नवीन लेखन...

दिलीपकुमार… अभिनयाचा वटवृक्ष

‘यश हेच चलनी नाणे’ ह्या पुस्तकातील दिलीप ठाकूर ह्यांनी लिहिलेला हा लेख


संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलेल्या ‘अपने’ या मसाला मिक्स मनोरंजक चित्रपटाच्या फस्ट लूकचा जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील इव्हेन्टस. अगदी दिग्दर्शक अनिल शर्मादेखिल या धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल याच कुटुंबातील. आणि या पॅकेजमध्ये कैतरिना कैफ नायिका. एक ग्लॅमरस सेटअप. या इव्हेन्टसची माझी ही सुखद आठवण.

चित्रपटसृष्टीचे इव्हेन्टस, पाय, प्रीमियर हे घड्याळाच्या काट्यावर चालत नाहीत. आणि अवतीभवती असे आणि इतके ग्लॅमरस वातावरण असते की घड्याळात पाह्यचे भान राहत नाही. आणि अशातच दिलीप कुमार आणि सायरा बानो आले आणि वातावरण बदलले. सगळे फोटोग्राफर, चॅनेलचे कॅमेरे त्यांच्यावर खिळले. दिलीप कुमारच्या हस्ते अनेक चित्रपटांचे, त्यांच्या ऑडिओ रिलीजचे प्रकाशन झालेय (अगदी मीच रिपोर्टिंग केलेल्या इव्हेन्टसची सूची द्यायची म्हटलं तरी एक भला मोठा लेख होईल. तात्पर्य, एवढ्या प्रमाणात त्यांच्या शुभेच्छा लाभल्यात. हे देखील दिलीप कुमारचे चित्रपटसृष्टीला देणं आहे.) दिलीपकुमारच्या येण्याने धर्मेंद्रची संपूर्ण देहबोली बदलल्याचे माझ्या सूक्ष्म निरीक्षणाने लक्षात आले. धरम पडद्यावर कितीही गरम ( ही मॅन अर्थाने) असू देत, अनेक प्रसंगी तो भावूक होतो, त्याचे एक्प्रेशन बदलते, कधी त्याच्यातील लहान मुल जागे होते.

तसा हा दिलीपकुमारच्या हस्ते पोस्टर रिलीज असा सोहळा. पण त्यासह घडलेल्या दिसलेल्या अगदी बिटवीन द लाईन्स गोष्टी महत्त्वाच्या… अशातच धर्मेंद्र माईक घेत भावूक झाला. अतिशय हळूवारपणे तो बोलू लागलाच ‘गजबलेल्या पार्टीत’ बरीचशी शांतता पसरली. ( मध्येच सोडा और बर्फ डालना इतकेच एखाद्या बाजूने कानावर यायचे. फिल्मी पार्टी म्हटलं की हे होणारच. तो तर अशा फिल्मी पार्टीचा स्वभाव आहे) धरम बोलत होता, पंजाबमध्ये लहानाचा मोठा होताना दिलीपकुमारच्या चित्रपटांनी, त्यांच्या अभिनयाने मी झपाटून गेलो आपणही अभिनेता व्हावे याची खरी आणि पहिली प्रेरणा मला युसूफ साहेबांमुळे मिळाली. मी तेथे त्यांचे अनेक चित्रपट अगदी वेड्यासारखे पाहिले. पुन्हा पुन्हा पाहिले.

मी खरोखरच मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आलो. कधी वाटलं नव्हतं की या खूप मोठ्या अभिनेत्याशी माझे मैत्रीचे नाते निर्माण होईल… एकदा दिलीपसाहेबांच्या पाली हिलवरील बंगल्यावर जाण्याचा योग आला. त्यांनीच मला गप्पांसाठी एका संध्याकाळी आमंत्रित केले होते. मी धरधरत होतो. गोंधळलो होतो. गप्पाना कशाने सुरुवात करायची, नेमके काय बोलावं याचा दिवसभर मी विचार करत होतो आणि मला काही सुचतच नव्हते. अशातच संध्याकाळ कधी झाली हे समजलेच नाही… त्यांच्या बंगल्यावरील हिरवळीवर ते आणि सायराजी यांच्यासोबत अतिशय शांतपणे, हळूवारपणे आमच्या गप्पा सुरू झाल्या.

पुढ्यात खायला इतके आणि असे विविधतापूर्ण होते की ते पाहूनच पोट भरले… मला फार थंडी लागतेय, ती वाढलीय हे दिलीपजींच्या लक्षात आले आणि ते बंगल्यात गेले आणि ते शाल घेऊन तर आलेच पण त्यांनी स्वतः ती शाल माझ्या अंगावर टाकली. माझ्यासाठी हा अतिशय उत्कट, भावपूर्ण अनुभव होता. दिलीपसाहेबांच्या स्पर्शातील प्रेम मला जाणवलं. मी शहारून गेलो…. आजही ती शाल मी जपून ठेवली आहे आणि कधी ती मी जवळ घेतो तेव्हा त्यात मला दिलीपसाहेबांच्या प्रेमाची आठवण येते…. धर्मेंद्र बोलता बोलता थांबला. त्याचे डोळे बरेच काही बोलत होते. ‘अपने’ या इव्हेन्टसवर लिहिताना मी फक्त ही एकच गोष्ट लिहिली आणि ती पुरेशी ठरली…

दिलीपकुमारचे निधन झाले आहे तुमची प्रतिक्रिया हवी असा ७ जुलै, २०२१ रोजी सकाळी आठ वाजता एका मराठी वृत्तवाहिनीवरुन फोन आला आणि एकाच वेळेस माझ्या डोळ्यासमोर पडद्यावरचा आणि मी मिडियात आल्यावर फिल्मी जगतात असा विविध प्रकारे अनुभवलेला दिलीपकुमार आठवला. मग एकेक करत सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांचे फोन आले. मी अगदी झूमच्या माध्यमातून लाईव्ह दिसलो. माझ्याकडे सांगण्यासारखे बरेच काही होतेच.

खरं तर साठच्या दशकात जन्माला आलेली माझी पिढी आपल्या आईबाबांचा हात धरत महिन्यातून एकदा प्रामुख्याने मराठी आणि कधी तरी हिंदी चित्रपट पाहत पाहत मोठी झाली. आजच्या डिजिटल युगात मुलं जरा कुठे इकडे तिकडे पाह्यला लागले की त्याला आईच्या हातच्या मोबाईलवर चालती फिरती चित्रे दिसतात तसेच घरातील दूरचित्रवाणी संचावर चित्रपट दिसतोय, यावरुन साठच्या दशकात जन्माला आलेली माझी पिढी या तुलनेत खूपच मागे होती. अशातच मग कधी तरी वडिलांकडून समजले दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांचे चित्रपट पाहून त्यांची पिढी मोठी झाली होती. त्या काळात मराठी कुटुंब वाचनालयाचे सभासद असे आणि तेथून घरी येत असलेल्या साप्ताहिके, मासिकात सिनेमा संदर्भात काही वाचायला- पहायला (पिक्चरचे फोटो या अर्थाने… त्या काळात तोच शब्द प्रयोग होता) मिळे.

माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी म्हणजे १९७० साली प्रामुख्याने ‘रसरंग’ साप्ताहिकातून समजले की, या एकाच वर्षी दिलीप कुमारचा ‘गोपी’, देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ आणि राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ प्रदर्शित होत आहेत. (याच क्रमाने परंतु दरम्यान काही आठवड्यांचे अंतर ठेवून हे चित्रपट प्रदर्शित झाले हे कालांतराने लक्षात आले.) खरं तर राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझच्या सात ते सत्तर वर्षांच्या रसिकांना झपाटून टाकलेला हा काळ होता. पण शालेय वयात अभ्यासात इतिहास विषय असतो, तसेच व्यक्तिगत आयुष्यातही अनेक गोष्टीत पूर्वी काय घडले हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच.

जुन्या काळातील चित्रपटविषयक ज्ञान होण्यासाठी तेव्हा रसरंगमध्ये इसाक मुजावर यांचे ‘फ्लॅशबॅक’ नावाचे सदर असे. त्यात कधी तरी समजले की, बॉम्बे टॉकीज निर्मित आणि अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ज्वार भाटा’ (१९४४) या चित्रपटापासून दिलीपकुमारने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.

एकदा कधीतरी माझी आजी मला म्हणाली, दिलीपकुमार तिचा आवडता नट, म्हणून तिने माझे नाव दिलीप ठेवले. ( फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मोठ्या नातवाचे नामकरण आजी अथवा आजोबा करत. एक महत्वाची सामाजिक, कौटुंबिक गोष्ट ) हे समजले आणि दिलीप कुमारबाबत नकळत आपुलकी निर्माण झाली.

एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे गिरगावातील खोताची वाडीतील गल्लीबोळातून खेळणे, नियतकालिके वाचणे आणि थिएटरमध्ये अथवा गल्लीत चित्रपट पाहणे यात आयुष्य पुढे सरकू लागले. अशातच १९७२ साली दिलीप कुमारची दुहेरी भूमिका असलेल्या आणि बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘दास्तान’ फ्लॉप झाला असे वाचले. (चित्रपट फ्लॉप झाला म्हणजे नेमके काय असते हे समजण्याचे आणि समजून काही उपयोग नसल्याचे ते वय होते… आयुष्याचा खरा आनंद वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंतच असतो हे पन्नाशीनंतर समजले ते जाऊ दे) अशातच १९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झाले आणि शनिवारी संध्याकाळी मराठी तर रविवारी हिंदी चित्रपट घरबसल्या पाह्यची सोय झाली.

आता वय वाढत असताना गल्लीत ‘राम और श्याम’, ‘गंगा जमुना’, ‘मधुमती’ मॅटीनी शोला ‘लीडर’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘संघर्ष’ रिपीट रनला ‘मुगल ए आझम’ असे दिलीपकुमारची भूमिका असलेले चित्रपट आवर्जून पाहू लागलो याची दोन कारणं, एक म्हणजे वडीलांनी आवर्जून सांगितले होते, दिलीप, देव आणि राज कपूर यांचे जुने चित्रपट कुठेही पाह्यला मिळाले तर सोडू नकोस (त्या काळात जुने चित्रपट रिपिट रनला अथवा मॅटीनी शोला रिलीज होत आणि ती एक चांगली पर्वणीच होती. पुढील पिढीतील प्रेक्षक घडण्यासाठी ते उपयुक्त होते. एक प्रकारे हादेखील सिनेमाचा अभ्यासच )… आणि दुसरं कारण म्हणजे, दिलीप कुमार आवडू लागला होता. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनची जबरा मोहिनी असूनही दिलीपकुमारची अभिनय शैली आवडत गेली, कधी भारावूनही गेलो.

अशातच असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’ (१९७६) मधील दिलीपकुमारच्या तिहेरी भूमिकेची (पिता आणि दोन मुले) खूप टवाळी होत असल्याचे वाचनात आले. पण दिलीप कुमारच्या नवीन चित्रपटाऐवजी जुने चित्रपट पाहत जा अशी शिकवण आणि सवय असल्याने ‘बैराग’कडे सहज दुर्लक्ष करु शकलो. सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’ येईपर्यंत मी फिल्म दीवाना झालो होतो, आणि आता असे महत्वाचे चित्रपट ‘पहिल्या तीन दिवसांत’ पहायची सवय लागली होती. रॉक्सी थिएटरमध्ये धक्काबुक्की असलेल्या रांगेत कसाबसा पुढे सरकत स्टॉलचे तीन रुपये तीस पैसे असे दर असलेले तिकीट एकदाचे हाती आले. ते दिवसच वेगळे होते.

‘विधाता’ मी दिलीपकुमारला पाहण्यासाठी गेलो आणि संजीवकुमारला दाद देत बाहेर आलो. (तोपर्यंत काही झालं तरी आपल्या आवडता हीरोच पडदाभर श्रेष्ठ अशीच एकनिष्ठ असण्याचे दिवस होते. ते आजही असले तरी त्याचे प्रमाण घटलयं असे समजतोय. प्रेक्षकांच्या चित्रपट वेडात काळानुसार बदल झाला आहे.) दिलीप कुमारने याच सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चनला स्टार केलेल्या ‘ॲग्री यंग मॅन’चीच व्यक्तिरेखा ‘विधाता’मध्ये ‘ॲन्ग्री ओल्ड मॅन’च्या रुपात साकारलीय हा तर अमिताभने जे पेरले त्याचेच यश आहे असे वाटले, पण एव्हाना व्यावसायिक पातळीवरील हिंदी चित्रपट खूपच बदललाय, त्यानुसार आपणही बदलायला हवे असे दिलीपकुमारने व्यावसायिक शहाणपण दाखवलयं असेही लक्षात आले. हा माझ्या दृष्टिकोनातील बदल होता.

ऐशीच्या दशकाच्या पूर्वार्धात मीच मिडियात आलो आणि स्टुडिओ भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी आणि निरीक्षण याचा झपाटा लावला. आणि अशातच १९८४च्या दिवाळीच्या दिवशी सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ या चित्रपटाचा मेहबूब स्टुडिओत मुहूर्त आहे याचे आमंत्रण हाती आले आणि त्यावरील दिलीपकुमारचे नाव पाहून शहारलो. तोपर्यंत या मुहूर्त दृश्यात भाग घेतलेल्या नसिरुद्दीन शहा, जॅकी श्रॉफ ( हा ‘हिरो’च्या प्रेस शोला न्यू एक्सलसियरच्या मिनी थिएटरमध्ये आला असता ‘कैसा है भिडू’ असे जणू जुनी ओळख असल्याप्रमाणे माझ्यासह अनेकांना भेटला), अनिल कपूर आणि अनुपम खेर ( राजश्री प्रॉडक्सन्सच्या प्रभादेवीच्या ऑफिसात विनय वेलिंग यांनी ‘सारांश’च्या निमित्ताने भेट घालून दिली होती) यांच्यापेक्षा दिलीपकुमारला प्रत्यक्षात कधी पाहतोय असं झाले होते. आपल्या चित्रपटवेड्या देशातील अनेक फिल्म दीवाने आपल्या आवडत्या हीरोला आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्षात पाहू देत असे स्वप्न घेऊन जगतात, मीदेखील या दिवसात अगदी त्याच ‘मास’ मधील अथवा पब्लिक मधील एक होतो. त्यामुळे आमंत्रणावरील ‘दुपारी साडेअकरा ‘ अशी मुहूर्ताची वेळ होती तरी मी चक्क साडेदहा वाजताच पोहचलो.

दिलीप कुमारला प्रत्यक्षात अभिनय करताना अनुभवायचंय यासारखे आयुष्यात दुसरे सुख ते काय असणार? याक्षणी माझ्यातील सिनेपत्रकार बाजूला पडला होता आणि स्टॉलचा पब्लिक म्हणून अगणित चित्रपट एन्ज्यॉय केले तो. मी जागा झालो होतो. साडेदहा वाजता सेटवर फारसं कोणी नव्हतेच. बारा वाजता अनेक फिल्मवाले एकेक करत वाढत होते, पण माझे सगळे लक्ष कधी बरे एकदा हे मुहूर्त दृश्य सुरु होऊन दिलीपकुमारला पाहतोय याकडे लागले होते. साडेबारानंतर एकदाचा तो क्षण आला. सुभाष घईच्या चित्रपटाचा मुहूर्त असल्याने अनेक बडेबडे फिल्मवाले शुभेच्छा देण्यासाठी आले यात आश्चर्य ते काय हो… भव्य स्टेजवर अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर आले, प्रत्येकाच्या धारदार संवादासह नाट्यमयता वाढत गेली, अंगावर रोमांच उभे राहिले आणि अशातच साक्षात दिलीपकुमार…. खरेच वाटेना. पण ही वस्तुस्थिती होती. या मुहूर्ताच्या शूटिंग रिपोर्टीगमध्ये मी फक्त आणि फक्त दिलीपकुमारवरच सगळा फोकस ठेवला.

दिलीप कुमारवरचे बरेच काही वाचायला रसिकांना आवडते याची मला कल्पना होती, पण त्यातील बरेचसे लेखन ‘मुगल ए आझम’, ‘नया दौर’, ‘गंगा जमुना’ या चित्रपटांभोवतीच फिरत होते आणि माझा कल ऐशींच्या दशकातील दिलीप कुमारवर राहिला, कारण तो काळ मी अनुभवलाय.

याच काळात सुलोचनादीदींची त्यांच्या प्रभादेवी येथील घरी सविस्तर मुलाखत घेत असताना राज कपूर आणि देव आनंद प्रमाणेच दिलीपकुमारचा विषय निघणे अगदी स्वाभाविक होतेच. या तिघांसोबतचे त्यांचे अनुभव जाणून घेण्याची सर्वसाधारण चित्रपट रसिकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होतीच. अशा बुजुर्गांच्या मुलाखतीतून आपले ज्ञान, माहिती, संदर्भ (सिनेमाच्या जगात या तिन्ही गोष्टी भिन्न आहेत, बरं का?) हे वाढवावेत याकडे माझा जास्त ओढा होता. दिलीपकुमार सोबत सुलोचनादीदीनी एस.एच. रवैल दिग्दर्शित ‘संघर्ष’ (१९६८), मनोज कुमार दिग्दर्शित ‘क्रांती’ (१९८१) अशा काही चित्रपटात भूमिका साकारली. त्यावेळच्या अनुभवाबाबत त्या काय सांगताहेत याची मला विशेष उत्सुकता होती. त्या अगदी शांतपणे म्हणाल्या, दिलीप कुमार कधीही सकाळची शिफ्ट ठेवू द्यायचे नाहीत. दुपारी दोन ते रात्री दहा अशा शिफ्टमध्ये काम करण्यास प्राधान्य देत. इतकेच नव्हे तर एखाद्या दिवशी अतिशय महत्त्वाचा प्रसंग चित्रीत होत असेल तर, रात्री दोन वाजेपर्यंतही ते शूटिंग करत. याबाबत त्याना एकदा विचारले असता ते म्हणाले, उद्या फ्रेश होऊन हा प्रसंग मी केला असता तर अगोदर केलेल्या शॉटमध्ये फरक वाटला असता.

सिनेमात प्रत्येक दृश्याची वेशभूषेपासून अभिनयापर्यंत कंटीन्यूटी असते. तीच जर सांभाळली गेली नाही तर त्या दृश्याच्या आविष्कारावर परिणाम होतो. तो प्रसंग जर संघर्षमय दृश्याचा असेल तर तो एका वेळीच पूर्ण करावा… दिलीपकुमारचे हे म्हणणं सुलोचनादीदीनी ऐकले तसेच ते कायम स्मरणात ठेवून अंमलातही आणले. दिलीपकुमार आणि मराठी कलाकार यांच्या नात्याची ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते.

दिलीप कुमार म्हणजे बरेच काही आहे अथवा कदापि न संपणारा विषय आहे असे मी आवर्जून म्हणतो त्यात अशाच अगणित गोष्टी आहेत. आणि तेव्हा ओरडून सांगावेसे वाटते की, दिलीप कुमार म्हणजे केवळ ‘ट्रॅजेडी किंग’ नव्हे हो. तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी बरेच काही हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर केले आहे, प्रत्यक्ष आयुष्यात केले आहे. खरं तर अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘दाग’ (१९५२), झिया सरहादी दिग्दर्शित ‘फुटपाथ’ (१९५३), रमेश सैगल दिग्दर्शित ‘शिकस्त’ (१९५३), बिमल रॉय दिग्दर्शित ‘देवदास’च्या (१९५६) काळात दिलीपकुमार ट्रॅजेडी किंग होता. तो पन्नासच्या दशकात. ती प्रतिमा मागे ठेवून दिलीपकुमारचा बराच मोठा प्रवास आणि प्रभाव आहे.

सलिम जावेद यांच्या पटकथा संवादाच्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’ (१९८२) ही दिलीप कुमारची नवीन ओळख, नवीन प्रतिमा होती. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पिता त्यानी साकारला. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असलेल्या पुत्रावर (अमिताभ बच्चन) कडक कारवाई करण्याचे पाऊल टाकले. अशी व्यक्तिरेखा त्यांनी साकारलीय.

रुपेरी पडद्यावरील अष्टपैलूत्वासह दिलीपकुमारने कायमच आपले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भान जपले. आणि अशा वैशिष्ट्यांमुळे दिलीपकुमार अधिकाधिक प्रगल्भ आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे कोणते चित्रपट ज्युबिली हिट ठरले आणि कोणते चित्रपट फ्लॉप झाले यापलीकडे जाऊन दिलीपकुमार यांची खूप मोठी वाटचाल होती. आणि तेच तर महत्वाचे आहे.

दिलीपकुमारचे असेच एक खास वैशिष्ट्य म्हणजे, मराठीशी निर्माण झालेले विविध स्तरांवरील नाते. आणि त्यातही विशेष म्हणजे, चांगले मराठी बोलणे. आपण मुंबई, महाराष्ट्रात घडलोय आणि त्यामुळे येथील मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, रंगभूमी, चित्रपट यांची आपणास कल्पना असावी याबाबतची त्यांची जागरुकता आणि त्याचा त्यांनी अनेकदा दिलेला प्रत्यय विशेष उल्लेखनीय आहे.

नव्वदच्या दशकात सायरा बानूने दूरदर्शनसाठी हिंदी चित्रपट गाण्यांवर एका मालिकेची निर्मिती केली असता दिलीपकुमारच्या वतीने त्यांच्या पाली हिलवरील बंगल्यावर मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांसाठी एका गेटटुगेदरचे आयोजन करण्यात आले होते.

स्क्रीनचा फोटोग्राफर पीटर मार्टिसने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. (आजही मी त्याचे आभार मानतो.) दिलीप कुमारच्या बंगल्यावर जायचा योग आला यातच आपले नशीब खुलले अशीच आम्हां महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांची भावना झाली. मी तर प्रचंड थ्रील झालो होतो.

लहानपणापासून आपण ज्याचे चित्रपट एक पडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स, तेथील मॅटीनी शो तसेच गल्ली चित्रपट, दूरदर्शनवर पाहत आलो आहोत त्याच्या बंगल्यावर जायचा हा योग म्हणजे माझे नशीब कमालीचे बलवान असावे हे मनात आलेच. अगोदरच्या पिढीकडून दिलीपकुमारच्या अनेक चित्रपटांची वैशिष्ट्ये ऐकून आणि नियतकालिकांमध्ये त्याच्याबद्दल बरेच काही वाचून (विशेषतः शिरीष कणेकर, इसाक मुजावर, वसंत भालेकर यांचे दिलीप कुमारवरचे अक्षरशः प्रदीर्घ लेख वाचून) माझी पिढी वयात आली.

आमच्यावर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका आणि व्यक्तिमत्वाचे विलक्षण गारुड. तरीही देव, दिलीप आणि राज यांच्याबाबत विशेष कुतूहल वाटत होतेच. ( अमूकतमूक क्षेत्रात पूर्वी काय घडले हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक नवीन पिढीत असतेच असते आणि त्यातूनच दोन पिढ्यांचा संवाद साधला जातो. वाढत जातो.), प्रत्यक्ष बंगल्यातील प्रशस्तपणा, साहेबी थाट, त्यातील दिलीपकुमार आणि सायरा बानू यांच्या भव्य देखण्या आणि बोलक्या तस्वीरी हे पाहूनच माझे मध्यमवर्गीय मन दबून गेले. त्यातच दिलीपकुमारच्या मोठेपणाचा माझ्यावरचा प्रभाव. तो अशा वेळी जास्तच जागा अथवा सावध होतो. आणि तो असायलाच हवा.

आपण सिनेपत्रकार असलो तरी फिल्म दीवाने आहोत हे मी कायमच लक्षात ठेवल्याने असे दुर्मिळ अनुभव भरभरून घेऊ शकतो. विशेष म्हणजे, आम्हां महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांशी ते आवर्जून मराठीत बोलले. आवर्जून सांगावी अशीच ही गोष्ट आहे. दुसरे विशेष म्हणजे, त्यांची मेहमाननवाझी! आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कशी अदबीने आणि उत्तम खाद्याने पाहुणचार करायचा हे दिलीप कुमारचे अतिशय खास वैशिष्ट्य.

शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही उंची खाना आणि तो अधिकाधिक प्रमाणात घ्या असा विशेष आग्रह. खुद्द दिलीपकुमार हे करताहेत हे तर केवढे सुख. (माझ्या या मताशी प्रदीप भिडे नक्कीच सहमत होतील. त्यांनाही असाच एक सुयोग आला आहे.)

विशेष म्हणजे, दिलीपकुमारला मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, नाटक, चित्रपट याबाबत नेहमीच विशेष प्रेम वाटले. मराठी चित्रपटाच्या संदर्भातील काही विशेष आठवणी सांगायलाच हव्यात. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फूल चार हाफ’ (१९९१) या मराठी चित्रपटाचे निगेटीव्ह कटिंग दिलीपकुमारच्या शुभ हस्ते झाले. पुरुषोत्तम बेर्डेसाठी ही आयुष्यभरची विशेष आठवण झाली. त्याने तेव्हाचा फोटो अतिशय जपून ठेवला आहे. निगेटिव्ह कटींग ही चित्रपट माध्यम व्यवसायातील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.

आणखीन एक विशेष आठवण आहे, राजकमल कलामंदिर (युथ विंग ) च्या किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८) च्या सुवर्णमहोत्सवी इव्हेन्टसला चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमारची विशेष उपस्थिती होती. दोन दिग्गज एकाच सोहळ्यात पाहण्याचा-ऐकण्याचा अनुभवण्याचा अतिशय दुर्मिळ योग. (मिडियात वावरताना – वाढताना अशी अनेक सुखं माझा उत्साह कायम ठेवणारी. एक प्रकारचे टॉनिक देणारी) जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा इव्हेन्टस छान खुलला. ते मराठी चित्रपटसृष्टीचे पाहुणे म्हणून आले होते. यावेळी दिलीपकुमारनी मराठी चित्रपटसृष्टीला मराठीत विशेष शुभेच्छा दिल्या. अतिशय भारावून जावे असे ते वातावरण होते. विशेष म्हणजे यावेळचा दिलीप कुमार सोबतचा अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो आजच्या ग्लोबल युगातील सोशल मिडियात भरपूर लाईक्स मिळवतोय.

पुन्हा पुन्हा पोस्ट होतोय. एकदा पुणे शहरात दिलीप कुमारनी अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६८) हा चित्रपट पाहून ‘हा चित्रपट आपल्याला असे गुंतवून ठेवतो की वेळ कसा जातो तेच समजत नाही’ असे गौरवोद्गार काढले. त्यामुळे जयश्री गडकर विशेष प्रभावी झाल्या. आपल्या ‘अशी मी जयश्री’ या चरित्रात या गोष्टीचा खास उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर, जयश्री गडकर यांच्या एका भेटीत त्यांच्याकडून हा अनुभव मी ऐकला तेव्हा या क्षणाच्या आठवणीने त्या फार रोमांचित झाल्याचे जाणवले. त्या काळात मराठी कलाकाराला दिलीप कुमारची मिळणारी शाबासकी विशेष गोष्ट होती. यात दिलीप कुमार यांचे श्रेष्ठत्व दिसतेय तसेच मराठी कलाकारांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर दिसतोय. एखाद्याला शाबासकी आणि पाहुण्यांची सरबसाई यात दिलीप कुमार कायमच सरस.

पडद्यावरचे दिलीप कुमार पाहत पाहत लहानाचा मोठा झालो, मग मिडियात आलो, इकडेतिकडे जात राहिलो आणि आता प्रत्यक्षातील दिलीप कुमार पाहण्याचे सुखद योग येऊ लागले. असाच एक फंडा चित्रपटाच्या भव्य मुहूर्तांचा!

पूर्वीच्या फिल्मवाल्यांसाठी असा बड्या चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे जणू इव्हेन्टस अथवा फेस्टीवल! दिलीप कुमारची भूमिका असलेल्या के. बापय्या दिग्दर्शित ‘रास्ता’चा मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त आठवतोय. महालाच्या भव्य सेटवर दिलीपकुमार आणि अनुपम खेर यांच्यावर मुहूर्त दृश्य (जितेंद्र आणि श्रीदेवी हैद्राबादला एका शूटिंगमध्ये बिझी असल्याने येथे आले नाहीत. ते हजर असते तरी साक्षात दिलीपकुमार असताना इतरत्र नजर जाईल का?) दिलीपकुमार हे मुहूर्त दृश्य आहे म्हणून कसे तरी उरकूया आणि मिठ्ठास पेढा खाऊन मोकळे होऊ यात असे केले नाही.

एकीकडे आम्ही सिनेपत्रकार आणि फिल्मी हस्तीया यांची गर्दी वाढत असताना सर्वांसमोर दिलीप कुमारने बराच वेळ रिहर्सल केली, अनुपम खेरकडून ती करुन घेतली आणि मगच म्हटले, चलो टेक करते है.. हा चित्रपट त्या दिवशी रात्री पार्टी झाल्यावर डब्यात गेला. दिलीप कुमारचे असे अनेक चित्रपट काही ना काही कारणास्तव डब्यात गेले. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘चाणक्य’चा यात खास उल्लेख हवाच.

सुधाकर बोकाडे निर्मित आणि के. बापय्या दिग्दर्शित ‘इज्जतदार’ चा गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मुहूर्त आजही आठवतोय. मुहूर्त दृश्यात दिलीपकुमार आणि गोविंदा असे दोघेही पिस्तूल घेऊन (१९८८च्या अखेरीस हा मुहूर्त झाला तोपर्यंत हिंदी चित्रपट खूपच बदलला होता) आता दिलीप कुमार समोर गोविंदाचे अस्तित्व जाणवणे शक्यच नव्हते. पण दिलीप कुमारने आपल्या स्वभाव आणि सवयीनुसार या मुहूर्त दृश्याची रिहर्सल सुरु केली (त्यातच गोविंदाला घाम येतोय हे लपत नव्हते. त्यात त्याची तरी काय चूक. ती वेळच तशी होती. महत्वाचे आहे ते कायमच उशिरा येत असलेला गोविंदा वेळेपूर्वीच आला ) प्रत्यक्षात टेकमध्ये दिलीपकुमारने बाजी मारली. हे काय सांगायला हवे का? मुहूर्त होईपर्यंत या चित्रपटाची गोविंदाची नायिका म्हणून माधुरी दीक्षितची निवड झाली नव्हती.

दिलीप कुमारचे मराठी रंगभूमीवरचे प्रेम कायमच ठळकपणे व्यक्त झाले आहे. आणि सत्तर- ऐशीच्या दशकातील नाटकवाले प्रचंड सुखावले.

संशयकल्लोळ, तीन पैशाचा तमाशा, तो मी नव्हेच, घाशीराम कोतवाल, अश्रूंची झाली फुले अशा अनेक नाटकांच्या काही पाचशे अथवा हजाराव्या प्रयोगाना दिलीपकुमारची विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होती आणि अगदी संपूर्ण नाटक अगदी शांतपणे पाहणे. खरं तर अनुभवणे. मध्यंतराला आवर्जून विंगेत येऊन अथवा स्टेजवरुन त्या नाटकातील बारकावे सांगत सांगत प्रत्येक कलाकाराचे कौतुक करणे, त्यांना शाबासकी देणे हे त्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे शक्यतो हे भाषण मराठीत करणे आणि छान कौतुक करताना खास उर्दूतील नेमके शब्द वापरुन आपल्या भाषणाला अधिकाधिक उंचीवर नेत, सर्वानाच मंत्रमुग्ध करणे.

‘संशयकल्लोळ’च्या वेळी दिलीप कुमारने आपल्या पाठीवरून कौतुकाचा फिरवलेला हात अशोक सराफच्या आजही लक्षात आहे. त्या क्षणाची नुसती आठवणही त्याला शहारून जाते. म्हणूनच त्याला मी अधूनमधून करुन देत असतो. अशोक सराफने दिलीप कुमारला श्रद्धांजली अर्पण करताना मराठी वृत्तवाहिनींशी बोलताना ही आठवण आवर्जून सांगितली. (मग अशोक सराफला सतत फोन येऊ लागले. तोपर्यंत ही गोष्ट आजच्या डिजिटल पिढीतील पत्रकारांना माहिती नव्हती आणि ते हल्ली गरजेचे वाटत नाही.) नव्वदच्या दशकात दिलीप कुमारने काही मराठी कलाकारांसोबत ‘ओ बाबा जान’ या नावाच्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारायचीही तयारी झाली होती. सतिश आळेकर त्या चित्रपटात भूमिका साकारणार होते. दिलीपकुमारने त्यासाठी त्या मराठी कलाकारांची मुंबई उपनगरातील एका तारांकित हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था केली होती. तो चित्रपट प्रत्यक्षात सेटवर न जाताच बंद पडला. पण पुणे शहरात या एकूणच गोष्टीची खूपच चर्चा रंगली. विशेषत: एकदा सायरा बानूने या सर्व मंडळींसाठी एकदा केलेल्या टेस्टी खिचडीची चर्चा पुणे शहरात बरेच दिवस रंगली. हा चित्रपट दुर्दैवाने सेटवर न जाताच डब्यात गेला. सतिश आळेकर यांच्याकडून ही गोष्ट एकदा ऐकायला मिळाली. त्यांनी एका वृत्तपत्रात ही आठवण आवर्जून लिहिली होती. हा चित्रपट खरंच बनायला हवा होता.

दिलीप कुमारचे असे ‘पडद्यावर न आलेले चित्रपट अनेक आहेत. ‘ बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘चाणक्य’चा त्यात खास उल्लेख हवाच. पंढरीदादा जुकर यांनी यासाठी दिलीप कुमारचा मेकअप केला होता आणि ते फोटो स्क्रीन साप्ताहिकात प्रसिद्ध झाले होते. पण हा चित्रपट तेवढ्यावरच थांबला…

आणि असाच एक चित्रपट ‘कलिंगा’
या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती येताच मी थ्रील झालो. सुधाकर बोकाडे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन दिलीप कुमारचे आहे आणि २० एप्रिल, १९९१ रोजी जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा इव्हेन्टस आहे. दिलीप कुमार दिग्दर्शकांच्या कामात ढवळाढवळ करतो असे मागील पिढीतील चित्रपट पत्रकार आणि लेखकानी अनेकदा लिहिलेले (विशेषतः असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’ फसल्यावर आणि तत्पूर्वी ‘संघर्ष’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘आदमी’, ‘लीडर’ फ्लॉप झाल्यावर म्हटले गेले) दिलीप कुमारच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचा मुहूर्त म्हणून वेळेपूर्वीच गेलो आणि तेव्हा ‘मार्मिक’, ‘सामना’ यात सिनेप्रीक्षान लिहित असलेल्या शुद्धनिषाद अर्थात श्रीकांतजी ठाकरे यांना आवर्जून आमंत्रण असल्याने आम्ही बरोबरच गेलो. तेव्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की, आतापर्यंत आपल्या सोबत विविध चित्रपटात भूमिका साकारलेल्या अशा जवळपास सर्वच कलाकारांना आवर्जून आमंत्रित केले होते.

कामिनी कौशलपासून मुकरीपर्यंत अनेक कलाकार दिसले. याक्षणी वैजयंतीमाला, वहिदा रहेमान असत्या तर आणखीन रंगत आली असती. असो. ‘कलिंगा’च्या मुहूर्त दृश्याला संगीतकार नौशाद यांनी क्लॅप दिला तर मुहूर्त दृश्यात दिलीप कुमार, सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, राज बब्बर, शिल्पा शिरोडकर यांनी सहभाग घेतला. जोरदार डायलॉगबाजी झाली. मुहूर्त दृश्य पार पडताच एका बाजूला पार्टी रंगात येत असतानाच दिलीप कुमार संपूर्ण पार्टीत फिरले आणि अधिकाधिक जणांना आवर्जून भेटले.

श्रीकांतजी आणि मलाही भेटताना पीआरओ आर. आर. पाठक यांनी श्रीकांतजींची ओळख करुन देताना म्हटलं, हे बाळासाहेबांचे बंधु… यावर दिलीप कुमारने म्हटले, बाळासाहेब आले असते, मला आशीर्वाद दिला असता तर मला आणखीन आनंद झाला असता…

बरेच दिवस ‘कलिंगा’च्या या मुहूर्ताची चर्चा रंगली. ती जंगी पार्टी झाली होती. सिनेमाचे शूटिंग होत असल्याच्या बातम्या येत. एकदा शिल्पा शिरोडकरकडून दिलीप कुमारच्या दिग्दर्शन शैलीचे बरेच कौतुक ऐकले. चांगले वाटले. निर्माता विलक्षण तगडा असल्याने हा महत्वाकांक्षी चित्रपट महाखर्चिक बनेल आणि प्रचंड मिडिया हाईपने रिलीज होईल असे वाटले होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. एकदा बातमी आली की, सहा तासाचा सिनेमा होईल इतके शूटिंग झाले आहे, तर एकदा बातमी आली की राज किरण गायब झाल्याने कन्टीन्यूटीचा प्रॉब्लेम झाला आहे.

‘कलिंगा’ पडद्यावर आला नाही हेच सत्य आहे. आणि दिलीप कुमारचा दिग्दर्शन गुण पाह्यला मिळाला नाही.

वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ याच नाटकाच्या मध्यवर्ती कथासूत्रवर आधारित यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’ (१९८४) या चित्रपटात दिलीप कुमारची भूमिका आहे. मूळ थीम कायम ठेवून अन्य संदर्भ बदलले आहेत इतकेच. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलीपकुमार आणि निळू फुले एकत्र भूमिका साकारण्याचा योग आला. निळू फुले आपल्या या अनुभवावर आवर्जून सांगत. (पण असे असले तरी या दोघांवरचे अनेक प्रसंग का कापले याची उत्तरे कधीच मिळाली नाहीत. चित्रपटाची लांबी वाढल्याने तसे झाले असे म्हणता येईल इतकेच).

तर उमेश मेहरा दिग्दर्शित ‘किला’ (१९९८) या चित्रपटात दिलीप कुमारची दुहेरी भूमिका आहे. एका नायिका रेखा आहे. तर दुसरा दिलीपकुमार स्मिता जयकरचा नायक आहे. स्मिता जयकरने हा चित्रपट साईन करताच मी ‘या सोनेरी संधी’ बाबत स्मिता जयकरची खास मुलाखत घेतली. तिच्यासाठी ही मोठीच आनंदाची गोष्ट होती. ती यावर बोलताना इतकी आणि अशी भारावून गेली होती की प्रत्यक्षात दिलीप कुमारसोबत शूटिंग करताना तिचे काय होईल असा प्रश्न मला पडला.

दिलीप कुमारच्या विलक्षण लौकिकामुळे हे झालेय हे लक्षात आले. विशेष म्हणजे, गोरेगावच्या चित्रनगरीतील कोर्ट दृश्याच्या शूटिंगच्या वेळी स्मिता जयकरमुळे मला प्रत्यक्षात सेटवर हजर राहण्याची संधी मिळाली. तिने अतिशय आग्रहाने सेटवर बोलावले याबाबत आजही मी तिचे मनोमन आभार मानतो. अभिनयाचे विद्यापीठ दिलीप कुमारला प्रत्यक्षात अभिनय करताना अनुभवायला मिळणे ही तर कमालीची सोनेरी चंदेरी संधी मिळाली. संपूर्ण सेटवर दिलीप कुमारचे अस्तित्व जाणवत होते. एका बाजूला रेखा, पलिकडे स्मिता जयकर आणि आजूबाजूला अनेक ज्युनिअर आर्टिस्ट अशात सगळ्या नजरा अर्थात दिलीपकुमारवर!

दिग्दर्शक उमेश मेहराकडून संपूर्ण दृश्य समजून घेऊन मग कॅमेरा नेमका कुठे आहे, त्याची मुव्हमेंट कशी आहे, असे सगळे छोटे छोटे तपशील जाणून घेत दिलीप कुमारने बरीच रिहर्सल करुन मग टेक करते है असे म्हणताच संपूर्ण सेटवर शांतता पसरली. अर्थात, एका टेकवर दिलीपकुमारचे समाधान होणे शक्यच नव्हते. त्यामुळे एकेक टेक वाढत वाढत गेला. जवळपास सव्वा तास एकच दृश्य चित्रीत होत होते, पण दिलीप कुमार यांचा परिपूर्णतेचा ध्यास कमालीचा होता. तोपर्यंत दिलीप कुमार यांचा खूपच मोठा अभिनय प्रवास झाला होता, त्यामुळे ते थोडक्यात उरकून बाजूला होऊ शकले असते. पण ते म्हणजे ‘एका सेटवरुन दुसरीकडे शूटिंगसाठी धावणारे नव्हते.’ कायमच त्यांनी दिवसाला एकाच शिफ्टमध्ये भूमिका साकारली आणि एकाच वेळेस जास्तीत जास्त दोनच चित्रपट स्वीकारले. आणि आपली कामावरची निष्ठा, अभिनय बांधिलकी जपली.

‘किला’ (रिलीज १० मे, १९९८) हा योगायोगाने दिलीप कुमारची भूमिका असलेला शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमारची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाची आम्हा सिनेपत्रकाराना मिन थिएटरची फस्ट डे फर्स्ट शोची तिकीटे दिली होती आणि चित्रपट फसलाय हे लक्षात येत होतेच. पण चित्रपट फसला तरी दिलीपकुमारचा अभिनय दर्जेदार होता हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. अशा महान कलाकारासोबत भूमिका साकारण्याची संधी स्मिता जयकरला मिळाली.

दिलीपकुमारचा फंडा असा विविध स्तरांवरचा आहे. दिलीपकुमारच्या मोठेपणाला साजेशा असाच हा खास फंडा आहे… दिलीप कुमार म्हणजे अभिनयाचे सखोल विद्यापीठ, दिलीप कुमार म्हणजे वटवृक्ष, दिलीप कुमार म्हणजे भारतीय चित्रपटांची जगभरातील एक ओळख, दिलीप कुमार म्हणजे सामाजिक सांस्कृतिक भान असलेले व्यक्तिमत्व असे बरेच काही आहे. अगणित गोष्टी, किस्से, आठवणी, कथा, दंतकथा या कधीच संपणार नाहीत आणि त्यात एक पैलू सिनेमाच्या जगतात दिसलेला, भावलेला दिलीपकुमार. जवळपास चाळीस वर्षे सिने पत्रकारिता करताना मला दिलीपसाहेब कसे जाणवले, मी ते कसे अनुभवले ते थोडक्यात सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

हा फक्त एक ट्रेलर आहे, मेन पिक्चर अभी बाकी है दोस्त याची कल्पना नक्कीच आहे.

सिनेमासृष्टीत भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी आणि निरीक्षण करताना दिलीप कुमार आठवत राहणारच. त्यांचे अस्तित्व जाणवत राहणार. अतिशय महान कलाकार, अतिशय अलौकिक कारकिर्द आणि अतिशय खोलवर सामाजिक, सांस्कृतिक आणि माध्यमांवरचा प्रभाव.

-दिलीप ठाकूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..