हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर ‘जोशीमठ’ हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव ‘ज्योर्तिमठ’! जोशीमठ हा अपभ्रंश आहे.
जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी जेव्हा पांडव हिमालयात आले, तेव्हा त्यांनी बराच काळ आपल्या ह्या जन्मभूमीत वास्तव्य केले होते. पंडू राजा व माद्रीचे त्यांनी या ठिकाणी क्रियाकर्म केले. पंडू राजाच्या स्मरणार्थ त्यांनी शिवमंदिर बांधले. तेच मंदिर पांडुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. भगवान विष्णूनी या स्थळी तपध्यान केले, योगसाधना केली म्हणून या ठिकाणच्या बद्रीस्थानाला, ध्यानबद्री किंवा योगबद्री म्हणून ओळखले जाते. पंचबद्रीमध्ये विशालबद्री नंतर हे स्थान महत्त्वाचे समजले जाते.
अलकनंदेच्या काठावर कत्युरी शैलीतील पांडुकेश्वर व ध्यानबद्रीची मंदिरे फार विलोभनीय दिसतात. या मंदिरांना तटबंदी होती. आता मात्र प्रवेशद्वारापाशी दोन भिंती उभ्या आहेत. योगबद्रीच्या मंदिरात विष्णूची योगध्यानस्थ मुर्ती आहे. ही मुर्ती गंडकी नदीतील निळसर झाक असलेल्या पाषाणाची आहे, असे सांगतात या ठिकाणी अष्टधातूंची श्रीकृष्णाची एक अप्रतिम मूर्ती आहे. इंद्राने ही मूर्ती पांडवांना दिली व तिची द्रौपदी पूजा करत असे अशी श्रद्धा आहे.
या मंदिराचे कळससुद्धा देखणे आहेत. कळसावर बभ्रुवाहनाचे शिल्प आहे. तर चार दिशांना सिंहाची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्राकारात दगडी स्तंभ उभे आहेत. पांडुकेश्वर महादेवाच्या मंदिरात महादेवाची मूर्ती आहे. या मूर्तीखाली रत्नजडित शिवलिंग आहे, अशी श्रद्धा आहे. मंदिरात लक्ष्मी-नारायण, उद्धव, द्रौपदी, भूदेवीच्या मूर्ती आहेत. ही मंदिरे नवव्या शतकाच्या आरंभी बांधली असतील असा एक अंदाज आहे. दरवर्षी या ठिकाणी ‘जानकीमेळा’ भरतो. ह्या शिवाय पांडुकेश्वरामध्ये कुबेरथात, घंटाकर्ण, शेषनागतीर्थ अशी इतर स्थाने आहेत. येथील घंटाकर्ण, वादळ, गारा, अवर्षणापासून सर्वांचे रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे. कत्त्युरी राजासंबंधी माहिती सांगणारे काही ताम्रपट अलीकडील काळात येथे सापडले आहेत.
-प्रकाश लेले
Leave a Reply