डिटर्जंट आणि साबण ( तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्ट्या काहीच साम्य नाही. डिटर्जंटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिटर्जंट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने) असलेले संश्लेषित पदार्थ. साबणाच्या रेणूप्रमाणे डिटर्जंटच्या रेणूच्या कार्बनी मूलकाच्या एका टोकाचा भाग ‘जलरोधी’ तर दुसऱ्या टोकाकडील भाग ‘जलप्रेमी’ असतो. अशाप्रकारचे रेणू पाण्याचा पृष्ठीय ताण करतात. कमी त्यामुळेच डिटर्जंटमध्ये साबणाचे गुणधर्म येतात. साबणाशी तुलना करता डिटर्जंट हे अधिक कार्यक्षम आहेत. यामागे काय कारण असेल?
जर पाणी कठीण असेल तर अशा पाण्यात कपडे धुण्यासाठी वापरलेला साबण कपड्याची स्वच्छता करण्यापूर्वी पाण्यातील क्षारांशी संयोग पावतो. दुहेरी विस्थापन होऊन त्यामधून कॅल्शिअमचे व मॅग्नेशिअमचे क्षार बनतात. पाण्यात हे क्षार अद्रावणीय असल्याने त्यांचा चिकट साखा होऊन तो पाण्यामध्ये तरंगत राहतो व कपड्यांना चिकटतो. या साख्यामुळे कपड्याचा रंग भुरकट बनतो आणि कापड व कापडतंतू यांची काही प्रमाणात खराबी होते. हा दोष डिटर्जंटमध्ये येत नाही; याचे प्रमुख कारण म्हणजे या दोन द्रव्यांच्या संरचनेच्या अंत्य गटातील फरक होय. साबणात रेणूच्या अंती असणारा (-COOH) हा अणूंचा गट होय, तर डिटर्जंटमध्ये या गटाऐवजी सल्फेट (-0-SO3H) किंवा सल्फोनेट (-SO3H) असे अणू गट हायड्रोकार्बन साखळीला जोडलेले असतात. त्यांचे सोडिअम क्षार तयार केल्यावर त्या संयुगाच्या रेणूचे आयनीकरण होऊन साबणाप्रमाणेच जलप्रेमी व जलरोधी अशी दोन टोके एकाच आयनामध्ये एकत्र आल्याने त्यामध्ये साबणाचे गुण येतात. परंतु कठीण पाण्यातील कॅल्शिअम किंवा मॅग्नेशिअम यांच्याशी झालेले साबणाचे संयुग अद्रावणीय परंतु किंवा असतात. सल्फेट सल्फोनेटबरोबर झालेले तेच संयुग द्रावणीय असल्याने हे संयुग काही अडचणी न येता पाण्याबरोबर वाहून जातात. हेच डिटर्जंटच्या यशाचे कारण आहे.
साबणाची कार्यक्षमता आणखी एका ठिकाणी कमी पडते, ती म्हणजे आम्लयुक्त पाण्यामध्ये. साबणावर आम्लाची अभिक्रिया होऊन साबणापासून तैल आम्ले मोकळी होतात. तैल आम्ले यामध्ये साबणाचे काहीच गुण नसतात, मात्र डिटर्जंटवर आम्लयुक्त पाण्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता अबाधित राहते.
शुभदा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply