तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी आता उत्तमोत्तम व्यासपीठ मिळत आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल व्यासपीठाचा विचार करता फेसबुक, युटयूबसारखे सामाजिक माध्यमं आपल्यासमोर येतात. तरुणाई या सोशल मीडियाचा व्यासपीठ म्हणून कसा वापर करते यावर थोडीशी नजर टाकू या.
गेल्या अनेक वर्षात मनोरंजनाची साधने बदलत गेली आहेत. चित्रपट, मालिका, नाटके आदी साच्यातून बाहेर येऊन आता वेब सिरीज प्रचलित झाली. यू टयूबच्या उदयानंतर वेब सिरीजने मनोरंजन क्षेत्रात उडी मारलेली पाहायला मिळते. विविध विषय ज्यामध्ये कोणत्याही सेन्सॉरचा आक्षेप नसतो, भाषाशैलीला मर्यादा नसतात, असे कोणतेही अटी नसलेले वेब सिरीज सध्या प्रचंड हिट होतायत. हे वेब सिरीज पाहण्यामध्ये तरुणाई अधिक पुढाकार घेताना दिसते. संध्याकाळी ६ ते १०.३० पर्यंत महिलांनी मालिका विश्वात आपलं अढळ स्थान केलं आहे; त्यामुळे या फावल्या वेळात आपण काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच तरुणांना वेब सिरीजचं उत्तर मिळालं आहे.
१९९५ साली दि स्पॉट ही पहिली वेब सिरीज प्रसिद्ध झाली. मात्र वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद २०१४ पासून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मंडळींनाही यू टयूब हे उत्तम माध्यम वाटत असल्याने तेही वेब सिरीजला महत्त्व देताना देसतात. मात्र आजकाल या यू टयूब चॅनेलचा किंवा या वेब सिरीजचा तरुणाई जरा हटके पद्धतीने विचार करताना दिसते.
कवितेचे गाणं होताना ही वेब सिरीज तुम्हाला माहीत असेलच. सलील कुलकर्णी दर रविवारी यू टयूबवर त्यांचा हा वेबिसोड अपलोड करतात. त्यात त्यांच्या प्रत्येक कवितेविषयी आत्मितयेने बोलताना दिसतात. त्याचप्रमाणे आपल्या तरुण वर्गातही कविता लिहिणारे कमी नाहीत.
पूर्वी कवितांचा संच तयार करून त्याचं पुस्तक रूपात प्रकाशन केलं जायचं. नाहीतर आपली एखादी कविता कोणत्याही प्रकाशनात किंवा अगदी दिवाळी अंकातही छापून यावी अशी माफक अपेक्षा काही नवकवींची असायची. मात्र आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळण्यासाठी या नवकवींना आयता प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे तो म्हणजे यू टयूबच्या माध्यमातून.
एखादी स्वरचित कविता व्हीडिओ रूपात सादर करून ती यू टयूबवर टाकायची आणि त्या यू टयूबची लिंक सर्वत्र पसरवायची. हा ट्रेंड आता बराच रुळला आहे. यू टयूबवर अशा कविताकारांचे अनेक व्हीडिओ सहज आपल्याला पाहायला मिळतील. फेब्रुवारी महिन्यात साज-या करण्यात येणा-या व्हॅलेंटाईननिमित्ताने अनेक नवकवींनी या संधीचं सोनं केलं. स्वरचित प्रेम कविता व्हीडिओ रूपात सादर करून त्या यू टयूबवर अपलोड केल्या. त्याचप्रमाणे महिला दिनादिवशीही महिलांसाठी त्यांचं गौरव करणारे त्यांना सन्मानित करणा-या कविता यू टयूबवर पाहायला मिळाल्या.
सतत कवितेच्या धुंदीत असणारा कवी मल्हार (मनोज गुंड) म्हणतो की, कविता करणं हे माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कलेला प्रसिद्धी मिळावी, असं प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो. यू टयूबच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. या यू टयूबमुळे आमच्या कवितांना प्रचंड लाईक्सही मिळतात.
पूजा भंडागे नावाची तरुण कवियीत्रीही फेसबुकवर चारोळ्या पोस्ट करत असते. तिची सावळबाधा ही कविता यू टयूबवर फार प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे तिने अनेक कविता यू टयूबच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. मनोज किंवा पूजा याप्रमाणेच अनेकांच्या कविता आपल्याला यू टयूबच्या माध्यमातून वाचायला, ऐकायला मिळतील. महिला दिनानिमित्त शिल्पा देशपांडे आणि राधिका फराटे यांची कविताही प्रचंड गाजली.
पूर्वी कवितांची मैफल भरवली जायची. आजही कविताप्रेमी ऑनलाईन एकत्र येतात आणि मैफल रंगवतात. फेसबुक लाईव्ह चॅटमध्येही ही कविता मैफल भरवलेली पाहायला मिळते. तरुणांनी त्यांच्या कलेसाठी सोशल मीडियाचा केलेला हा वापर स्तुत्यच आहे. त्यामुळे त्यांच्या कलेला भरभरून दाद द्यायला तुम्हीही कधीतरी त्यांच्या यू टयूब चॅनलला भेट द्या.
— स्नेहा कोलते
Leave a Reply