नवीन लेखन...

मलेरियाचे निदान : रक्त व लघवीची तपासणी

मलेरियाचे निदान करण्यात रक्ताच्या तपासणीचा मोलाचा वाटा आहे . यामध्ये दोन विशिष्ट पद्धतींनी तपासण्या केल्या जातात .

अ ) रक्तातील मलेरियाचे परोपजीव शोधण्यासाठी केलेल्या चाचण्या
ब ) मलेरियाच्या तापामुळे रक्तातील विविध घटकांवर व रुग्णाच्या शरीरातील इतर इंद्रियांवर जो परिणाम होत असतो , त्यांच्यामधील बदल व उतारचढाव दाखवून देणाऱ्या रक्ताच्या व लघवीच्या काही चाचण्या केल्या जातात . त्या निरिक्षणावरील निष्कर्षातून रुग्णाच्या शरीरावर रोगाचा किती घातक परिणाम झालेला आहे याचे अनुमानही करता येते .

अ ) रक्ताच्या काचपट्टीवरील नमुन्यावरून परोपजीवांना शोधणे
( Blood Smear Examination )
रुग्णाला हुडहुडी भरून ताप चढत असताना , किंवा ताप उतरून गेल्यावर अंग गार झालेले असताना रक्ताची तपासणी केल्यास मलेरियाचे परोपजीवी दिसण्याची शक्यता जास्त असते . शरीरात त्वचेच्या खालील बारीक केशवाहिन्यात ( Blood Capillaries ) परोपजीवी असलेल्या तांबड्या रक्तपेशी मुक्तपणे फिरत असतात . अशा वेळी बोटातून रुग्णाच्या रक्ताचा थेंब काचपट्टीवर घेऊन ( Thick & Thin Smears Stained Slides ) असा नमुना तपासणे योग्य असते . असे असूनही सर्वसाधारणपणे रक्तवाहिनीतून जास्त प्रमाणात रक्त काढून घेता येत असल्याने व त्यातूनच Smears बरोबर इतरही रक्ताच्या महत्त्वाच्या चाचण्या करता येत असल्याने हीच पद्धत जास्त प्रचलित आहे .

साधारण १५ ते ३० मिनिटे Smears च्या निरिक्षणानंतर असल्यास पॉझिटिव्ह व नसल्यास निगेटिव्ह असा रिपोर्ट दिला जातो . काही वेळा परोपजीवांचे प्रमाण अत्यल्प असेल तर परोपजीवी शोधण्याचे काम चिकाटीचे होते . त्याकरिता लक्षपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे . निगेटिव्ह रिपोर्ट म्हणजे मलेरिया नाही असे कधीच मानले जात नाही . Thick Smear ( जाड ) मध्ये तांबड्या रक्तपेशी जास्त प्रमाणात दिसत असल्याने परोपजीवी लवकर शोधून काढण्यास मदत होते . तसेच Thin Smear ( पातळ ) मध्ये परोपजीवी कोणत्या गटाचे आहेत व त्यांची कोणती अवस्था आहे हे समजण्यास सोपे जाते . परोपजीवी दिसल्यावर त्याचे रक्तातील प्रमाण किती आहे हे खालील वेगवेगळ्या पद्धतींनी दर्शविता येते .

१ ) साधारण १००० तांबड्या पेशींमध्ये परोपजीवी किती प्रमाणात आहेत . उदा . १००० तांबड्या रक्तपेशींत १० परोपजीवी याप्रमाणे
२ ) साधारण १००० पांढऱ्या रक्तपेशींशी त्यांचे प्रमाण किती आहे यानुसार
३ ) + , ++ +++ ++++ अशा अधिक या चिन्हाचा वापर करूनही रिपोर्ट दिला जातो . उदा . एक चिन्ह म्हणजे सर्वात कमी त्याचप्रमाणे चार अधिकचे चिन्ह सर्वात जास्त परोपजीवांचे प्रमाण दर्शविते .
४ ) ज्यावेळी रुग्णाच्या रक्ताच्या Smear मध्ये Sexual Forms ( Gamatocytes ) दिसतात तेव्हा त्यांची नोंद घेणे हे फार महत्त्वाचे ठरते . यावरून एखाद्या नागरी विभागात मलेरियाचा प्रसार किती प्रमाणात होऊ शकतो याचा अंदाज घेता येतो .

प्रथम घेतलेला रुग्णाच्या रक्ताचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर तापाची पद्धत लक्षात घेऊन कमीत कमी पुन्हा दोन वेळा तरी रक्त तपासून घेणे जरुरीचे आहे . बरेच वेळा तिसऱ्या वेळी घेतलेल्या रक्तात परोपजीवी आढळतात . खरे तर परोपजीवी आणि रक्त तपासनीस यांच्यात लपंडावाचा खेळ चालू असतो व त्यात पुष्कळदा परोपजीवी रक्त तपासकांना चकविण्यास यशस्वी होतात हीच खरी वैद्यकीय शास्त्रापुढे गंभीर समस्या आहे . शेवटी तज्ञ डॉक्टर आपल्या आजपर्यंतच्या अनुभवाने रुग्णाची एकूण लक्षणे पाहून औषधोपचार सुरू करतात . याबाबतीत तारतम्य बाळगणे गरजेचे आहे . थोडक्यात कोणताही ताप म्हणजे मलेरियाच आहे असे नव्हे हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे .

रक्ताच्या Smear मध्ये परोपजीवी न दिसण्याची काही कारणे याप्रमाणे आहेत .
१ ) मलेरियाच्या तापावरील दिलेली औषधे रुग्णाने अर्धवटपणे सोडून दिली असतील , तर त्यावेळी परोपजीवी दिसत नाहीत .
२ ) परोपजीवी शरीरातील आतील भागात पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून अडकून राहिल्यास त्वचे खालील ( Blood Capillaries ) बारीक केशवाहिन्यांमध्ये ते दिसून येत नाहीत .
३ ) परोपजीवांचे काळपट रंगाचे कण अस्थिमज्जेतील रक्त तयार करणाऱ्या पेशींमध्ये दिसतात . त्यामुळे काही वेळा अस्थिमज्जेतील रक्ताची तपासणी ( Bone Marrow Aspiration ) केल्यावरच परोपजीवी दिसू शकतात .

रक्ताचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाच्या रोगाचे अचूक निदान करण्यासाठी हल्ली नवीन प्रकारच्या रक्तचाचण्या करण्यात येतात ज्यामध्ये मायक्रोस्कोप वापरला जात नाही .

या तपासण्यांना Card Marker Enzyme Test असे म्हणतात . मलेरिया परोपजीवांमध्ये अनेक तऱ्हेचे रासायनिक पदार्थ असतात . त्यांना प्रतिजने ( Antigen ) म्हणतात . ही प्रतिजने तांबड्या रक्तपेशींना घट्टपणे जोडलेली असतात . या प्रतिजनांचे विविध घटक असतात . त्यातील मुख्य घटकांची नावे १ ) PGluDH २ ) Histidine Rich Protein II ( HRP II ) ३ ) PLDH ४ ) Fructose Phosphate Aldolase अशी आहेत . P. Vivax व P. Falciparum या दोन्ही प्रकारच्या मलेरियातील परोपजीवांत यापैकी काही प्रतिजने समान आढळतात परंतु काही प्रतिजने ( Antigens ) या दोनही परोपजीवांच्या गटामध्ये त्यांचे वेगळेपण विशिष्ट स्वरूपात निश्चितपणे दाखवतात . ह्या सर्व तऱ्हेच्या प्रतिजनांना ओळखण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान आता कार्ड स्वरूपात उपलब्ध आहे .

या कार्डावर कोणत्या ठिकाणी P. Vivax व कुठे P. Falciparum ची लाल रेषा येईल हे कार्डावर नमूद केलेले असते . त्यानुसार रुग्णाच्या रक्ताचा एक थेंब कार्डावर टाकल्यानंतर २० ते ३० मिनिटात तपासणी पूर्ण होते . रक्तात परोपजीवी असतील तर लाल रंगाची आडवी रेषा कार्डवर दिसते आणि विशेष म्हणजे कार्डाच्या ज्या भागात ती येते , त्यावरुन कोणत्या गटाचा परोपजीवी आहे हे नेमकेपणाने ओळखता येते . जर ते त्या गटाचे परोपजीवी नसतील तर त्या भागात लाल रेषा येत नाही . Control Line मुळे तपासणीवर नियंत्रण ठेवता येते . या अद्ययावत् तपासणीलाही काही मर्यादा आहेत . परोपजीवांचे रक्तातील प्रमाण ५० / c.m.m . पेक्षा कमी असेल तर तपासणी निगेटिव्ह रिझल्ट दाखवते . त्यामुळे तेथे निदान १०० % टक्के बरोबर येईलच अशी खात्री नसते . परंतु मायक्रोस्कोपमधून Smear ची तपासणी , व कार्ड टेस्ट दोन्ही एकाच वेळी केल्यास योग्य निदान होण्याची शक्यता अगदी ९ ० ते ९ ५ टक्क्यापर्यंत वाढते .

आता नवनवीन शोध लागत आहेत ज्यामुळे अगदी कमीत कमी परोपजीवी असूनसुद्धा तपासणी पॉझिटिव्ह असल्याचा रिझल्ट मिळू शकेल . जिवंत परोपजीवी व औषधांमुळे मेलेले परोपजीवी यांचेही प्रमाण कळणाऱ्या चाचण्या उपलब्ध होत आहेत .

Qualitative Buffy Coat -QBC तपासणी
एका लहान व्यासाच्या पातळ काचेच्या नळीत ( ५ ते १० मि . मि . व्यासाची Capillary tube ) ज्याच्या आतील पृष्ठभागावर Acridine Orange Stain चा पातळ रंगीत थर लावलेला असतो . या नळीत रुग्णाचे रक्त घेऊन त्या नळ्या Centrifuge Machine मध्ये १००० ते १५०० रिव्होल्यूशन पर मिनिट ( Revolution Per minute ) RPM या वेगाने १५ मिनिटे फिरवल्या जातात . या नंतर प्रथम रक्तामधील पातळ द्राव ( Plasma ) सर्वात वरच्या भागात जमा होतो . त्यानंतर पांढऱ्या रक्तपेशींचा करड्या रंगाचा थर ( Buffy Coat ) दिसून येतो व त्याच्या खालील बाजूस तांबड्या रक्तपेशींचा थर असे तीन वेगवेगळे थर दिसतात . ज्या रक्तात मलेरियाचे परोपजीवी असतील त्या तांबड्या रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशींच्या थराखाली जमा होतात . नळीच्या आतील पृष्ठभागावर असलेला Acridine Orange Stain या परोपजीवांमधील जनुकाचे कण खेचून घेतो . अशा परोपजीवी जोडलेल्या तांबड्या रक्तपेशी Fluroscent Machine खाली नळीचे निरिक्षण केल्यावर चकाकताना ( Fluorsce ) उठून दिसतात . ज्या नळ्यांमध्ये चकाकणाऱ्या रक्तपेशी आहेत त्यामध्ये मलेरियाचे परोपजीवी आहेत असे अनुमान ठामपणे करता येते . Blood Smear तपासणीला ही महत्त्वाची पुरक चाचणी आहे . या पद्धतीत एका वेळी अनेक रुग्णांच्या रक्ताची तपासणी करता येते . या चाचणीवरुन मलेरिया झालेला आहे किंवा नाही एवढेच कळू शकते . कोणत्या गटाचे परोपजीवी आहेत हे कळू शकत नाही . या तपासणीचा रक्तपेढीतील रक्तदात्यांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे समजण्यासाठी उपयोग होतो . ज्या रक्तदात्यांमध्ये ही तपासणी पॉझिटीव्ह रिपोर्ट दाखवते त्यांचे रक्त कोणालाही देता येत नाही .

या रक्त तपासणीलाही मर्यादा आहेत . कारण काही वेळा False Positive म्हणजे फसवा Positive Report येण्याची शक्यता असते .

