स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले भाजपचे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्या उप मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला.
महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे २०१४ पासून २०१९ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनण्याची किमयाही त्यांनी साधली होती. फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अॅरग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावं. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’.
पुढं हा मुलगा लॉ मध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थानं जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्र च्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचं. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आलं नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले. कमी वयात महापौर आणि आता मुख्यमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. देवेंद्र फडणवीस अवघ्या सतरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर गंगाधर पंतांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकलं. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. विशेष म्हणजे, २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले. विधानसभेतही देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. वरिष्ठ भाजप नेता व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीच देवेंद्र यांना राजकारणात आणले आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपली स्वच्छ प्रतिमा कसोशिनं जपली आहे. आजवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा राजकीय तडजोडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कदाचित या गुणांमुळेच वयाच्या ४४ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचले आहेत. आजवर वयाच्या ३७ व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री आहेत. कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार, रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार, मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार असे अनेक पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आहेत.
आमदार म्हणून दुस-यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नी अमृता या नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या होत. अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या पत्नीने नोकरी केलेली नव्हती. मात्र, अमृता फडणवीस त्याला अपवाद ठरल्या आहेत.
सध्या शिंदे सरकार मध्ये ते अजितदादा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply