नवीन लेखन...

ध्येय कॅसेट विक्रीचे

कॅसेटचे प्रमुख वितरक ग्रँटरोडला होते. त्यांच्याकडे मी कॅसेट घेऊन गेलो. माझ्या कॅसेटची प्रत्येक बाब त्यांना नापसंत होती. माझ्यासारखा कॅसेट मार्केटला तसा अनोळखी, नवीन गायक, एकदम नवीन कंपनी, कॅसेटची अपुरी जाहिरात अशी अनेक कारणे देऊन त्यांनी नकार घंटा वाजवली. एव्हाना नकार ऐकण्याची मला सवय झाली होती. कॅसेटची भरपूर जाहिरात करण्याचे आश्वासन मी त्यांना दिले. पण त्यांनी स्वर-मंचतर्फे निदान तीन ते चार नवीन कॅसेटस दर महिन्याला वितरणासाठी देण्याचे आश्वासन मागितले. नव्हे तसा करारच त्यांना हवा होता. हे आश्वासन माझ्या ताकदीबाहेरचे होते. थोडक्यात मी माझ्या कॅसेटबद्दल त्यांच्याशी बोलत होतो आणि ते एका कॅसेट कंपनीचा मालक या नात्याने माझ्याशी बोलत होते. एकूण बोलणी फिसकटली आणि खिन्न मनाने मी घरी आलो. ही कॅसेट हा माझ्या कंपनीचा एक प्रॉडक्ट होता. मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या प्रॉडक्टची विक्री करण्यासाठी वेगळे स्वतंत्र सेल्स अॅन्ड मार्केटिंग डिपार्टमेंट असते. मला तेही परवडणारे नव्हते. माझ्यासमोर पाचशे कॅसेटचा डोंगर उभा होता. त्याची विक्री करण्याचे अवघड काम मला करायचे होते. मला प्रश्न पडला की मी नक्की कोण आहे? गायक आहे, कॅसेट कंपनीचा मालक आहे. विक्रेता आहे, मॅनेजर आहे, इंजिनियर आहे की कार्यक्रमाचा आयोजक आहे?

एक चांगली गोष्ट या धडपडीच्या काळातही सुरू ठेवली होती. ती म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे वाचन. मी एकुलता एक मुलगा असल्याने मला सख्खे भावंड नव्हते. त्यामुळे या पुस्तकांनाच मी मोठा भाऊ मानले होते. माझ्या अडचणी मी त्यांच्याशी शेअर करत असे आणि मोठ्या भावाप्रमाणे ती माझ्या अडचणी सोडवत असत. मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर यांचे पुस्तक त्यावेळी मी वाचत होतो. माझी अडचण सोडवायला पीटर ड्रकर धावून आले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पाचशे कॅसेटसचे प्रत्येकी दहा या प्रमाणे पन्नास भाग केले आणि लक्ष फक्त दहा कॅसेट्स विकण्यावर केंद्रित केले. आता ही समस्या त्यामानाने सोपी वाटू लागली. नातेवाईकांपासून मित्रमंडळींपर्यंत घरोघरी जाऊन कॅसेट विकायला सुरुवात केली. माझी पहिलीच कॅसेट असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ दीडशे कॅसेट्स मी विकल्या.

कॅसेट वितरकांच्या एका आक्षेपावर मी विचार केला. त्यांच्या मते मी नवीन गायक असल्यामुळे लोक माझी कॅसेट विकत घेणार नाहीत. पण जर का याच लोकांनी दोन तास माझे गाणे ऐकले तर? कदाचित माझे गाणे आवडले तर ते कॅसेट विकत घेतील. मी तातडीने अनेक देवस्थानांना पत्रे लिहिली. त्यांच्या देवस्थानांच्या महत्त्वाच्या उत्सवप्रसंगी मोफत कार्यक्रम आयोजित करावा, फक्त त्यानंतर मला कॅसेट विकायची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. माझी युक्ती यशस्वी ठरली. अशा अनेक कार्यक्रमात मला प्रत्यक्ष ऐकल्यानंतर रसिकांनी माझ्या कॅसेट्स विकत घेतल्या. पुढील सहा महिन्यातच उरलेल्या साडेतीनशे कॅसेट्स मी विकल्या. कॅसेट निर्मितीच्या खर्चापैकी संपूर्ण नाही, पण बरीच रक्कम मी कॅसेट विक्रीतून परत मिळवली होती. या वाटचालीत माझा अजून एक खूपच मोठा फायदा झाला होता. माझ्या कार्यक्रमांची संख्या वाढत होती आणि मी पंच्याहत्तर कार्यक्रम पूर्ण करून शंभराव्या कार्यक्रमाकडे घोडदौड सुरू केली होती.

