समाज कल्याणाकरता प्रत्येक देशामध्ये आरोपीला शिक्षा दिली आहे. परंतु बदलत्या परिस्थितीत शिक्षा शास्त्रज्ञांचे विचार पण सुधारित झाले आहेत. प्राचीन काळातील शिक्षा आधुनिक नवीन विचाराचा परिणाम होऊनदेखील मुख्यत: चार प्रकारच्या शिक्षा मान्य झाल्या आहेत.
१) कडक शिक्षा (Deterrent):
समाज कल्याणाकरता प्रत्येक देशामध्ये आरोपीला शिक्षा दिली आहे. परंतु बदलत्या परिस्थितीत शिक्षा शास्त्रज्ञांचे विचार पण सुधारित झाले आहेत. प्राचीन काळातील शिक्षा आधुनिक नवीन विचाराचा परिणाम होऊनदेखील मुख्यत: पुढील चार प्रकारच्या शिक्षा मान्य झाल्या आहेत.
यामध्ये शिक्षा कडक स्वरूपाची असावी हा विचार आहे. त्याचा उद्देश असा असतो की, गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा. त्याला धडा मिळाला पाहिजे. त्या शिक्षेचा परिणाम इतरांवरदेखील होतो की, ज्यामुळे ते अपराध करण्यापासून परावृत्त ह्वावेत. गुन्हेगारास आणि इतर गुन्हा करणाऱ्यांना त्यातून भीती आणि चेतावणी मिळते. परंतु निर्ढावलेल्या अट्टल गुन्हेगारांवर त्याचा परिणाम होत नाही. इतर नवीन गुन्हेगारांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही; कारण पुष्कळ अपराध अचानक पूर्वनियोजन न करता क्षणिक भावनेत घडतात. निर्ढावलेले अपराधी त्या शिक्षा भोगून परत अपराध करतात. शिक्षा होऊन परत तुरुंगात येतात! त्यांना तुरुंगातील जीवनच आवडते. बाहेर मोकळेपणे समाजात काम करायची इच्छा नसते. त्यामुळे शिक्षेचा उद्देश सफल होत नाही. कारण असा अनुभव आहे की, जाहीर फाशी देत असता त्या गर्दीमध्येच पिक पॉकेटिंगचे अपराध घडत. इतकेच नव्हे तर मारामाऱ्या, खून देखील पडत. पूर्वीच्या काळी समज होता की, गंभीर अपराध करणाऱ्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची दुष्ट प्रवृत्ती असते, भूतपिशाच्चवृत्ती संचारत असल्याने अपराध केलेला आहे या कल्पनेने कडक शिक्षा दिली जात असे.
२) दुष्कर्म फलदायक (Retributive) :
या शिक्षेमागे हेतू हा की, दुष्ट विचारांचा नायनाट करण्याकरता तशाच प्रकारची धडा शिकवणारी शिक्षा असावी. मग त्याचे परिणाम विचारात घेऊ नयेत. अपराध्याला अपराध करून जर सुख मिळाले असेल तर त्याची अद्दल त्यास घडविणे होय. समाजाचा त्या शिक्षेमधून तिरस्कार दिसला पाहिजे. आरोपीने जे कृत्य केले त्याप्रमाणात त्याने ते फेडावे ही कल्पना यामागे आहे.या प्रकारची शिक्षा म्हणजे आरोपीवर सूड उगविण्यासारखे आहे. त्यामुळे अशी शिक्षा उपयोगी नाही. अशा प्रकारची शिक्षा म्हणजे गणिती सूत्रासारखी होय. ‘म्हणजे अपराधाचे इक्वेशन असे तयार होते की, शिक्षा = निरपराधित्व’ बहुतेक शिक्षा शास्त्रज्ञांना मान्य नाही की, ‘अपराध्यांना शिक्षा झालीच पाहजे म्हणजे ती त्यांनी केलेल्या कृत्याची भरपाई केलीच पाहिजे.’ कारण की, पुष्कळ अपराधी असे मानतात की, दिलेली शिक्षा भोगून झाली की माप पुरे झाले. आता पुन्हा नवीन अपराध करण्यास हरकत नाही. म्हणूनच तत्त्वज्ञ श्रीयुत् हेगल म्हणतो की, ‘अशी शिक्षा म्हणजे एक प्रकारचा सूड घेणेच होय’ तो पुढे म्हणतो की ‘तू मला इजा दुखापत केली म्हणून मी अता तुला करणार. वास्तविक शब्दश: याचा अर्थ हाच होतो आणि मी जर दुखापत करू शकलो नाही तर मी इतरांकडून तुला दुखापत करवीन.’
३) प्रतिबंधात्मक (Preventive):
यामागे तत्व असे आहे की, ‘अपराध घडू नये तर तो थांबला पाहिजे’ या संदर्भात तत्वज्ञ श्रीयुत् किरटे म्हणतो की,’ ‘प्रत्यक्षात फौजदारी कायदे अमलात आणायचे नसतात. उदा: जेव्हा जमिनीचा मालक त्याच्या जमिनीत सूचना फलक लावतो की जमिनीत अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर इलाज केला जाईल’ यामागे जमीन मालकाचा उद्देश असतो की, प्रत्यक्षात कोणी अतिक्रमण करू नये आणि मग जमीन मालकास केस देणे, कोर्टात जाणे याचा त्रास होऊ नये. लावलेला सूचना फलक गुन्हेगारास धमकी देईल की त्यापासून तो परावृत्त व्हावा. म्हणजे भविष्यात त्याने गुन्हा करू नये. यालाच प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) म्हणतात. म्हणजेच सूचना फलक लावण्याचा उद्देशच असा आहे की, अपराध घडू नये. आधीच सूचना केली आहे. त्यामुळे अतिक्रमणाचा अपराध करण्यापासून सर्वसाधारण जनतेला आधीच सूचना केली आहे.
४) सुधारणा करण्याकरता (Reformative) पद्धत :
अपराध्यांना शिक्षा देणे बाबत अधिक नवीन विचारसरणी पुढे येऊ लागली. त्यातूनच गुन्हेगारांना सुधारावे, त्यांचे जीवनात नवीन आशा निर्माण कराव्यात हा विचार पुढे येऊ लागला आणि गुन्हेगारास शिस्तबद्ध नागरिक बनवावा हा विचार मूळ धरू लागला. गुन्हेगाराचा कायदा पाळणारा नागरिक तयार व्हावा या विचारास चालना मिळू लागली. म्हणजे शिक्षेचा उद्देश आरोपीस जाच-त्रास देण्याचा नसून त्याला सुधारून समाजात चांगला नागरिक बनविणे हा आहे. त्याचे समाजात पुनर्वसन करणे हा आहे. तुरुंगातदेखील गुन्हेगारांना सुधारणे हाच उद्देश असावा असे या पद्धतीचे पुरस्कर्ते म्हणतात.
कायद्यामधील तरतुदी ‘पॅरोल’ आणि ‘प्रोबेशन’ यांची शिफारस केली जाते. कारण त्याचा वापर केल्याने गुन्हेगार चांगले नागरिक बनतील आणि त्यांना समाजात चांगले स्थान मिळेल. आरोपींना शिक्षा द्यावी पण त्याचा उपयोग त्याचे भविष्य सुधारण्याकरता असून त्याने केलेल्या भूतकाळातील कृत्यांना शिक्षा देणे हे योग्य नाही. शिक्षेचा उद्देश आरोपीचा जुना हिशेब मिटावा हा नसावा तर नवीन खाते उघडण्याचा असावा. या पद्धतीप्रमाणे आरोपी जरी तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी त्या काळात त्याला एकटेपणा नसावा, तर त्याची सुधारणा कशी होईल ते पाहावे आणि तो तुरुंगामधून सुटल्यावर त्याचे पुनर्वसान चांगल्या पद्धतीने होईल याकडे लक्ष द्यावे. शिक्षा देणे हाच अंतीम उद्देश नसावा तर तो एक मार्ग असावा की ज्यामुळे त्याची सुधारणा होत राहील.
रशिया – फ्रान्स देशांमधील तुरुंगाबाबत तत्त्वज्ञ श्रीयुत पिटर क्रोपोकीन म्हणतो, ‘येथील तुरुंग म्हणजे मागासलेपणाचा नमुना आहे. अपयशाचे मूळ कारण दारिद्र्य, विषमता, बेकारी, अज्ञान, लोकसंख्या वाढ ही आहेत. त्याचा विचारच केला जात नाही.’ सुधारणा करणे या पद्धतीत प्रत्यक्ष शिक्षा नसातेच. त्यामुळे ही शिक्षा नसतेच असे काही म्हणतात. तर त्याला या काळात मानसिक तणाव असतात त्यामुळे ती एक प्रकारची शिक्षाच असे मानावे.
जुन्या काळातील भगवद्गीतादेखील म्हणते: ‘काही प्रसंगी ठार मारणे म्हणजे योग्यच ठरते. तसे न करणे म्हणजे पाप होय. भित्रेपणा होय. खून करणाऱ्यास ठार मारणे धर्मशास्त्राप्रमाणे आपले कर्तव्य आहे. मग तो खून करणारा म्हातारा, तरूण, मुलगा अगर विद्वान ब्राह्यण असो अशा प्रकारचे तत्त्वज्ञान जुन्या हिंदुधर्मात सांगितले आहे. त्यावरून जुन्या काळातील हिंदू कायदेकर्ते किती दूरदृष्टीचे होते याची स्पष्ट कल्पना येते. म्हणजेच त्यांनी आत्मसंरक्षणाचा अधिकार मान्य केला होता. त्याला कायद्याने संमती दिली होती.’ वरील प्रकारचे मत प्रदर्शन माननीय न्यायमूर्ती (ओरिसा उच्च न्यायालय) यांनी पुरी येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत ‘सनातन धर्म आणि कायदा’ यावर बोलताना 1 डिसेंबर 1974 रोजी व्यक्त केले होते. मिळकतीचे नुकसान केल्यास त्याची भरपूर भरपाई दिली जात असे.
मध्ययुगीन काळ (A.D. 550 To A.D. 1450) : पाश्चिमात्य देशात धार्मिक संस्कारांचे वर्चस्व होते. त्याचा न्यायदानावर मोठा पगडा होता. अपराध म्हणजे पाप समजले जात असे. एकांतवास शिक्षेचा एक प्रकार असे. भारतामध्ये आत्मशुद्धी प्रकार होता.मध्ययुगीन काळात तुरुंगाची स्थिती फारच वाईट होती. त्यांचे जीवन नरकासारखे हते. शिक्षा म्हणजे गुन्हेगारास सतावणे, त्रास देणे हा असे.
— अॅड. प. रा. चांदे
नाशिक ४२२००९
— “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
Leave a Reply