दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
संध्याकाळचे पुणे हे माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख.पुण्यात रोज झडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चितनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील.
आम्ही मराठी माणसं हा, १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा हा संग्रह दि.बा.मोकाशींच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.
त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये “दि. बा. मोकाशी यांची कथा ” (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि.बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी, या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या पालखी या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. खरे म्हणजे “पालखी”च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्यााच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले.
एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर “यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं – काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!” ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.
दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply