एक नूर आदमी दस नूर कपडा. किंवा कपड्यासाठी नाटक करीशी तीन प्रवेशाचे असो. वस्र ही मूलभूत गरज आहे हे मात्र खरं आहे. आणि कपडे धुणे हे एक घरातील बायकांचेच काम आहे असा अलिखित नियम आहे. पूर्वी घरात माणसं खूप आणि वेगवेगळ्या वयोगटातील. त्यामुळे कपड्यांचे वर्गीकरण असे होते. एक अंगावर एक दोरीवर एवढेच कपडे असायचे तरीही जशी भांडी ढिगभर तसेच धुणे मोटभर….
1) रेशमी कद… रोज देवपुजा असल्याने घरात कद हा प्रकार होताच. पण ते रोज धुणे नाही. देवघरात त्याचे पावित्र्य जपले जायचे. म्हणून ते तिथेच ठेवले जाई. आणि त्या कदा बद्दल भितीयुक्त आदर असायचा. त्याचे आपल्या कडे लक्ष आहे याची सतत जाणीव होती. ते वस्र म्हणजे घरातील मोठी व्यक्तीच अशी धारणा होती…
2) मोठे कपडे… यात नऊ वारी साडी. धोतर. उपरणे. हे धुताना काठाला काठ लावून दोन्ही हातांनी दोन्ही बाजू एकत्र जुळवून उभे असेच धुवावे लागतात. आणि वाळत घालताना देखिल एखाद्या खुंटीला वा दाराच्या कोंडीला एक वेढा देऊन अडकवून मग परत ते फटकारुन मगच काठीवर जायचे. तेव्हा सुद्धा काठाला काठ. पदराला पदर असेच. नतंर ती साडी वा धोतर एका काठीने दोन काठ्या वर समांतर पसरवून वाळत घातलेले. कुणालाही त्रास होणार नाही उलट सगळ्यांना सारखी वागणूक दिली जाणारी मोठी व्यक्ती याचे प्रतिक. सगळ्या गोष्टी कशा नियोजन पूर्वक. जिथल्यातिथे. लक्तरे दाखवायची नसतात. शिवाय संस्कार. मायेची उब. चुकांना पदरात घेणाऱ्या आज्जी आई काकू आत्या अशा अनेक नात्याने असलेल्यांचे हे कपडे…
3)मधली पिढी व तिसरी पिढीचे कपडे…. यात पायजामे. सदरे. चड्ड्या. अर्ध्या बाहीचे सदरे. परकर पोलके. झगे. झबली टोपडी. अंघोळ करण्यापूर्वी आपापले कपडे सुलट करणे. आतील कपडे स्वतः धुणे. ही अट मोठ्यांना. आणि जवळपास एका बादलीत साबणाचे पाणी ठेवले जायचे त्यात टाकूनच बाहेर येणे. वाळत घालतांना देखील असेच क्रमवार. कपड्यातून
कधीच कुणाच्याही नजरेत वाईट भावना निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली जात असे…..
ही सगळी काम करणाऱ्या. लेकी सुना समान कायद्याने वागावे हे दाखवत. बाळाचे कपडे हळुवार हाताने धुणे याचा अर्थ त्याचे संगोपन हळूवार हातानेच केले पाहिजे. असे धुतलेले कपडे वाळून झाले की त्याच्या घड्या घातल्या जात तेव्हा ही फाटलेले आहे का. गुंडी काजे. नाड्या आहेत का. हे पाहिले पाहिजे याची शिकवण दिली जाते….
आता धुणे घरी असेल तर हे असे. नदीच्या काठावरचे धुणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. तिथे गेल्यावर वाकळ. चादरी कसे स्वच्छ आणि कमी कष्टाचे होते. यातून नदीसम सगळे आपलेच आहेत. मोकळ्या मनाने. आपुलकीने स्वच्छता म्हणजेच सेवा केली पाहिजे. नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण. असे होते. आणि संतसंग असेल तर कपडेच काय पण मनाची सुद्धा मलिनता जाते. सूर्यप्रकाशात त्यातील विषाणू मरुन जातात तसेच वाईट विचारांचे होते. ही सगळी शिकवण नदीच्या पात्रात धुतल्यावर नक्कीच मिळते…..
आता शेवटचा गावातील घरोघरी नवरात्राच्या आधी पंधरा दिवस घरातील चिंधी न चिंधी धुण्याचा सार्वजनिक आरोग्य अभियान राबविण्यात किती उत्साही वातावरण असते हे सगळे अनुभवले आहे. इथे कुणाला कसलीही जबरदस्ती नाही. कुणाच्या कायद्याने नाही. भितीने नाही तर स्वेच्छेने आनंदी मनाने धार्मिक भावना मनात ठेवून मनाच्या भितीने केले जाणारे.
आणखीन एक फायदा मराठी साहित्यातील वाक्प्रचार किंवा म्हण याची भर पडली. धो धो धूतला.धोबीपछाड. धोबी घरचा कुत्रा न घरचा ना घाटचा. अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. नाही निर्मळ साबण. दाग अच्छे है. असू दे असू दे साबण महत्वाचे नाही. धुणे महत्वाचे आहे. पण पाणी वाया न घालता हे ही नसे थोडके….. आणि राग येतो तेव्हा तर धूणे फारच छान वाटते. काढा आपटून आपटून आणि मारा घसाटे. फटका जोरात आणि द्या भिरकावून दोरीवर. आणि नंतर राग शांत झाला की हळूवारपणे घड्या घालून अलगदपणे कपाटात ठेवणे हे सगळे फक्त आणि फक्त तिलाच जमते. येऱ्या गबाळाचे काम नाही बर का.. हुश्श झाले बाई एकदाचे भांडी. धुणी याचे काम आता मस्त पैकी गरम गरम चहा मिळाला तर नक्कीच उद्याचे काय एकदम झक्कास..
धन्यवाद.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply