धारधार तरी उगाच चालुनी जाते
बाण ही बोथट होती नतमस्तकी
मुठीत येणे दुर्लभ तरी करे प्रयत्ने
जिव्हा कोणाच्या काबूत येते?
अर्थ–
पूर्वीच्या काळी रणांगणावर आपले कर्तृत्व दाखवायला अनेक प्रकारची शस्त्रे असायची. तलवार, भाला, धनुष्यबाण इत्यादी पण जसा काळ बदलत गेला तशी शस्त्रे सुद्धा अपग्रेड होत गेली. म्हणजे तलवार, भाले जाऊन बंदुका आल्या. मग काळ बदलला आणि हीच शस्त्रे अजून जास्त चांगल्या स्वरूपात येऊ लागली. पण या सगळ्यात एक शस्त्र मात्र पूर्वापार चालत आलेले आहे. त्यात काळानुरूप बदल नाही की काही नाही पण त्याची धार अजूनही तशीच सर्वात जास्त आहे. बाकी शस्त्रे कधी उगाच चालवत नाहीत पण हे शस्त्र मात्र कधी कधी कारण नसतानाही चालवले जाते. अगदी तीक्ष्ण बाणांच्या टोकापेक्षाही याचे टोक हे जास्त भयंकर असते तसेच या शस्त्र ला तलवार, दांडपट्टा, भाला, धनुष्यबाण, बंदूक यांसारखे मुठीत पकडणे हे दुरापास्त आहे. कारण इतर शस्त्रे मुठीत धरूनच चालवावी लागतात पण हे शस्त्र चालवायला मूठ नाही तर मन घट्ट असावं लागतं. या शस्त्राचे नाव म्हणजे ‘ जीभ’ होय. भलेभले या शस्त्रावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आणि त्यांच्या जीवनाची माती झाली.
गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याने जिभेवर नियंत्रण मिळवले त्याने परमार्थाची अर्धी लढाई जिंकली असं समजायचं. तर अशा ह्या धारदार टोकेरी शस्त्रावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समर्थांच्या मनाच्या श्लोकांना आत्मसात करणे फार गरजेचे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply