नवीन लेखन...

देवीच्या दागिन्यांची चोरी

गणपती विसर्जन झालं होतं. आतां सर्व नवरात्रीची वाट पहात होते. देवीचे पूजन अनेक ठिकाणी घट बसवून होई. देवीची मंदिरे तर देवीचा महोत्सवच करतात. अशा वेळेला यशवंतांकडे एका देवीच्या मंदीराचे विश्वस्त (Trustee) आले होते. ते चौघे होते.

आपल्याकडे ते कां आले असावेत ह्याचा विचार यशवंत करत होते देणगी मागायला नक्कीच नाही कारण आपण मोठी रक्कम देऊ शकत नाही, हे त्यांना माहिती असेलच आणि मागावीशी वाटली तरी त्यासाठी स्वत: सगळे ट्रस्टी येणार नाहीत. मग पेपरांत वाचलेल्या देवळासंबंधी बातम्या त्यांना आठवू लागल्या. अमुक ठिकाणी मूर्ती चोरीला गेली.
अमुक ठिकाणचे दागिने पळवले. देवळांतले दागिने चोरीला गेल्याच्या बातम्या तर नेहमीच येतात. एवढा सामान्य विषय झाला होता तो. पोलिसांना ह्या चोऱ्यांचा शोध कसा घ्यायचा हे चांगलंच माहित आहे. ह्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत्येय म्हणजे ते अडचणीत नक्कीच आहेत आणि त्यासाठी ते आपल्याकडे आले आहेत. त्यांच्यापैकी एकाने त्यांची ओळख करून दिली.
“हे प्रभाकर देवळेकर, त्यांचा रेडीमेड कपड्याचा व्यवसाय आहे. हे जनार्दन दिक्षित हे दंतवैद्य आहेत.
हे अशोक म्हात्रे, प्राध्यापक आहेत आणि मी नंदकुमार कुळकर्णी मी इंजिनीअर आहे व कन्स्ट्रक्शन बिझिनेस करतो.”
यशवंत म्हणाले, “तुम्हाला भेटून आनंद झाला. माझ्याकडे काय काम निघालं आपलं ?”
कुळकर्णी म्हणाले, “आम्ही चौघे आमच्या गांवातील देवीच्या मंदीराचे विश्वस्त आहोत, हे मी तुम्हाला सांगितलं आहेच.”
यशवंत म्हणाले, “हो ! देवीचे दागिन्यांसंबंधी कांही आहे का ?”
कुळकर्णी म्हणाले, “देवीचे दागिने चोरीला गेलेत.
देवीच्या दागिन्यांची तिजोरी आम्ही देवळांतीलच एका खोलींत एका अभेद्य तिजोरीत ठेवतो.
त्या तिजोरीच्या चाव्या आम्हां चौघांकडेच आहेत.
तिजोरी उघडायला एकूण तीन चाव्या वापराव्या लागतात.
आमच्यापैकी कुणाही एकाकडे तीनही चाव्या नसतात.
दोन असतात व तिसरीसाठी आणखी एकाची मदत लागतेच.
म्हणजे आम्ही किमान दोघेजण मिळूनच तिजोरी उघडू शकतो.
तिजोरी उघडण्याचे फारसे प्रसंग येत नाहीत.
ठराविक सणांना थोडे दागिने देवीच्या मूर्तीवर चढवतो.
मात्र नवरात्रींत बहुतेक सर्व दागिन्यानी देवीला मढवतो.
दागिने सोन्याचे असून मुकुटांत एक हिरासुध्दा आहे.
आजमितीला दागिन्यांची किंमत दोन कोटी रूपये होईल.
ह्यावर्षी हे दागिने काढण्यासाठी मी आणि म्हात्रे दोघेजण देवळांत गेलो.
त्या खोलीत गेलो.
पहातो तर तिजोरी उघडीच पडलेली आणि रिकामी.
आम्हाला धक्का बसला आम्ही लगेच देवळेकर आणि दिक्षित ह्यांना बोलावले.
त्यांनीही तिजोरी उघडली नव्हती.
याचा अर्थ ही अभेद्य तिजोरी कुणी तरी उघडली होती.”
चंदू म्हणाला, “मग तुम्ही पोलिसांत एफआयआर नोंदवला असेलच ना !”
विश्वस्त म्हात्रे म्हणाले, “नाही. दागिन्यांची चोरी झाली, हे ही आम्ही जाहीर केलेले नाही.
कारण इथल्या लोकांना कळल्यास ते अपशकुनापासून काय काय तर्क काढतील.
शहरावर संकट येणार म्हणतील.
शिवाय आम्हाला जबाबदार धरून मारहाणही करू शकतात.”
देवळेकर म्हणाले, “आता उत्सव सात दिवसांवर आला.
पुढल्या रविवारी घटस्थापना.
तोपर्यंत जर दागिने मिळाले नाहीत तर आम्हाला लोकक्षोभाला बळी जावं लागेल.”
कुळकर्णी म्हणाले, “आता आमची सारी भिस्त तुमच्यावर आहे.
गाजावाजा न करतां दागिने परत मिळवायला हवेत.”
यशवंतानी विचारले, “तुम्हाला काय वाटते ? दागिने कुठे शोधावे लागतील ? कोणी चोरले असतील ?”
दिक्षित म्हणाले, “मंदिर परिसरांतीलच कोणी तरी असावं !”
यशवंत म्हणाले, “ते तिजोरी कशी उघडू शकतील ?”
कुळकर्णी म्हणाले, “आमची मति कुंठीत झाली आहे.”
यशवंत म्हणाले, “एवढे दागिने आणि त्यांतील कांही जुने “ॲंटीक व्हॅल्यू” असलेले, ते कुणा साध्या मारवाड्याकडे थोडेच विकायला जातील ? ते परदेशांतही जातील.
बरं मला सांगा, कुणी तुमच्याकडल्या चाव्यांच्या डुप्लिकेट बनवल्या असतील काय ?”
त्यावर चौघांनीही आपण चाव्या इतक्या बंदोबस्तात ठेवतो की त्या कुणाच्या हाती लागणार नाहीत, अशा अर्थाचेच उत्तर दिले.
यशवंत म्हणाले, “बरं ह्या दागिन्यांचा विमा तर असेलच ना !”
कुळकर्णी म्हणाले, “चार वर्षे झाली, आम्ही विमा काढणे बंद केले.
हप्त्याच्या रक्कमेत फार मोठी वाढ झाली.
मग आम्ही विमा काढलाच नाही.”
यशवंत म्हणाले, “ ठीक आहे, आम्ही लवकरच तिथे येऊ.”
ते गेल्यावर चंदू म्हणाला, “हे सर्व विश्वस्त अस्वस्थ कां होते ?
नवरात्रीपर्यंत दागिने मिळतील की नाही म्हणून की ह्यांत त्यांचाच कोणाचा हात असावा ?”
यशवंत म्हणाले, “चोरी झाली असणार, ह्यात शंका नाही कारण त्यांच्यापैकी कुणीही नवरात्र जवळ असतांना चोरी करतील इतके भोळे नाहीत.
मात्र ते जरा जास्तच अस्वस्थ होते, हे माझ्याही लक्षांत आलं.”
यशवंतानी लवकरच तिथे येतो, म्हटलं होतं पण तिथे जाऊन कांही फायदा होणार नव्हता, असं त्यांना वाटत होतं.
ते विचार करत होते की भारतात जर हे दागिने घेतलेच तर कोण घेईल ?
कां घेईल ?
देवीच्या बऱ्याच दागिन्यांची घडण कालसुसंगत नसल्याने सध्या वापरण्यासाठी कोणी घेण्याची शक्यता नव्हती.
ते वितळवून हाती लागणाऱ्या सोन्याची किंमतही फारशी नसती.
त्याला किंमत आहे ती जुने आणि देवीचे दागिने म्हणून.
म्युझियम, विशेषत: परदेशी म्युझियम ह्याला चांगली किंमत देऊ शकतो.
परंतु तो ही असा चोरीच्या मार्गाने घेणार नाही.
परदेशांतील अशा वस्तु जमविण्याचा शौक बाळगणारे श्रीमंतच हे दागिने चांगली किंमत देऊन घेतील.
ते चंदूला म्हणाले, “आपल्या खबऱ्यांकडून असे दागिने कुणी विकू पहात आहे कां ? ह्याबद्दल माहिती काढ.
