जन्म. २७ जानेवारी १९५२ ठाणे येथे.
आनंद दिघे म्हणजे तर शिवसेनेचा ढाण्या वाघच. बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्वानसाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते “शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख”.
ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात आनंद दिघे याचं घर. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे. “बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आनंद दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नव्हते.
शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुलटाईम कार्यकर्ता मिळाला होता. आनंद दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली.
आनंद दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता. परंतु जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं दूर केलं. जिथं कार्यालय होतं, तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे. कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे.
याच दरम्यान आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात ‘जनता दरबार’ भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे.
आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी सहा वाजल्यापासून जमलेले असायचे. दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे.
१९८९ मध्ये आनंद दिघे यांनी ठाण्याला मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर उत्तम सार्वजनिक व्यवस्था मिळावी म्हणून ‘टीएमटी’ परिवहन सेवा सुरू केली. देवा-धर्माच्या बाबतीत आनंद दिघे यांनी अतिशय कडक धोरण अवलंबले. त्यांनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव सुरू केला. ठाण्यात सर्वांत पहिली दहीहंडी त्यांनी सुरू केली. या सगळ्या धार्मिक कार्यातून त्यांची ‘धर्मवीर’ अशी ख्याती पसरली. शिवाय, ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या. स्वयंरोजगारासाठी अनेकांना स्टॉल उभारून दिले. त्यामुळे ते लोकांच्या हृदयावर राज्य करू लागले. दिवसेंदिवस आनंद दिघेंचं महत्व वाढत होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती.
आनंद दिघे १९८९ च्या ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राज्यभर प्रकाशझोतात आले. या निवडणुकीत महापौरपदासाठी प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार होते आणि शिवसेनेचा महापौर निवडून येणं अपेक्षित होतं. पण परांजपे यांचा फक्त एका मतानं पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेची काही मतं फुटल्याचं समोर आलं. या पराभवानंतर बाळासाहेब खवळले आणि त्यांनी ‘गद्दार कोण?’ असं विचारायला सुरुवात केली.
काही दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी स्वत:च्याच पक्षाशी प्रतारणा करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं आणि त्यामुळे मग शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं, अशी चर्चा सुरू झाली. महिन्याभरानंतर खोपकरांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. याप्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांच्या निधनापर्यंत ही केस सुरू होती.
आनंद दिघे यांचे २६ ऑगस्ट २००१ रोजी अपघाती निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply