सध्या कचर्याच्या गंभीर प्रश्नाने मला भंडावून सोडले आहे. दिवाळीच्या निमित्ताने सर्व घराची साफसफाई झाली. पण गॅलरीकडे लक्षच गेले नाही. दिवाळीच्या गडबडीनंतर जेव्हा गॅलरीत डोकवायला गेले, बाप रे! केवढा ढीग जमा झाला आहे!! यात माझा स्वतःचा कचरा तर होताच, पण त्याहूनही चौपट कचरा बाहेरून आलेला होता. गॅलरीत ढीग करणारी माणसे देखील आपलीच प्रेमाची, त्यामुळे कोणालाच काही बोलता येणार नव्हतं. शेवटी आपणच रोज थोडं थोडं आवरून ढीग कमी करावा म्हणून आवरायला घेतले. पण छे!! रोज जेवढा ढीग साफ करायला जायचे त्याच्या पाचपट ढीग जमा होऊ लागला. आता कामाची गती वाढवणे आवश्यक झाले. शेवटी एक संपूर्ण दिवस त्यात घालवून गॅलरीतला कचरा एकदाचा साफ केला.
पण हा कचरा आला कोणामुळे? तर माझ्या अर्धवट ज्ञानामुळे. वास्तविक हा कचरा थोपवणे माझ्या हातात होते. पण निव्वळ दुर्लक्ष केल्याचा परिणाम असा झाला की शुभेच्छा संदेश, ज्ञानवर्धक, मनोरंजक लेख, पाककृती, आरोग्यविषयक टिपणी अशा सर्व गोष्टींनी माझी गॅलरी गच्च भरून गेली. खरंतर हे सर्व पाठवणार्यांचा उद्देश खूप चांगला होता. ह्या गोष्टी मला परिपूर्ण करणाऱ्याच होत्या. पण त्याचे प्रमाण इतके जास्त झाले की त्याच्या ओझ्याखाली मी दबले गेले. आणि अर्थातच मी स्वतः वाचले तरच मी हे सर्व वाचू शकणार होते. इतका ढीग जमा झाल्यावर त्यातून चांगले वाईट निवडणं पण अवघड होऊन गेले. शेवटी सर्वच गोष्टी कचरा म्हणून टाकून द्यावा लागल्या.
आता ही गॅलरी माझ्या भ्रमणध्वनीची म्हणजे माझ्या मोबाईलची होती हे एव्हाना आपणा सर्वांच्या लक्षात आलेच असेल.
वास्तविक व्हाट्सअप, फेसबूक अशा सोशल मीडियाच्या माध्यमांशी माझी काही फारशी गट्टी नाही. पण त्यांचा योग्य उपयोग केल्यास हीच माध्यमे संवाद साधण्यासाठी आणि अनुभव संपन्न होण्यासाठी खूप उपयोगी आहेत. त्यामुळे काळाची गरज म्हणून मी त्यांच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न करते. पण आमची मैत्री होण्याआधीच आमच्या नीतिमूल्यांवर हल्ला होतो आणि आम्ही परत परत दुरावले जातो.
या मैत्रीतले अंतर दूर करण्यासाठी मी आधी व्हाट्सअपचे ऑटो डाउनलोडिंग बंद केले आणि मला आणि माझ्या मोबाईलरुपी सख्याला झेपतील तेच संदेश आणि ज्ञान घ्यायचे मी निश्चित केले.
आता तर व्हाट्सअप वर फक्त ऍडमिनच मेसेज पाठवू शकेल अशीही सोय आहे. मग एडमिनला योग्य वाटेल तेव्हा तो समूह सर्वांसाठी खुला करण्यात येतो. पण तेव्हाही पाण्याच्या पाइपमध्ये बोळा घालून पाणी थांबवले आणि तो बोळा काढला की ते पाणी जसे धो धो वाहू लागते तसेच धो-धो संदेश मोबाईलवर येऊन धडकतात. यामध्ये तर पुष्कळसे संदेश या समूहात आधी आले आहेत का हे देखील बघितले जात नाही. अन तसेच पुष्कळसे संदेश तर स्वतःही न वाचताच पुढे पाठवले जातात. बिचारे ॲडमिन तर हया ग्रुप वर इतर विषयावर शेअर करू नका म्हणून सांगून हैराण होतात. पण पाठवणार्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नाही.कोणतेही सणवार किंवा काही विशेष दिवस असेल तर पुन्हा ढीग गोळा होणार ह्याची धडकीच भरते.
त्यामुळे कोणतीही गोष्ट शेअर करताना प्रत्येकाने स्वतःला मर्यादा घालाव्यात असे मला वाटते. समूहामध्ये तर नियम व अटी घालूनच समूह तयार करावा आणि त्या व्यवस्थित पाळाव्यात असे माझे स्पष्ट मत आहे. सणावारांना समूहामध्ये एकच शुभेच्छा सर्व समूहाकडून सर्वांना देण्यात यावी. तसेच कोणाच्या दुःखद निधनाची बातमी आली तरी एकच श्रद्धांजली संपूर्ण समूहाकडून देण्यात यावी.
कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते. प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.
माझ्या मोबाईलची गॅलरी स्वच्छ करण्यात माझा अख्खा दिवस गेल्यामुळे अंतर्मनातून आलेली ही एक प्रतिक्रिया आहे. यामध्ये कोणाच्याही लिखाणाला केव्हा संदेशांना कचरा म्हणण्याचा माझा हेतू नाही. कारण मी देखील आलेले चांगले संदेश, माझे लेख ह्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत असते.त्यामुळे स्मार्टफोन वापरताना आपणही त्याविषयीचे ज्ञान स्मार्टपणे घेतलं पाहिजे हे मला नक्कीच समजले आहे. असे केले तर हया माध्यमातून मिळणारे ज्ञान हे कचरा न वाटता आपल्या जीवनपटावर उगवलेले ज्ञानाचे कमळ असेल.
प्रतिक्रियांचे स्वागत.
— © मंजुषा देशपांडे, पुणे.