धरणीचा दूत म्हणुनी,
उंच आभाळी जाशी,
सतत पंख फैलावुनी,
प्रवास सारा करशी–!!!
दूरवरी खूप उडशी,
घेऊन निरोप खालचा,
वर अगदी जाऊन पोचशी,
जिथे ना पोचे ऐहिक दृष्टी,–;
आयुष्ये ज्यांची संपली,
त्यांची खुशाली आणशी,-!!!
त्यांच्याविना सारी पृथा,
वंचित पोरकी,बापुडवाणी,
नाती-गोती इथली सारी,
मात्र एकदम केविलवाणी,–!!!
भन्नाट रान वाऱ्यासारखा,
काळ जाई पुढे पुढे,
घेऊन जाई संगतीला,
आपुले सख्खे परके,–!!!
जीवन आहे त्यांच्यावाचुनी
आतल्या आत भकास,
कोण रडे कोणासाठी,
जागवीत आपुली आंस,–!!!
पाखरा गेले त्यांना,—
दे आमुची ख्यालीखुशाली,
आमच्यावाचून तिथे कसे ते,
जगत असतील शंका निराळी,–!!!
ऋणानुबंध आमच्यातले,
असीम अमीट अतूट,
देहांनी जरी केली असली,
अगदी विलक्षण ताटातूट,–!!!
पाखरां, ते जिवंत असती,
आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये,
*एक प्रेमाची खूण दे,
पटेल* त्यांना अंतरामध्ये*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply