नवीन लेखन...

धोक्याची घंटा !

“सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. हा सर्व खटाटोप भयगंड निर्माण करण्यासाठी नाही. तर, परिणामांची जाणीव करून देण्यासाठी आहे.आता जर आपण आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी घेतली नाही तर पुन्हा आपल्याला संधी मिळेल, याची शाश्वती देता येत नाही.”

धोक्याची घंटा!

कोरोना व्हायरस नावाचा विषाणू सैतान आज जगात धुमाकूळ घालतो आहे.. भारतातील स्थिती अद्याप नियंत्रणात असली तरी, दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे आकडे धोक्याचा इशारा देणारे आहेत. त्यामुळे आता आपल्याला नुसती काळजी घेऊन चालणार नाही; तर या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक क्षणी दक्ष असावं लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग आपल्या देशात सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यानंतरच्या सामूहिक संसर्गाच्या टप्प्यात जर आपण जाऊन पोहचलो तर रुग्णांची संख्या गुणाकाराच्या स्वरूपात वाढण्याचा धोका आहे. त्याच्यामुळे संसर्गाची ही शृंखला खंडित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र काहींना अजूनही यातलं गांभीर्य लक्षात आल्याचे दिसत नाही. विनाकारण रस्त्यावर फिरणारयांची संख्या कमी झाली असली तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अजूनही लोक गर्दी करत आहेत. शहराकडून खेड्याकडे जाणारे कामगारांचे लोंढे अजूनही थांबलेले नाहीत. देशभरातील लॉकडाऊन प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सर्व यंत्रणा झटत असतानाच दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून ‘मरकज’ च्या अनुषंगाने समोर आलेली बातमी तर अत्यंत चिंताजनक म्हणावी लागेल. सारा देश एका आव्हानाचा सामना करीत असताना राजधानी दिल्लीत हजारोच्या संख्येने देशी-विदेशी लोक जमा होणे ही बाब कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अक्षम्य म्हणावी लागेल!

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असतांना दिल्लीच्या निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी हजारो जण एकत्र आले. त्यात परदेशी नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती आहे. त्यातील काहींना आज रोजी कोरोना संसर्गाची लागण झाली असून या कार्यक्रमात सामील झालेले नागरिक देशातील कित्येक राज्यात परतले आहेत. त्यामुळे संसर्गाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे. सदर कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात आयोजकांनी आणि प्रशासनाने जो निष्काळजीपणा दाखवला तो अशोभनीय आहे. कळस म्हणजे, या धार्मिक कार्यक्रमातून परत आलेले नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नसल्याच्या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत. तर, दुसरीकडे कोणत्याही घटना-प्रसंगांमध्ये हिंदू-मुस्लिम खेळ करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती सक्रिय होऊ लागल्याने समाजात विद्वेषाचे वातावरण निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. देश एका आपत्तीच्या प्रसंगातून जात असताना आपली ही वर्तवणूक योग्य आहे का? याचा विचार सर्वच समाज घटकांनी करायला हवा. कोरोना नावाचा हा राक्षस कुणाची जातधर्म पाहून त्यावर आक्रमण करत नाही तर संपूर्ण मानव जातीला बाधित करतो. त्यामुळे धर्म आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला या संकटाचा मुकाबला करावा लागेल. सरकार, आरोग्य यंत्रणा, पोलीस दल आम्हाला काळजी घेण्याचं, संसर्ग टाळण्याचं, घरात राहण्याचं सातत्यानं विनवतंय. परंतु आम्ही बेपर्वाईने त्यांच्या सूचना धुडकावून लावतोय. आपल्या अशा वागण्यामुळे आपण स्वतःचं नाही तर आपले कुटुंब, आपला समाज, आपले राज्य, आपला देश किती मोठ्या संकटात जाणार आहे, याचीही जाण आपल्याला होत नसेल तर हे दुर्दैवच म्हटलं पाहिजे.

सामूहिक संसर्गाचा जो धोका टाळण्यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याचं गांभीर्य जर आपण समजून घेतलं नाही तर होणाऱ्या विनाशास आपणच कारणीभूत ठरणार आहोत. कोरोनाचा एक संसर्गित रुग्ण काळजी घेतली नाही तर आपल्या आसपासच्या शेकडो लोकांना आणि ते शेकडो लोक हजारोंना बाधित करु शकतात. ही बाधा कोणत्याही जाती धर्माचे भेद मानत नाही. त्यामुळे तमाम नागरिकांनी सावध व्हावं. आपण प्रवास केला असेल, आपल्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील, किंवा आशा नागरिकांच्या आपण संपर्कात आलो असू तर स्वतःहून आपण याची माहिती प्रशासनाला दिली पाहिजे. लक्षात ठेवा, आपण जरा खबरदारी घेतली नाही, सहकार्य केलं नाही तर कोरोना विषाणू सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाला, आपल्या परिचितांना, आपल्या समाजाला बाधित करु शकतो. परंतु दुर्दैवाने आजही काही लोक हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. जमावबंदी, संचारबंदी सारखे आदेश धुडकावून ही मंडळी विषाची परीक्षा पाहत आहेत.

खरंतर या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही हजारो पटींनी समजूतदार व्हायला हवं! पण आम्ही इतके बेजबाबदार झालो आहोत की, आमचे हित कशात आहे? हेच आज आम्हाला कळेनासं झालं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगाच्या पाठीवर मृत्यूचे तांडव सुरू झालं आहे.. हजारो लोक हाल हाल होऊन मरत आहेत.. विनाशाची झळ आमच्यापर्यंतही येऊन पोहोचली आहे..आपल्या शहरापासून दूर असलेला कोरोनाचा संसर्ग आता आपल्या दारात येऊन पोहचला आहे..प्रत्येक घरावर मृत्यूची काळी सावली घिरटय़ा घालत आहे. आता तरी आपण सावध होणार आहोत का? जाती-धर्माच्या बाहेर येऊन इतरांचा विचार करणार आहोत का? की,अनुभवाचे चटके मिळाल्याखेरीज आपले डोळे उघडणारचं नाहीत?

सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. हा सर्व खटाटोप भयगंड निर्माण करण्यासाठी नाही. तर, परिणामांची जाणीव करून देण्यासाठी आहे. आता जर आपण आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी घेतली नाही तर पुन्हा आपल्याला संधी मिळेल, याची शाश्वती देता येत नाही. म्हणूनच, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.. सावध व्हा.. सहकार्य करा.. दक्ष राहा.. खबरदारी घ्या! इतकीच कळकळीची विनंती आहे.

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..