
पंचबद्रीमधील शेवटचे स्थान म्हणजे भविष्यबद्री. जोशीमठापासून १७ कि.मी. अंतरावर मलारी रस्त्यावर ‘सुबैन’ या गावी भविष्यबद्रीचे मंदिर पर्वतराजीत दडले आहे. लोककथेनुसार जोशीमठाच्या नृसिंह मंदिरातील नृसिंह मूर्तीचा कृश होत जाणारा डावा हात गळून पडेल. त्यावेळी नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळतील व विशालबद्रीची वाट कायमची बंद होईल. तेव्हापासून भविष्यबद्रीलाच बद्रीनाथचे स्थान समजले जाईल.
जोशीमठहून मलारी रस्त्यावर हे स्थान आहे. जोशीमठपासून भविष्यबद्रीसाठी जीप उपलब्ध होतात. जोशीमठपासून ८ कि.मी. अंतरावर तपोवन ही छोटीशी वस्ती आहे. या ठिकाणी काही वैशिष्ट्यपूर्ण सुरेख पुरातन मंदिरे आहेत. ही मंदिरे गुप्तकालात बांधली असावीत असा संशोधकांचा अंदाज आहे. हिमालयातील मंदिरांच्या धाटणीपेक्षा या मंदिरांची धाटणी वेगळी आहे.
तपोवनपासून २-३ कि.मी. अंतरावर गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्याचे तापमान १२७° फॅरेनहाइट इतके आहे. या पाण्यात गंधकाचा अंश असल्याने परिसरात गंधकाचा वास पसरलेला असतो. पुढे २-३ कि.मी. अंतरावर मुख्य रस्ता सोडून डोंगरात साधारण २ कि.मी. अंतरावर भविष्यबद्रीचे स्थान आहे.
भविष्यबद्रीचे हे मंदिर हे अतिशय लहान आहे. मंदिरावर शिल्पकला अशी काहीच नाही. मंदिरात श्रीविष्णूची चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली मूर्ती आहे. मूर्तीचे डावे मुख नृसिंहाचे तर उजवे मुख वराहाचे आहे. मूर्तीखाली शेषनाग व पृथ्वी प्रदर्शित केली आहे. या ठिकाणाहून नंदादेवी पर्वतराजीच्या परिसराचे फार विहंगम दर्शन होते.
या मंदिरापासून साधारण २ कि.मी. अंतरावर चीड-पाईन वृक्षांच्या दाटीत एका शिलाखंडावर मूर्ती सारखा आकार दिसतो. स्थानिक लोक सांगतात की हा आकार नैसर्गिकरित्या आला आहे व यात बदलही होत आहे. हेच स्थान भविष्यात ‘भविष्य-बद्री’ म्हणून पूजले जाईल.
अशी ही पंचबद्रीची कथा
प्राचीन मंदिरे आपल्या वैभवशाली संस्कृतीचे शिल्पकलेचे पुरावे आहेत. काळाच्या प्रवाहात व आपल्या बेफिकिरीमुळे आज या मंदिरांना अवकळा प्राप्त झाली आहे. मंदिरांची पडझड होत आहे. मूर्तीची चोरी होत आहे. एके दिवशी आपल्या निष्काळजीपणामुळे हा अमूल्य ठेवा कायमचा नाहीसा होईल. या श्रद्धास्थानांचे जतन करणे व त्यांना वैभवशाली गौरवस्थाने बनवणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
-प्रकाश लेले
Leave a Reply