हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात.
एकतर डायबिटीसमुळे शारीरिक तणाव असतोच शिवाय मानसिक तणावही येतो.
अनेकदा लोकं गोंधळून जातात. आपण नक्की काय करावं, काय खावं, काय वर्ज्य करावं, केव्हा खावं, असे बरेच प्रश्न पडतात. भीतीपोटी सुरुवातीला काही जण दोन वेळेचं जेवणही व्यवस्थित घेत नाहीत. त्याचा दुष्परिणाम म्हणजे रक्तातली साखरेची पातळी एकदम खाली जाते, चक्कर येते व इतर अनेक नवीनच समस्या उभ्या राहतात. हे सर्व टाळण्यासाठी, सुदृढ, कार्यक्षम व निरामय आयुष्यासाठी डॉक्टर व आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मधुमेही व्यक्तींच्या पोषणाच्या गरजा या सर्वसाधारण व्यक्तींसारख्याच असतात. प्रत्येकास आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्या व्यक्तीचे वय, वजन, लिंग, उंची, कामाची पद्धत, शारीरिक स्थिती या सर्व घटकांवर अवलंबून असतात.
मधुमेहाचा सामना करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना-आपल्या उंचीसाठी असणाऱ्या आदर्श वजनापेक्षा १० टक्के वजन कमीच असावे. रक्तातील ग्लुकोजची तपासणी वारंवार करून ती योग्य आहे याची खात्री करावी. शीतपेय, मिठाई, केक, आइस्क्रीम, जॅम, जेली, गोड बिस्किटं, गूळ, मध, साखर घातलेले पदार्थ टाळावेत. मद्यपान, धूम्रपान व तंबाखूचे सेवन वर्ज्य करावे. बेकरीचे वनस्पती तुपात बनविलेले पदार्थ-खारी, टोस्ट, बटर, पाव टाळावेत. मैद्यापासून बनविलेले पदार्थ सामोसा, नूडल्स, पास्ता, नान, तळलेले नाश्त्याचे पदार्थ- शेव, गाठ्या, भजी, कचोऱ्या, चाटचे पदार्थ शक्यतोवर टाळावेत.
मधुमेहींचा आहार हा ताज्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, संपूर्ण (न चाळता, पॉलिश न केलेली) तृणधान्ये, गाईचे दूध, दही, ताक, पालेभाज्या, भाकरी, भाजलेले चणे, कच्च्या भाज्यांचे सॅलड, सूप असा असावा. भरपूर प्रमाणात केवळ दुपारचे व रात्रीचे जेवण न घेता, दिवसातून ५ ते ६ वेळा हलका आहार घ्यावा.
-डॉ. गीतांजली चितळे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply