हे मूळ मंदीर कोणी व कधी बांधले याचे उल्लेख सापडत नाहीत. पण मिळालेल्या एका शिलालेखानुसार हे मंदीर २५०० वर्षांचे पुरातन आहे असा एक अंदाज निघतो. शंकराचार्यांनी या मंदिराचा बद्रीनाथाची मूर्ती स्थापन केल्यावर जीर्णोद्धार केला असावा. आजचे हे मंदीर कत्युरी राजाने बांधले व तिथे पूजा-अर्चा सुरू केली. त्यासाठी मंदिराला त्यांनी काही जमिनी इनाम दिल्या, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. पंधराव्या शतकात लिहिलेल्या आनंद रामायणात, “बद्रीकाश्रमे रामः केदारेश्वरः विलोक्यसः” असे उल्लेख आहेत तर इ.स. १६९५ सालातील मिळालेल्या राजमुद्रांवर “बद्रीनाथो दिग्विजयते सर्वदा” असे लिहिले आहे. काहीही असो, हे स्थान पुरातन आहे हे निश्चित. सर्वसाधारण या स्थानाचा उल्लेख ‘बद्री-विशाल’ असा केला जातो. या नावामागे वराह पुराणात एक कथा सांगितली आहे. सूर्यवंशी राजा विशाल शत्रूकडून पराजित झाला. दुःखीकष्टी राजा हिमालयात आला. त्याने भक्तिभावाने बद्रीनाथाचे पूजन केले व गंधमादन पर्वतावर जाऊन तो बद्रीनाथाची तपश्चर्या करू लागला. त्याची भक्ती पाहून बद्रीनाथाने त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. राजाने ‘आपले राज्य परत मिळावे’ अशी प्रार्थना केली. बद्रीनाथाने राजाला सामर्थ्य दिले. तसेच तुझ्या भक्तिमुळे लोक माझ्या नावापुढे तुझे नाव लावतील व जयजयकार करतील असाही वर दिला. बद्रीनाथाच्या वर प्रसादाने राजाला आपले राज्य परत मिळाले व बद्रीनाथाच्या वरप्रसादाप्रमाणे तेव्हापासून ‘जय बदरी-विशाल’ असा जयघोष सुरू झाला.
मंदिरातून बाहेर पडल्यावर अलकनंदेच्या काठावर थोडी सपाट जागा आहे. त्याला ‘ब्रह्मकपाल’ असे म्हणतात. या ठिकाणी पितरांचे श्राद्ध केले जाते. ‘या ठिकाणी श्राद्ध केल्यास भविष्यात श्राद्ध तर्पण करण्याची गरज नाही, पितरांना अक्षयमुक्ती मिळते’ असे सांगितले जाते. एवढेच कशाला जिवंतपणी आपण आपले स्वतःचे श्राद्धसुद्धा या ठिकाणी करू शकतो असे सांगितले जाते. स्वत:चे श्राद्ध करण्याचीही पद्धत फक्त याच ठिकाणी पहायला मिळते. कोठियाल जातीचे ब्राह्मण हे विधी करतात.
या परिसरातील पाच पाषाण खंड गरूडशिला, नारदशिला, मार्कण्डेय शिला, नृसिंहशिला व वराहशिला या नावान ओळखल्या जातात.
मंदिराच्या बाहेर गरम पाण्याचे कुंड आहे. ते तप्तकुंड किंवा अग्निकुंड म्हणून ओळखले जाते. महाभारत काळात श्रीकृष्ण व अर्जुनाच्या मदतीने अग्नीने खांडववन जाळून वृक्षलता, पशुपक्ष्यांची हत्या केली. तेव्हा श्रीविष्णूने हिमालयातील यात्रेकरूंची सेवा करून तू पापमुक्त हो असे अग्निला सांगितले. श्रीविष्णूच्या आदेशानुसार अग्नी येथे गरम पाण्याच्या रूपात प्रगट झाला, अशी आख्यायिका सांगतात.
गंधकमिश्रित या गरम पाण्याचे तापमान १२८° फॅरनहाईट आहे. हे बारमाही गरम पाण्याची झरे आहेत. हे गरम पाणी नळाद्वारे बाहेर आणून यात्रेकरूंच्या स्नानाची इथे चांगली सोय केली आहे. गंधकाच्या वासामुळे मुख्य कुंडाजवळ जास्त वेळ उभे राहिल्यास चक्कर येण्याची शक्यता असते. या शिवाय आणखी नारदकुंड, सत्यपथकुड, त्रिकोणकुंड व भानुषीकुंड अशी चार कुंडे ही पवित्र कुंडे या ठिकाणी आहेत, असे सांगितले जाते. वराह पुराणात सुद्धा या ठिकाणी पाच पवित्र कुंडे आहेत असा उल्लेख आहे.
पुराणात या बदरीवनांचा विस्तार बारा योजने लांब व तीन योजने रुंद असा सांगितला आहे. (एक योजन म्हणजे चार मैल) हे ऐश्वर्य, सुखशांती देणारे पापक्षालन करणारे तीर्थस्थान, असे या स्थानाचे माहात्म्य पुराणात सांगितले आहे. बद्रीनाथ हे गढवाल नरेशांचे कुलदैवत समजले जाते व गढवाल नरेश ‘गढवालची राजगादी ही भगवान बद्रीनाथाची आहे,’ या भावनेने राज्यकारभार करत. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना त्यांनी ‘रावळ’ असा किताब बहाल केला आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी १४० गावांतील सरकारी जमिनी त्यांनी मंदिराला भेट म्हणून दिल्या आहेत.
अति बर्फवृष्टीमुळे दिवाळीनंतर हे मंदीर बंद केले जाते. मंदीर बंद करतेवेळी गाईचे शुद्ध एक किलो तूप घेतात. त्यातील काही तूप मूर्तीवर चोळले जाते व मूर्तीवर पातळ वस्त्र चिकटवले जाते. राहिलेल्या तूपात एक किलो तांदुळ मिसळून कापसाची वात बाहेर काढून ते एका डब्यात भरतात. वात प्रज्वलित करून आरती केली जाते व मंदीर बंद करतात.
साधारण अक्षयतृतीयेनंतर हे मंदीर भाविकांसाठी परत उघडले जाते. उघडण्यापूर्वी सैन्यदलातर्फे सर्व परिसर, रस्त्यांची पाहणी करून, रस्ते-पूल दुरुस्त करून, सुरक्षिततेची खात्री झाल्यावर एक मुहूर्त निश्चित केला जातो व त्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी मंदीर बंद करताना लावलेला दिवा, मंदीर उघडल्यावर सुद्धा तसाच्या तसा तेवत असतो. मूर्तीवरील फुले टवटवीत असतात. जेव्हा हे मंदीर बंद असते त्या काळात नारदमुनी गुप्त रूपाने रोज बद्रीनाथाची पूजा करतात तर लक्ष्मीदेवी दिवा लावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जेव्हा मंदीर बंद असते तेव्हा बद्रीनाथाची गादी जोशीमठ या ठिकाणी असते. जोशीमठ येथील नृसिंह मंदिरात बद्रीनाथाची पूजा होते. भाविक या ठिकाणी बद्रीनाथाचे दर्शन घेतात.
बद्रीनाथमध्ये अनेक धर्मशाळा तसेच राहण्याच्या व इतर प्रवासी सुविधा उपलब्ध आहेत. हरिद्वार-ऋषीकेशपासून नियमित बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे.
-प्रकाश लेले
Leave a Reply