भटकंतीसाठी तेच तेच मार्ग, साधनं वापरण्याऐवजी निरनिराळ्या प्रकारे पर्यटन करण्यात निराळीच मजा असते.
प्रवासाची साधनं
प्रवासासाठी सर्वसाधारणतः पुढील साधनांचा वापर करता येतो.
– बससेवा
– स्वतःची कार स्वतः चालवणं (कॅरव्हॅनसह)
– ट्रेनसेवा
– देशांतर्गत विमानसेवा
– क्रुझ
– बाईकने/ मोटारसायकलने प्रवास
बससेवा:
परदेशात मग तो युरोप, स्कँडेनेव्हिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, केनिया आदि कोणताही भाग असो, तिथे गटाने किंवा एकट्याने फिरण्याचं उत्तम साधन म्हणजे बस. बसने प्रवास हा सर्वात सोयीचा ठरतो. युरोप, इंग्लंड तसंच पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या बहुतेक देशांमध्ये रस्ते चांगले असतात. तिथे वाहतुकीला शिस्त असते. त्यामुळे युरोपमधल्या सात-आठ देशांमध्येही बसने रोजच्या ५०० – ६०० कि. मी. प्रवास करायला काहीच अडचण येत नाही.
तुम्ही तुमची सहल प्लॅन करत असाल तर प्रवाशांची संख्या निश्चित झाल्यानंतर तेवढ्या संख्येची आसन व्यवस्था असलेली बस इथूनच आरक्षित करता येते. इंटरनेटवरून अगर चांगल्या एजंटकडून त्याचं आरक्षण तुम्ही करू शकता. परदेशात मोठ्या – छोट्या बसेस, महिलाही सहज चालवताना दिसतात. त्यामुळे फक्त बायकांचा छोटा ग्रुप असला व त्यांना ड्रायव्हर कम गाईड महिला असावी अशी इच्छा असली तर त्याचीही व्यवस्था होऊ शकते. अर्थात ग्रुप लहान असला तर ड्रायव्हर कम गाईड बरा पडतो.
अपंगांसाठी खास व्यवस्था:
परदेशात अपंग व्यक्तींची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे अपंग पर्यटकांसाठी खास व्यवस्थाही असते. तुमच्या गटात जर कोणी पायाने किंवा अन्य अवयवांनी अपंग असेल व त्यांना चालता येत नसेल तर त्यांच्यासाठी बसपासूनच व्हिलचेअरची सोय होते. पण बसमध्येही लिफ्टची व्यवस्था असते. म्हणजे बसमधील व्यक्ती लिफ्टने रस्त्यावर उतरते किंवा बसमध्ये चढू शकते. बसमध्ये खास खुर्चीमुळे त्यांना प्रवासात काहीही त्रास होत नाही. वेगळ्या टॉयलेट्सचीही सोय असते.
स्वतःची कार स्वतः चालवणं (कॅरव्हॅनसह)
‘सेल्फ ड्राईव्ह’.
परदेशात पर्यटनासाठी जाऊन स्वतःची गाडी स्वतः चालवून, तो देश पाहण्याची प्रवृत्ती हळूहळू का होईना पण भारतीयांमध्ये लोकप्रिय होत आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (International Driving Permit ) हवं. हा परवाना भारतातही मिळतो. RTO च्या साईटवर त्याची संपूर्ण माहिती मिळू शकते. ती वाचून त्या गोष्टीची पूर्तता करावी. मग तो परवाना घ्यावा. तसंच तुम्ही ज्या देशात जात आहात, त्या देशात वाहतुकीचे काय नियम आहेत याची संपूर्ण माहिती इंटरनेटवरून घेऊन त्याचाही व्यवस्थित अभ्यास करावा. त्या देशात गेल्यानंतर निदान अर्धा दिवस त्या देशाच्या नियमांप्रमाणे ड्रायव्हिंग करण्याचा सराव करावा.
कॅरॅव्हॅनची सफर:
‘कॅरॅव्हॅन’ या चार चाकांच्या फिरत्या अलिशान घरातून भटकंती करणं हे पाश्चात्य देशांत अगदी कॉमन व लोकप्रिय आहे.
