काही वर्षापूर्वी दुबईच्या मेट्रोत एका भारतीयाला प्रवासासाठी एका धक्कादायक कारणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्याने धोतर घातले होते. हा माणूस पहिल्यांदा दुबईत धोतराने फिरत नव्हता. यापूर्वीही त्याने दुबईत धोतर नेसून प्रवास केला होता.
स्वातंत्र्य आंदोलनात भारतीय रेल्वेच्या एका डब्यातून आखूड धोतर घातलेले “बापू” एका स्थानकावर उतरत असल्याचे आपल्या परिचयाचे आहे. हे चित्र डोळ्यांसमोर उभे करा आणि दुबईच्या चकचकीत मेट्रोतून प्रवास करायला मनाई केलेला हा धोतरवाला भारतीयसुद्धा डोळ्यासमोर आणा.
धोतर हा काही फक्त मराठमोळा वस्त्रप्रकार नाही. संपूर्ण भारतभर धोतर हा पोशाखाचा एक भाग आहे. चिनी प्रवासी युआन च्वांग याने इसवी सन सातव्या शतकातील भारतीय पोशाख पांढरे शुभ्र धोतर हाच होता असे लिहून ठेवले आहे.
खादीची गांधी टोपी, नेहरू शर्ट त्यावर जाकीट आणि पैजमा किंवा धोतर हा पोशाख स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकप्रिय होता. आजही अनेक नेत्यांच्या अंगावर हा पोशाख दिसतो. राजकारणच काय… आता तर “मोदी जॅकेट”च्या नावाखाली अनेकांनी या पोशाखाला जवळ केलंय.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे तर कायम धोतरातच वावरायचे. महाराष्ट्रातील कित्येक नामवंत धोतर परिधान करत असत. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण हे तर कायम धोतर घालत.
भारतीय उपखंडाबाहेरही आग्नेय आशियातील थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या देशांतही धोतर प्रचलित आहे. एकटागी किंवा दुटांगी धोतर घालून तेथील नागरिक फिरतात.
चित्रपटसृष्टीतही धोतर लोकप्रिय आहे. मनोजकुमारचा ‘उपकार’ हा चित्रपट आणि त्याचा पेहेराव आठवा. तेव्हापासून पासून अनेक चित्रपटांतून ते पडद्यावर दिसत आले आहे.
धोतराचाच एक वेगळा अवतार म्हणून लुंगीचा उल्लेख करता येईल. गुढग्याच्या वर नेसलेली लुंगी ही दाक्षिणात्यांची खासियत. काहीजण तर ती आणखी वर नेसतात. चित्रपटांमधूनही लुंगीदर्शन अनेकदा झाले आहे. चेन्नई एक्सप्रेसमधला ‘लुंगीडान्स’ जगभर प्रसिद्ध झालाय.
आधुनिकतेची कास धरत जग बदलले. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण केली गेली. मात्र जगाच्या नकाशावर ठिपक्याएवढे दिसणारे काही देश अजूनही पुरातनकाळात जगत आहेत.
एक काळ असा होता की जगात जिकडेतिकडे भारतीयांना ठेचण्याची संधी सोडली जात नसे. मात्र एक खंबीर पंतप्रधान जगाला आपल्यासमोर वाकवू शकतो हे आता नरेंद्र मोदींच्या जगभरातल्या लोकप्रियतेमुळे सिद्ध होतंय. सोशल मिडियात व्हायरल झालेला एक फोटो इथे आठवतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबर मनमोहन सिंगांचा फोटो आणि नरेंद्र मोदींचा फोटो हे बरंच काही सांगून जातात.
— निनाद अरविंद प्रधान
धोतर हा भारतीयांचा अभिमानाचा विषय आहे. त्याचा अपमान का सहन करायचा ?
नमस्कार.
धोतराबद्दलची माहिती आवडली.
धोतर नेसणार्यााला प्रवेशबंदी, हें वाचून इतर कांहीं प्रसंग वाचलेले आठवले.
चित्रकार एम्. एफ्. हुसेन यांना पायात पादत्राणें न घातल्याबद्दल एका ठिकाणी प्रवेश नाकारला गेलेला आहे.
तसेंच, भारतातील ‘पश्चिमाळलेल्या’ क्लब्ज मध्ये टाय न बांधतां गेलें , किंवा सूट न घालतां गेलें, तर प्रवेश नाकारला जात असे.
‘एक नूर आदमी दस नूर कपडा’ हें खरें आहे, पण ‘का रे भुललासी वरलिया रंगा ?’ असें विचरण्याची पाळी आणणें , हें केव्हांही अयोग्यच.
सुभाष नाईक