त्या दरम्यान वाकडी येथे कुष्ठरोग निवारण आश्रमात कार्यक्रम सादर करून मी तीर्थरूप भाऊसाहेब धामणकर यांचे आशीर्वाद घेतले. प्रथमेश या विलेपार्ले येथील नामवंत संस्थेने श्रीकांतजींच्या रचनांचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात नामवंत गायिका निर्मलादेवी, शोभा गुर्टू, भूपेंद्र, दिलराज कौर यांच्यासोबत गायची संधी मला मिळाली.

शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत गाण्याचे भाग्य मला लाभले. माझ्या व्हीजेटीआय या कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळासाठी ‘आरास ही स्वरांची’ हा कार्यक्रम मी केला. या कार्यक्रमाला कवीवर्य शंकर वैद्यांचे बहारदार निवेदन होते.

हिंदी गीत-गझलचा संपूर्ण कार्यक्रम मी गावा अशी श्रीकांतजींची इच्छा होती. त्याप्रमाणे १८ मार्च १९८७ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, दादर येथे लायन्स क्लबसाठी मी ‘शाम-ए-गझल’ हा कार्यक्रम सादर केला. टेलिव्हिजनच्या नामवंत निवेदिका श्रीमती सरिता सेठी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. शाम-ए-गझलचा दुसरा प्रयोग मी २ नोव्हेंबर १९८७ रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे केला. या कार्यक्रमाला ठाण्याचे लोकप्रिय महापौर श्री. वसंत डावखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम अतिशय आवडला आणि त्यांच्या भाषणात स्टेजवरच ८ नोव्हेंबरच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे मला आमंत्रण दिले. त्याप्रमाणे ८ नोव्हेंबरला डावखरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी गझलचा कार्यक्रम सादर केला. नामवंत गायक व संगीतकार श्री. सुधीर फडके यांच्या उपस्थितीत मी गायलो. १ जानेवारी १९८८ रोजी ६१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सरस्वती स्तवन व महाराष्ट्र गीत गाण्याची संधी मला ज्येष्ठ गायक शरद जांभेकर आणि उत्तरा केळकर यांच्याबरोबर मिळाली.

त्याच काळात ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक श्री. गोविंदराव कुलकर्णी हे ‘अंगार’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत होते. भाऊंचे मित्र श्री. विष्णू रत्नपारखी यांनी गोविंदराव कुलकर्णीं बरोबर एका सिनेमाची निर्मिती यापूर्वी केली होती. त्यांच्याबरोबर मी गोविंदरावांची भेट घेतली आणि त्यांना गाणे ऐकवले. रत्नपारखी काकांच्या आग्रहामुळेच या चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधी मला मिळाली. लवकरच गीतकार प्रवीण दवणे यांनी लिहिलेले आणि संगीतकार दीपक पाटेकर यांनी स्वरबद्ध केलेले गीत मी विनय मांडके आणि अरुण इंगळे या ज्येष्ठ कलाकारांबरोबर रेकॉर्ड केले. गाण्याचे शब्द होते ‘या रे या तारुण्याच्या लाटेवरी.’ लवकरच संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आंबेडकर या चित्रपटासाठी मी एक गीत ध्वनीमुद्रित केले. एकदा कामे मिळू लागली की किती भराभर मिळतात पहा. याच काळात एक तरुण निर्माता दिग्दर्शक शिरीष जांभेकर मला भेटला. ‘सडे फटिंग’ या चित्रपटाची तो निर्मिती करीत होता. या चित्रपटाचे संगीतकार होते विश्वास पाटणकर. माझा मित्र अजित अभ्यंकर मला भर पावसात डोंबिवलीला विश्वास पाटणकरांकडे घेऊन गेला. माझे गाणे विश्वासजींना पसंत पडले. या चित्रपटात चार द्वंद्वगीते होती आणि ती वेगवेगळ्या कलाकारांबरोबर गायची होती. त्यामुळे गायक एक होता तर गायिका चार. शिरीषने आणि विश्वास पाटणकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला. प्रशांत वैद्य यांनी लिहिलेली चारही द्वंद्वगीते मी अनुक्रमे उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, मृदुला दाढे-जोशी आणि प्रज्ञा खांडेकर या गायिकांबरोबर गायलो. या सर्व काळात विश्वास पाटणकरांकडून मला भरपूर शिकायला मिळाले. विश्वासजी, पाटणकर वहिनी आणि त्यांचा मुलगा मिथिलेश यांच्यासोबत माझे घरगुती संबंध जुळले.

