आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे. बळी प्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून किंवा आदल्या दिवशीच आम्हा शेतकऱ्यांच्या घरोघरी असलेल्या बैलांची स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना तासून रंग किंवा तेल लावून चमकावले जाते. बैलांच्या शिंगांना फुगे बांधून, त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. त्यांच्या अंगावर झालर वगैरे टाकून छानपैकी सजवले जाते. बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधून हार घालून त्यांच्यावर गुलाल उधळला जातो. त्यांच्या शेणा पासून गोळे बनवून त्यांची पूजा केली जाते. शेणापासून गोळे बनवून पूजा करायची प्रथा का व कशासाठी आहे ते नक्की माहिती नाही परंतु बैलांचे शेणापासून शेतात खत, पूर्वी घरात मातीच्या भिंती असायच्या तसेच लादी किंवा फरशी यायच्या अगोदर त्या शेणाने सारवल्या जायच्या. गावागावात कॉंक्रीटचे जंगल होण्यापूर्वी घरोघरी शेणाने सारवलेली अंगणे असायची. आम्ही लहान असताना दिवाळीच्या आठ दिवस अगोदर संपूर्ण अंगण कुदळी व टिकावाने उकरून त्यात भर घालण्यासाठी बैलगाडीने मुरूम आणून पुन्हा ते अंगण चोपटणे वापरून ठोकून ठोकून सरळ केले जायचे त्यानंतर ते शेणाने सारवले जायचे. मातीचे अंगण दर चार पाच दिवसांनी शेणाने सारवले जायचे. या मातीच्या अंगणात लहान पोरं कितीतरी खेळायची पडायची धड पडायची त्यांना कितीतरी लागायचं, खरचाटायचे, रक्त यायचे पण ही सगळी लहान पोर तेव्हा त्याच अंगणातली माती त्या जखमेवर लावायची. डेटॉल नाही की साबण नाही की मलमपट्टी नाही, त्यांना कोणी ओरडायचे नाही की लागले म्हणून कौतुक करायचे नाही.
घरो घरी मातीच्या चुली असल्याने त्यांना इंधन म्हणून बैलांच्या शेणापासून थापलेल्या गोवऱ्या किंवा शेणी वापरल्या जायच्या त्यापासून निघणारी राख कीटक नाशक आणि जंतुनाशक म्हणून वापरली जायची.
हल्ली अमेझॉन वर बैलांच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या विकत मिळतात असे ऐकले आहे कारण काय तर त्या शेणाच्या गोवऱ्यांवर काही वेळ पायाचे तळवे ठेवल्यास ब्लड प्रेशर कमी होते म्हणे . आमच्या कडे आता शेती परवडत नाही तसेच शहरीकरण झाल्याने शेती करणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी झालीय पूर्वी आमच्या गावात शेकडो बैल एकामागोमाग आगीवरून उड्या मारताना दिसायचे पण आता तीस चाळीस पण बघायला मिळत नाहीत.
घरोघरी आपापल्या सजवलेल्या बैलांना पंचारतीने औक्षण घातले जाते घरातील स्त्रिया त्यांना पूजतात व दिवाळीत केलेलं गोड धोड भरवतात. मग गावातल्या चावडीवर मोठा जाळ पेटवला जाऊन एखाद्या मिरवणुकी प्रमाणे सगळे बैल एका मागोमाग या जाळावरून उडवले जातात.
भातशेतीची चिखलणी व लावणी झाल्यावर पावसाळ्यातील दोन अडीच महिने बैलांना काही काम नसते. बैल हिरवे गार गवत खाऊन घरातल्या गोठ्यांमध्ये असतात त्यामुळे त्यांच्या पायांना सतत ओलाव्यामुळे जखमा व रोग राई होते. काम नसल्याने काहीशा सुस्तावलेल्या बैलांना बळी प्रतिपदेला धूर व आगीवरुन उडवले जाण्यामुळे त्यांच्या अंगावर पायांवर असलेले रोग व जीवजंतू नष्ट होतात तसेच धूर व आग यांच्याशी संपर्क आल्याने बैलांच्या मनात आग व धुरा बद्दल असलेली भीती निघून जाते. भविष्यात कधी आग वगैरे लागली तर आपली गुरे ढोरे बावचळून किंवा गोंधळून जाऊन इकडे तिकडे सैरावैरा होऊन न जाता त्या आगीला समर्थपणे तोंड देऊ शकतील असा विश्वास प्रत्येक शेतकऱ्याला असतो. दिवाळी संपली की लगेच भाजीपाला आणि शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांसह बैलांमध्ये सुद्धा उत्साह व चैतन्य निर्माण होते.
प्राणीमित्र किंवा प्राणी संघटना यावर भलेही लाख आक्षेप घेवोत. परंतु बैलांना आगीवरुन उडवणे त्यांच्या अंगावर फटाके उडवणे यावर आक्षेप घेण्यापूर्वी प्रत्येक शेतकरी या बैलांच्या पुढे जाऊन स्वतः धुरात आणि आगीवरून जातो आणि त्याच्या मागे आपल्या बैलांना ओढत नेतो हे लक्षात ठेवा. आम्ही शेतकरी आमच्या गुरा ढोराना आमच्या मुलांसारखे जपतो आणि त्यांचं कौतुक करतो त्यांना इजा होईल किंवा त्रास होईल असे कृत्य करण्याचे आमच्या मनात सुध्दा नसते. सर्व प्राणी मित्रांनी नुसती बडबड करण्यापेक्षा स्वतः अगोदर एखादा बैल पाळून दाखवावा मगच त्यांच्या विषयी बोलावे.
इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणतात. आम्हा शेतकऱ्यांना आमच्या शेतात राब राब राबणाऱ्या बैलांची ईडा पिडा टाळण्यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली ढोरं उडवण्याची प्रथा त्याच जुन्या उत्साहात व जोशात पाळावी लागते याचा आभिमान आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर,
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply