अहो अहो कुठं चाललात?हातातली काठीतरी नीट धरा!तोल गेला असता ना आता!आणि हे काय?आकाश कंदील?कधी आणलात?आधी खाली ठेवा तो!हsss!आता समजले..गॅलरीत लावायला निघाला होतात ना?अहो नका हो करू हे असले उद्योग!वय झालंय आपलं.. पडले-बिडले स्टुलावरून किती महागात पडेल?एखादं हाडबीड मोडलं तर बसाल एका जागी!आकाशदिवा लावायचाय?सोसायटीच्या वॉचमनला बोलवा ना!त्याच्याकडून लावून घ्या!पण ही कसरत थांबवा आधी..
अगं मालती..दिवाळी आलीय गं जवळ!आजूबाजूला बघ!सगळ्यांनी लावलेत आकाशकंदील!आपलंच घर कसं दिसतंय सुनंसून..म्हणूनच वॉचमनला सांगितला आणायला!म्हटलं आपणच लावू..त्यांत काय एवढं!तू थोडी मदत केलीस धरायला तर आत्ता लावून टाकू!स्वतः लावल्याचं तेव्हढंच समाधान… कसं समजून सांगू ह्या माणसाला!अहो..आपले दोघांचेही हातपाय लटपट करताय!जर्जर झालोत आपण!मी नाही बाई ही सर्कस करायला तयार!आणि तुम्हालाही नाही सांगते!नका करू भलतं धाडस!हवंतर मी बोलावते वॉचमनला.. तुम्ही बसा इथे..राहिलेत ते दिवस राहा धड!अंथरुणावर आडवे झालातर कुणीनाही येणार विचारायला पाहायला..
ए..असं नाही बोलायचं!चांगली अडतीस वर्ष नोकरी केली पोस्टखात्यात!तुचं पाहिलंस पोस्टमनची ड्युटी किती श्रमाची कष्टप्रद असते..खांद्यावर थैला लावला.. सायकलवर टांग मारली की निघायचो टपाल वाटप करायला!त्याचं जोमानं त्याचं कर्तव्य निष्ठेने नोकरीच्या अखेरच्या दिवसापर्यत सेवा देतं राहिलो..आणि आज साधा आकाशकंदील लावायला तू नाही म्हणतेस?टपालावर शिक्के मारून मारून..गावभर हिंडून फिरून टपाल बटवडा करता करता..स्टील बॉडी झालीय माझी…अभि बहुत जान बाकी हैं इन हाथो में..समझी? राहू द्या राहू द्या ओ रिटायर्ड ठाकूर!
सिनेमांतलं सिनेमात राहू द्या!उगीचच घोड्यावर बसू नका..त्यावेळची गोष्ट वेगळी होती..सध्याची तुमची अवस्था ऊन वारा पाऊस झेलून झेलून पोष्टाच्या त्या जीर्ण गंजलेल्या रंग उडालेल्या पत्रपेटी सारखी झालीय!कशाला उगाच आव आणताय?अहो!आयुष्यभर पोस्टमनची नोकरी केलीत!घरोघरी दारोदारी फिरून पायपीट पायऱ्या चढउतार करता करता लोकांची सुखदुःख वाटत फिरलात..गळ्यात थैला अडकवून!म्हणायला उत्साह दांडगा आहे ओ..पण शरीर थकलंय तुमचं आता!कुणाला मुलगा झाला!नात झाली!नोकरी लागली..लग्न ठरलं..कुणाचं कुणी गेलं तर कुणाच्या घरी कुणी जन्मलं..रोज उठून साऱ्या साऱ्यांच्या वार्ता ज्याला त्याला पोहोचत्या केल्यात!पत्रावर लिहिलेल्या आंबट गोड खबरबात ज्याच्या त्याला सुपूर्त केल्यात..उन्हाची वाऱ्याची थंडी पावसाची अगदी जीवाला बरं नसतांनाही..कशाची म्हणून तमा न बाळगता..पत्रावरचा पत्ता शोधून शोधून पोस्टाची ड्युटी बजावलीत!चांगली बातमी दिलीत म्हणून कुणी धन्यवाद दिलेत..आभार मानले..तर वाईट बातमीने कुणा अनोळख्या सामनेवाल्याच्या दुःखात सहभागी झालात..सांत्वन केलंत!पण आता ती ताकद तो जोम राहिलीय का?माझंच बघा ना.. गेल्या दिवाळीला हिम्मत करून कशीबशी थोडीफार घराची साफसफाई..थोडंसं दिवाळीचं फराळ तरी केलं होतं..पण ह्या दिवाळीला इच्छा तळमळ असूनही कशाला हात लावायला..करायला मन धजावत नाहीये..वय आडवं येतंय ना..! काय बोलतेस तू!अगं बाई…जो डर गया समझो मर गया!शोले फेम गब्बरसिंग महाराजांचा डायलॉग आठवतोय ना तुला!ह्या थकल्या देहाला..एका वेगळ्या अर्थाने एकचं आदेश द्यायचा…चल धन्नो तेरी बसंती की इज्जत का सवाल हैं! म्हणायचं अन..पळत सुटायचं!वय वय काय धरून बसलीस गं!माणसानं कसं पत्राला घट्ट चिकटलेल्या पोस्टाच्या तिकिटासारखं चिवट असावं…
तुम्हालातर सगळी चेष्टा सुचतेय!कधीतरी सिरीयल व्हा!एक सांगू?काहीही म्हणा!अखेरच्या प्रवासाकडे झुकलेल्या ह्या आपल्या आयुष्यात..अताशा राहून राहून मनाला काळीज कुरतरडणारी एकचं खंत लागून राहिलीय!एका सुखापासून वंचित ठेवलं आपल्याला!मला आई..तुम्हाला बाबा होण्याचं भाग्य नाही लाभू दिलं दैवानं !याबद्दल तक्रार नाही..पण साहजिकच कितीही नाही म्हटलं तरी..विचार येतोचं ना मनात..तुम्ही आणि मी सोडले तर..ह्या चार भिंतीच्या पलीकडे..आपलं म्हणावं असं आहे का कुणी आपलं…? ए सोड ना हा विषय!डोळे पूस आधी!अगं..असं समजायचं..आमच्या पोस्टाच्या नियमानुसार कदाचित पूर्ण पत्या अभावी ते सुख आपल्या पर्यत न पोहोचता..’अपूर्ण पत्ता’ शेरा मारून..पाठवणाऱ्या कडे परत गेलं असेल?फारसं मनाला नाही लावून घ्यायचं ह्याचं !चलता हैं!इकडे बघ..पंधरा वर्ष होऊन गेलीत निवृत्त होऊन मला!छान जगत आलोय ना आपण!हा हल्ली थोडं दमायला होतं..विसरायला होतं इतकंच!बाकी अजूनही सगळी कामं करू शकतो मी!नाहीतर तू..कधी चहात साखर तर वरणात मीठ टाकायला विसरतेस!पूजा करताना आपोआप हातातली घंटी वाजायला लागते तुझी!गंध लावताना कपाळी लागण्याऐवजी देवाच्या कानाला गालाला गळ्याला लागतो!त्यापेक्षा मी बरा..ह्या काठीच्या आधाराने..कट रही हैं जिंदगी…
ओ!पोस्टमन साहेब वाट्टेल ते बोलू नका!मी करते म्हणून दोन वेळचा चहा नाश्ता जेवण मिळतं तरी!नाहीतर मेसचं बेचव जेवण गिळायला लागलं असतं.. नको सांगुस!हल्लीतर बऱ्याचं वेळा खालच्या स्वीट्सच्या दुकानात जावून..नाहीतर पार्सल मागवून आपलं उदरभरण चालू असतं..सगळं समजतं गं मला!नाही होत तूझ्या कडून आता..गॅसजवळ उभं राहणं नाही झेपत तुला..जावू दे..नाही लावत आकाशदिवा!उगीचं काही विपरीत नको घडायला!त्यापेक्षा आपण शांत बसलेलं बरं!बाहेर आजूबाजूची गंमत पाहून आनंद घेऊयातं बस्स!झालं तूझ्या मनासारखं..घेतली तितकी शाळा पुरे झाली आता..!
आश्विन कृ 11 गोवत्स द्वादशी वसुबारस..दिवाळीचा पहिला दिवस..संध्यासमयीची घटिका..श्रीमंती-गरिबी ठळकपणे जाणवावी इतपत विभागलेली संध्याकाळ..कुठे रोषणाईत न्हावून निघालेले गगनचुंबी प्रासाद तर कुठं रस्त्याच्या कडेला गोळा करून ठेवलेल्या कचऱ्याच्या ढिगासमान जागोजागी दिसणाऱ्या कळकट वस्त्या..तरीही आपापल्या कुवतीनुसार सजलेली सजवलेली लहानमोठी घरटी..परिणामी सर्वत्र दीपोत्सवाच्या स्वागताला सारं शहर प्रकाश दिव्यांनी उजळून न्हावून निघालेलं..इकडे आपले पोस्टमनकाका रहात असलेल्या इमारतीत..लहानश्या घराला आकाशकंदील विद्युतमाळा पणत्या रांगोळीने केलेली लक्षवेधी आकर्षक सजावट..दाराशी शुभ दीपावली हॅपी दीपावली शुभलाभ लक्ष्मी पावलांची सुरेख स्टिकर्स..जवळच सुबक रंगीत प्रकाशलेल्या पणत्या.. पुढं हलक्या हातानं हळूच दरवाजा ढकलून आंत प्रवेश केल्यावर समोर आश्चर्य आदर आनंद कृतार्थ कृतज्ञता कितीतरी समिश्र भावभावनाचा कल्लोळ-रेषा दाखवीत बसलेले पोस्टमनकाका काकू..थोड्या अंतरावर मिठाई ड्रायफ्रूटचे बॉक्स..चकली लाडू शेव चिवड्याची काही पॅकेट्स..थोडं पुढं गॅलरीत जाता..मंद हेलकावे घेणारा छानसा आकाशकंदील.. छोटीशी रंगीबेरंगी दिव्यांची माळ..फार ऐसपैस नसलं तरी जिथंल्यतिथं टापटीप स्वच्छ आवरलेलं पोस्टमन काकांचं घर..तसं बघता..वयोमानानुसार परिस्थितीपुढे हार मानून काहीही न करता हतबल गलितगात्र होऊन बसलेली ही ज्येष्ठाची जोडी.. मग ही आवरसावर सजावट….????
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले.. देवस्वीट्सचे संचालक..दिगंबर देव..हॅलो देव स्वीट्स!पुढच्या क्षणी नेहमीचा परिचित आवाज..बोला काय पाठवू काकू!कचोरी समोसा ढोकळा बोला!परंतु तिकडून अपेक्षित उत्तर येण्याऐवजी.. अचानक.. अहो!कुठं चाललात!हातातली काठीतरी नीट धरा!तोल गेला असता ना आता!गोंधळून देवांचं मध्येच एकदा दोनदा हॅलो हॅलो..पण तिकडून एकामागून एक भलतेच संवाद..काहीतरी गडबड दिसतेय..देवांचं एकाग्रचित्त होऊन ऐकणं..पोस्टमन काका आणि काकू मधलं आकाशकंदील लावण्यावरून रंगलेलं ते सांभाषण चालू असताना..देवांचा मनाशी संवाद..काय झालं असावं?काकू फोनवर आपल्याशी बोलत असताना काका धडपडत आकाशदिवा लावण्यासाठी निघाले असावेत?त्या गडबडीत फोन तसाचं चालू ठेवून काकू काकांशी बोलत राहिल्याने..देवांना सगळ्या परिस्थितीची झालेली जाणीव..दरम्यान….
देवांच्या दुकानात नेहमीचं येणंजाणं..चांगला परिचय तेव्हा..ह्या वृद्ध जोडीला आपल्याकडून काहीतरी मदत करावी…
ह्यांचा दिवाळ सण गोड करावा हेतू..सदहृदयी देवांनी..दुसऱ्याचं दिवशी.. दुकानात नियमित साफसफाई करायला येणाऱ्या मुलीकडून काकांच्या घराची साफसफाई.. दिवाळीची सजावट करून घेतलेली…मिठाई दिवाळ फराळासह स्वतः जावून दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा देतं पदस्पर्श करून आशीर्वाद घेतलेले…
आज या क्षणी..तो सगळा भारलेला भारावलेला प्रसंग आठवून पोस्टमन काका मिश्किलपणे काकूंकडे पाहत बोलताय..
मालतीबाई!बघितलंत?अहो..ह्याला काय म्हणायचं..’देव’ दीनाघरी धावला?खरंच खालच्या देव स्वीट्सवाल्या मालकांचे मनापासून आभार!केवळ फोनवरचं बोलणं ऐकून..त्यामागं दडलेली आमची असहाय परिस्थिती जाणून ह्या माणसानं आपली अंधारात जाणारी दिवाळी प्रकाशमय गोड केली..देवा ह्या देवांचं कल्याण कर बाबा…
शेखर वैद्य..नाशिक
01 डिसेंबर 2023
Leave a Reply