नवीन लेखन...

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग पाच

असंख्य डायऱ्यांचा ढीग तिथे होता. नेहमीप्रमाणे विस्कटलेली पाने पडली होती. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पेनं, पेन्सिली, बोरू, टाक, असंख्य रिफिल्स आणि शाईच्या दौती पण पडलेल्या होत्या. बाजूला तराजू मोडून पडला होता आणि हे सगळं एका कचरा कुंडीजवळ पडलं होतं. चमत्कारिक दृश्य दिसत होतं ते. मी सगळ्या डायऱ्या एकत्र केल्या, पानं एकत्र केली आणि वाचू लागलो.

एक विलक्षण गोष्ट माझ्या नजरेत भरली. आत्तापर्यंत ज्या ज्या डायऱ्या मी वाचल्या त्या त्या डायरीची सुरुवात कुठल्यातरी एखाद्या वाक्याने होत असे . ते वाक्य म्हणजे त्या डायरीचा आत्मा असायचा. पण या डायऱ्यांच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलेलं मला आढळलं. ही डायरी कुणाला सापडली तर कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकावी . कारण तिच्यातल्या मजकुराची तीच लायकी आहे! उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. मी मिळेल ते पान वाचू लागलो.

१: सगळ्या गोष्टींचा आता पश्चात्ताप होतोय. वेळीच तोंड उघडलं नाही किंवा वेळीच लेखणी चालवली नाही, तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपला पाठिंबा आहे, असं, सगळी व्यवस्था गृहीत धरून चालते आणि सगळं कर्तृत्व खड्यात जातं. पण हे कळायला खूपच उशीर झालाय. खूपच.

आज खरं म्हणजे आनंदाचा दिवस. घसघशीत रकमेचा फार मोठा पुरस्कार लाभला होता. देशविदेशातील अनेक नामवंत विचारवंतांना हा पुरस्कार देण्यात येणार होता. शिवाय अनेक देशांकडून सदिच्छा भेटीचं निमंत्रण मिळालं होतं. जगभरात नामवंत विचारवंत म्हणून वेगळी ओळख लाभणार होती. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. सगळ्या प्रकारच्या मिडियानं प्रचंड कव्हरेज दिलं होतं. त्यामुळं वातावरण आनंदी होतं. पण…

आत्ता लक्षात येतंय, आपण पुरस्कार स्वीकारून, जगभर फिरून क्षुद्र ठरलोय. कारण जगभरात फिरताना, तिथल्या मीडियाला इंटरव्ह्यू देताना, त्यांनी विचारलेल्या तिरकस प्रश्नांची उत्तरं देताना, कळत नकळत आपण आपल्या देशाची नालस्ती करीत होतो. आपल्याच देशाला असंस्कृत ठरवून अवहेलना करत होतो आणि जगभरातील सर्व प्रकारचा मीडिया आपल्या देशावर थुंकत होता. त्याला आपणच कारणीभूत होतो. पैशाचा, मानसन्मानाचा, प्रसिद्धीचा माज इतका चढला होता की माईक समोर आल्यावर आपण काहीही बरळत होतो. सगळं जग हसत होतं आणि तथाकथित विचारवंत म्हणून आपण मिरवत होतो. वैचारिक दृष्ट्या देशाचं केवढं नुकसान केलं होतं, याची तेव्हा जाणीव होत नव्हती. आता सगळ्याची लाज वाटते आणि विचारवंत म्हणून आपल्या समाजासमोर येण्याचीही शरम वाटते.

