जाने का समय आ गया
अमिताभचे हे वाक्य अनेकांना चटका लावून गेलं. जाने वाले कभी नही आते जाने वाले की याद आती है. आपल्यात असलेली व्यक्ती आपल्यातून जाणार त्यामुळे वाईट वाटतंच. काही माणसांचं नसणं हे सहनच होत नाही, पण आठवणींचे सलाईन आपल्याला जिवंत ठेवतं, शक्ती देतं, प्रेरणा देतं, जगण्याचं बळ देतं. प्रत्येकाचे नायक, गायक ठरलेले असतात.
कोन बनेगा करोडपती मध्ये प्रत्येकाला मान देणारा, न्याय देणारा, समजून घेणारा,खोटं खोटं न हसणारा, गंभीर होणारा अभिताभ. एकेक नायक एक एक पिढीवर राज्य करत असतो, अनेकांच्या मनावर राज्य करत असतो.
ढळला रे ढळला दिन सखाया संध्या छाया भिवविती हृदया लागले नेत्र पैलतिरी आता प्रभूचे नाम कासया या ओळी जीवनाचं वास्तव आहे. पण शेवटच्या क्षणावर शिक्कामोर्तब करावच लागतं. येणारां क्षण आपल्या हातात नसतों, तसा जाणारा क्षण आपल्या हातात नसतो.
आपल्या प्रिय व्यक्ती जबाबतीत मन घट्ट करा हे वाक्य मनाची समजूत काढतं. जाणं अटळ आहें हे माहीत असूनही शेवटच्या श्वासापर्यंत माणसांची धडपड असते, त्याच्या नातेवाईकांची ही धडपड असते, जास्तीत जास्त आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभावा, शरीराने, मनाने आणि नाहीच लाभला तर शेवटी आठवणीने आपण त्यांना जिवंत ठेवतो. आठवणीत माणसे कधी मरत नाहीत, ती स्मरत असतात,ती जिवंत असतात, आपल्याशी संवाद साधतात, आपल्याला मार्ग दाखवतात. आपण समजूत करून घेतो की ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत, ते स्वर्गातून पाहत आहे ही आपली मनाची समजूत, आपल्याला जगण्याला बळ देते.
जायची वेळ कधी कधी माणसें आपल्यावर ओढवून घेतात. शेवटी राख होणार आहे हे माहीत असूनही राखेतून फिनीक्स पक्षाप्रमाणे आपल्याला उभारी घ्यायची आहे हे सतत लक्षात ठेवायचे आहे. आपल्यातलें निखारे सतत आपण फुलवत ठेवले पाहिजे, विझू देता कामा नये. जे विझतं ते संपतं. विखाऱ्याला हवा मिळाली की ते पुन्हा पेटतात. माणसांनाही माणसांची संगत मिळायला हवी, माणसाशी संवाद साधण्याची संधी मिळायला हवी तरच माणसातलं माणूस पण जगतं. एकांतात माणसं संपून जातात, कधी कधी विचार त्यांना संपवतात, वेगळ्या मार्गावर नेऊन अस्तित्व संपवतात.फिंदरी पुस्तकाच्या लेखिका सुनिता बोर्डे या नकोशी म्हणून जमीनीत पुरलेल्या मुलीने हवीशी म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.जाता जाता इतिहास घडवतात माणसें.
आत्महत्या करण्याचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात पण ते टाळणं ज्याला जमलं तोच खरा विजेता. मोहाचे क्षण जसे टाळायला हवेत तसेच नैराश्याचे क्षण ही टाळायला हवेत.
आत्महत्याच्या प्रसंगी त्याच्या अवतीभवती असणाऱ्यांनी त्याला सावरलं, त्यापासून प्रवृत्त केलं तर आत्महत्या टळू शकते. जयाप्रदा यांनी दोन वेळेस स्वतःला संपवण्यासाठी प्रयत्न केला होता.अनेक जणांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नातून स्वतःला सावरलं किमान दुसऱ्यांनी त्यांना सावरलं म्हणून आज ते जगत आहेत. पुस्तक वाचताना एखादं पान रटाळ असेल किंवा आपण त्यात रमत नसू तर ते पुस्तक वाचणं बंद करायचं नसतं. आयुष्याचं ही असच आहे. काही प्रसंग नकोसे असले तरीही पुस्तकातल्या पुढच्या पानात जसं काहीतरी आशादायक, मन प्रसन्न करणारं असतं, तसं आयुष्यातही अनेक गोष्टी पुढे चांगल्या घडणार असतात त्यासाठी प्रतीक्षा करायला हवी. आत्महत्या करणारी माणसे मरतात पण लहान मुलांना घेऊनही मरतात. वास्तविक त्या लहान मुलाला पुढे कोणीतरी वाढवतं व तो एक मोठा यशस्वी माणूसही बनतो.
शेवटी सगळच शून्य आहे पण आपण त्याच्या बाजूला डावीकडे का उजवीकडे उभे राहतो यावर जसं संख्येचे महत्व जसं असतं तसं जीवनातही आपल्याला कुठे आणि कसं उभं रहायचं हे ठरवता यायला हवं.
मृत्यूचे विचार उतार वयात जास्त यायला लागतात. मृत्यू आहेच पण मृत्यूपर्यंतच्या प्रवास कसा सुखद होईल हे आपल्याही हातात असतं. आजूबाजूला नैराश्य असलं तरीही दवाबिंदूप्रमाणे आपण तटस्थ राहून अस्तित्व टिकवायचं असतं. पहिल्या श्वासासाठी आपल्याला रडवलं जातं आणि शेवटच्या श्वासाला आपण दुसऱ्यांना रडवतो.
पहिला श्वास अस्तित्वाचा असतो व शेवटचा श्वास अस्तित्व मिटवण्याचा असतो. अनेकांचं अस्तित्व युगानुयुगे टिकून आहे कारण त्यांनी लोकांच्या मनात घर केलेलं आहे. हे भाग्य स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जे जगले ते अमर झालें.
वाक्यात पूर्णविराम कुठे द्यायचा ते विचार करणाऱ्यांच्या व लिहिणाऱ्याच्याही हातात असतं. मध्ये मध्ये समाधानाचा स्वल्पविराम देणं जसं आवश्यक असतं तरच वाक्य कंटाळवाणं वाटत नाही व अर्थपूर्ण वाटतं तसंच आयुष्याचं आहे.
अस्तित्व क्षणिक असतं म्हणून दवबिंदूची कुठे तक्रार असते. दवबिंदू पानाचं, निसर्गाचं सौंदर्य वाढवतात तसंच कुणाच्यातरी आयुष्यात आपण दवबिंदू असावं.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply