नवीन लेखन...

‘धनुष्यबाण’, ‘नारायणास्त्र’ ते ‘वज्रस्त्र’ !

नारायण “राणे आणि महाराष्ट्र स्वाभिमान”..!!
“धनुष्यबाण, “नारायणास्त्र” ते “वज्रस्त्र’…!

गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसार माध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला. एक “स्वाभिमान” दुखावलेला कोकणातील नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी काल आपली नवीन दिशा जाहीर केली. राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नाव जाहीर केले.

काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजपकडून सध्यातरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ सोबत घेण्यास रेड सिग्नल आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राणे यांनी भाजपाअध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली होती. त्यावेळी सध्यातरी नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढत एनडीएला पाठींबा द्यावा असा सल्ला देण्यात आल्याच बोललं जातं. या सर्व घडामोडींवरून राणे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वच लक्ष लागले होते.

हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा. सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय करिअरची सुरवात केलेल्या नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मारलेली मजल आणि त्यानंतरही पद असो वा नसो आपले वजन कायम ठेवण्याचे कौशल्य फार थोड्या नेत्यांना आत्मसात करता आले. कोकणचा राजकीय इतिहास लिहीताना ‘राणेंच्या राजकारणाची शैली’ कायमच ठळक अक्षरात लिहीली जाईल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

राणेंचे मुळ गाव कणकवलीजवळचे वरवडे. मात्र त्यांचे बालपण मुंबईतच गेले. मुंबईतील चेंबूर भाग त्यांचे कार्यक्षेत्र. तेथूनच त्यांचे नेतृत्व खुलत गेले. शिवसेना आणि बाळासाहेब यांचे ते भक्त होते. शिवसेनेसाठी काहीही करण्याची, झोकून देण्याची वृत्ती त्यांच्या रक्तात भिनली. सन १९६८ मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले. शिवसेनेसाठी तो काळ संघर्षाचा होता. एक आक्रमक आणि मराठी माणसाचे प्रश्‍न मांडणारी संघटना म्हणून शिवसेना पुढे येत होती. बाळासाहेबांना जीवाभावाच्या मागचा पुढचा विचार न करता झोकून देवून काम करणाऱ्या निडर, धाडसी आणि निष्ठावान शिवसैनिकांची गरज होती. या फ्रेममध्ये राणे अगदी चपलखपणे बसत होते. ते बाळासाहेबां बरोबर सावली सारखे वावरू लागले. संघटनेनेही त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवायला सुरवात केली. ते अवघ्या दोन वर्षात चेंबूरचे शाखाप्रमुख बनले. त्यांच्या रोमारोमात शिवसेना भिनली. शिवसेनेसाठी ते “नारायणास्त्र” बनले.

सन १९८५ मध्ये ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. बाळासाहेबांच्या शब्दावर वाटेल ते करण्याची तयारी असलेले नेतृत्व म्हणून राणेंनी ओळख निर्माण केली. याच दरम्यान शिवसेनेतील वजनदार नेते छगन भुजबळ यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाचा शिवसेनेत शोध सुरू होता. राणेंनी अगदी नकळत ही जागा भरून काढली. एखादी संघटना चालवायची तर आर्थिक पायाही भक्कम लागतो. त्यातही शिवसेनेसारखी संघटना चालविण्यासाठी आक्रमकपणाही जपावा लागतो. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता राणेंमध्ये होती. बाळासाहेबांनी ती पक्की ओळखली. यामुळे राणेंना झपाट्याने वरची पदे मिळत गेली. ते बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. यानंतर त्यांचे पक्षातील वजन वाढत गेले. नंतरच्या काळात ते सिंधुदुर्गातील राजकारणात सक्रीय झाले. अर्थात बाळासाहेबांच्या आदेशानेच ते कोकणच्या राजकारणात उतरले. मात्र मुंबईतील मातोश्रीवरील त्यांचे वजन तिळमात्र कमी झाले नाही. उलट ते वाढत गेले. यातूनच त्यांनी अगदी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते पदापर्यंतची पदे मिळविली.

मला चांगल आठवतयं सन १९९६-९७ ची गोष्ट आहे. मी ओरोस हायस्कूलला शिकायला होतो. मी B.Tech पण S.S.P.M college of Engg हरकूळ बुद्रुक कणकवली मधून केलय. राणे साहेबांना आणि त्यांच्या कुंटूबियाना जवळून पाहिलंय. राणेसाहेब मुख्यमंत्री असताना सिंधूदुर्ग नगरीत पहिल्यांदा भव्य दिव्य असे पशुसंवर्धन,कृषी संमेलन( सिंधूमहोत्सव) भरवलेल होत. त्यात पहिल्यांदा तळकोकणातल्या माणसाने कृषी उद्योग हा उद्योग अशु शकतो हे अनुभवल असेल. इतक्या भव्य,मोठ्या प्रमाणातला तो मेळावा थक्क करणाराच होता, पण त्यामागे राजकिय ताकद होती ती नारायण राणेंची. होय दादांची…! या नारायण राणेंचा उदय तेव्हा होत होता, पण खर ते सांगतो, आज जे काही मालवण,सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या नकाशावर दिसतोय ते दादांमुळेच..!

१९९१ ला राणेंना पहिल्यांदा सेनेकडुन तिकिट मिळाल, मुंबईचा महापौर बनण्याची आकांक्षा असणारा हा माणुस आमदार बनु घातला होता.दादांनी कोकणवासीयां ची मन जिंकली ,दादा पहिल्यांदा आमदार झाले.कायमच वांझ म्हस म्हणुन हिणवुन घेणार्या नी स्वत:च्या पानात खायला भाकरी नाही पण जगाच तत्वज्ञान मांडणार्या कोकणी दिग्गज नेत्यांना, त्यांना follow करणार्या मालवणी जनतेला, आपलाही विकास होवु शकतो याच स्वप्न नारायण राणेंनी दाखवलं. प्रशासनावर अचाट पकड, अचुक ज्ञान ,घणाघाती भाषा या जिवावर नारायण राणेंनी कामाचा सपाटाच लावला. कोकणात जी काही काम झाली ती खरच नारायण राणेंमुळेच झाली.अगदी दोडामार्ग तालुका निर्मिती असो, आतले रस्ते असोत ते कोकणी माणसाला नोकर्या असोत, इतकच काय तर आंबा, काजु, सुपारी अशा बागायदाराना अनुदान असोत हे सगळ फक्त नारायण राणेंमुळेच पहायला मिळाल.

कोकणाला राणेंनी खुप काही दिलय,म्हणुनच या दादांवर कोकणच मनापासुन प्रेम होत. बेस्टचे चेअरमन बनल्या पासून नारायण राणेंची वाहवा सुरु झाली होती, त्याची परीणीती आमदारकीत, मग मंत्रीपदी झाली. दादा मुख्यमंत्री झाले तो काळ मालवणी जनतेचा सुवर्ण काळ होता. मालवणकरांनी कायम आदरानेच दादांकडे बघितल, नारायण राणे सेनेचे नेते बनले. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा होता, पण पुढे सेनेतल्या काही लोकांमुळे राणेंची महत्त्वकांक्षा दाबली गेली. राणेंनी बंड केले ( त्यानी जे सेना नेत्यांवर जे आरोप केले होते, त्यांची उत्तर आजतागायत कोणीही दिलेली नाहीत ). कालपर्यतंचा तडफदार मुख्यमंत्री म्हणुन कौतुक करणार्या बाळासाहेबांनी अंतर्गत कौटुंबिक कलहामुळे राणेंची हकालपट्टी केली, पण तेव्हा अख्ख कोकण, सिंधूदुर्ग राणेंच्या बाजुने उभे होत.

कालपर्यतंचा निष्ठावान शिवसैनिक आज दहशतवादी गुंड झाला होता. मालवणला पेपरमध्ये दहशदीच गाव म्हणुन ओळखल जावु लागल, ही संपादकांची कृपा.इतिहासात सेनेविरुद्ध बंड करणारा कायम पडत असे पण राणेंनी सेनेच डिपोझिट जप्त केल.सेनेच मालवणात पानिपत झाल. इथपर्यतं ठिक होत. पण राणेच्या पुढच्या खेळ्या त्यांच्या अंगलटी आल्या. मुळात रांगडी स्टाईल, त्यात भगवप्रेम म्हणुन राणेंचा शब्द कोकणात अंतिम मानला जायचा. पण राणेंच सेनेला संपवायच्या भाषा, यशासाठी वाट्टेल ते हे मात्र खटकु लागल, राणेंची दहशत कोकणच्या मुळाशी येवु लागली. राणेंनी काॅग्रेसमध्ये प्रवेश करण हे कोकणी जनतेल, काही वेळासाठी मान्य होत. मात्र काॅग्रेसने त्यांचा वापर करुन स्वत:चा फायदा घेण सुरु केल,आणि मुख्यमंत्री पदाचा आशेसाठी राणेंनी कोकणात फार मोठ्या चुका केला.

त्यांच्या चिरंजीवांच राजकारणात येण कदापीही मालवणी जनतेला रुचल नाही,पण या महत्त्व कांक्षेसाठी राणेंनी स्वत:चा बेस घालवला.यात निर्दोष मालवण रक्ताळलं. मुंबई मनपाची निवडणुक असो, सिवल्ड प्रोजेक्ट असो ,जैतापुर प्रकल्प असो, गाडगीळ अहवाल असो , मुलाची खासदारकी असो यासाठी राणेंनी आपल्याच माणसावर दबाव टाकायला सुरुवात केली.राणे बदनाम होवु लागले, त्यातुनच राणेंचा प्रवास उलटगतीने सुरु झाला.या कर्तृत्वान माणसाची गरज कोकणला हवी होती पण गरजेपेक्षा जास्त असणारी महत्त्वकांक्षा, त्यासाठी वाटेल ते…! यातच राणेंकडुन मोठ्या चुका घडत गेल्या, कोकणी माणसाला आता “विकास नको पण जीव वाचव..!” ही म्हणायची वेळ आली होती. त्याचीच परिणिती आज दिसतेय…! राणेंचे जवळचे निकटवर्तीय जिजी उपरकर, राजन तेली, शंकर कांबळी, काका कुडाळकर, संजय पडते असे बरेचसे शिलेदार २००५ पासून दुर गेले. राजकारणाच्या पुढील वाटचालीसाठी राणे साहेब आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आत्मपरिक्षणाची खरंच गरज आहे.

राजकारणात दिसतं, तसंच घडत असतं, असं समजून चर्चा करणं हा निव्वळ मुर्खपणा असतो, हे नारायण राणे यांनी मिडीयाला दाखवून दिलं असेल. राजकारण हे हिम्मतीने, धोका पत्करून पुढे रेटणारे नेते आहेत. ते पक्षाची ताकद वाढवण्यासाठी झटतात अन् त्यातच आपल्या नेतृत्वाची ताकद वाढवतात…पण आपल्या कामाच योग्य ते फळ मिळावे म्हणून सगळेचं आग्रही असतात.राजकारण नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी आग्रही असावंच लागतोच मग अशा नेत्यांच्या वाटचालीत खोडा घालण्याचं राजकारण सर्वच पक्षात होत असतं बरं. कोकणात शिवसेना विस्तारात राणेंचा मोठा सहभाग होता. म्हणून १९९५ ला सेना-भाजपा सत्तेवर आल्यावर बाळासाहेबांनी त्यांना दुग्धविकास मंत्री नंतर महसूलमंत्री अन् शेवटीचे ६ महीने मुख्यमंत्रीपद देण्यात आले.

१९९९ ला सेना-भाजपा युतीची सत्ता गेली, मग राणे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जेरीस आणून सोडले होते, पण परत २००४ ला आघाडीचे सरकार पुन्हा आले. या दरम्यान मुख्यमंत्री पदी राहिलेल्या विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांनी राणेंची ताकद ओळखून या दोघांनी अशोकराव चव्हाण यांना शह देण्यासाठी राणेना काँग्रेसमध्ये आणलं. राणे काँग्रेस मध्ये येण्यापुर्वी त्यांना सेनेतून बाहेर काढायचे राजकारण खेळलं गेलं ; आज तशीच मांडणी काँग्रेसने राणे केली आहे. राणेंनी भाजपात जाण्याचे कोणतेही संकेत दिले नाही; तरी ते भाजपात जात असल्याचं वातावरण मिडियामार्फत करण्यात आले. मग काय राणे सेना व काँग्रेस फोडून फडणवीस सरकारला पाठिंबा देऊन सेनेच्या सत्तेला नाचवणार्या दोर्याला छाटतील असं वातावरण निर्माण झालं म्हणून प्रदेश काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली. मग सेनेने आमदार-खासदारांची मिटिंग बोलवण्यात आली ; ही सारी लगबग राणेंनी निकटवर्तीय नितीन गडकरीच्या सहकार्याने घडवून आणली.

गेल्या दोन-अडीच वर्षांत मात्र राणेंचा राजकीय “डाउनफॉल’ सुरू झाला. सगळ्यात आधी त्यांचे पुत्र डॉ. नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर स्वतः राणे कुडाळमधून पराभूत झाले. पुढच्या काही काळात वांद्रे (मुंबई) येथील पोटनिवडणुकीत राणेंना पराभव पत्करावा लागला. असे असूनही न्यूजमेकर म्हणून त्यांची असलेली ओळख तसूभरही कमी झाली नसल्याचा प्रत्यय गेले काही दिवस सोशल मीडिया आणि त्यानंतर मीडियामध्ये त्यांच्याविषयी सुरू असलेल्या “ब्रेकिंग न्यूज’नी आला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यातील राजकीय स्पर्धा २००८ पासून सुरू होती. पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाई जगताप, संजय निरुपम अशा कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचा असलेला राजकीय संघर्ष, स्पर्धा या आधीही उघड झाली. राणेंबरोबरच माजी खासदार नीलेश आणि आमदार नीतेश हे त्यांचे दोन्ही पुत्र कॉंग्रेसच्या मुख्य राजकीय प्रवाहात सक्रिय आहेत. त्यामुळे राणेंच्या कोंडीची झळ या दोघांनाही अप्रत्यक्षपणे बसत असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे राजकारण कायमच मुत्सद्दी असते. राणेंची राजकीय स्टाइल मात्र सरळ आणि आक्रमक असते. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा राणेंनी अनेकदा बोलून दाखविली.

मैदानात उतरणारे नेतृत्व…
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुभाष देसाई, सुधीर जोशी, मनोहर जोशी अशा सोबर नेतृत्वाला कायमच दरबारी राजकारणामध्ये महत्वाचे स्थान मिळाले. पण ही संघटना कॉंग्रेस, भाजपसारखी चालणारी नव्हती. तिला मराठी माणसाच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणेही तितकेच गरजेचे होते. यासाठी विशेषतः मुंबईत कार्यकर्त्यांचे बळ राखायला आक्रमक नेतृत्वाची सुद्धा तितकीच आवश्‍यकता होती. हीच गरज रामदास कदम, नारायण राणे आदीं सारख्या नेत्यांनी पूर्ण केली. यातही राणे प्रत्यक्ष मैदानातील लढाईत कायमच अग्रस्थानी राहिले. यामुळे शिवसेनेची ताकद निर्माण करणाऱ्या नेत्यांमध्ये राणेंची ही गणती सुरू झाली. एखाद्या नेत्याचे वजन त्याच्यामागे किती मोठा प्रांत उभा आहे आणि मतांची ताकद किती यावर ठरते. मुळात मतांची संख्या कमी असलेल्या कोकणातील फार थोड्या नेत्यांना राज्यस्तरावर वजन निर्माण करता आले. राणेंनी आपल्या शैलीच्या जोरावर गेली कित्येक वर्षे आपले राजकीय वजन टीकवून ठेवले.

भाजपाची ही चाणक्य खेळी….
गेले काही महिने राणे हे भारतीय जनता पक्षात जाणार, असे वातावरण होते आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी तर ‘राणे भाजपमध्ये आल्यास, त्यांच्यासाठी आपण एक खाते सोडू,’ असे जाहीर करून टाकले होते. प्रत्यक्षात राणे यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत दादांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल कसलीही चर्चा नसल्याचे सांगितले. राणेंच्या बंडाची भाजपने थ दखलही घेतली नाही. त्यामुळे राणे यांना भाजपने झुलवत ठेवले आणि त्यातून कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची बदनामी करण्याचे आपले इंगितही साध्य करून दाखवले. भाजपच्या चाणक्‍यांच्या या खेळीला दाद द्यावी, तेवढी थोडीच आहे.

मुख्यमंत्रिपदाची माळ ही तत्कालीन राजकीय सोय
राणे यांनी बरोबर एका तपापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र!’ केला, तेव्हा कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्यासाठी लाल गालिचे अंथरले होते. मात्र, या वेळी ना कोणी त्यांच्या स्वागतासाठी वाजंत्री लावली, ना कुणी गालिचे अंथरले. राणे हे खरे तर गेली १२ वर्षे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थपणे वावरत होते आणि त्याचे कारण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेत होते; पण बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या गळ्यात घातलेली मुख्यमंत्रिपदाची माळ ही तत्कालीन राजकीय सोय होती, हे राणे यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःविषयी अवास्तव कल्पना करून घेतल्या. राजकीय यशासाठी संयमाचीही गरज असते, हे तर त्यांच्या गावीही नाही; त्यामुळेच आत्ताचा हा निर्णय ही ‘राजकीय हाराकिरीकडेच जाण्याची शक्‍यता’ आहे.

राणे यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचा मोठा वाटा आहे; पण कोकणातून मुंबईत आल्यावरही आपला तेथील सुभा भक्‍कम राखणाऱ्या राणे यांना आपल्या खऱ्या ताकदीचा अंदाज कधीच आला नाही. त्यास अर्थातच शिवसेनेने त्यांना बहाल केलेली मुंबई महापालिकेतील अनेक पदेच कारणीभूत होती. त्या जोरावरच राणे प्रथम मंत्री आणि पुढे मुख्यमंत्री झाले. हे खरे, की आपल्या खात्यांवर त्यांची चांगली पकड होती. विधिमंडळातील त्यांची अर्थसंकल्पावरील भाषणेही अभ्यासपूर्ण असत. मात्र, या मार्गाने जात आणि स्वतःचा जनाधार वाढवीत राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याऐवजी विशिष्ट पदासाठीची महत्त्वाकांक्षा हाच त्यांचा जणू एकमेव अजेंडाच.

शिवसेनेशी पंगा घेताना, त्यांच्या सोबत किमान सात-आठ आमदार होते. त्यापैकी श्‍याम सावंत यांचा अपवाद वगळता बाकी सर्वांना त्यांनी पुन्हा विधानसभेवर निवडूनही आणले होते. मात्र, गुरुवारी त्यांनी कॉंग्रेस व शिवसेना यांची निंदानालस्ती करताना आदळआपट केली, तेव्हा त्यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले त्यांचे चिरंजीव नीलेश यांच्याशिवाय कोणीच नव्हते. आता राज्याचा दौरा करून दसऱ्यापूर्वी पुढील वाटचालीबाबतचा आपला निर्णय ते जाहीर करणार आहेत..! अर्थात, आपण टप्प्याटप्प्याने ‘ब्रेकिंग न्यूज’ देणार आहोत, असे त्यांनीच चार दिवसांपूर्वी सांगून टाकले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांना बातम्या जरूर मिळतील; पण त्याचा काडीमात्रही परिणाम त्यांचे स्वत:चे वा राज्याचे भवितव्य यावर होण्याची शक्‍यता नाही.

स्वत:च्या ताकदीविषयी चुकीचा विश्वास :-
कोकणातल्या सागरकिनाऱ्यावरची वाळूही आपल्या पायाखालून घसरू लागली आहे, हे राणे यांना स्वत:चा, तसेच चिरंजीव नीलेश यांच्या तीन वर्षांपूर्वीच्या पराभवा नंतर लक्षात यायला हवे होते. मात्र, स्वत:च्या ताकदी विषयी अफाट कल्पना असलेल्यांचे जे होते, तेच राणे यांचेही झाले आणि पुढे वर्षभरातच वांद्रे या मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही त्यांना वास्तवाचे भान आले नाही. तरीही कॉंग्रेसने विधान परिषदेची जागा बहाल करून त्यांची बूज राखली होती. त्याचे चीज त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या यथेच्छ बदनामीने केले…! त्यामुळे आता राजकीय ताकदीचे झालेले खच्चीकरण आणि गमावलेली विश्‍वासार्हता या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी पुढील निर्णय घेतला तरी राज्यातील जनतेला त्याचे काय सोयरसुतक असणार हे येणारा काळच ठरवेल….?

— गणेश उर्फ अभिजित कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..