मला आठवतंय , काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरात डिक्शनरी आणि टेलिफोन डिरेक्टरी या दोन मोठ्या ,जाडजूड पुस्तकांसाठी जागा राखीव असायची. घरातल्या एका कोपऱ्यात टेलिफोन आणि बाजूला डिरेक्टरी एका स्पेशल तिपाई वर ऐटीत विराजमान असायचे . शहरातील सर्व टेलिफोनधारकांची नावें त्यात असत. त्यामुळे अनावधानाने कधी एका जुन्या परिचिताचा नंबर हरवला असल्यास लगेच गवसायचा . शाळेतली आवडती ‘ती ‘ किंवा ‘त्याचा’ नंबर चोरून डिरेक्टरीत बघितल्यावर उगाच आनंद व्हायचा . फोन लावायची कधी हिंमत नव्हती पण असाच मनातल्या मनात आनंद …..
डिरेक्टरीच्या बाजूलाच तिची लहान बहिण म्हणजे एक संपर्क वही असायची ;जिच्यात नातेवाईक आणि मित्र परिवार,काही अर्जेंट व्यक्ती , शेजारीपाजारी यांचा पत्ता आणि नंबर अल्फाबेटीकली लिहिलेला असायचा. दोघींचा थाट काही औरच .
अशीच डिक्शनरी ही . पुस्तकांच्या कप्प्यात लगेच दिसेल अशा ठिकाणी तिची जागा फिक्स . इंग्लिश टू मराठी ,इंग्लिश टू इंग्लिश यापैकी एक.
न कळलेल्या अर्थाचे तेव्हा बरेच शब्द असायचे ;अशा शब्दांचा अर्थ शोधण्यात एक धमाल असायची. किती किती नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ म्हणून अजुन समर्पक कितीतरी शब्द. भाषेची अथांगता बघुन बुद्धी थक्क व्हायची. कुमारवयात सभ्य घरांतून न वापरले जाणारे ‘असे’ काही शब्द या डिक्शनरी मध्येच चाचपडले जायचे.
अशीही डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील.
-शुभदा अमृतकर
Leave a Reply