नवीन लेखन...

धडाकेबाज इग्नेश्यस

(सर जेफ्री आर्चर यांच्या CLEAN SWEEP IGNATIUS या कथेचा मुक्त मुक्त अनुवाद)

इग्नेश्यस अगार्बी जेव्हा नायजेरियाचा वित्तमंत्री म्हणून नेमला गेला तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. साहजिकच आहे, गेल्या सतरा वर्षातला तो सतरावा वित्तमंत्री झाला होता ना. नेमणूक झाल्यावर पार्लमेंटमधल्या पहिल्याच भाषणात त्याने ठणकावून सांगितलं की तो समाजातली लाचलुचपत, भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून टाकण्यासाठी वित्तमंत्री झाला आहे, ज्या सरकारी अधिकाऱ्याचं वर्तन धुतल्या तांदळासारखं नसेल अशानं हा स्पष्ट इशारा समजून सरळ मार्गावर यावं अन्यथा त्याची गय केली जाणार नाही. भाषणाची अखेर त्यानं ‘नायजेरियाला लागलेली ही कीड मी निर्दयपणे चिरडून टाकणार आहे’ या गर्जनेने केली.

पण त्याचं हे भाषण कुणीही गंभीरपणे घेतलं नाही. लागोसच्या दैनिक टाइम्समध्येही त्या भाषणाला स्थान दिलं गेलं नाही. कदाचित संपादकाला वाटलं असावं की आजवरच्या सोळा वित्तमंत्र्यांची असलीच भाषणं वाचकांनी वाचली आहेत त्यामुळं ह्या भाषणात त्यांना नवीन काहीच वाटणार नाही. मग छापून रकाने वाया घालवा कशाला?

पण या लोकांनी दाखवलेला हा अविश्वासच इग्नेश्यसचा निश्चय दृढ करून गेला. त्यानं आपल्या या नव्या कामगिरीची सुरुवात मोठ्या धडाक्यानं केली. अगदी आठवड्याभरातच त्यानं व्यापार मंत्रालयातल्या एका दुय्यम अधिकाऱ्याची अन्नधान्य आयातीच्या मामल्यात खोटे दस्तावेज बनवल्याबद्दल सरळ तुरुंगात रवानगी केली. इग्नेश्यसच्या नव्या विटीचा दुसरा टोला एका प्रसिध्द लेबानीज धनिक सावकाराला बसला. वित्त विनिमय निर्बंध तोडल्याबद्दल त्याची देशातून विनाचौकशी, ताबडतोबीने हकालपट्टी करण्यात आली. एक महिन्यानंतर इग्नेश्यसने कमालच केली. नायजेरियाच्या पोलीस प्रमुखालाच लाच घेण्याच्या गुन्ह्याखाली अटक केलं. आजवर पोलीस खात्यातील नोकरीमध्ये लाच हा पगाराव्यतिरिक्तचा भत्ताच समजला जायचा. वावगं वाटायचंच नाही कुणाला त्यात. चार महिने विनाचौकशी अटकेत ठेवल्यानंतर त्या पोलीसप्रमुखाला आठरा महिन्याच्या सक्तमजुरीसाठी तुरुंगात टाकलं गेलं. या प्रकरणामुळं दैनिक टाइम्सला इग्नेश्यसची दखल घ्यावीच लागली. पहिल्या पानावरच्या मथळ्यात त्याला ‘धडाकेबाज इग्नेश्यस’ म्हणून गौरवलं गेलं. गुन्हेगार लोकांना आता धडाकेबाज इग्नेश्यसची दहशत वाटायला लागली. अटकांचं सत्र सुरूच राहिलं तसतसा इग्नेश्यसचा दबदबा आणखीन वाढत गेला. लोकांमध्ये पसरलेल्या एका अफवेनुसार तर खुद्द नायजेरियाच्या अध्यक्ष जनरल ओतोबीची देखील चौकशी वित्तमंत्री इग्नेश्यसनं आरंभली आहे असं म्हटलं जाऊ लागलं.

एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची सगळी विदेशी कंत्राटे आता इग्नेश्यस स्वत: तपासून आवश्यक तर त्यातल्या अटी बदलून नवीन लिहू लागला. त्याना मंजुरी देणंदेखील तो स्वत:च करायचा. इग्नेश्यसनं वित्त मंत्री म्हणून घेतलेला प्रत्येक निर्णय त्याचे राजकीय विरोधक घारीच्या नजरेनं पारखत होते. पण त्याला नावं ठेवायला जराही कारण मिळालं नाही त्यांना.

वित्तमंत्री म्हणून त्याच्या कारकिर्दीचं दुसरं वर्ष सुरु झालं तेव्हा शंकेखोरांनी देखील त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक करायला सुरुवात केली. त्याच सुमाराला राष्ट्राध्यक्ष जनरल ओतोबीनी त्याला अचानक काही खासगी विचारविनिमयासाठी म्हणून बोलावून घेतलं.

डोडन बरॅक्समधल्या राष्ट्राध्यक्षांचा खासगी कचेरीत इग्नेश्यस आला तेव्हा जनरल ओतोबीनी त्याचं मिठी मारून स्वागत केलं आणि निर्देश करून एका गुबगुबीत खुर्चीत बसवलं.

“इग्नेश्यस, मी तुझा वित्तीय अंदाजपत्रकावरचा अहवाल वाचला. देशाच्या खजिन्यात भर पडायच्या ऐवजी कोट्यावधी डॉलर्स लाच म्हणून परदेशी दलालांच्या खिशात पडताहेत हा तुझा निष्कर्ष वाचून सुन्न झालो. खरोखरच काळजी करण्यासारखी परिस्थिती दिसते. पण हे दलाल कोण असतील असं वाटतं तुला?”

इग्नेश्यस खुर्चीत ताठ बसला. अध्यक्षांच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला, “मला दाट संशय आहे यातला जास्तीतजास्त पैसा स्विस बँकेतल्या खात्यांमध्ये भरला जातोय, पण पुराव्याअभावी खात्रीपूर्वक काहीच सांगू शकणार नाही मी.”

“हे बघ, इग्नेश्यस, मी तुला आवश्यक ते सगळे अधिकार देतो पण तू याचा छडा लाव,” जनरल ओतोबी म्हणाले. “काहीही करून हे जे कुणी हरामखोर असतील त्याना तू शोधून काढ. अगदी सरकारी मंत्र्यांच्या चौकशीपासून सुरुवात केलीस तरी माझी हरकत नाही. आता अधिकारावर असलेल्या किंवा नसलेल्या, कुणाचीही भीती बाळगू नकोस नि कुणाच्या दबावामुळं घाबरूही नकोस.”

“जनरल, त्यासाठी मला तुमच्या सहीशिक्क्याचं अधिकारपत्र मिळायला हवं.” इग्नेश्यस म्हणाला.

“आज संध्याकाळी सहाच्या आत ते तुझ्या टेबलावर असेल.”

“आणि त्याचबरोबर मला जेव्हा जेव्हा परदेश प्रवास करायला लागेल तेव्हा तेव्हा अँबॅसेडर लेव्हलचे सारे अधिकार माझ्यापाशी असायला हवेत.”

“दिले.” जनरल ओतोबीनी तात्काळ हमी दिली.

“थँक यू जनरल.” म्हणत इग्नेश्यस मीटिंग संपली अशा कल्पनेने उठून जायला निघाला.

“आणि हो, इग्नेश्यस, हे पण तुझ्याजवळ ठेव,” दाराजवळ जाताना म्हणत जनरल ओतोबीने एक छोटे ऑटोमॅटिक पिस्तूल इग्नेश्यसच्या हातात ठेवले. “तुला गरज लागेल, कारण एव्हाना तुझ्या शत्रूंची संख्या जवळजवळ माझ्या शत्रूंएवढी झाली असेलच.”

इग्नेश्यसने थोडेसे अवघडून जाऊनच जनरलच्या हातातून ते पिस्तुल घेउन आपल्या खिशात टाकले, जनरलचे आभार मानत निरोप घेतला आणि गाडीत बसून आपल्या मंत्रालयाकडे निघून गेला.

नायजेरीयन सेन्ट्रल बँकेच्या गव्हर्नरला किंवा इतरही कुणा उच्चपदस्थ अधिकाऱ्याना गुंडाळून ठेवून इग्नेश्यसने आपलं हे नवं काम सुरू केलं. दिवसरात्र एक करत त्यानं चौकश्यांचा धडाका लावला. पण चौकशीत काय सापडतंय याची कुणाकडेही अजिबात वाच्यता केली नाही.

तीन महिन्यांनंतर इग्नेश्यस झडप घालायला तयार झाला. विदेश प्रवासासाठी त्यानं ऑगस्टचा महिना मुक्रर केला. बरेच नायजेरियन्स त्या काळात सुट्टीवर जातात त्यामुळे त्याची अनुपस्थिती कोणालाही दखल घेण्यासारखी वाटली नसती हे त्यामागचे कारण होते.

इग्नेश्यसनं सेक्रेटरीला तो, त्याची बायको आणि त्यांच्या दोन मुलांची ओर्लांडो-फ्लोरिडा इथं जाण्याची विमानाची तिकिटं काढायला सांगितलं. सरकारी पैशांनी नव्हे तर त्याच्या स्वत:च्या खात्यातून. फ्लोरिडाला पोचल्यावर सारं कुटुंब तिथल्या मॅरीयट हॉटेलमध्ये उतरलं. इग्नेश्यसनं त्याच दिवशी बायकोला सांगितलं की तो थोड्या दिवसांसाठी न्यूयॉर्कला जाणार आहे सरकारी कामावर, आणि नंतर फ्लोरिडाला येऊन उरलेली सुटी त्यांच्याबरोबर घालवणार आहे. दुसऱ्या दिवशी बायको आणि मुलांना डिस्ने वर्ल्ड बघायला सोडून इग्नेश्यसनं न्यूयॉर्कचं विमान पकडलं. केनेडी विमानतळावर उतरल्यानंतर तिथेच कपडे बदलले आणि जिनेव्हाला जाणाऱ्या स्विसएअरचं तिकिट काढून विमानात बसला.

संध्याकाळी उशीरा विमान जिनेव्हाला पोचलं. तिथल्या एका अगदी साध्या दिसणाऱ्या हॉटेलात खोली घेऊन धावपळीनं थकलेल्या इग्नेश्यसनं कॉटवर अंग टाकलं आणि चांगलं आठ तास गाढ झोपून गेला. सकाळी ब्रेकफास्ट घेताना त्यानं लागोसमध्ये गेले तीन महिने खपून तयार केलेली परदेशी बँकांची यादी पुन्हा पुन्हा तपासली आणि गर्बर एट सीये या बँकेपासून सुरुवात करायचं ठरवलं. या बँकेची प्रशस्त इमारत इग्नेश्यसला त्याच्या खोलीतून जवळच दिसत होती. अव्हेन्यू डी पारचिनचा निम्म्याहून जास्त भाग व्यापला होता त्या इमारतीनं. हॉटेलच्या स्वागत कक्षातून त्यानं बॅंकेचा फोन नंबर मिळवला आणि तो जोडायला सांगून बँकेचे चेअरमन मिस्टर गर्बर यांच्याशी संभाषण केलं. चेअरमननी दुपारी बारा वाजताची वेळ दिली भेटण्यासाठी.

एक जुनाट अशी ब्रीफकेस हातात घेतलेला इग्नेश्यस बाराला पाच मिनिटं कमी असतानाच बँकेत पोचला. त्याची वाट बघत उभ्या असलेल्या, राखाडी रंगाचा सूट, शुभ्र पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाचाच टाय परिधान केलेल्या तरुण अधिकाऱ्याच्या दृष्टीनं हे अनपेक्षितच होतं, विशेषत: नायजेरियन व्यक्तीकडून. त्या तरुण अधिकाऱ्यानं इग्नेश्यसला वाकून अभिवादन केलं, आपली ओळख बँकेचे चेंअरमन मिस्टर गर्बर यांचा सेक्रेटरी अशी करून दिली आणि नंतर त्याला आकराव्या मजल्यावर असलेल्या चेअरमनच्या ऑफिसकडे घेऊन गेला. जाताना दोघांपैकी कुणीही काहीही बोललं नाही. ऑफिसच्या दारात पोचल्यावर त्यानं दारावर टकटक केली तेव्हा आतून आवाज आला. “एन्त्रेज” (आत या). मग दोघेही आत गेले.

“नायजेरियन फायनान्स मिनिस्टर हिज एक्सलन्सी इग्नेश्यस अगार्बी, सर.” तरुणाने परिचय करून दिला.

तसाच राखाडी रंगाचा सूट, शुभ्र पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाचाच टाय परिधान केलेल्या चेअरमननी टेबलामागील खुर्चीवरून उठून पुढं येत इग्नेश्यसचं स्वागत केलं.

“गुड मॉर्निंग, मिनिस्टर,” चेअरमन म्हणाले. “या, बसा ना.” आणि त्यांनी हॉलच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या बैठ्या, काचेच्या टेबलाभोवती असलेल्या गुबगुबीत आरामशीर खुर्च्यापैकी एकीकडे निर्देश केला. इग्नेश्यस आणि सेक्रेटरी आणि स्वत: चेअरमन खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर चेअरमन म्हणाले, “मी कॉफी मागवलेली आहे. चालेल ना?” इग्नेश्यसने मान हलवून होकार दिला आणि हातातली ब्रीफ केस जमिनीवर, पायाशी ठेवली. जुजबी इकडच्या तिकडच्या गप्पा होईपर्यंत एका मुलीने कॉफी आणून तिघानाही दिली आणि ती खोलीच्या बाहेर निघून गेली. ती गेल्यानंतर इग्नेश्यसने मुद्द्याला हात घातला.

“मिस्टर चेअरमन, माझ्या राष्ट्राध्यक्षानी माझ्यावर एक जरा खास अशी कामगिरी सोपवली आहे,” चेअरमन आणि त्यांचा सेक्रेटरी, कुणाच्याही चेहऱ्यावर हे ऐकून काही आश्चर्य वाटलं असा भाव उमटला नाही. “ज्या नायजेरियन नागरिकांनी तुमच्या बँकेमध्ये खाती उघडून पैसे ठेवले आहेत त्यांची नावं हवी आहेत त्यांना. ही आहे ती कामगिरी.”

“अशी माहिती उघड करणं माझ्या अधिकारात नाही मिस्टर मिनिस्टर. आणि…..” निर्विकारपणे चेअरमन बोलायला लागले.

“एक मिनिट, जरा मला बोलू द्या,” इग्नेश्यस उजव्या हाताचा पंजा वर करून चेअरमनला आडवत म्हणाला. “मी इथं आलो आहे तो माझ्या सरकारने दिलेल्या निखळ अधिकारासहच आलो आहे. हे पहा.” त्यानं सावकाशपणे आपल्या जाकिटाच्या आतल्या खिशातून एक लिफाफा बाहेर काढला आणि चेअरमनच्या हातात दिला. चेअरमनने लिफाफ्यात असलेलं अधिकारपत्र शांतपणे वाचलं आणि एकवार घसा खाकरून म्हणाले, “हे असलं अधिकारपत्र आमच्या देशात मान्य होत नाही मिस्टर मिनिस्टर,” त्यांनी ते पत्र पुन्हा लिफाफ्यात घालून इग्नेश्यसच्या हातात ठेवलं आणि पुढं म्हणाले, “अर्थात, तुम्हाला मिनिस्टर आणि राजदूत (अँबॅसेडर) या दोन्ही पदांचे अधिकार तुमच्या सरकारने दिले आहेत याबद्दल मला अजिबात शंका नाही. पण तरीही आम्ही आमच्या बँकेचे गोपनीयतेचे नियम बदलू शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या खातेदारांची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय उघड करू शकत नाही. क्षमा करा, पण या बँकेचे नियम कधीच मोडले जाणार नाहीत.”

चेअरमन मीटिंग संपवण्यासाठी खुर्चीतून उठून उभे राहिले. पण त्याना माहित नव्हतं त्यांची गाठ धडाकेबाज इग्नेश्यसशी होती ते.

सूर जरासा खाली आणत इग्नेश्यस म्हणाला, ‘माझ्या राष्ट्राध्यक्षानी नायजेरिया आणि स्वित्झर्लंड या दोन देशांत भविष्यात होणाऱ्या सर्व करारमदारांसाठी मध्यस्थ म्हणून माझी नेमणूक केलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं मिस्टर चेअरमन.”

“आमच्या देशाचा हा बहुमान समजतो आम्ही मिस्टर मिनिस्टर,” उभे राहूनच चेअरमन म्हणाले. “पण तरीही आमच्या खातेदारांच्या आमच्यावरच्या विश्वासाला तडा जाईल अशी कुठलीही कृती आम्ही करू शकत नाही हे तुम्हीही कृपया ध्यानात घ्या.”

इग्नेश्यस अविचलित राहिला.

“तर मग, मिस्टर गर्बर, जिनेव्हामधल्या आमच्या राजदूताला आदेश दिला जाईल आमच्या नागरिकांच्या खात्यांची माहिती देण्यातल्या तुमच्या असहकाराबद्दल स्विस विदेश मंत्रालयाकडे अधिकृत निषेध खलिता द्या म्हणून,” इग्नेश्यस धमकीच्या सुरात बोलला. “ही संभाव्य अप्रियता तुम्ही टाळू शकाल…गर्बर एट सीये बँकेतील आमच्या नागरिक खातेदारांची नावं आणि खात्यातील रकमांची माहिती देऊन….. मी शब्द देतो की ही माहिती कुठून मिळाली ते आम्ही कोणाला कळू देणार नाही.”

“तुम्ही द्या तसा निषेध खलिता, पण मिस्टर मिनिस्टर, आमचे विदेश मंत्री ठामपणे तुमच्या राजदूताच्या लक्षात आणून देतील की स्विस कायद्यांनुसार कोणत्याही बॅंकेकडून अशी माहिती देवविण्याचे अधिकार स्विस विदेश मंत्रालयाच्या अखत्यारीत नसतात.” चेअरमन मिस्टर गर्बर यांनी रोखठोक जवाब दिला.

“तर मग ही माहिती मिळेपर्यंत स्विस कंपन्यांशी कुठलेही व्यवहार भविष्यात केले जाऊ नयेत अशी आमच्या व्यापार मंत्रालयाला मी ताकीद देईन.”

“तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता मिस्टर मिनिस्टर. पण आमच्याकडून खातेदारांची माहिती उघड केली जाणार नाही हे निश्चित समजा.”

“आणि, मिस्टर गर्बर, सध्या नायजेरियात स्विस कंपन्यांबरोबरची जी कंत्राटे चालू आहेत ती ताबडतोब रद्द केली जातील, काहीही नुकसानभरपाई न देता. हे लक्षात असू द्या.”

“तुम्ही हे फार ताणता आहात मिस्टर मिनिस्टर.”

“इतकंच नव्हे मिस्टर गर्बर,” इग्नेश्यसनं आणखी एक बाण भात्यातून काढला. “तुमच्या नायजेरियन खातेदारांची नावं मिळवण्यासाठी याही पलिकडे जाऊन मी तुमच्या देशाला माझ्या देशासमोर गुढगे टेकायला लावायलाही मागं पुढं बघणार नाही.”

“ठीक आहे मिनिस्टर, तुम्ही तसं करू शकाल. पण तरीही आम्ही गोपनीयतेची नीति बदलणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ समजा.”

“तसं असेल तर, सर, मी आजच आमच्या राजदूताला जिनेव्हामधला दूतावास बंद करायच्या सूचना देतो आणि लागोसमधला तुमचा राजदूत ‘स्वागतार्ह नसलेली व्यक्ति’ (पर्सोना नॉन ग्राटा) म्हणून जाहीर करतो.” चेअरमन गर्बर यांनी भुवया उंचावल्या पण काही बोलले नाही. इग्नेश्यस पुढं म्हणाला, “आणि मी स्वत: लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमच्या सरकारची या बँकेच्या व्यवहाराबद्दलची तीव्र नाराजी कडक शब्दात मांडेन. जगभरच्या वृत्तपत्रातून याची बातमी दिली जाईल. अशी नकारात्मक प्रसिद्धी जगभर झाल्यावर तुमच्या या बँकेचे बहुतांश खातेदार आपल्या ठेवी काढून घेऊन खाती बंद करतील. केवढ्याला पडेल हे याचा विचार करा.”

इग्नेश्यस बोलायचं थांबवून चेअरमनच्या तोंडाकडं प्रत्युत्तरासाठी बघत राहिला. अजूनही चेअरमन काहीच बोलले नाही.

“ठीक आहे तर. तुम्ही मला भाग पाडता आहात…” म्हणत इग्नेश्यस उठून उभा राहिला. अखेर मीटिंग संपली अशा समजुतीने चेअरमननी हस्तांदोलनासाठी हात पुढं केला. पण घडलं भलतंच. इग्नेश्यसनं जाकिटाच्या खिशातून पिस्तुल बाहेर काढलं. चेअरमन आणि त्यांचा सहाय्यक, दोघंही भयभीत होऊन बघतच राहिले. नायजेरियन वित्त मंत्री इग्नेश्यसनं एक पाउल पुढं टाकलं आणि पिस्तुलाची नळी चेअरमन गर्बरच्या कानशिलावर टेकवली.

“मला ती नावं हवी आहेत, मिस्टर गर्बर, आणि एव्हाना तुमच्या ध्यानात आलं असेलच की मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. तुम्ही जर आत्ताच्या आत्ता मला हवी असलेली माहिती दिली नाही तर तुमच्या मेंदूच्या चिथड्या उडवीन मी. समजलं?”

चेअरमननी मान थोडीशी हलवली. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब दिसायला लागले. “आणि तुमच्यानंतर या तुमच्या सेक्रेटरीचा नंबर असेल.” गर्भगळीत होऊन उभ्या असलेल्या गर्बरच्या सहाय्यकाकडे निर्देश करून इग्नेश्यसनं धमकावलं.

“बँकेत खाती असलेल्या सगळ्या नायजेरियन्सची नावं घेऊन ये,” इग्नेश्यसनं सहाय्यकाकडे नजर रोखून शांतपणे सांगितलं, आणि नंतर स्वर जरा चढवून बोलला, “नाही तर तुझ्या चेअरमनचा मेंदू या कार्पेटवर विखरून देईन. ऐकलंस ना? जा.”

सहाय्यकानं चेअरमनकडं बघितलं. चेअरमन थरकापत होते पण तरीही स्पष्टपणे म्हणाले, “नाँ, पिएर, जमै ! (नाही, पिएर, कदापि नाही !)

“ड’ऍकोर्द माँस्यू” (ओके, सर.)

“ठीक, मी तुम्हाला हर प्रकारची संधी दिली. नाकारू शकणार नाही तुम्ही.” इग्नेश्यसनं पिस्तुलाचा खटका मागं ओढला. चेअरमनच्या चेहऱ्यावरून आता घामाच्या धारा वाहायला लागल्या. सहाय्यकानं मान दुसरीकडं वळवली, बघवलं नसतं त्याच्याच्यानं म्हणून. मुकाट्यानं गोळी झाडल्याचा आवाज येण्याची वाट बघत राहिला.

“एक्सलंट ! उत्तम !” म्हणत इग्नेश्यसनं पिस्तुल चेरमनच्या कानशिलावरून हटवलं आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसला. चेअरमन आणि सहाय्यक, दोघेही काही बोलू शकत नव्हतेच. इग्नेस्यसनं पिस्तुल खिशात घातलं, पायाजवळची ब्रीफ केस उचलून टेबलावर ठेवली आणि खटका दाबून उघडली.

बँकेच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी उघड्या ब्रीफकेसकडं बघितलं. आत व्यवस्थित रचलेली डॉलर्सची बंडलं होती. तसूभरही जागा शिल्लक न राहता ठासून भरलेली. चेअरमननी त्यांच्या सरावलेल्या नजरेनं अंदाज केला, पन्नास लाख तरी डॉलर्स होते.

“तुमच्या बँकेत गुप्त अकाउंट उघडायचा आहे मला माझा. वैय्यक्तिक. काय करायला हवे?” वित्तमंत्री इग्नेश्यस अगार्बीनी विचारलं

— मुकुंद कर्णिक

****

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

4 Comments on धडाकेबाज इग्नेश्यस

  1. व्वा ! खूप छान! आर्चरची मूळ कथा वाचली होती काही वर्षांपूर्वी तेव्हा जितकी आवडली कथा तितकीच आज मातृभाषेत वाचताना आवडली…. मराठीचा बाज चांगला जमून आलाय … भारी ! शेवट अगदी भन्नाट!!!

  2. शेवट कहानी में ट्विस्ट भारीच! यालाच म्हणतात हलवून खुंटा बळकट करणे. अनुवाद उत्तम.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..