ज्यांनी नुकतेच कोरोनाशी दोन हात केले आणि कोरोनाला पळवून लावले, कोरोना बिचारा रडत गेला असे आमचे दिलीप भाई.
“दिलीप खन्ना” नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते. दिदारसिंग & पार्टी, ‘बाबला ऑर्केस्ट्रा’, मेलडी मेकर्स, सुनहरी यादे, झंकार, सेवन कलर्स, कलाकार ऑर्केस्ट्रात मिमिक्री आयटम सादर करणारा दिलीप खन्ना. त्यांचे खरे नाव `अशोक राजाराम पोटे’ !
खन्ना यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी जवळ कुंडल गावात झाला. शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत गावात आणि पुढे मुंबईतील बऱ्याच ठिकाणी कारण वडील मुंबई पोलीस खात्यात होते. शिक्षण (जुनी मॅट्रिक) ११ वी पर्यंत. अशी मुले जे काही करतात ते भन्नाट आणि जीव ओतून. त्याकाळी ऑर्केस्ट्रा क्षेत्रात दिनेश हिंगु आणि जॉनी व्हिस्की, दिलीप दत्त फुल फॉर्मात होते. दिलीप खन्ना यांच्या डोक्यात मिमिक्रीचे खूळ होतेच. एका शो मध्ये फिल्मस्टार “प्राण” चा हुबेहूब आवाज काढला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षकांनी स्टेजवर बक्षिस देण्यासाठी रांग लावली. कुणी एक रुपया, कुणी दोन, कुणी पाच रुपये दिले आणि इथे त्यांना सूर गवसला आपण हेच करायचे. आपण कलाकार व्हायचे.
दिलीप खन्ना यांना बाबला ऑर्केस्ट्रामध्ये असताना बरेच व्यावसायिक मुद्दे शिकायला मिळाले. अशोक सराफ – पुणे – यांच्या मेलडी मेकर्स मध्ये शब्बीर कुमार शी मैत्री झाली. शब्बीर कुमार रफीसाहेबांचा आवाज हुबेहूब काढत असे. दिलीप जी त्याच्याबरोबर विंगमध्ये त्याला फॉलो करत गाणे म्हणत असत. तेथे त्यांना गाण्याचा सूर सापडला. आज ते पाच पार्श्र्वगायक आवाज सादर करतात. त्यांनी कुठलेही व्यसन केले नाही. एकच व्यसन ते म्हणजे ” मिमिक्री ”
मुंबईत मोठ्या कंपनीत कार्यक्रम होता. गाणी झाली , दिलीप खन्ना यांची मिमीक्री झाली आणि नियोजित पाहुणे श्री. अमिताभ बच्चन साहेब स्टेजवर आले. प्रेक्षकांशी संवाद साधत होते. तोपर्यंत स्टेजवर अमितजी सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी झाली आणि स्टेज कलंडला. आणि सर्वांची धावाधाव झाली. असो,
दिलीप खन्ना यांनी मुंबईतील सर्व ऑर्केस्ट्रातून कामे केली.
बाबला ऑर्केस्ट्रा सोबत १९८५ साली अमेरिका, कॅनडा, वेस्ट इंडिज टूर केली . ७५ दिवसात त्यानी २५ शो केले. ती टूर मोठी सुखद अनुभव देणारी ठरली. अंकुश दवे या त्यांच्या फॅन ने त्यांना आठवड्यात दोनदा नायगारा धबधबा दाखवला , ते त्यांची ऑडी गाडीतून घेऊन गेले.
अमेरिकेत त्यांनी भारताचे पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांचा हुबेहूब आवाज काढला.(१९८५) तेव्हा सम्पूर्ण थिएटर दणाणून गेले. कोणत्याही पंतप्रधानांचा आवाज काढण्याची अमेरिकेत ती पहिलीच वेळ होती. प्रचंड यश मिळाले.
एकदा बर्फ पडत होता तेव्हा ते बर्फात गेले तेव्हा बाबला म्हणाले, लक्षात ठेव एखादा गायक आजारी पडला , किंवा वादक आम्ही काहीतरी करू शकतो परंतु मिमिक्री आर्टिस्ट आजारी पडला तर त्याला रिप्लेसमेन्ट नसते. तेव्हा आपण किती महत्वाचे आहोत हे कळले. परदेशात मिमीक्री करणाऱ्याला खूप मान आहे.
माया जाधव यांच्या ग्रुपबरोबर इस्रायलला गेले. तेव्हा स्टेजवर त्या भागाचे मेयर आले तेव्हा त्यांना खन्ना म्हणाले लित राऊत. मेयर ना म्हटल्याबरोबर सर्व वातावरण बदलले. प्रचंड हंशा झाला. गर्दीतून लोकांची मागणी आली ‘ दादा कोंडके ‘ यांचा आवाज काढा. खन्ना यांनी लगेच दादा कोंडकेंचा आवाज काढला. लोकांनी थिएटर डोक्यावर घेतले. समोरून एक रसिक प्रेक्षक स्टेजवर आला आणि त्याच्या हातातील भारीतले ‘ सिको ‘ कंपनीचे घड्याळ काढून दिले . दिलीपजी म्हणाले नको. आम्ही तुमच्या कडून तिकीटाचे पैसे घेतले आहेत. तेव्हा मला बक्षिस घेण्याचा अधिकार नाही. त्याने ते घड्याळ त्यांच्या हातात घालत म्हणाला , सॉरी, मी वापरलेले आहे, खरे तर तुम्हाला नवीनच घेऊन द्यायला पाहिजे.
माणसाकडे आत्मविश्वास आणि संयम असलं तरच असे घडू शकते.
काही शो झाल्यानंतर वडिल म्हणाले हेच करणार आहेस का नोकरी लावू. दिलीपजी म्हणाले नाही मी हेच करणार, मग वडील म्हणाले आत्ताच काय ते बघ मग तुला मी नोकरी लावणार नाही. दिलीपजी आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांचे शोज चालू होते. ७ जुलै १९८८ रोजी त्यांनी स्वतःचा ‘ हास्यदरबार ‘ नावाचा शो सुरु केला. तो आजतागायत चालू आहे.
सतत मुलाखती देणे व्हिडिओज यु ट्यूब वर टाकणे त्यांना आवडत नाही ते म्हणतात लोकांना लाईव्ह परफॉर्मन्स जितका समोर बघून भावतो तितका व्हिडिओज वगैरे नाही. शो सुरु होण्याआधी , प्रेक्षक येण्याआधी प्रत्येकाच्या सीटवर व्हिजिटिंग कार्ड ठेवलेले असते. जेणेकरून प्रेक्षकांना कलाकाराचा इतिहास कळतो.
‘ हास्य दरबार ‘ हे दोन शब्द आहेत. खन्ना म्हणाले, मी तो कॉपॅक्ट केला आहे. कारण जाहिरातीत एक शब्द वाढतो आणि त्यात वगेळेपणाही दिसतो , कारण वृत्तपत्रात जाहिरातीत प्रत्येक शब्दावर चार्ज असतो.
|| श्री तेहतीस कोटी देव प्रसन्न || असे व्हिजिटिंग कार्डवर लिहिणारे दिलीप खन्ना महाराष्ट्रात एकमेव कलाकार आहेत. खन्ना म्हणतात कोणत्याही देवाला नाराज करायचे नाही. तेव्हा बाळ कोल्हटकर म्हणाले. तू प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला आहेस.
डोबिवलीत २००५ साली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन झाले. त्यात त्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ते सलग १५ वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दरवर्षी कार्यक्रम करत आहेत.
८ मार्च २००६ रोजी त्यावेळचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई महिला पोलिसांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई पोलीस महिलांसाठी कार्यक्रम करणारे पहिले मानकरी ठरले.
दिलीप खन्ना हे अत्यंत व्यवहारी आहेत. मी शब्द विकतो हे ते सरळ म्हणतात. अत्यंत परखड असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे त्यांनी आजपर्यंत १६ देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत आजही करत आहेत.
२० वर्षांपूवी किसन चव्हाण यांचा डिलाईल रोडला कार्यक्रम केला होता. रहातात यांनी परवाच फोन केला. तेव्हा त्याला उत्तरं देताना दिलीप खन्ना यांनी अमिताभ बच्चन च्या आवाजात उत्तर दिले , खन्ना यांनी कोरोनाच्या या दिवसात “अमिताभ बच्चन” चा आवाज त्यातील चढउतार घोटून तयार केला. आणि माझ्याशी अमिताभच्या आवाजात दिलीप खन्ना बोलू लागले. मी कंप्लिट फ्लॅट.
तुमचे गुरु कोण ?
माझे वडिल ‘राजाराम’ हेच माझे गुरू.
मी ‘ अशोक राजाराम पोटे.’..म्हणजेच दिलीप खन्ना…
आणि दिलीपजी म्हणाले….भय्या नाम से भी बहोत कुछ मिलता है.
मैदान मे आओगे तो समझोगे …
— शब्दांकन
सतीश चाफेकर
DILIP KHANNA
9653204296
24×7
Leave a Reply