एकदा त्याला वाटले, आज जाऊन पहावे त्याच्याकडे
पहावे त्याला समजते का,
की का पाऊले वळली तिकडे?
थेट ‘त्या’च्या समोर गेला ‘बघ कळतंय का तुला !’
आव्हानाची भाषा ऐकून,
‘तो’ फक्त मनोमन हसला
‘त्याने’ चक्क विचारले, ‘सुखी आहेस ना बाळा ?’
आश्चर्य वाटून याला वाटले,
‘त्याला’ आला आपला कळवळा
‘काय सांगू देवा तुला…..’ सर्व दुःख त्याने मोकळे केले
अगदी ढसाढसा रडल्यावरच
चरण त्याचे सोडले
नजर चेहऱ्याकडे, मग सर्व देहाकडे वळली
आताची ‘सजीव मूर्ती’ दगड कशी झाली?
इतक्यात आकाशवाणी झाली….
‘मी समोर असतांनाही
तुम्ही दुःखाचेच पाढे वाचता
आता तरी दुःख विसरावित
हेच कसं विसरता ?
विश्वास नसतो माझ्यावर
की, उगाचच दुःखाचा बाऊ करुन
का मलाच दोष देत बसता ?
अरे असं गाऱ्हाणे गाऊन कधी,
कोणत्या परीक्षेत पास होता येतं का ?
कष्ट केल्याशिवाय, यश चाखता येतं का ?
भ्याडासारखे आत्महत्या करता
खऱ्या परीक्षेतच, सहज हार पत्करता
मीच दिलेल्या आयुष्याची
क्षणात माती करुन टाकता
म्हणूनच मी दगड होणे पसंत करतो
पुन्हा एक संधी नव्याने देऊ पाहतो
पहा तिचे सोने करता येते का ?
आयुष्याचे मोल ओळखता येते का ?
तो तडक उठला, अश्रु कधीच थांबले होते
त्याचं देवत्व मानून
त्याने आत्मविश्वासाने लढायचे ठरवले होते.
सौ. मृणाल महागांवकर, महाड
Leave a Reply