संगीतकार आनंद मोडक हे पुण्याचे एक प्रयोगशील संगीतकार होते. त्यांची आणि माझी ओळख रेडिओच्या एका रेकॉर्डिंग दरम्यान रंजना पेठे-जोगळेकरने करून दिली होती. पुण्याला गेलो की नेहमी मी आनंद मोडकांना भेटत असे. संगीतावर नेहमीच ते भरभरून बोलत. पण आम्ही एकही काम एकत्र केले नव्हते. अनेकदा असे घडले आहे की ज्या संगीतकारांबरोबर मी अजिबात काम केलेले नाही किंवा अगदीच कमी काम केले आहे, त्यांच्याबरोबर माझे संबंध नेहमीच जवळचे राहिले आहेत. संगीतकारांबरोबर संबंध ठेवताना त्यांनी मला काम दिले आहे की नाही, याचा मी आजपर्यंत कधीही विचार केलेला नाही. कारण या प्रत्येक संगीतकाराबरोबर चर्चा करताना, त्यांचे गाणे ऐकताना मी भरपूर शिकत गेलो आहे. माझी सांगीतिक दृष्टी प्रगल्भ होण्यासाठी या सर्व संगीतकारांची मोलाची मदत मला झाली आहे. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहीन. आनंद मोडकांचा एक दिवस सकाळी मला फोन आला. त्यांनी ताबड़तोब पुण्याला भेटायला बोलावले. त्यांच्याकडून एखादे गाणे मिळणार या आनंदात मी गेलो. गाण्याचे काम होते पण अगदीच वेगळ्या प्रकारचे होते.

मंगला साने या गायिकेची त्यांनी मला ओळख करून दिली. मंगलाताई अमेरिकेहून आल्या होत्या. त्या दीड महिना भारतात होत्या. आपल्या आवाजात एखाद्या कॅसेटचे रेकॉर्डिंग व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण संपूर्ण कॅसेटचा खर्च त्यांच्या बजेटबाहेर होता. मी पार्टनरशीपमध्ये त्यांच्याबरोबर कॅसेट करावी अशी आनंद मोडकांची इच्छा होती. आनंद मोडक संगीताची जबाबदारी घेत असतील तर हा प्रोजेक्ट करायची मी तयारी दर्शवली. पण मंगलाताईंना हिंदी भजनांचा अल्बम करायचा होता. त्या प्रकारात आनंद मोडक काम करायला राजी नव्हते.

“या प्रोजेक्टमध्ये मी नसलो म्हणून काय झाले?” तो थोर मनाचा संगीतकार म्हणाला.

“तू प्रभाकर पंडितांसारख्या अव्वल दर्जाच्या संगीतकाराबरोबर मराठी भजनांचा अल्बम केला आहेस. ते तुला नक्की हो म्हणतील. तुम्ही दोघेही चार-चार भजने गा. या प्रोजेक्टच्या निमित्ताने तुझे गाणे अमेरिकेत पोहोचेल लेका!” आनंद मोडकांची बोलायची पद्धत इतकी आग्रही असायची की समोरच्याला नकार देण्याची शक्यताच नसायची.

तो प्रोजेक्ट मी केला. हा प्रोजेक्ट पार्टनरशीपमध्ये असल्याने आम्ही निम्मा निम्मा खर्च करणार होतो. त्यामुळे पहिल्या कॅसेटच्या विक्रीतून परत आलेले भांडवल मी या प्रोजेक्टमध्ये गुंतवले. प्रभाकर पंडितांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आम्ही प्रत्येकी चार गाणी रेकॉर्ड केली. या कॅसेटच्या वितरणाचे अमेरिकेमधील हक्क कराराने मंगला साने यांना देण्यात आले. भारतातील वितरणाचे हक्क ‘स्वर-मंच’कडे ठेवले. मंगलाताईंची प्रसिद्धी भारतात कमी असल्याने त्यांची चारही भजने माझ्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड झाली आणि ‘प्रभू मोरे’ या नावाने हिंदी भजनांची माझी संपूर्ण कॅसेट बाजारात आली. त्याची विक्रीही बऱ्यापैकी झाली. कारण हिंदी कॅसेट असल्याने विक्रीच्या कक्षा बऱ्याच रुंदावल्या होत्या. त्यामुळे हिंदीत माझे नाव फार प्रसिद्ध नसतानाही या कॅसेटची विक्री मराठी कॅसेटपेक्षा जास्त झाली. एकूणच हिंदी मार्केटची ताकद आणि आवाका माझ्या लक्षात आला.

एव्हाना माझे ऊर्दू उच्चार रियाजाने बरेच सुधारले होते. गझलची गायकीही गळ्यात बसू लागली होती. आता मला गझलच्या कॅसेटचे वेध लागले. माझा सगळा खटाटोप श्रीकांतजी जवळून पहात होते. एका मराठी तरुणाच्या या धडपडीचे कौतुक ठाकऱ्यांना नाही तर कोणाला असणार? श्रीकांतजींनी कॅसेटचे संगीत करायचे मान्य केले, पण एक अट घातली की फक्त चारच गझल एका दिवशी रेकॉर्ड होतील. त्याचा एकूण दर्जा त्यांना पसंत पडला नाही तर प्रोजेक्ट तेथेच थांबेल आणि त्या चार गझल प्रसिद्धही केल्या जाणार नाहीत. त्यांची अट मी आनंदाने मान्य केली. ते माझे फक्त संगीतकार नव्हते, तर गुरूही होते. मी गायलेली गझल त्यांनाच पसंत पडली नाही तर ती प्रसिद्ध करण्यात काही अर्थच नव्हता. जोरदार रिहल्सलला सुरवात झाली. हिंदी-ऊर्दू गझल मी गेली सात वर्षे शिकत होतो. पण योग्य उच्चारांसह रेकॉर्डिंग माईकवर गझल गाणे बरेच कठीण काम होते. त्याची तयारी आणि रियाज मी मनापासून करत होतो. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ तयारीनंतर आम्ही एक गझल रेकॉर्ड केली. श्रीकांतजींना ती आवडली. मग काय जराही थांबायची माझी तयारी नव्हती. लवकरच ताडदेव, मुंबई येथील अॅकमे स्टुडिओमध्ये सलग चार दिवस आम्ही या कॅसेटचे रेकॉर्डिंग केले. या रेकॉर्डिंगची एक खासियत अशी की आजचे शिवसेनाप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे सलग चारही दिवस या रेकॉर्डिंगला उपस्थित होते. त्यावेळी ते शिवसेनाप्रमुख नव्हते. फक्त उद्धव ठाकरे होते. त्यांना हिंदी, ऊर्दू गझलची उत्तम जाण होती. सलग चारही दिवस रेकॉर्डिंगला उपस्थित राहून त्यांनी मला मोलाची मदत केली. माझा आत्मविश्वास वाढवला. ते गंमतीने मला म्हणायचे,

“या कॅसेटच्या रिलीजनंतर मी तुला अनिरुद्ध खान-जोशी म्हणेन.” एकूण सगळी ठाकरे मंडळी ही मुळात हाडाची कलावंतच. ती राजकारणात आली हा योगायोग.

अशा प्रकारे गझलची कॅसेट तर रेकॉर्ड झाली. आता प्रश्न होता ती प्रकाशित करण्याचा. या कॅसेटचे वितरण संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही करावे लागणार होते. या अवघड कामात स्वतः श्रीकांतजींनी जातीने लक्ष घातले. एव्हाना माझे नावही कॅसेट कंपन्यांना माहीत झाले होते. त्याचाही थोडा फार उपयोग झाला. ‘व्हिनस कॅसेट्स’ या प्रख्यात कंपनीच्या चालकांशी श्रीकांतजी स्वतः बोलले आणि आमची कॅसेट व्हिनसने विकत घेतली. कोणत्याही लेखाला, पुस्तकाला, कॅसेटला शीर्षक देण्यात श्रीकांतजींची हातोटी होती. मार्मिकमध्ये ‘शुद्ध निषाद’ या टोपणनावाने ते चित्रपटांचे परीक्षण लिहीत असत. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा नवीन मराठी चित्रपट येणार होता. त्याचे नाव होते ‘आई पाहिजे.’ त्याच्या परीक्षणाच्या लेखाला श्रीकांतजींनी शीर्षक दिले, ‘आई पाहिजे घेऊन जा.’ ‘लेकिन’ या चित्रपटात एक गाणे होते, ‘यारा सिली सिली. ‘ या चित्रपटाच्या परीक्षणाला श्रीकांतजींचे शीर्षक होते, ‘गुलजार यारा डोंट बी सिली सिली’ तर आमच्या कॅसेटला श्रीकांतजींनी सुंदर शीर्षक दिले ‘दिलोजानसे.’

“या कॅसेटसाठी तू मनापासून परिश्रम केलेस ना, म्हणून हे नाव देतोय, श्रीकांतजी म्हणाले. व्हीनस कंपनीने रेडिओवर विविध भारतीपासून टीव्ही चॅनलपर्यंत या कॅसेटची उत्तम जाहिरात केली आणि लवकरच मुंबईत या कॅसेटचे प्रकाशन झाले. दिलोजानसे या गझलच्या कॅसेटमुळे प्रथमच माझे गाणे भारताच्या मर्यादा ओलांडून बाहेर पडले. अमेरिका, हाँगकाँग, लंडन येथे स्थायिक झालेल्या माझ्या मित्रांनी कॅसेट विकत घेऊन मला अभिनंदनाचे फोन केले. दुबईमध्येही या कॅसेटची विक्री चांगली झाली, असे व्हीनसच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कॅसेट देण्यासाठी मी ‘मातोश्री’वर गेलो. माननीय उद्धवजी ठाकरे रेकॉर्डिंगच्या वेळी आमच्या बरोबर होतेच. उद्धवजी मला शिवसेनाप्रमुखांच्या समोर घेऊन गेले. त्या महान व्यक्तीमत्त्वाला वंदन करून मी कॅसेट त्यांना अर्पण केली. कॅसेट पाहून शिवसेनाप्रमुख खूष झाले. “एकूण ठाकरे-जोशी समीकरण संगीतातही यशस्वी होतेय असे वाटते.” ते गंमतीने म्हणाले, “मराठी तरुणांनी निरनिराळ्या क्षेत्रात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, अशी माझी अपेक्षा असते. हिंदी-ऊर्दू गझल गायनासारख्या निराळ्या क्षेत्रात तू काम सुरू केलेस, याचा मला आनंद आहे. श्रीकांत तुझ्यावर घेत असलेल्या मेहनतीचे चीज कर. यशस्वी हो.” असा त्यांनी आशीर्वाद दिला. मला आस्मान ठेंगणे झाल्यासारखे वाटले. माननीय बाळासाहेबांची भेट हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे.
,
यानंतर व्हीजेटीआयच्या शतक महोत्सवात या कॉलेजचे इंजिनीयर असलेल्या पण कलाकार म्हणून काम करणाऱ्या सर्वश्री आत्माराम भेंडे, रामदास पाध्ये, अनंतराव वर्तक, लालजी देसाई, अशोक खरे आणि श्रीकांत दादरकर या मोठ्या कलाकारांसोबत मी कार्यक्रम सादर केला. पुणे लायन्स क्लबच्या रिजनल कॉन्फरन्समध्ये माननीय पेशव्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची संधी माझे काका गजानन जोशी यांनी मला दिली.

एक दिवस आमच्या ठाणे शहराचे महापौर श्री. वसंत डावखरे यांनी महापालिकेच्या कार्यालयात मला बोलावून घेतले. वसंतरावांच्या विशिष्ट शैलीत ते म्हणाले,

“अनिरुद्ध, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नागरी सत्कार आपण ठाणे शहरातर्फे करणार आहोत. या कार्यक्रमाच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. लक्षात घे. गाणे लताबाईंसमोर गायचे आहे. तेव्हा नीट तयारी कर. यासाठी तुझ्याकडे पंधरा दिवस आहेत.”

युवर टाईम स्टार्टस् नाऊ या पद्धतीने हे अवघड पण गोड काम मी अंगावर घेतले. अनेक गाणी शोधली, पण मनासारखे गाणे मिळेना. ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांचे एक नवीन सरस्वती स्तवन संगीतकार श्रीधर फडके यांच्याकडे आहे, असे मला कोणीतरी सांगितले. गाणे ऐकवण्यासाठी यापूर्वी मी श्रीधरजींना भेटलो होतो. या कारणासाठी पुन्हा त्यांच्याकडे गेलो आणि लताबाईंच्या स्वागतासाठी या सरस्वती स्तवनाची मागणी केली. श्रीधर फडक्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता ते स्तवन मला शिकवले. शांताबाईंनी केलेले सरस्वतीचे वर्णन या गानसरस्वतीलाही शोभून दिसणार होते. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमोर मी सरस्वती स्तवन सादर केले. जय शारदे वागीश्वरी गाणे सर्वांनाच अतिशय आवडले. माझ्या गाण्यापेक्षा याचे श्रेय गीतकार शांताबाई शेळके आणि संगीतकार श्रीधर फडके यांचेच होते. कार्यक्रमानंतर डावखरे साहेबांनी लताबाईंशी माझी ओळख करून दिली. एखाद्या अथांग सागरासमोर आपण दिङ्मूढ होऊन उभे रहातो, तसा मी या स्वर सागरासमोर उभा राहिलो. काय बोलावे तेच मला सुचेना. “छान गायलात तुम्ही,” लताबाईंचे शब्द ऐकून मी धन्य झालो. आयुष्यात काही क्षण असे येतात की काळ पुढे सरकूच नये असे आपल्याला वाटते. मलाही असेच वाटत होते. मी भानावर आलो तोपर्यंत लताबाई निघून गेल्या होत्या. मी मात्र हरवल्यासारखा तिथेच उभा होतो.

या सर्व कार्यक्रमांची आणि रेकॉर्ड होत असलेल्या गाण्यांची तारीखवार नोंद मी ठेवत होतो. कारण कायमच ध्येय समोर ठेऊन काम करण्याची माझी पद्धत होती आणि या सवयीचा फायदा मला आजही होत आहे. कारण कधी टारगेट साध्य होतं, तर कधी होत नाही. पण प्रयत्न मात्र पूर्णपणे केल्यामुळे आपण टारगेटच्या बरेच जवळ तरी पोहोचू शकतो.