Serology Test For Malaria Antibodies detection :
विविध जंतू व विषाणूंमुळे माणसाला जे रोग होतात त्यांचे निदान मानवी शरीरात त्यामुळे तयार होणाऱ्या प्रतिपिंडांच्या ( Antibodies ) रक्तामधील पातळीवरून करता येते . उदाहरणार्थ टायफॉईड , पॅराटायफॉईड यांच्या निदानासाठी Widal Test , डेंग्यूसाठी ‘ डेंग्युची Antibody detection Test अशा प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत , ज्यामुळे रोगांचे निश्चित स्वरूप समजून घेता येते . परंतु मलेरियाच्या परोपजीवांचे निदान करण्यात अशा तऱ्हेची Serological तपासणी उपयुक्त ठरत नसल्याने ती केली जात नाही .

ब ) वर नमूद केलेल्या ‘ ब ‘ विभागातील तपासण्या तितक्याच महत्त्वाच्या असतात.
१) Complete Blood Count with Platelet Count , Haemoglobin ( Hb ) , Red Blood Cell count ( R.B.C. )
Packed Cell Volume ( P.C.V. ) या सर्वांचे प्रमाण मलेरियाच्या रुग्णामध्ये कमी होते .

Total White Cell Count ( W.B.C ) एकूण रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या बरेच वेळा कमी होते .

प्लेट लेट काऊंट ( Platelet Count ) च्या बाबतीत मलेरियाच्या रुग्णात तो बराच काळ कमी कमी होत गेल्यास त्याला रुग्णालयात भरती करणे श्रेयस्कर असते . कारण अशा रुग्णात शरीरातील विविध भागात रक्तस्राव होण्याची शक्यता असते . त्यासाठी Platelet Count ही तपासणी वारंवार करावी लागते .

२ ) Liver Function Tests : ( L.F.T. ) अनेक वेळा मलेरियाच्या रोग्यामध्ये थोड्या प्रमाणात कावीळ झाल्याचे लक्षात येते . परंतु जेव्हा मलेरियाचा ताप गंभीर स्वरूप धारण करतो तेव्हा रुग्णाच्या यकृतावर बराच वाईट परिणाम झालेला दिसून येतो . रक्तामधील

१ ) Bilirubin ( Total & Direct )
२ ) S.G.O.T.
३ ) S.G.P.T.
X ) Alkaline Phosphatase
५ ) Proteins Albumin & Globulin
६) Prothrombin Time
७) Bleeding Time & Clotting time
या सर्व तपासण्या करणे अत्यंत गरजेचे असते .
3 ) Kidney Function Tests
लघवीची तपासणी : लघवीमधून रक्तासोबत Haemoglobin चे बारीक कण बाहेर जात असल्याने लघवीच्या विविध तपासण्या कराव्या लागतात .
काही वेळा दोन्ही मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात . याचे निदान
१ ) Serum Creatinine
२ ) Blood Urea Nitrogen
३ ) Blood Electrolytes – Sodium , Potassium , chlorides , Bicaronates . या तपासण्यांवरुन होऊ शकते .
४ ) रक्तामधील साखरेचे ( Blood Sugar ) प्रमाण बरेच कमी होते , म्हणून त्याची तपासणी वारंवार करावी लागते .
५ ) Blood G – 6 – P – D – Enzyme test :
समाजातील काही विशिष्ट गटातील काही लोकांमध्ये उदा . पारशी , सिंधी , कच्छी G – 6 – P – D . या ( Enzyme ) विकराचे प्रमाण सामान्यतः बरेच कमी असते किंवा काही वेळा त्याचा पूर्ण अभाव असतो . अशा गटातील लोकांमध्ये G – 6 – P – D ची कमतरता असल्याने त्यांना मलेरियासाठी काही औषधे रुग्ण असताना दिली गेल्यास त्यांच्या रक्तामधील तांबड्या पेशींवर घातक परिणाम होतो.

आत्तापर्यंत वरील नमूद केलेल्या सर्व तपासण्यांपैकी निश्चितपणे कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे हे पूर्णपणे रूग्णाच्या रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते . यामधील बऱ्याच तपासण्या खर्चिक असल्याने सर्व सामान्यांना आर्थिक दृष्टया संकटात टाकणाऱ्या असतात . या खेरीज औषधांचा खर्च हा निराळाच असल्याने रुग्ण व त्याचे कुटुंबीय बेजार होतात हीच खरी गंभीर समस्या आहे .

अत्याधुनिक तपासणी पद्धती
१ ) मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशीत वाढताना त्यांचा नाश करतात . त्यावेळी त्या रक्तपेशींतील हिमोग्लोबिन Haemoglobin अणूंवर परोपजीवांमुळे रासायनिक बदल घडून येतो व Feriprotoporphyrin IX ( heme ) नावाचे पिंगट काळपट कण तांबड्या रक्तपेशींपासून सुटेपणाने रक्तात फिरू लागतात . या कणांना रक्तातील पांढऱ्या पेशी खेचून घेतात . पिंगट काळपट कणांचे अस्तित्व Mass Spectrophotometry या अद्ययावत यंत्राद्वारे निश्चित करता येते . कमीत कमी म्हणजे अगदी १० परोपजीवी per . c.m.m रक्तात असले तरी हे कण मोजता येतात . ज्या रक्ताच्या नमुन्यात हे कण असतात त्या रक्तात मलेरियाचे परोपजीवी असण्याची शक्यता जवळजवळ ९ ० % पर्यंत असते . ही तपासणी अक्षरश : एका मिनिटात होत असल्याने झटपट निदान करण्यासाठी याचा उपयोग होतो . ज्या प्रयोगशाळेत शेकडोंनी रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासावयाचे असतात तेथे या तपासणीचा चांगला उपयोग होतो .

२ ) Flurescence Microscope :
या पद्धतीमध्ये Acridine Orange , Benzothiocarboxypurine ( BCP ) अशा तऱ्हेचे द्रवरूप रंग वापरून काचपट्टीवरील रक्ताचे नमुने तपासले जातात . खास पद्धतीच्या मायक्रोस्कोपमधून मलेरियाचे परोपजीवी व पांढऱ्या रक्तपेशी विविध रंगात दिसतात . त्यांचे आकार व रंग भिन्नता यामुळे परोपजीवांचे अस्तित्व दर्शविता येते . नेहमीच्या पद्धतीपेक्षा येथे थोडक्या वेळात व जास्त अचूक निदान करता येते .

३ ) वरील तऱ्हेचीच पद्धती वापरून परंतु मायक्रोस्कोप शिवाय असे चकाकणारे परोपजीवी Flow Cytometry मशीन द्वारा रक्ताच्या नमुन्यात अचूकपणे दर्शविता येतात .

४ ) Polymerase Chain Reaction ( PCR ) या आधुनिक तंत्रज्ञानाने परोपजीवांच्या जनुकातील अतिसूक्ष्म कण जे रक्तामध्ये फिरत असतात , ते अचूकपणे शोधता येतात . या तंत्र तपासणीत 10 Parasites Per microlitre असतील तरीही ते शोधणे शक्य असते .

मलेरियाच्या परोपजीवांचा Electron Microscope ( E.M ) द्वारा केला जाणारा अभ्यास

पॅथोलॉजी लॅबॉरेटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रोस्कोप मधून मलेरियाचे परोपजीवी साधारण ३०० ते ३५० पट मोठे दिसतात . E.M. द्वारा ते हजारो पटीने मोठे दिसण्याचे तंत्रज्ञान अवगत झाल्याने परोपजीवाच्या प्रत्येक अवस्थेचा अतिशय सखोल अभ्यास अतिप्रगतशील अशा अद्ययावत प्रयोगशाळांतून केला जातो . याचा उपयोग नेहमी करण्यात येणाऱ्या रक्ताच्या काचट्टीवरील तपासणीसाठी केला जात नाही .

परोपजीवी मनुष्याच्या तांबड्या रक्तपेशीत व यकृताच्या पेशीत तसेच डासांच्या विविध पेशीत कोणत्या पद्धतीने शिरतात व कोणते घातक परिणाम घडवितात या संशोधनातून झालेल्या ज्ञानाचा उपयोग नवीन औषधे व लस निर्मितीत होण्याची शक्यता आहे .

E.M. अभ्यासाचा आवाका फार व्यापक असून या प्रकरणात त्याची तोंड ओळख करून देण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे .

ज्याक्षणी परोपजीवांची पिल्ले ( Merozoites ) माणसाच्या रक्तात पसरतात त्यावेळी आपले लक्ष फक्त तांबड्या रक्तपेशीच आहेत याचे अचूक ज्ञान त्यांना नैसर्गिक प्रेरणेने प्राप्त झालेले असते . या तांबड्या रक्तपेशींत शिरण्याची पूर्वतयारी म्हणून त्यांच्यात रासायनिक बदल होतात , व नवीन तयार झालेल्या रसायनामुळे रक्तपेशीच्या दोन पदरी आवरणाचा ताठरपणा जाऊन ती नाजुक व दुबळी बनण्यास सुरवात होते . त्यामुळे ही पिल्लावळ बिनबोभाटपणे तांबड्या रक्तपेशींच्या अंर्तभागात शिरते . आता तांबड्या रक्तपेशीत शिरण्याचा दरवाजा सताड उघडला गेल्यावर परोपजीवांच्या पिल्लांचे अनेक भाऊबंद आत शिरतात व तांबड्या रक्तपेशींमधील खाद्य व्यवस्थितपणे फस्त करण्यास सुरवात करतात . ही एकूण प्रक्रिया अशा प्रकारे होत असताना E.M. मधून फोटोंच्या माध्यमातून मिळू शकते .

Merozoite च्या शरीरातून दोन पदरी आवरण ( PVM . membrane ) असलेली Cytostome नावाची सोंड तांबड्या रक्तपेशीवरील आवरणाच्या निरनिराळ्या जागांमधून आत घुसण्याचा प्रयत्न करते . P.V.M. मुळे हा प्रयत्न सफल होतो

एकदा Merozoites चा आत प्रवेश झाल्यावर Haemoglobin प्रथिनाची शृंखला तोडली जाते ज्यामधून Free iron ( Haeme ) चे अणु मोकळे होतात . परंतु ते अणू तसेच राहिले तर त्यांच्या सहवासात परोपजीवी जिवंत राहू शकत नाहीत . या कारणास्तव परोपजीवी हुषारीने या Free Haeme अणूंचे Polymerization पद्धतीने Haemozoin या काळपट रंगाच्या कणांमध्ये परिवर्तन करतात . Malaria Pigment परोपजीवींच्या अन्न साठविण्याच्या पोकळीत म्हणजे Food Vacuoles मध्ये साठविले जाते . शृंखला तुटताना अनेक Amino Acids सुटी होतात जी परोपजीवांच्या वाढीसाठी मोलाची मदत करतात . हा सर्व खेळ ३० सेकंदात संपतो व तांबड्या रक्तपेशीचे थडगे तयार होते .

हे मलेरियाचे परोपजीवी जेव्हा मनुष्याच्या यकृताच्या पेशीत वाढत असतात तेव्हा तेथे शिरण्याची त्यांची पद्धती ही तांबड्या रक्तपेशीत शिरण्याच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असते . यावेळी सोंडेभोवती तयार होणारे PVM . Membrane व तांबड्या रक्तपेशीत शिरणारे PVM . Membrane ही दोन्ही भिन्न पध्दतीची असतात . त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते .

तांबड्या रक्तपेशी व यकृताच्या पेशी यामधील परोपजीवांचे शिरण्याचे व वाढीचे काम इतके अचूकपणे घडते की त्यामुळेच मलेरिया परोपजीवांचे जीवनचक्र अबाधित चालू राहते .

डासांच्या पोटातील आवरणात व लाळ ग्रंथीत वाढणाऱ्या परोपजीवांची विविध रूपे ( Development Stages ) यांच्या E.M. द्वारा अभ्यासाअंति काही शास्त्रज्ञांना असे वाटते की त्यांच्या शरीरात असे काही रासायनिक बदल घडविता येतील की अशा तऱ्हेने तयार केलेल्या ( New Mechanical Models ) डासांच्या शरीरात हे परोपजीवी तग धरू शकणार नाहीत . Xantho Urenic Acid हे रसायन यामध्ये मोलाची कामगिरी बजावू शकेल . ज्यामुळे डास निर्मूलनात एक प्रभावी मार्ग निघण्याची शक्यता आहे .

केस नंबर ४
डॉ . अभय गोखले वय ६५ राहणार ठाणे , स्वत : सर्जन व स्वतः चे नर्सिंग होम , दोन दिवस अंग मोडून १०० ° पर्यत ताप चढला . एकंदर लक्षणे फ्लू सारखी होती . कोल्हापूर मध्ये एक महत्त्वाची मिटींग होती म्हणून तेथे जाणे भाग होते . डॉक्टरांनी एकट्यानेच रेल्वेचा प्रवास केला . कोल्हापूरमध्ये गेल्यावरही एक दिवस अंग कणकणत होते परंतु कामे पार पडली होती . संध्याकाळी अचानक लघवीतून तांबडे रक्त जाण्यास सुरवात झाली . पोटात दुखत नव्हते . परंतु एकंदरीत अशक्तपणा फार जाणवत होता . सर्जनच असल्यामुळे मुतखडा किंवा मुत्राशयाच्या कॅन्सरची सुरवात असेल किंवा काय अशी डॉक्टर गोखल्यांना शंका आली . त्यांनी एक दिवस आधीच परत रेल्वेने ठाण्याला परतायचे ठरविले . त्यासंबधीत सर्व समाचार त्यांनी घरी कळविला होता . रात्रीच्या प्रवासात तब्बेत खालावत गेली . जवळ जवळ बेशुद्धीच्या अवस्थेत ते ठाण्यात उतरले व ताबडतोब त्यांना घरच्या मंडळींनी मोठ्या हॉस्पिटलच्या I.C.U. मध्ये दाखल करून घेतले . दोन तासात Falciparum Malaria चे निदान झाले . दुपारपर्यत पूर्णपणे बेशुद्धावस्थेत गेलेल्या डॉक्टरांची मूत्रपिंडे निकामी होत गेली व पहाटेला मृत्युने त्याच्यावर झडप घातली . २४ तासात सर्व खेळ संपला.

Slide Stains ( रंगद्रव्ये ) यामुळे झालेला उत्कर्ष

माणसाच्या रक्तातील मलेरियाचे परोपजीवी ओळखण्याकरिता काचपट्टीवर रुग्णाचा रक्ताचा थेंब पसरून विविध रंगाचे द्राव ( stain ) वापरल्याने तो परोपजीवी रंगीत दिसतो व त्यामुळे मायक्रोस्कोपखाली ओळखता येतो .

१८४७ सालात व्हर्काव्ह या पॅथॉलॉजिस्टने मलेरिया सदृश तापामुळे मरण पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन सुरू केले . यामध्ये त्याला प्लीहा , यकृत , व मेंदू ( Spleen , Liver , Brain ) या अवयवांमध्ये काळ्या रंगाच्या बारीक कणांचे थर जमा झालेले आढळून आले . हे कण म्हणजे त्या रोगाचे जंतू नसून हा त्या रोगामुळे अवयवात होणारा बदल आहे . ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती .

१८८० मध्ये आल्फान्स लॅवेरान याने रक्तात मलेरियाचे परोपजीवी दाखविले परंतु त्याच्या काळात कोणताही Stain ( रंगद्रव्य ) वापरण्याचे ज्ञान अवगत नव्हते .

१८८५ मध्ये इटालियन शास्त्रज्ञ गॉल्गी याने तांबड्या रक्तपेशीमधील मलेरियाच्या परोपजीवांच्या विविध अवस्था शोधण्याचा प्रयत्न केला होता .

१८९ ३ मध्ये मासयीयाफावा या शास्त्रज्ञाने प्रथम Methyleneblue stain हे रंगद्रव्य वापरून निळ्या रंगाचे मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशीत दाखविले .

१८९४ मध्ये रोमोनॉव्हस्की याने Slide Stain करण्याच्या विविध पद्धती शोधून काढल्यामुळे रक्ताच्या तपासणीत क्रांतीच घडली . या अभ्यासातूनच पुढे Giemsa , Field’s व Leishman Stain यांचा वापर सुरू झाला जे Stain जे आजमितीसही प्रचलित आहेत . या रंगद्रव्यांच्या मदतीने परोपजीवांची प्रत्येक अवस्था ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले.

–डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..