नवीन लेखन...

शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

जे लोक, ‘नॉर्मल असलेल्या ६८ टक्क्यांपेक्षा भिन्न आहेत , त्यांचे काय ?

पूर्वीच्या काळी, असे वेगळे असलेल्यांना खूपच त्रास वा अपमान सोसावा लागत असे, कधीकधी त्यांना जगणेही अशक्य होत असे. पुरातनकालीन ग्रीसमधील स्पार्टा या गणराज्यात, जे नवजात शिशु नॉर्मल नसत, हँडिकॅप्ड (handicapped) असत, त्यांना एक रात्र बाहेर, लांब एकटे ठेवून दिले जात असे ;

मेले तर मेले !! महाभारतातील धृतराष्ट्राला, तो आंधळा असल्यामुळे, मोठा भाऊ असूनही, राज्य मिळाले नाही. हा अन्यायच नाही काय ? खरे तर, सगळे महाभारतच ‘राज्य वस्तुत: कोणाचे?’ या प्रश्नामुळेच घडले. धृतराष्ट्र राजा होता, तर ते न्याय्य झाले असते, व घटनांना वेगळीच कलाटणी मिळाली असती.

आजचे युग सुधारलेले म्हणवते खरे, पण नॉर्मलपेक्षा वेगळे असलेल्यांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे ? आपण ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ असलेल्यांसाठी काही करतो आहोत काय, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था निर्माण करतो आहोत काय ? त्यांच्या शिक्षणासाठी आपण काय सोयी निर्माण करत आहोत ?

परंतु पुढे जाण्यापूर्वी, वर्गीकरणाशी संबंधित एका महत्वाच्या प्रश्नाकडे नजर टाकणे आवश्यक आहे.

तो प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

नॉर्मल (normal) नॉर्मलपेक्षाभिन्न (different from normal) असे वर्गीकरण करण्यासाठी ,  

केवळ आय्. क्यू.’ हेच योग्य मापन आहे काय ? :

हा मुद्दा फार महत्वाचा आहे, व तो समजून घेणे जरूरीचे आहे. आय्. क्यू. हे मापन सन १९०० पासून वापरात येऊ लागले. म्हणजे ते १०० हून अधिक वर्षे जुने आहे. ते उपयुक्त आहे हे खरे ; पण ते परिपूर्ण आहे काय ? आय्. क्यू. मापनामधे कोणते गुणधर्म जास्त वापरले जातात ? ते आहेत : ‘तर्कानुसारी विचार करण्याची क्षमता’ (Logical-thinking ability), गणित, आणि भाषिक क्षमता (Linguistic- ability). माणसाकडे यांच्याव्यतिरिक्त इतर क्षमता नसतात काय ? अन्, असल्यास, त्या क्षमता उपयोगी नसतात का ? त्या मापनासाठी वापरल्या जात का नाहीत ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उठू शकतात.

तीसएक वर्षांपूर्वी अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी ‘बहुआयामी बुद्धिमत्ते’ बद्दलची (Multiple Intelligence) धिअरी मांडली. त्यांचे ‘फ्रेमस् ऑफ माइंड’ (Frames of Mind) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. (बुद्धिमत्तेच्या बहुआयामीपणाबद्दल अन्यही थिअरीज् आहेत. पण तूर्तास आपण गार्डनर यांची थिअरी समजून घेऊ. शिक्षणाविषयीचा मुद्दा आपला स्पष्ट होण्यासाठी सध्यातरी तेवढे पुरेसे आहे).

मात्र, गार्डनर यांची थिअरी समजून घेण्यापूर्वी आपण मेंदूबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.

माणसाच्या मेंदूचे दोन भाग (Lobes) असतात, जे एकमेकांना जोडलेले असतात. तुमच्याआमच्या  सर्वसाधारण व सोप्या भाषेत त्यांना ‘उजवा मेंदू’ व ‘डावा मेंदू’ असे संबोधतात. या दोन्ही भागांचे कार्य वेगवेगळे असते. एक भाग तार्किक कार्यांवर (Logical functions) भर देतो. गणित, शब्द, भाषा, तर्क वापरून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे, या गोष्टींसाठी हा भाग वापरला जातो. दुसरा भाग सृजनशील कार्यांसाठी (Creative Functions) वापरला जातो. चित्रें, संगीत, इतर कला, अशा सृजनशील गोष्टींसाठी हा दुसरा भाग वापरला जातो. एक साधे उदाहरण द्यायचे तर, एखाद्या माणसाचे नाव आपल्या मेंदूच्या एका भागात साठवलेले असते, तर त्याच्या चेहर्‍याचे चित्र आपल्या मेंदूच्या दुसर्‍या भागात साठवलेले असते. त्यामुळेच, कधीकधी आपल्या एखाद्या माणसाचा चेहरा आठवतो पण नाव काही आठवत नाही ; किंवा नाव आठवते पण चेहरा आठवत नाही. या माहितीवरून , आपल्याला हे स्पष्ट होते की,

आय्. क्यू. टेस्टिंगमधे मेंदूच्या सर्व क्षमता कसाला लागत नाहीत, मेंदूचे दोन्ही भाग (Lobes) समान प्रकारे वापरले जात नाहीत.

डॉ. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटलिजन्स’ ची थिअरी सांगते की बुद्धिमत्तेला वेगवेगळे आयाम असतात. ते आठ आयाम मानतात. ते आठ आहेत :

  • त्रिमिती जगाशी संबंधित (Spacial, i.e. related to space)
  • भाषिक (Linguistic)
  • तर्किक-गणिती (Logical-mathematical)
  • शारीरिक-हालचालींशी संबंधित (Bodily-kinesthetic)
  • सांगीतिक (Musical)
  • व्यक्तींच्या परस्पर-संबंधाबद्दलचे (Interpersonal)

[यालाच हल्ली वेगळ्या परिभाषेत ‘इमोशनल इंटलिजन्स’ असे म्हणतात.]

  • व्यक्तीच्या ‘स्व’ च्या संबंधातील, अंतर्गत (Intrapersonal)
  • नैसर्गिक (Naturalistic)

आता, या वर्गीकरणावरून, आपल्या लक्षात येते की जगप्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम् , महान गायक भीमसेन जोशी व क्रिकेटियर सचिन तेंडुलकर हे कसे वेगळे आहेत, त्यांच्या मेंदूच्या क्षमता कशा वेगळ्या आहेत. अर्थातच रामानुजम् हे भीमसेन होऊ शकले नसते, आणि भीमसेन हे रामानुजम् होऊ शकले नसते.

एका  अशाच  ‘डिफरंटली एबल्ड’  इंग्लिश मुलाची सत्यकथा मी (बहुधा ‘रीडर्स डायजेस्ट’ मधे) वाचलेली आहे.

या मुलाला एकट्याने रस्तासुद्धा ओलांडता येणे कठीण वाटत असे. पण त्याची भाषिक बुद्धिमत्ता जबरदस्त होती. एकदा तो लंडनला विमानात चढला,  हॉलंडमधील  ऍमस्टरडॅम येथे जाण्यासाठी. हा फक्त दोनएक तासांचा प्रवास आहे. प्रवास सुरू होतांना त्याने डच भाषा शिकण्याचे पुस्तक वाचायला घेतले ; अन् उतरेपर्यंत तो ती भाषा, मातृभाषा असल्याप्रमाणे बोलू लागला होता !

असाच एकदा मला डॉ. वत्स या गृहस्थांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. हे गृहस्थ एम्. डी. मेडिकल डॉक्टर होते. त्यांनी सांगितले की शाळेत असतांना त्यांना गणित हा विषय अजिबात कळत नसे, ते त्यात नापासही होत असत. पण पुढील शिक्षण व व्यवसाय त्यांनी असे निवडले जिथे गणिताचा विशेष संबंधच येत नाही, म्हणूनच ते यशस्वी झाले. जर त्यांचा व्यवसाय गणिताशी संबंधित असता, तर ते नक्कीच अयशस्वी (failure) म्हणूनच गणले गेले असते.

या सर्वाचा अर्थ असा की, ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीप्रमाणे आपण वागू नये ; आपण सर्वांना एकाच तराजूत तोलू शकत नाही.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..