ट्रेनसेवा:
परेदशात अंतर्गत प्रवासाला किंवा एका राष्ट्रातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी ट्रेनसेवा ही अत्यंत उत्कृष्ट म्हणावी लागेल. एकतर परेदशांतील रेल्वेसेवा ही नियमित, व्यवस्थित, बहुतेक सर्व सोयींनीयुक्त व सुरक्षित असते. त्यामुळे त्यातून प्रवास करणं हे कमी खर्चाचं व श्रेयस्कर ठरतं. युरोपात निरनिराळ्या देशांत रेल्वेचं उत्तम जाळं पसरलं आहे. त्याची तिकिटं म्हणजे पासेस असतात. उदा. युरोप स्विस पास, इटली रेल पास, जर्मन रेल पास वगैरे. त्या देशांचे पासेस, ट्रेनची माहिती इंटरनेटवर किंवा येथील ट्रॅव्हल्स एजंटकडेही मिळते. आणि त्याची आरक्षणंही येथून करता येतात. आता भारतातील अनेक ट्रॅव्हल कंपन्या लंडन ते पॅरिस हा प्रवास युरोस्टार रेल्वेतून घडवतात. तसंच हा प्रवास उलटही करता योते. त्यामुळे आपल्याकडच्या पर्यटकांनाही या प्रवासाची कल्पना येऊ लागली आहे.
देशांतर्गत विमानसेवा:
प्रचंड मोठा देश, फिरण्याची जास्त ठिकाणं व कमी वेळ यांची सांगड घालायची तर देशांतर्गत विमानसेवा हा सर्वोत्तम मार्ग ठरतो. उदा. अमेरिकेत निरनिराळ्या राज्यांत जायचे असेल तर विमानाने जाणं हेच श्रेयस्कर कॅनडातही तेच योग्य. दक्षिण अमेरिकेतील बराच प्रवास विमानाने करणं फायद्याचं ठरतं प्रत्येक देशात देशांतर्गत विमानसेवा निरनिराळ्या स्थानिक विमान कंपन्यांमार्फत उपलब्ध असते. त्या प्रवासाची आरक्षणं आपण भारतातून इंटरनेटवरून किंवा ट्रॅव्हल एजंटमार्फत करू शकतो. ही बुकिंग काळजीपूर्वक करावीत. काही विमानं अगदी छोटी असतात. त्यामुळे त्या विमानांतून न्यायच्या सामानावर खूप बंधनं घालण्यात येतात. त्याची आधी माहिती नसली तर ऐनवेळी मोठी अडचण होऊ शकते. अमेरिकेत हवाई प्रांतातील निरनिराळ्या छोट्या छोट्या बेटांवर जाण्यासाठी छोटी विमानसेवा उपलब्ध आहे. अवघ्या अर्ध्या तासात आपण एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाऊ शकतो. झटपट प्रवासासाठी, थोडी महाग वाटली तरी ही विमानसेवा फायद्याची ठरते.
क्रूझ:
प्रवासात अत्यंत लोकप्रिय होत असलेला मार्ग म्हणून क्रुझ सफरीचा उल्लेख करावा लागेल. शक्य असेल तिथे क्रुझने प्रवास करण्याची प्रवृत्ती हळूहळू वाढत आहे. काही तासांच्या किंवा एका रात्रीच्या किंवा तीन-चार दिवसांच्या क्रुझ सफरी विविध देशांत उपलब्ध असतात. क्रुझमध्ये निरनिराळे प्रकार असतात. उदा. एक्सपिडिशन क्रुझ, लक्झुरियस क्रुझ वगैरे. अनेक क्रुझ अक्षरश: पंचतारांकित असतात. त्यात विविध सोयींची उपलब्धता असते. सिंगापूर, थायलंड वगैरे ठिकाणी दोन-तीन दिवसांच्या क्रुझ सफरी असतात. यासर्वांची आरक्षणं भारतातून होतात. आता अंटार्क्टिका, आर्क्टिक सर्कलच्या धाडसी सफरींवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढते आहे. अर्थात, क्रुझसफरी या तशा महाग असतात. पण जिथे शक्य असेल तिथे देशातंर्गत प्रवास क्रुझमधून जरूर करावा. युरोपमध्ये विविध देशांमध्ये जाण्यासाठीही क्रुझ आहेत. तसंच ज्यांना परदेशी जाऊन केवळ आराम करायचा आहे, त्यांना सुध्दा क्रुझसफरींवर जाऊन तो आनंद लुटता येतो. अनेक आंतरराष्ट्रीय क्रुझ कंपन्यांची कार्यालयं भारतात आली आहेत. इंटरनेटवर विविध क्रुझची माहिती मिळवून, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून या क्रुझ सफरींची निवड करावी.
बाईकने:
मोटरसायकलने प्रवासः पर्यटनाचा हा एक धाडसी प्रकार प्रामुख्याने तरूण वर्गामध्ये बराच लोकप्रिय होत आहे. काही देशांमध्ये मोटरसायकली भाड्याने मिळतात. ( उदा. गोव्यात तसंच बाली, आफ्रिकेतील सेशल्स बेट वगैरे) त्या घेऊन त्यावरून दोघांनी प्रवास करायचाय हे थोडं साहसी पर्यटन आहे. पण बँग पॅक प्रकराचं पर्यटन करणाऱ्यांमध्ये हे लोकप्रिय आहे. ज्यांना मोटरसायकल चांगल्याप्रकारे चालवता येते व तसा उत्साह आहे, त्यांनीच या मार्गाने प्रवास करावा. अर्थात यात मोठं थ्रील तर आहेच पण खूप कमी खर्चात तुमचं पर्यटन होऊ शकतं. इंडोनेशियात बाली, व्हिएतनाम, थायलंड, युरोपमध्ये माल्टा, दक्षिण आफ्रिका आदि अनेक ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. अर्थात, अशाप्रकारे भटकंती इच्छिणाऱ्यांनी करू त्याची आरक्षणं आधी करण्याची बिलकुल जरूरी नाही. त्या देशात पोहोचल्यानंतर प्रवासाची संपूर्ण माहिती मिळू शकते. बाईक्स मिळणारी दुकानं शहारातील महत्त्वाच्या ठिकाणी असतात व तिथून भाड्याने लगेचच मिळतात. मात्र प्रत्येक देशात वाहन चालवण्याचे, सुरक्षिततेचे निरनिराळे नियम असतात. प्रवासाला सुरुवात करण्याआधी त्याचा पूर्ण अभ्यास करावा व त्याचं काटेकोर पालन करावं. चलता है ही आपल्याकडची पध्दत अंगाशी येण्याची भीती असते.
सायकल:
अनेक देशात ठिकठिकाणी सायकलीवरून पर्यटन करण्याची पध्दतही आहे. उदा. स्पेनमधील बॅलेॲरिक आयलंडवर दरवर्षी युरोप, ब्रिटनमधून एक कोटी पर्यटक येत असतात. तिथे पर्यटकांसाठी निदान ४० लाख सायकली भाड्याने उपलब्ध केल्या जातात. अगदी दोनशे- अडीचशे कि. मी. ची भ्रमंतीही सायकलींवरून केली जाते. शहरांत ग्रामीण भागात सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग असतात. सायकलस्वाराच्या मागून बस येत असली तरी ती हळू जाते व सायकलस्वाराला प्राधान्य दिलं जातं. अर्थात हा थोडा धाडसी पर्यटनाचा प्रकार आहे. ज्यांना सायकल चालवण्याची चांगली सवय त्यांनीच तो पत्करणं योग्य.
उपलब्ध दिवसात व पैशात, जास्तीत जास्त प्रदेश बघायचा, तेथील सौंदर्य आणि वैशिष्ट्य डोळ्यात भरभरून साठवयाची हाच आपल्या सहलीचा मुख्य उद्देश असायला हवा. हा विचार करूनच प्रवासाची आरामदायी साधनं निवडावीत.
‘जेपीज् भटकंती टिप्स’
या पुस्तकातून साभार
-जयप्रकाश प्रधान
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply