भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर पामिरच्या पठारापासून पूर्वेला दूरपर्यंत अनेक पर्वतरांगा जातात. आसामच्या टोकापर्यंत जाऊन तिथून त्या खाली दक्षिणेकडे वळतात. ह्या सगळ्याच पर्वतमाला आपण हिमालय म्हणून ओळखतो. पण ह्या एवढ्या मोठ्या प्रचंड प्रदेशात पवित्र म्हणून आपण परंपरेने ओळखणारी जास्तीत जास्त स्थाने उत्तराखंड भागात आहेत. परशुरामासारखा एखादा दैवी पुरुष तेवढा आसामच्या टोकापर्यंत गेलेला दिसतो. म्हणून तिकडे परशुराम कुंड आहे.
हिमालयाचे सौंदर्य त्याच्या बर्फाच्छादित शिखरात, दऱ्याखोऱ्यात उधळलेल्या निसर्गात, शुभ्र धवल प्रवाहात, प्रपातात, पर्वत शिखरावर रेंगाळणाऱ्या मेघमालात सामावलेले आहे. पुरातन काळापासून संस्कृति, तत्त्वज्ञान, देव-देवता, स्वर्ग मोक्ष वगैरे संकल्पना या हिमालयाच्या परिसरात निर्माण झाल्या. मन:शांतीसाठी अद्भुत व रमणीय निसर्ग पार्श्वभूमीची आवश्यकता असते किंबहुना अशा स्थळीच मनःशांतीची अनुभूती लाभते. एखादे वेळेस समाधीयोगासारखा अद्वितीय योग लाभतो. म्हणूनच हिमालयाच्या शांत व रमणीय परिसरात राहून आचार-विचार, उच्चार, विचारमंथनातून, उपासनेतून, अनुभवातून, तपश्चर्येच्या माध्यमातून ऋषि-मुनींनी अनेक मुलभूत गोष्टी शिकून आपले उद्दिष्ट व ज्ञान विकसित केले व एक संस्कृती निर्माण केली. वेद, उपनिषदे, अरण्यके या सर्वांचा साक्षात्कार हिमालयात तपाचरणासाठी बसलेल्या किंवा वावरत असलेल्या मंत्रद्रष्ट्या ऋषिमुनींना झाला. असित, वसिष्ठ, वाल्मिकी, कण्व ऋषींचे आश्रम हिमालयात किंवा हिमालयाच्या परिसरात होते, असे सांगितले जाते. आजही त्या जागा दाखवल्या जातात.
हिमालयातील शिखरे म्हणजे हिंदू धर्मियांची धार्मिक क्षेत्रे आहेत. निरनिराळ्या देव-देवतांनी आपले निवासस्थान म्हणून हिमालयाला निवडले आहे. तर पुराणांनी त्याचे तसेच नद्यांचे माहात्म्य सांगितले आहे. अनेक युगायुगात मानव या महान विशाल हिमालयाच्या चरणी आदरांजली अर्पण करीत आला आहे. ऋषिमुनींच्या शब्दात सांगायचे तर तो देवभूमी असलेला देवतात्मा आहे.
विनय पीटक व चुल्लवग्ग या प्राचीन बौद्धधर्मीय ग्रंथातसुद्धा हिमालयाचे उल्लेख आढळतात. याशिवाय अनेक जातकामध्ये बोधिसत्त्व किंवा इतर तपस्वी हिमालयात तपाचरणाला गेल्याचे उल्लेख मिळतात. कुरूक्षेत्रातील उत्तर पांचाळ नगरामधील रेणू नावाचा राजा महारक्षित तपस्वी असलेल्या पाचशे तपस्व्यांना बरोबर घेऊन हिमालयात राहण्यास गेल्याची कथा कौसल्यायन व सोमनस्स जातकात सांगितली आहे. वर्षाऋतु संपल्यानंतर रेणू म्हणतो की, आता हिमालय रमणीय झाला असेल.
योगिनी तंत्रातही हिमालयाचा उल्लेख ‘हिमवान’ असा आलेला आहे. अनेक प्राचीन बौद्ध ग्रंथात हिमालयाच्या आध्यात्मिक वैभवाच्या खुणा व सूचक असे वर्णन आपणास पाहावयास मिळते.
नगाधिराज हिमालय प्रत्यक्ष जितका विशाल व सुंदर आहे तितकाच विस्तृत आणि मोहक आहे. प्रत्यक्ष जसा आहे त्यापेक्षा अधिकाधिक सुंदर तो भारतीय वाङ्मयात दिसतो. कला व साहित्याच्या जगातील हिमालयाचे योगदान कधीही विसरता येणार नाही. महाकवी कालिदासावर तर हिमालयाने मोहिनीच घातली आहे. त्याची प्रतिभा तर हिमालयाविषयी लिहिताना बहरून गेली आहे. हिमालयावरील त्याचे प्रेम तर त्याच्या रचनात, काव्यात पदोपदी जाणवते. अक्षरश: तो हिमालयाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे, स्वत:ला हरवून गेला आहे. कालिदासाच्या जवळजवळ सर्वच कृतीत हिमालयाचे वर्णन करताना कालिदास रंगून गेला आहे. कालिदासाला हिमालय एक पवित्र पर्वत वाटतो. हिमालयाला नगाधिराजत्व पद कसे प्राप्त झाले याचे वर्णन करताना कालिदास म्हणतो, ‘सोमवल्ली व इतर यज्ञोपयोगी साहित्य हिमालयावर मिळते. संपूर्ण जगावर स्थैर्य आणण्याचे कार्य हिमालय करतो. म्हणूनच ब्रह्मदेवाने स्वतः हिमालयास शैलाधिपत्य दिले.
कुमारसंभव या आपल्या महाकाव्यात कालिदासाने हिमालयाची भव्य पूजाच बांधली आहे. तो म्हणतो:
अस्तुत्तरस्यां दिशि देवतात्मा ।
हिमालयो नाम नगाधिराजः ।।
पूर्वापरौ तोय विधिऽवगाह्य ।
स्थितः पृथ्वीव्याम् इव मानदण्डः ।।
(उत्तर दिशेला हिमालय नावाचा देवातात्मा नगाधिराज आहे. पृथ्वीला पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत मोजण्यासाठी विधात्याने जणू हा एक मानदण्डच ठेवला आहे.) त्याने हिमालयाला ‘देवतात्मा’ असे संबोधून हिमालयाची आध्यात्मिक संपन्नता उत्कृष्टपणे प्रकट केली आहे. त्याचे हे महाकाव्य हिमालयाच्या रंगमंचावरच अवतरले आहे तर त्याच्या मेघदूतातील यक्ष हाही हिमालयातील अलकापुरीचा रहिवासी आहे.
रघुवंशाच्या चौथ्या सर्गात हिमालयाचे वर्णन केले आहे. विक्रमोवंशीयम् या नाटकालाही हिमालयाची पार्श्वभूमी आहे. परंपरेने भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे. पुराणानी शंकराचे हिमालयाशी आलेले कोमल संबंध आल्हादाने उलगडून दाखवले आहेत. कुमारसंभवातील उमामहेश्वराचा परिचय, प्रेमोदय, प्रमोत्कर्ष व परिणय हिमालयाच्या पुढाकाराने झाला व त्याचा विवाहोत्तर उन्मत्त प्रणय फुलला तो हिमालयातच.
-प्रकाश लेले
Leave a Reply