(दिगंबर म्हणजे दिग्+अंबर. आकाश हेच ज्याचे वस्त्र तो भगवान महावीर दिगंबर. ज्याला एका वस्त्राचाही मोहन नाही. त्याच्या नावाने चाललेले श्रीमंती वैभवाचे प्रदर्शन, ओंगळवाणे अभिरुचीहीन पाहून या महान अवताराच्या भक्तांची कीव येते, अशाच एका समारंभाचा मंडप पाहून-)
भलंमोठं नक्षीदार प्रवेशद्वार
आज वैभवशाली मंडप झोकदार
छताला लखलखीत झुंबरं दिमाखदार
बसायला गाद्या टेकायला लोड
त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी चमकदार
लाऊड स्पीकर चा आवाज दमदार
सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर
भजनांच्या ठेक्यांचा चाललाय कहर
संत महंतांची गर्दी व्यासपीठावर
गलेलठ्ठ भक्तांची गर्दी मंडपभर
खाण्या-पिण्याची चालली चंगळ फार
अलिशान गाड्यांचा ताफा तयार
लखलखत्या चांदीच्या रथात
महंत साधूंची निघाली वरात
गाजत वाजत गेली शहरात
मंडपात उरलाय एकांत निवांत
प्रवेशद्वारावर एकटाच धीरगंभीर
बसलाय महावीर भगवान दिगंबर
— विनायक अत्रे.
Leave a Reply