कथा कथन केल्या आहेत व शेवटी सांगितले आहे की ह्या भागाची यात्रा करणारा जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो. त्याचा परत जन्म होत नाही. उलट त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. पुराणात हिमालयाची व्याप्ती पाच खंडात झाल्याचे म्हटले आहे.
खण्डा: पंच हिमालयस्य कथिता नेपाल कुर्माचलौ ।
केदारोऽथ जलोधरोऽथ रुचिर: काश्मीर संज्ञोऽन्तिमः ।।
प्रथम खंड म्हणजे नेपाळ तर दुसरा खंड म्हणजे कुर्माचल (आताचा कुमाऊ). तिसरा खंड म्हणजे केदारखंड (आताचा गढवाल) चौथा खंड म्हणजे जालंधर-पंजाब (आताचा हिमाचल प्रदेश) तर पाचवा खंड म्हणजे काश्मीर.
-प्रकाश लेले
Leave a Reply