“खामोशी ” शब्दांच्या पलीकडला – वहिदा, राजेश, धर्मेंद्र, गुलज़ार, ललिता पवार, देवेन वर्मा आणि हेमंतदा या साऱ्यांचा परिसस्पर्श मिरवणारा ! आज ५० वर्षांचा झालाय पण आपल्या रुग्णाच्या प्रेमात (एकदा नव्हे दोनदा) पडून त्याला बरं करण्याच्या नादात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील रेषा विसरणारी नर्स वहिदा आजही स्मृतीत लखलखीत आहे. ” हमने देखी हैं ,उन आँखोंकी महकती खुशबू ” (लता) , ” तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार हैं ” ( हेमंत कुमार) आणि भूत /वर्तमान/आणि भविष्याची अद्भुत मिसळण करणारे ” वो शाम कुछ अजीब थी ” वाला किशोर , संगीत दस्तुरखुद्द हेमंत कुमारचं अशी सांगीतिक मेजवानी ! संपूर्ण काळी -पांढरी पार्श्वभूमी ( गडद भावनाविष्काराला पोषक नव्हे आवश्यक) आणि अभिनयाचे इमले उठवणारे वहिदा /राजेश !!
” प्यासा ” आणि ” खामोशी ” या दोनच चित्रफिती काळ्या -पांढऱ्या रंगांमुळे मनावर कोरल्या गेल्या आहेत.
“प्रायोगिक “उपचार पद्धतीचा वापर करून वेडेपणाच्या सीमेवर असलेल्या रुग्णाला विश्वास,आस्था, आणि प्रेम देता देता स्वतःच थकलेली परिचारिका त्याला औदासीन्यातून, निराशेतून बाहेर काढते मात्र स्वतःच ” खामोशी ” स्वीकारते. रुग्णात “परकाया “प्रवेश वगैरे संकल्पना ठीक आहे पण भावनांचे हेलकावे सोसताही यायला हवेत. रुग्णसेवा करता करता स्वतःचे खरे भावविश्व विसरणे /नाकारणे याचा असह्य ताण एकदा अनुभवूनही ती दुसऱ्या प्रयोगाला सामोरी जाते आणि तुटून पडते. दोन्हीवेळा तिला व्यक्त होताच येत नाही.
वैद्यकीय विश्वाचा हा आरसा विलक्षण आहे- विशेषतः गुंतवणूक असेल तर !
कितीवेळा पाहिला /ऐकला ” खामोशी ” तरी अतृप्ती संपत नाही. काळाच्या पडद्यावरची ही अभिजात कलाकृती आहे.
२००५ साली ” क्योंकी —– ” हा सलमान, जॅकी ,करीना ,ओम पुरीचा चित्रपट आला- समांतर कथानक ( परिचारिकेऐवजी महिला डॉक्टर उपचार करणारी ). मात्र वेड्यांचे इस्पितळ, शॉक ट्रीटमेंट सारं काही तसंच ! स्वतःच्या चुकीमुळे प्रेयसी गमावलेला सलमान इथे शुश्रूषेसाठी भरती झालाय आणि महिला डॉक्टर त्याच्यात गुंतते. प्रियदर्शन च्या चित्रपटाला हिमेश रेशमियाचं संगीत ! चवीला असरानी ,रिमी सेन , मोहन जोशी आणि अतुल परचुरे सारखे दिग्गज ! मात्र शब्दशः वेडाचारात हा सिनेमा माती खातो. कोठेही अलवार नाजुकपण नाही, भावनांची गुंतागुंत नाही. सगळं बटबटीत , वरवरचं ! अपवाद फक्त ” क्योंकी इतना प्यार तुमको ” या अलका आणि उदीतच्या श्राव्य गीताचा. त्याबाबत या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन, पण बाकी आनंदी आनंद !!
अशी काळी -पांढरी तुलना योग्य नाही हे मान्य ! कथानक एकसारखे असल्याने साहजिकच दोन्ही चित्रकृती जवळाजवळ ठेवून पाहण्याचा मोह झाला. ही स्पर्धा नाही, कारण अस्सलाच्या आसपास जाणं अवघडच .
म्हणून टाळत होतो, पण आज लता-मन्नादांनी आग्रह केला – ” दिल की गिरह खोल दो ! ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply