दिवसाचा चोवीस तासांचा कालावधी हा पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या आणि सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणाकाळांवर आधारलेला आहे. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी आहे, २३ तास, २३ मिनिटं आणि ५६ सेकंद. मात्र हा सरासरी कालावधी आहे. प्रत्यक्षात पृथ्वीच्या वेगात सतत फरक पडत असतो. पृथ्वीचं तिच्याभोवतीचं वातावरण, समुद्रातलं पाणी, पृथ्वीच्या गाभ्याचं चलन, अशा अनेक प्रकारच्या घर्षणांमुळे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग बदलत असतो. साधारणपणे, त्यात सतत अल्पशी परंतु अनियमित घट होत असते.
आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात. या दिवसावर आधारलेलं वर्ष आणि घड्याळ्यातील वेळेवर आधारलेलं वर्ष, यांतील फरक एका सेकंदाच्या जवळ पोचला की त्या वर्षी घड्याळ मागे नेण्यासाठी अतिरिक्त लीप सेकंदाचा वापर केला जातो. म्हणजे या वर्षी एक सेकंद अधिक असल्याचं मानलं जात. हा अधिक सेकंद म्हणजेच लीप सेकंद. त्यामुळे हे वर्ष ८६,४०० सेकंदांचं नव्हे तर, ८६,४०१ सेकंदांचं होतं. (जसं लीप वर्ष हे ३६५ नव्हे तर, ३६६ दिवसांचं असतं, तसाच हा प्रकार!) या अगोदर २०१६ साली असा लीप सेकंदाचा वापर केला गेला होता.
दरवेळी जरी घड्याळं मागे न्यावी लागत असली तरी, गेल्या वर्षी मात्र उलट स्थिती उद्भवली होती. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेग गेल्या वर्षी वाढल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं. गेल्या वर्षभरात तब्बल एकूण २८ वेळा पृथ्वीचा वेग असा वाढल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या गतीवर आधारलेला काळ हा सरासरीपेक्षा अधिक वेगानं पुढे धावला आहे. असा प्रकार अर्थात नवा नाही. तो पूर्वीही घडला आहे. आतापर्यंतच्या नोंदींनुसार, सर्वांत जलद दिवसाची नोंद ही ५ जुलै २००५ सालची होती. या वेळी, दिवस १.०५ मिलिसेकंदांनी लहान झाला होता. (मिलिसेकंद म्हणजे सेकंदाचा हजारावा भाग – ०.००१ सेकंद.) मात्र २०२० साली, पृथ्वीनं ज्या ज्या वेळी जलद प्रदक्षिणा घातली आहे, अशा सगळ्या २८ दिवशी तो यापेक्षाही लहान होता. त्यातही हा १९ जुलै २०२१ हा सर्वांत लहान दिवस ठरला. या दिवशी दिवसाची लांबी ही सरासरीपेक्षा १.४६ मिलिसेकंदांनी कमी होती.
पृथ्वीचं हे अधिक जलद फिरणं या वर्षीही अपेक्षित आहेच. पृथ्वीचं हे जलद फिरणं जर असंच चालू राहिलं, तर मात्र संशोधकांना वर्षभरातील एखादं सेकंद कमी करण्याचा विचार करावा लागेल. आणि तसं केलं गेल्यास ते वैशिष्ट्यपूर्ण ठरेल! कारण आतापर्यंत वर्षाचा कालावधी लीप सेकंदाद्वारे अनेकवेळा वाढवला गेला आहे… परंतु, तो कधीच कमी केला गेलेला नाही.
(विज्ञानमार्ग संकेत स्थळ)
छायाचित्र सौजन्य: fuse.education.vic.gov.au.
Leave a Reply