२: लेखक म्हणून केवढा अभिमान वाटत होता. लिहावं त्या अक्षराचं सोनं होत होतं. आपण मागू तेवढं मानधन प्रकाशक द्यायला तयार असायचे. प्रसिद्धीपूर्वीच पुस्तकाच्या सहासात आवृत्या संपलेल्या असायच्या. केंद्र आणि राज्यशासनाचे सगळे पुरस्कार, साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद, वेगवेगळ्या समित्यांवर नेमणुका, राज्यपाल नियुक्त आमदारकी असं बरंच लाभलं होतं. फॅनक्लब मोठा होता. फॅनमेल अनावर असायचं. पण कुठेतरी आत बोच होती. आपण अनैतिक काहीतरी करतोय याची खंत उरात दाटायची. कारण सत्तेतले सगळे मुरब्बी त्यांना हवं तसं, आपल्याला नाचवत होते. शासनाच्या चुकीच्या धोरणांना पाठिंबा द्यायला लावत होते. आपली लेखणी आपल्या ताब्यात नव्हतीच जणू. मदाऱ्यांनं माकडाला नाचवावं तसं चालू होतं. पैसा, प्रसिद्धीचा माज इतका होता की या सगळ्यात काही गैर आहे, हे जाणवतही नव्हतं. आपले शब्द, सत्ताधाऱ्यांची बटीक बनले होते. पण आता या वयात हे सगळं समजून काहीच उपयोग नव्हता. दारूच्या, नॉनव्हेजच्या आणि पार्ट्यांच्या नशेत लाज, शरम जळून गेली होती. आता फक्त छि – थू होत होती.

३: आपण म्हणजे समाजाचा आरसा आहोत. आपल्या लेखणीनं, धारदार शब्दांनी रस्ता हरवलेल्या राज्यकर्त्यांना, चुकणाऱ्या समाजाला, बिघडलेल्या व्यवस्थेला बातम्यांच्या माध्यमातून, आग ओकणाऱ्या आणि अभ्यासपूर्ण अग्रलेखातून आसूड ओढायला हवा होता. वर्तमानपत्रांचं तेच खरं काम असायला हवं होतं. दिशादर्शक, पथप्रदर्शक, ज्ञानवर्धक आणि वाचकांना अद्ययावत माहितीनं सजग करण्याचं पवित्र कार्य करायला हवं होतं. पण आज पश्चात्ताप होतोय. कुठल्यातरी मिडियाहाऊसने फेकलेल्या लाखो रुपयांचा तुकड्यावर, शासनाने कोट्यातून दिलेल्या फ्लॅटच्या मेहेरबानीवर आपलं स्वत्व, इनाम विकून समाजाला भ्रमित करण्याचं, वैचारिक दरी निर्माण करण्याचं छिनाल काम करतोय आपण. सगळ्या आदरणीय वृत्तपत्रकारांच्या परंपरेला मातीत गाडण्याचं नीच काम मात्र आपण करतोय. याची लाज, शरम वाटतेय.

४: अशा अनेक डायऱ्या. तथाकथित विचारवंतांच्या, आपलं कर्तव्य विसरून कुणाच्या तरी गुलाम झालेल्या पत्रकारांच्या. जन्मजात मिळालेल्या प्रतिभाशक्तीशी फारकत घेऊन, नको त्यांच्याशी, समाजमान्य नसणाऱ्या संबंधांचं समर्थन करणाऱ्यांच्या, जगभरात आपल्याच देशाची निंदानालस्ती करणाऱ्यांच्या. परावलंबी, पंगू, पोकळ तत्वज्ञान शिकवणाऱ्या विद्वानांच्या.

सगळ्या डायऱ्या वाचल्यावर लक्षात आलं, की प्रत्येक डायरीची शेवटी लिहिलेलं वाक्य अगदी योग्य होतं. पश्चाताप झाल्यानं असो वा अन्य कशानं, पण ते योग्य होतं. ही डायरी कुणाला सापडली तर कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकावी, कारण त्यातल्या मजकुराची तीच लायकी आहे!

यात थोडी भर घालायला डायरीलेखक विसरले. त्यांनी लिहायला हवं होतं, मजकुराप्रमाणे, तो मजकूर लिहिणाऱ्या व्यक्तीचीसुद्धा तीच लायकी आहे!

डॉ. श्रीकृष्ण जोशी.

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..