नवीन लेखन...

प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे व्यासंगी संशोधक देवदत्त रामकृष्ण भांडारकर

प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे व्यासंगी संशोधक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला.

श्रेष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे त्यांचे वडील. डेक्कन कॉलेजातून १८९६ मध्ये बी. ए. झाल्यावर कायद्याचा अभ्यास करीत असता, मुंबई विद्यापीठासाठी ‘पूर्व-मुसलमान काळातील (इ. स. १००० पर्यत) महाराष्ट्र देशातील प्राचीन ग्रामांचे आणि नगरांचे संक्षिप्त पर्यालोचन’ या विषयावर त्यांनी निबंध लिहिला; त्याला भगवानलाल इंद्रजी पारितोषिक मिळाले. त्यानंतर थोरल्या भांडारकरांच्या आदेशाप्रमाणे संस्कृत, प्राचीन भारतीय इतिहास आणि पुराभिलेख हे विषय घेऊन एम्, ए. ची पदवी मिळविली. एम्.ए.नंतर भारताच्या जनगणना खात्यात त्यांनी काम केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे लक्ष देवदत्तांच्या नवीन संशोधनाकडे वळले. परंतु मोठ्या पगाराची नोकरी नाकारून देवदत्तांनी मात्र १९०४ ते १९०७ या काळात मुंबई मंडलाच्या पुरातत्त्व विभागात साहाय्यक सर्वेक्षक हे पद स्वीकारले. १९१५ च्या ऑगस्टमध्ये पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडलाचे ते अधिकारी झाले. पुढे १९१७ साली कलकत्ता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयांचे कार्मायकेल प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३६ मध्ये निवृत्त होईपर्यत हे पद त्यांनी समर्थपणे सांभाळले.
अधिकार किंवा द्रव्यप्राप्ती यांचा लोभ नसलेला हा विद्वान इतिहासाने झपाटलेला, पुराभिलेख आणि नाणकशास्त्र यांत निष्णात असा अधिकारी होता. एम्.ए.साठी गुजरात राष्ट्रकूट युवराज पहिला कर्क्क याच्या नवसारी ताम्रपटावर (इ. स. ७३८) आणि कुशाण शिलालेखावर त्यांनी केलेले संशोधन, शककालाचा उगम आणि कुशाण राजपरंपरा यांविषयीचे त्यांचे निष्कर्ष फ्रेंच विद्वान बार्थ आणि वडील डॉ. रा. गो. भांडारकर यांनाही पसंत पडले. जनगणना खात्यात काम करीत असता, ‘धर्म आणि धर्मपंथ’, ‘जाति आणि जमाती’ ही प्रकरणे लिहिण्यास त्यांनी एंथोवन , आय्. सी. एस्. यांना मदत केली. मुबंईच्या सर्वेक्षण विभागात असताना ‘अहीर’ जमातीवर टिपण लिहून आपल्या स्वतंत्र संशोधन-लेखनाचा आरंभ केला. याच वेळी महेन्द्रपाल आणि विनायकपाल यांचे शासन, गुर्जर राज्याचा तत्कालीन विस्तार आणि राजवटीचा कालानुक्रम यांवर लेख प्रसिद्ध करुन तोवर अज्ञात असलेला इतिहास प्रकाशात आणला. मिहिर-भोजाच्या ग्वाल्हेरच्या अभिलेखाचे अचूक वाचन करुन त्यांनी कालनिर्णय केला; तो कीलहोर्नने आपली चूक कबूल करुन स्वीकारला.
मुंबई मंडलात सर्वेक्षक म्हणून काम करीत असता, त्यांनी राजपुतान्यात दौरा करुन पुरातत्वीय सामग्रीची यादी आणि टिपणे तयार केली. पाशुपत पंथाचा संस्थापक लकुली (श) यावरील त्यांचे संशोधन आणि निष्कर्ष तर त्याच्या वडिलांच्याही कामी आले. १९१५ मध्ये राजपुतांची सर्वश्रेष्ठ जमात ‘गुहिलोत’ याविषयी त्यांनी केलेल्या संशोधनाचे तसेच ‘हिंदु लोकसमाजातील परदेशीय अंश’ या लेखात त्यांनी दिलेल्या माहितीचे ऐतिहासिक मोल मोठे आहे.

बादशाह पाचवे जॉर्ज हिंदुस्थान भेटीस ५ डिंसेबर १९११ रोजी आले, त्या वेळी त्यांच्यासाठी एलिफंटा (घारापुरी) बेटाची मार्गदर्शिका देवदत्तांनी तयार केली. अखंड शिळेतून एकसंघ कोरुन काढलेल्या त्रिमुर्ति-मंदिराचे वैशिष्ट्य तीत स्पष्ट केले आहे. देवदत्तांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशा जवळील बीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खाम्‌ बाबा पिलर’ हा गोलाकार स्तंभ. ग्रीक राजदूत हीलिओडोरस याने आपल्या वासुदेवभक्तीचे आदरचिन्ह म्हणून हा स्तंभ उभारला. तो दोन पोलादी पट्टयांवर उभा आहे. आजूबाजूचे बांधकाम पक्क्या विटांचे, चुनखडीच्या गिलाव्याचे आहे. देवदत्तांनी पोलादाचा नमुना शेफील्डला पाठवून आणि चुनखडीच्या मिश्रणाची परीक्षा पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मॅन यांच्याकडून करवून घेऊन इ.स.पू. १२५ मध्ये- म्हणजे मौर्य काळात- अस्सल पोलाद, चुना-चुनखडीचा गिलावा आणि पक्क्या भाजलेल्या विटा यांचा बांधकामासाठी उपयोग होत असल्याचे सिद्ध करुन दाखविले.

कलकत्ता विद्यापीठात अध्यापन-संशोधन, अभ्यासक्रमाची आणखी, शासकीय व्यवस्थापन इ. कार्य करीत असता, देवदत्तांनी कार्मायकेल व्याख्यानमाला सुरु केली. या मालेत त्यांनी ‘प्राचीन भारतातील राजपद आणि प्रजातांत्रिक संस्था’ (१९१८), ‘भारतीय नाणकशास्त्र’ (१९२१), ‘अशोक’ (१९२३) या विषयांवर व्याख्याने दिली. १९२५ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठात ‘प्राचीन हिंदू राजनीतीचे काही पैलू’ या विषयावर मणिचंद्र नंदी व्याख्याने दिली. सेवानिवृत्तीनंतर १९३८-३९ मध्ये मद्रासला सर विल्यम मेयेर व्याख्याने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे काही पैलू’ या विषयावर दिली. प्राग्-मौर्य काळातील संस्कृती, व्रात्य आणि आधुनिक शैव पंथ याचा संबंध, यांवर त्यांत विवेचन आहे. सेवानिवृत्तीच्या काळात भारतीय अभिलेखांची यादी आणि गुप्त अभिलेखांची दुसरी सुधारित आवृत्ती त्यांनी तयार केली.

रॉयल एशियाटिक सोसायटी (बंगाल आणि लंडन)चे सदस्यत्व (१९१२), कलकत्ता विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट (१९२१), बंगाल रॉयल एशियाटिक सोसायटीचे बिमलचरण लॉ सुवर्णपदक इ. बहुमान त्यांना लाभले. कल्चरल कॉन्फरन्स, कलकत्ता (१९३६), हिस्टरी कॉंग्रेस, अलाहाबाद (१९३९) यांची अध्यक्षपदे, तसेच ‘इंडियन अँटिक्करी’चे संपादकत्व (१९११-१९२२), विविध संशोधन संस्थाचे सन्मान्य सदस्यत्व, विद्यापीठीचे व्याख्यानांची आमंत्रणे असे विद्त्क्षेत्रातील अनेक सन्मान देवदत्तांना लाभले.गुणांची पारख असलेल्या सर आशुतोष मुखर्जी यांनी देवदत्तांना ‘थोरल्या भांडारकरांची छोटेखानी आवृत्ती’ असे न मानता, ‘प्रतिथोरले भांडारकरच’ असे गौरविले, यातच देवदत्तांच्या योग्यतेचे परिमाण आहे.

मा.देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे ३० मे १९५० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..