आता कार्यक्रमांची संख्या शंभरच्या जवळ येत होती. तेव्हा शंभराव्या कार्यक्रमाची आखणी करायला आम्ही सुरुवात केली. ठाणेकरांसाठी कोणतेही तिकीट न लावता कार्यक्रम विनामूल्य करायचे आम्ही ठरवले. माझ्या ठाण्यातील रसिकांच्या प्रोत्साहनानेच मी येथपर्यंत पोहोचलो होतो. ठाण्याचे आयुक्त श्री. सुरेश जोशी यांनी गडकरी रंगायतन आम्हाला विनामूल्य दिले. आमचा हुरूप अजून वाढला. ६ मे १९८९ रोजी ‘स्वर-मंच’तर्फे ‘गीत-गझल फर्माईश’ हा माझा शंभरावा जाहीर कार्यक्रम गडकरी रंगायतनच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन टेलिव्हिजनच्या निवेदिका वासंती वर्तक यांनी केले. ख्यातनाम गायक श्री. सुरेश वाडकर यांनी एक गाणे सादर करून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गायक मिलिंद इंगळे, विनय मांडके यांनीही गाणी सादर केली. कवीवर्य श्री. शंकर वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक वि. आ. बुवा यांची आकर्षक भाषणे झाली. माझे मुख्याध्यापक अशोक चिटणीस सर, व्हिजेटीआयचे प्रोफेसर देसाई सर यांच्याबरोबरच ठाण्याचे आयुक्त श्री. सुरेश जोशी, संगीतकार विश्वास पाटणकर, नंद होनप, प्रभाकर पंडित, आयोजक अविनाश कोर्डे, चित्रपट निर्माते शिरीष जांभेकर, अभिनेते अरविंद सरफरे असे अनेक नामवंत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रसिद्धीही उत्तम लाभली.

शंभराव्या कार्यक्रमानंतर एक मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करायचे मी ठरवले.. इंग्रजीत याला ‘मिशन स्टेटमेंट” असे म्हणतात. यासाठी मी अनेक जाणकारांचा सल्ला घेतला. माझ्या स्वर-मंचच्या वादक मित्रांचीही मदत घेतली. विवेक दातार, समय चोळकर, विश्वनाथ शिरोडकर, अजय दामले, गिरीश प्रभू, मिथिलेश पाटणकर, मोहन पेंडसे, सुभाष घैसास, अजित अभ्यंकर यांच्याबरोबर चर्चा केली. या सर्वांच्या मदतीने मी एक हजार जाहीर कार्यक्रम सादर करण्याचे मोठे उद्दिष्ट नक्की केले. या प्रोजेक्टचे नामकरणच मी केले ‘मुक्काम पोस्ट एक हजार.’ एकदा मुक्काम पोस्ट ठिकाण नक्की झाले की मधले मैलांचे दगड नक्की होतात आणि आपण ते कधी कधी पार करायचे आहेत याची आखणी करता येते. ही संपूर्ण योजना मी भाऊंसमोर मांडली. योजनेच्या आखणीचे त्यांनी कौतुक केले, पण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे माझे लक्ष वेधले.

“एका कलाकाराचा कार्यक्रम एका शहरात आयोजित झाल्यानंतर त्या शहरात पुन्हा वर्षभर तरी रसिक पुन्हा त्याला ऐकण्यासाठी येणार नाहीत. त्यामुळे कार्यक्रमांची इतकी मोठी संख्या गाठण्यासाठी संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातही कार्यक्रम करावे लागतील.’

“माझी तयारी आहे,” मी म्हणालो.

“अरे, शंभर कार्यक्रम पूर्ण करायला तुला तीन वर्षे लागली. मग एक हजार कार्यक्रमांसाठी तुला अजून किमान वीस वर्षे तरी गायची तयारी ठेवायला हवी. ”

“माझी तयारी आहे,” मी पुन्हा म्हणालो.

“आज तू तरुण आहेस, पण अजून वीस वर्षे तीन तास सलग गाण्याची तयारी ठेवणे आणि त्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सतत प्रयत्न करणे हे फार अवघड काम आहे. कारण आज आहे ती परिस्थिती आणि ती माणसे तुला सतत वीस वर्षे मिळणार नाहीत.’

“मग काय करू? ” मी किंचित नाराज होऊन विचारले.

“काम मुश्किल है इसलिए करने योग्य है, आसान काम तो सभी करते है,” माझा उत्साह वाढवत भाऊ मिश्किलपणे म्हणाले.

‘मुक्काम पोस्ट एक हजार !’ भाऊ म्हणाले तेव्हा मला जाणवले की खूपच अवघड आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मी हाती घेतले होते. ते पूर्ण होईल की नाही? पूर्ण झालेच तर पूर्ण व्हायला किती वर्षे लागतील? या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. पण श्रीदत्तगुरूंच्या आशीर्वादाने शंभर कार्यक्रम पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला होता.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..