१९६४-६५ सालाची गोष्ट…..
आम्ही त्यावेळी कॅडेल रोड, दादर मुंबई २८, या भागात रहात होतो. आम्ही तीन भावंडं, आई वडील, माझे काका आणि आत्या. घर लहानसच होतं. माझे वडील, म्हणजे आमचे तात्या हे धार्मिक वृत्तीचे. आमच्याकडे धार्मिक विधी, नैमित्तिक पूजा अर्चा, एकादष्णी ,संकष्टी, श्रावणमासातील पूजा हे नित्याचच होतं. त्या लहानशा घरातला एक कोपरा देवघराने भरलेला होता. तात्यांची रोज भल्या पहाटे उठून पूजा चालायची. त्यांचं आध्यात्मिक पुस्तकांचं वाचनही प्रचंड होतं. घरात इतरही साहित्य संग्रह प्रचंड होता. थोडक्यात सांगायचं तर वाचन श्रीमंती भरपूर होती.
पूजा किंवा काहीही धार्मिक विधी घरात होणार असला की त्याची तयारी तात्या अगदी साग्रसंगीत करायचे. त्यामध्ये जराही कसर सोडायचे नाहीत. आई सुद्धा प्रत्येक गोष्ट अगदी निगुतीने करायची. या धार्मिक विधींचं पौरोहित्य करण्यासाठी आमच्या घरापासून पाचच मिनिटांवर रहाणारे धर्माधिकारी गुरुजी यायचे. मला समजायला लागल्यापासून गुरुजींना मी पहात होतो, तेव्हाच त्यांचं वय सत्तरीच्या आसपास असावं. मूळचा वर्ण गोरा असलेले, किरकोळ शरीरयष्टीचे , अंगात धुवट लांब हाताचा सदरा, तसच मळखाऊ धोतर, डोक्यापासून भुवयांपर्यंत संपूर्ण पांढरे झालेले केस, डोक्यावर काळी टोपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे डोळे. ते अत्यंत बारीक होते. बहुधा डोळे मिटूनच ते बोलायचे. आले की वेळ न घालवता हात पाय धुवून ते देवासमोर बसायचे आणि त्यांची पूजा सुरू व्हायची. तात्यांना नेहमी म्हणायचे,
“तुमची पूजेची तयारी अगदी व्यवस्थित असते. हे आणा, ते द्या असं कधीही सांगावं लागत नाही.”
पूजा आरती झाली, की पुन्हा सदरा चढवून ते, खुर्चीत स्थानापन्न व्हायचे. चहा, कॉफी किंवा दूध घेऊन झालं की त्यांच्या अवांतर गप्पा सुरू व्हायच्या. त्यांना अक्षरशः अनेक पाककृती माहित होत्या. हंगामानुसार बाजारात येणाऱ्या विविध भाज्यांची एखादी पाककृती सांगायला सुरवात करायचे.
“वहिनी कोरळाची भाजी करता की नाही ? अप्रतिम होते.”
अप्रतिम हा त्यांचा आवडता शब्द होता. मग समजा आई म्हणाली,
“तुम्ही कशी करता ?”
असं विचारल्यावर, त्यांची कळी खुलायची. आणि डोळे मिटून साग्रसंगीत पाककृती सांगायला सुरुवात व्हायची. दुसरी त्यांना मनापासून असलेली आवड म्हणजे वाचनाची. आमच्या घरातलं एक लाकडी कपाट आध्यात्म आणि इतर सर्व प्रकारच्या साहित्याने भरलेलं होतं. यामध्ये मराठी सोबतच उत्तम इंग्रजी साहित्यही होतं. तात्यांना कुणी चांगला वाचक मिळाला की मनापासून आनंद होत असे. धर्माधिकारी गुरुजींचं शिक्षण किती झालं होतं कल्पना नाही, परंतु ते जशी मराठी पुस्तकं वाचायला घेऊन जायचे तशीच इंग्रजी पुस्तकंही घेऊन जात असत. त्यांच्यासोबत एक खाकी रंगाची कापडी पिशवी असायची. पूजा आटोपली की तात्या त्यांना पुस्तकांचं कपाट उघडून द्यायचे. मग गुरुजी पुस्तकांच्या अगदी जवळ बसून एखादं पुस्तक निवडायचे. पुस्तक व्यवस्थित पिशवीत सरकवून आणि पिशवीची घडी घालून घेऊन जायचे. त्यांच्या चपलाही अगदी जाडजूड , बहुधा लवकर न झिजणाऱ्या असायच्या. वाचून झालेलं पुस्तक काही दिवसांनी एखाद्या संध्याकाळी घेऊन आले की तात्यांसोबत त्या पुस्तकावर त्यांची चर्चा चालायची.
बहुधा सरस्वतीचा वास जिथे असतो तिथे लक्ष्मी जरा फटकूनच वागते. धर्माधिकारी गुरुजींचं घरही याला अपवाद नव्हतं. पूजेला बोलावण्याचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी बहुधा मीच जात असे. कळकट्ट पोपडे उडालेल्या भिंती आणि काळोख दाटलेल्या त्या घरात गुरुजी, त्यांची सदैव पिंजारल्या केसांची वैतागलेली दिसणारी धर्मपत्नी, गुरुजींचे याच क्षेत्रात असलेले धाकटे बंधू ,त्यांची पत्नी आणि त्यांचे दोन मुलगे , त्यातला एक मनोरुग्ण होता असे सहा जण रहात होते. त्या संपूर्ण घराला दारिद्र्याचा दाट विळखा होता. घरात शिरण्याची मला बिलकुल इच्छा होत नसे , आणि मी बाहेरूनच निरोप देऊन परतत असे. तेव्हाही गुरुजी घरातल्या उजेड देणाऱ्या एकमेव खिडकीपाशी बसून वाचन करत बसलेले दिसायचे. त्या काळात पूजेची दक्षिणा, मिळून मिळायची तरी किती ? अकरा किंवा अगदी एकवीस म्हणजे डोक्यावरून पाणी. गुरुजी सोडले तर त्यांचे बंधू किंवा पत्नी एक शब्दही बोलायचे नाहीत. गुरुजींची पत्नी घरातल्या अठरा विश्वे दारिद्र्याने कंटाळून गेलेली असावी. गुरुजींना येणं शक्यच नसलं तरच त्यांचे बंधू यायचे. त्यांची वृत्ती मात्र अगदी व्यावसायिक होती. कार्य झालं की एकही शब्द न बोलता सगळं गुंडाळून ते चालू पडायचे. असो, परिस्थितीने आली असावी ही वृत्ती.
पुढे आम्ही दादर सोडून ठाण्याला राहायला गेलो. त्यानंतर मधल्या कळतच कधीतरी धर्माधिकारी गुरुजी वारले.
आज विचार करताना वाटतं, सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या या व्युत्पन्न माणसाला आयुष्यभर असं गरिबीत रहावं लागावं हा दैवदुर्विलासच म्हणायचा. ज्ञान, बुद्धिमत्ता, व्यासंग असलेल्या माणसाची पोटाची खळगी मात्र पूर्ण भरली जाऊ नये हा नियतीचा लाडका खेळच असतो म्हणा.
अगदी रंगात येऊन पाककृती सांगणारे गुरुजी मनानेच त्याचा आस्वाद घेत होते का ??? कुणास ठाऊक……
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply