मायानगरीच्या आकर्षणातून कोणी सुटलंय का? अगदीं सुमार सौंदर्य असलेल्या मुलीला हिराॅईन व्हायचं असतं, ज्यानं थोडंफार लिखाण केलंय त्याला स्वतःच्या कथेवर चित्रपट व्हावा असं वाटतं, मनोरंजनाच्या कार्यक्रमात संगीत संयोजन करणाऱ्याला सिने संगीतकार होण्याची स्वप्नं पडत असतात. तसाच ‘दिवास्वप्नं’ पहाणारा दिघे आम्हाला भेटला.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी इंन्स्ट्रुमेंट बाॅक्सचं डिझाईन करुन घेण्यासाठी सिक्रेट एजंटसारखी कॅप घातलेली एक व्यक्ती ऑफिसमध्ये आली. गिड्या तब्येतीची, साधारण उंचीची, डोळ्यांवर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, काळी दाट मिशी, डिझाईनर शर्ट पॅन्टमध्ये इन करून काळ्या पट्याने ढेरी आवळलेली, खाली काळे चकाकणारे बुट अशा या दिघेचे लोगो डिझाईन, कार्टून्सची कॅरेक्टर घेऊन बाॅक्स डिझाईन करुन दिली. तो जेव्हा आला त्यावेळी चित्रपटाच्या डिझाईनचे काम चालू असलेले त्याने पाहिले होतं. त्याबद्दल दिघेला कमालीचं औत्सुक्य वाटायचं.
मधे बरीच वर्षे गेली. दरम्यान नागराज मंजुळेचा ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला. काही लाख खर्च करुन केलेल्या या चित्रपटाने करोडोंची कमाई केली. त्यातील नवखे कलाकार पदार्पणातच रातोरात स्टार झाले. रिंकु राजगुरू सेलेब्रिटी झाली. मराठीतीलच नव्हे तर हिंदीतीलही बडे बडे निर्माते, दिग्दर्शक, वितरक ‘सैराट’चे यश पाहून बेफाम झाले. सर्वसामान्यांना या यशामागची मेहनत माहिती नसल्याने, कमी बजेटचा चित्रपटही कोटींची कमाई करु शकतो असे वाटू लागले.
मोठ्या गॅपनंतर दिघे आमच्या ऑफिसमध्ये आला तेंव्हा पुन्हा एखादं नवीन डिझाईन करून घ्यायचं असेल असं आम्हाला वाटलं. हाय, हॅलो झाल्यानंतर दिघेने ‘सैराट’चा विषय काढला. आम्ही देखील चित्रपटाचं कौतुक केले. त्याच्या बोलण्यातून एकच जाणवत होतं की, एखादा चित्रपट कमी खर्चात तयार करुन भरपूर फायदा मिळू शकतो. तासभर चर्चा झाल्यावर दिघेने मुद्द्याला हात घातला, ‘नावडकर, तुमच्याकडे फिल्म इंडस्ट्रीमधील एवढी माणसं येतात, त्यातून मला एखादा दिग्दर्शक भेटवून द्याना.’ त्यावर आम्ही त्याला स्पष्ट सांगितले, ‘चित्रपट निर्मिती एवढी सोपी गोष्ट नाही. कित्येकदा चित्रपट निम्मा झाल्यावर पुढे सगळं ‘ठप्प’ होतं. तुम्ही या भानगडीत पडू नका.’ दिघेवर आमच्या बोलण्याचा काहीएक परिणाम झाला नाही. तो पुन्हा पुन्हा ‘सैराट’चं उदाहरण देऊ लागला. शेवटी आम्ही त्याला ‘बघू’ म्हणून निरोप दिला.
त्याला भेटून आठवडाच झाल्यावर दिघेचा फोन आला, ‘काय नावडकर, कोणी भेटलं कां?’ आम्ही खरंतर विसरुन गेलो होतो. फोनमुळे विचार करु लागलो. त्याच्याकडून आठवड्यांची मुदत घेतली. वर्षांपूर्वीच करंबेळकर आणि त्यांचे मित्र यांची ‘साकव’ या चित्रपटाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यांच्याशी संपर्क साधला. भेटीचा दिवस ठरवला.
करंबेळकरचं ऑफिस होतं कर्वे पुतळ्याजवळ. आम्ही दोघे दुचाकीवरून गेलो. दिघे कोथरुडजवळच रहात होता, तो रिक्षाने आला. तिघे करंबेळकरच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. एका उत्तम चित्रपटाच्या निर्मितीचा अनुभव असलेल्या करंबेळकरने दिघेला निर्मिती मागच्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. बजेटची कल्पना दिली. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कथा ऐकवली. मात्र दिघेचे ‘समाधान’ काही झाले नाही. त्याच्या हातात असलेले भांडवल फारच तुटपुंजे होते. आम्ही करंबेळकरचा निरोप घेतला.
मधे एक महिना निघून गेला. आम्हाला वाटलं करंबेळकर व दिघेच्या भेटीगाठी झालेल्या असतील. मात्र तसं काही एक घडलं नाही. दिघेचा पुन्हा फोन येऊ लागला. दुसरा अजून कोणी दिग्दर्शक असेल तर पहा असं तो विनवू लागला. मी रमेशला बोललो, ‘दिघेला आपण काय मोकळेच आहोत, असं वाटतं कां?’ रमेश म्हणाला, ‘अजून एकदा प्रयत्न करु. नंतर हा विषय सोडून देऊ.’
किशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले. किशोरला ऑफिसमध्ये बोलावून दिघेच्या ‘सैराट’स्वप्नाची कल्पना दिली.
ओंकारेश्वर जवळील ‘राज’ हाॅटेलमध्ये आम्ही मिटींगसाठी बसलो. हाॅटेलमध्ये तशी सामसूमच होती. आम्ही किशोरला ऑफर केली की, तुला जी कोणती डिश आवडत असेल ती आपण मागवूयात. किशोरने फक्त चहा चालेल असं सांगितलं. दिघेला चित्रपट कसा तयार होतो ते विस्तारानं किशोरने ऐकवलं. बजेट कमीत कमी एक कोटी लागेल याची कल्पना दिली. तुमच्याकडे पैसे कमी असतील तर पार्टनर मिळवून देतो असंही सांगितलं. दिघेची धाव पन्नास लाखांपर्यंतच होती. त्याला पार्टनर नको होता. दोन तास चर्चा करून निष्पन्न काहीच झाले नाही.
एक महिना झाल्यानंतर पुन्हा दिघेचा फोन येऊ लागला. मी रमेशला स्पष्ट सांगितले, ‘आता आपण मध्यस्थी करायची नाही. हा ‘फुकटचंबु बाबुराव’ आपला उपयोग करून घेतो, आपण एका मर्यादेपर्यंत त्याला सहकार्य केले आहे. यापुढे जमणार नाही.’ शेवटी कंटाळून एकदा रमेशने फोन घेतल्यावर दिघे फोनवर म्हणाला, ‘तुम्ही मला एक रुपया खर्च करून साधा फोनही करत नाही. प्रत्येक वेळी मीच फोन करतो.’ आता माझी सटकली. मी फोन हातात घेऊन त्याला सांगितले, ‘साहेब, आपण चित्रपट करु नका. आता आहेत ते पैसे खर्च करून एखादी बिल्डींग उभी करा, ती किमान दिसेल तरी. मात्र चित्रपटात गेलेले पैसे दिसणार नाहीत आणि यापुढे मिटींग करायची असेल तर त्यासाठी जो खर्च येईल तो तुम्हाला आधी द्यावा लागेल.’ हे ऐकून दिघे म्हणाला, ‘म्हैस पाण्यातच असताना तिला कोण किंमत मोजेल?’ मी फोन बंद केला.
आता या गोष्टीला तीन वर्षे झालेली आहेत. इतक्या दिवसात दिघेचा फोन काही आला नाही. कदाचित त्यानं स्वतः ‘नागराज मंजुळे’ होण्याच्या चंदेरी स्वप्नावर कायमचा पडदा टाकला असावा….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३१-८-२०.
Leave a Reply