नवीन लेखन...

देवतात्मा  हिमालय  – भाग 3

हिमालयाचे अनेक तऱ्हेने वर्णन करून सुद्धा कालिदासाला ते अपूर्ण वाटते. आपली प्रतिभा शक्ती हिमालयाचे वर्णन करू शकत नाही ह्याची त्याला खंत वाटते व तो हिमालयाला शरण जातो व आपल्या न्यूनत्वाची जाणीव करून देताना म्हणतो:

स्थानो त्वां स्थावरात्मानम विष्णुमाहुस्तथाहि ते ।
चराचराणां भुतानाम् कुक्षिराधारतां गता ।।

प्राचीन संचितामध्ये हिमालय काव्यप्रेरक व काव्यप्रसुही ठरला आहे.

पाणिनीनेसुद्धा आपल्या रचनांत हिमालयाचे उल्लेख केले आहेत तर हर्षचरितमध्ये बाणभट्ट ग्रीष्म ऋतुचे वर्णन करताना म्हणतो, ‘ग्रीष्म काळात लोक हिमालमुखी होतात,’ म्हणजेच हिमालयाकडे प्रयाण करतात. मनूने या प्रदेशाला देवनिर्मित प्रदेश म्हटले आहे. वसिष्ठस्मृतीत तसेच बोधायनस्मृतीत देवनिर्मित प्रदेशाची हिमालय हीच सीमा, असे सांगितले आहे.

महाभारतातील अनेक घटनांना हिमालय साक्षी आहे. पांडवांचा जन्म हिमालयातच (पांडुकेश्वर) झाला असे सांगितले जाते व त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ हिमालयातच व्यतीत केला होता व शेवटचा प्रवास हिमालयातून करत स्वर्गलोकी प्रयाण केले असे सांगतात. महाभारताच्या वनपर्वाला तर हिमालयाची पार्श्वभूमी लाभली आहे. वनपर्वाप्रमाणे शांतीपर्वात सुद्धा खूप ठिकाणी अनेक घटनांशी, कथांशी आणि संदर्भाशी निगडित हिमालयाचे उल्लेख आढळतात तर अनुशासन पर्वात भगवान श्रीकृष्णाने हिमालयात प्रवास केला होता व महात्मा उपमन्यूच्या आश्रमाला भेट दिली होती, असे म्हटले आहे. महाभारताच्या जवळजवळ सर्वच पर्वात हिमालयाचे उल्लेख आले आहेत.

शंकराचार्यांनी हिमालयात प्रवास करून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, प्रतिष्ठापना करून ही स्थाने धर्मपीठे बनवली. ब्रह्मसूत्र व अनेक ग्रंथांवर भाष्य त्यांनी हिमालयात केले व आपले जिवीत कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी केदारनाथला अवतार समाप्ती केली.

हिमालयात सर्वच भारतीय विद्यांचा आद्यअविष्कार झाला आहे. पण ज्या विद्येच्या उदयामुळे व उत्कर्षामुळे भारतीय संस्कृतीला एक आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे ती आध्यात्मविद्या हिमालयातच प्रथम अवतीर्ण झाली असे तज्ञांचे मत आहे. हिमालय हे भारतीय व जागतिक आध्यात्माचे प्रतीक आहे. ही आध्यात्मविद्या जगातील अनेक धर्माच्या अनेक विद्वानांचे एक मोठे कुतूहल आहे, आकर्षण आहे. हिमालय हे सर्व तत्त्व जिज्ञासूंचे व मुमुक्षूंचे ‘शरण्य’ आहे. वैदिक ऋषींची मंत्रदर्शने, चार वेद, उपनिषदे, अरण्यके, ब्राह्मणग्रंथ, मंत्रविद्या, तंत्रविद्या, यंत्रविद्या या सर्वांचा संबंध हिमालयाशी उगमस्थान, अभ्यासस्थान किंवा अनुभूतीस्थान म्हणून जोडला जातो अनेक सिद्धयोगी पुरुषांना हिमालयात सिद्धीची प्राप्ती झाली आहे.

रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निम्बाचार्य, चैतन्यमहाप्रभू, समर्थ रामदास इत्यादींनी हिमालयाच्या निसर्गाचा आस्वाद घेत आपल्या तत्त्वज्ञानाला बळकटी मिळवण्यासाठी अनेक मुलभूत गोष्टी मिळवल्या व जगापुढे मांडल्या.

रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद तर आपल्या प्रत्येक शिष्याला हिमालयाचे दर्शन करण्याचे आवर्जून सांगत. रविंद्रनाथ टागोरांनीसुद्धा आपल्या गीतांजलीच्या रचनेसाठी काही काळ हिमालयात व्यतित केला.

हिमालय हा भारताच्या सांस्कृतिक भावजीवनातील एक अनन्यसाधारण विभूती आहे. हिमालय असा शब्द जरी उच्चारला, ऐकला किंवा वाचला की, मनःचक्षूसमोर भव्यतेचे, विशालतेचे, महानतेचे चित्र उभे राहते. हे चित्र मांगल्यमय कुंचल्याने रंगवून दिव्यत्वाच्या चौकटीत बसवले आहे. ह्या चित्राला पावित्र्याची झालर लावली आहे. प्रत्येक भारतीयांचे हे दैवत आहे. नास्तिकाला आस्तिक बनवणारा हा भूतलावरचा स्वर्ग आहे.

ह्या हिमालयाची अनेक रूपे आहेत. त्याच्याकडे ज्या नजरेने पहावे तसा तो दिसतो. भारतीय ऋषीमुनी, तत्त्वज्ञ यांना नेहमीच निसर्गाचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी हिमालयाकडे धाव घेतली व हिमालयाच्या स्वर्गीय सौंदर्यात वास्तव्य करून आपले सारे ज्ञान, तत्त्वज्ञान व विचारधारा ह्यापासून अनेक गोष्टी शिकून घेतल्या. आपले वेद-वाङ्मय, पुराणे, उपनिषदे, अरण्यके यांचा साक्षात्कार हिमालयात तपाचरण करणाऱ्या ऋषीमुनींना झाला व ह्या सर्व वाङ्मयाचा हिमालयात जन्म झाला. तसेच ह्या संस्कृतींना आधारभूत असणाऱ्या प्रेरणा हिमालयातील द्रष्ट्यांनी व विचारवंतांनी दिल्या.

श्रद्धाळू माणसांना ही देवभूमी वाटते. हिंदू धर्माची महत्त्वाची धार्मिक स्थळे, पवित्र नद्यांची उगम स्थाने हिमालयात आहेत. हिमालय हे देव-देवतांचे क्रिडास्थान, निवासस्थान अशीच त्यांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच हिमालयातील हिमशिखरांना, गुहांनासुद्धा पावित्र्य प्राप्त झाले आहे.

काहींना ही भारतीय पुराणातील असंख्य ऋषिमुनींची, योग्यांची तपोभूमी वाटते व आजही काही महात्मे शेकडो वर्षे हिमालयात साधना करीत आहेत, असे वाटते (कदाचित हे खरेही असेल). तर कोणी हिमालयाला अगम्य गूढ यती सारख्या हिममानवाचे निवासस्थान समजतात तर काहीजण अश्वत्थामा आजही हिमालयत वावरत असतो, असे सांगतात.

भूगर्भशास्त्रज्ञांना तर हिमालय पर्वत हा अभ्यासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू वाटतो. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडवणारी तसेच भारतीय उपखंडाला नियमितपणे पावसाने न्हाऊ घालणारी ही एक भिंत वाटते. जगाचे हवामान नियंत्रित करणारा हिमालय हा एक अभ्यासाचा विषय आहे. तर आयुर्वेदतज्ञांना ही एक जडी-बुटीची खाण वाटते.

रूंदपर्णी वृक्षांच्या प्रदेशापासून सुचीपर्णी वृक्षांच्या जंगलापर्यंत संपन्न असलेला हा प्रदेश जैवविविधतेचा, खनिजसंपत्तीचा हा एक अनमोल ठेवाच आहे तर उत्तरेकडील विध्वंसक, अमानुष टोळ्यांपासून तसेच परराष्ट्राकडून भारताचे संरक्षण करणारी ही एक भिंतच आहे. ह्या हिमालयाची महती सांगण्यासाठी शब्द खूप अपुरे आहेत.

नगाधिराज हिमालय हा भारताचा मतंदर आहे. प्रत्येक भारतीय हिमालयाशी अध्यात्मिक, सामाजिक, भौगोलिक, भावनिक दृष्टीने निगडित आहे. भारताचा रक्षणकर्ता, वेद पुराणांचे जन्मस्थान, वनौषधींचे भांडार, पवित्र नद्यांचे उगमस्थान तर मोक्षाप्रत नेणारे पवित्र स्थान अशी त्याची प्रतिमा आहे. कोणाला तो शंभू महादेवाचा शश्वर वाटतो तर कोणाला तो शिवरूप वाटतो. हिमालय म्हणजे सत्यम्-शिवम्-सुंदरम् ह्यांचे मूर्तिमंत रूप आहे. ह्या भूतलावर एवढे नैसर्गिक सौंदर्याचे भव्यतेचे, वैराग्याचे, परोपकाराचे महानतेचे, मांगल्याचे रूप कोठेच नसेल. भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्ण ‘स्थावरणां हिमालय’ म्हणजेच हिमालय ही माझी विभूती आहे, असे म्हणतात.

साधनेच्या किंवा तीर्थयात्रेच्या निमित्ताने इथपर्यंत येऊन पोहचणारी माणसे इथे सांडलेल्या स्वर्गीय तेजाच्या प्रभेमध्ये न्हाऊन निघतात. हे प्रकाशकण त्यांच्या नंतरच्या लौकिक जीवनातील अंधाराचे शाप सुसह्य करायला समर्थ ठरतात. हिमालयात कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे.

नर-नारायणानी सेविलेला, महर्षिगणांनी वंदिलेला, ऋषि-मुनी व सिद्धगणांनी आपल्या निवासाने पुनीत केलेला, गंधर्व-यक्ष-किन्नरांची आवडती स्थाने असलेला, तपोवने, गिरीकंदरे, विचित्र पानांच्या झाडांनी बहरलेला, दिव्यौषधीत हरवलेला, रंगीबेरंगी फुलांनी, झरे, तलाव, प्रपात, नद्या, सुवास उधळणाऱ्या फुलाफळांनी सजलेला पृथ्वीवरील यच्चयावत् सुखाचे, ऐश्वर्याचे व सौंदर्याचे सागर असलेला हा हिमालय अलिप्त, विरक्त, शांत, ध्यानस्थ, कर्मयोगी आहे. ही भूमी पवित्र आहे. ही तपोभूमी आहे. पुरुषार्थाची कर्मभूमी आहे. देवदेवतांचे हे निवासस्थान आहे.

तर दुसऱ्या क्षणाला वाटते की प्राणीमात्रांना अगम्य भयाण असलेली ही भूमी, गगनाचा वेध घेणारी अनंत काळापासून बर्फाळलेली ही उत्तुंग गिरीशिखरे, आपल्या प्रचंड वेगाने गर्जना करत खडक फोडणारे प्रपात, समोर ठाण मांडून बसलेल्या डोंगरांच्या अजस्त्र भिंती, समोर आ वासून पसरलेल्या खोल दऱ्या, भयानक गुहा, जिथे दिशापण कळत नाहीत असा हा हिमालय रूद्राचाच अवतार आहे व तोच जणू आपल्या प्रलयकालीन तांडवनृत्याचे पदविक्षेप करत चराचर सृष्टीला भय दाखवत आहे. हिमालयच असे विभिन्न भावांचे संमेलन दाखवू शकतो. हे सर्व पाहता हिमालय म्हणजे श्रीशंकराचे एक विराट रूप वाटते. हिमालय शंकराप्रमाणेच योगमय परंतु सर्वतोभावी, सौम्य पण भीषण, शांत पण सिंहनादपूर्ण, दयाघन पण कठोर, अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत होऊनही जीवनदाता, वल्कले परिधान करूनही दिगंबर. हिमांशुधारी असूनही उग्र वाटतो. हा हिमालय म्हणजे मधुर-उच्च भावयुक्त अभेदात्मक अपूर्व मूर्तीचे साक्षात दर्शन आहे.

हा हिमालय वर्षानुवर्षे निसर्गाचा आत्यंतिक प्रकोप अनुभवत आहे. वादळी वारे, प्रचंड पाऊस, बर्फवृष्टी, कधी कडाक्याची थंडी तर कधी तळपणारी सूर्य किरणे! ह्या व अशा प्रतिकूल परिस्थितीत हा उत्तुंग हिमालय ताठ मानेने उभा आहे. भारताचा हा मानदंड कुठेही वाकत नाही आणि मोडत तर नाहीच नाही. उलट प्रखर उन्हात आपल्या अंगाखांद्यावरचे बर्फ वितळवून नद्यांना जीवदान करतो. त्यामुळे असंख्य जिवांना जीवदान मिळते. हिमालयाचे हे केवढे तरी पुण्य कार्य आहे. लोकहितासाठी तो अहर्निश झिजतो तरीसुद्धा काहीही गाजावाजा करत नाही. हा हिमालय म्हणजे एक परोपकारी व्रतस्थ योगी आहे.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..