ही चोरी करणारी कोणी टोळी वगैरे नसावी तर कुशल चोर असावा.
तिजोऱ्या उघडण्याचा सराव असलेला एकांडा चोर असला पाहिजे.
तो स्वत: एवढे महाग दागिने विकू शकणार नाही.
त्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल.
यशवंत आणि चंदू, ह्यांनी एकहाती तिजोरी उघडणाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मिळवायचा प्रयत्न केला.
तिजोऱ्या निकामी करून उघडणारे बरेच मिळाले पण चावीने उघडल्यासारखी उघडणारा कोणीही रेकॅार्डवर नव्हता.
दागिने विकत घेणारेही कांही विशेष माहिती देऊ शकले नाहीत.
कांही जण म्हणाले की हल्ली खऱ्या दागिन्यांपेक्षा खोटेच जास्त वापरले जात आहेत आणि चोरी करणाऱ्यांची फजिती होते आहे.
कांही माहिती मिळत नव्हती म्हणून यशवंत आणि चंदू देवी
तिजोरी पहायला गेले.
विश्वस्तांनी देवळात कोणीही नसतांना त्यांना ती खोली उघडून दाखवली.
ती तिजोरीही उघडून दाखवली.
अर्थात् कांही रोकड सोडली तर तिजोरी रिकामीच होती.
देवीचा उत्सव चार दिवसांवर आला होता.
यशवंत म्हणाले, “तुम्ही आता तरी ही चोरी पोलिसांना कळवा.”
विश्वस्त म्हणाले, “तीच वेळ येऊन ठेपलीय आमच्यावर.
आम्ही आजच पोलिसांत एफआयआर देत आहोत.
परंतु देवीमातेच्या कृपेने कांही चमत्कार होऊन चोर सांपडेल, अशी आम्हाला अजून आशा आहे.”
यशवंत म्हणाले, “अशा चोराला शोधण्यात पोलिस प्रवीण असतात.”
तिथून निघतांना यशवंत चंदूला म्हणाले, “हे विश्वस्त खरंच देवीवर विश्वास दाखवत आहेत की ह्यांना कांही बातमी मिळाली आहे, जी ते आपल्यापासून लपवतायत ?”
यशवंताना प्रथमपासूनच विश्वस्तांच वर्तन खटकत होतं.
प्रथम आले तेव्हा ते अतिशय घाबरलेले होते तर आता अगदी आश्वस्त वाटत होते.
यशवंतानी सर्वांची जास्त माहिती काढायला सुरूवात केली.
चौघेही विश्वस्त समाजात मान्यवर मानले जात होते पण कुळकर्णी बिल्डर असल्याने ते चाळीस टक्के तरी रोख विनापावतीची रक्कम घेऊनच व्यवहार करत असत.
देवळेकर रेडीमेड कपड्यांबरोबर इतर अनेक वस्तु बेकायदेशीरपणे पाठवत असत व हवाला व्यवहारही पूर्वी करत, अशी माहिती मिळाली.
डेंटीस्ट दिक्षित यांची स्वत:ची प्रॅक्टीस चांगली चालत होतीच पण वडिलांच वारशात मिळालेल हॅास्पिटल ते ‘मॅनेज’ करत व ते हॅास्पिटल त्यांची टांकसाळ झालेलं होतं.
थोडक्यात सर्व विश्वस्त कायदा वाकवणारे होते.
मग ते आपल्याकडे प्रथम आले तेव्हा घाबरले होते, त्याला तसंच कांही कारण असलंच पाहिजे.
दागिने त्यांच्या संमतीनेच लपवले/चोरले असतील.
कदाचित त्यापूर्वीही विश्वस्तांनी कांही तरी घोटाळा केला असेल.
त्यामुळेच ते घाबरले होते असावेत आणि त्यामुळेच ते आपल्याला सर्व खरं सांगत नसावेत.
ते काय लपवत होते. ते शोधून काढलंच पाहिजे.
यशवंत मुंबईत परत आले त्या दिवशी सकाळीच पेपरांत बातमी दिसली.
“देवीमातेचा चमत्कार. चोराला उपरती”.
चंदूने बातमी वाचून दाखवली, ती अशी होती, “XXXX येथील देवीमातेचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार विश्वस्तांनी चारच दिवसांपूर्वी पोलिसांत दिली होती.
देवीमातेचे दागिने एका भक्कम तिजोरीत असत पण एका निष्णात चोराने ती तिजोरी उघडून ते दागिने चोरले होते.
दागिन्यांची किंमत सुमारे दोन कोटी होती.
देवीचा महोत्सव जवळ आलेला असतांनाच ही चोरी झाल्यामुळे सर्व भक्त चिंतेत होते.
अनेक लोकांनी वर्गणी जमवून दागिने घेऊन देण्याची तयारीही दाखवली होती पण असे जुन्या बनावटीचे अस्सल दागिने कुठे मिळणेच शक्य नव्हते.
सर्व शहरांत आणि दूरदूरचे भक्त चिंता करत असतांना देवीने चोराचेच हृदयपरिवर्तन केले.
चोराला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप वाटू लागला व त्याने सर्व दागिने पुन्हा तिजोरीत परत आणून ठेवले.
बरोबर एक चिठ्ठीही ठेवली होती.
त्या चिठ्ठीत लिहिले आहे. “देवीमातेने मला स्वप्नांत येऊन सांगितले की मी तिचे दागिने परत तिजोरीत नेऊन ठेवावेत.
तिची आज्ञा मानली तर मदत करण्याचे आश्वासनही दिले.
आज्ञा मानली नाही तर कायमची वणवण करायला लावीन असंही देवी म्हणाली.
त्या आज्ञेला अनुसरून मी धोका पत्करून सर्व दागिने परत तिजोरीत ठेवत आहे.
देवीमातेचा विजय असो.”
चंदू म्हणाला, “मामा, हा चोर ह्या विश्वस्तापैकीच नाही ना ?”
यशवंत म्हणाले, “नसावा. आपले काम तर आता संपले आहे पण मलाही अजून विश्वस्तांबद्दलच संशय आहे.”
दोन दिवसांनी यशवंताना पोस्टातून एक पत्र आलं, “आदरणीय धुरंधर साहेब, आपण आताच एका केसचा उलगडा केलात.
चोराला उपरती होऊन त्याने देवीला भिऊन तिचे सर्व दागिने परत तिजोरीत आणून ठेवले.
परंतु साहेब “अंदरकी बातही कुछ और है.” ते दागिने मीच चोरले होते.
मी कुठलीही तिजोरी सहज उघडू शकतो.
ते दागिने मी माझ्या विश्वासांतील एका सोनाराला दाखवले.
त्याने त्या दागिन्यांना कुणी दोन लाख रूपयेही देणार नाही, असे सांगितले.
तो म्हणाला, “हे देवीचे मुळचे दागिने नाहीत.
मुळचे दागिने लंडनच्या व युरोपमधील इतर म्युझियम्समध्ये विखूरलेले आहेत.
फार पूर्वीच ते विकून, त्याच्या जागी हे बनावट दागिने विश्वस्तांनी ठेवले आहेत.”
मला काय करावे, हे प्रथम सुचेना.
दीड दोन लाख मिळताहेत, ते घेऊन गप्प बसतां आलं असतं.
पण मला ते माझ्या कौशल्याच चीज वाटेना.
मग मी विश्वस्तांशी संपर्क साधला.
त्यांना म्हणालो, “तुम्ही देवीचे खरे दागिने विकून तिथे नकली ठेवून खूप पैसा केला आहेत.
आतां तुमची अब्रू माझ्या हातांत आहे. मी हे दागिने बनावट आहेत व तुम्ही खरे आधीच विकले आहेत, हे जाहिर करतो.
तसं करायला नको असेल तर चौघांनी मिळून मला पंचवीस लाख रूपये द्या.
सर्व दागिने मी परत तिजोरीत ठेवतो.”
विश्वस्तांनी फार वेळ विचार केला नाही.
मला माझे पंचवीस लाख मिळाले.
मी ते बनावट दागिने परत तिजोरीत नेऊन ठेवले.
आपल्याला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, अशी आशा आहे.
आपला आदर करणारा, चोर
चंदूचे पत्रवाचन पूर्ण होताच यशवंत आणि चंदू दोघे मोठ्याने हंसले.

वि,सू. ह्यांतील सर्व पात्रे, प्रसंग काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

– अरविंद खानोलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..