दिन ढळला सखया, कधी येणार तू ,-?
नयनांची ही निरांजने,
आता लागली रे विझू,–||१||
वाट तुझी पहावी किती,
भासते तुझीच कमी,
मलमलीची गादीही,
टोचू लागली अंतर्यामी,–||२||
भोवताली सारी सुखे,
एक विरह त्यांना मारे,
आजुबाजूस सगळे,
इहलोकीचे पसारे,–||३||
असा कुठे गेलास तू ,
परतण्याची वाट नाही,
आभाळ तारे वारे,
दशदिशा झाल्या स्तब्धही,–||४||
चातकाची अवस्था माझी,
चंद्रम्यास आम्ही तरसतो,
मी असे काय वेगळी,
तुझा विरह मला छळतो,–||५||
तू तर सर्वस्व माझे,
दूर माझ्यापासून रे,
तुझ्यावाचून पुरी दुनिया,
वाटते मज शून्य रे,–||६||
आयुष्य माझे असूनही,
तुझे ते किती झाले,
जरा दुरावा येता थोडा,
माझी न मी राहिले,–||७||
पार ज्याच्या सूर्य जातो,
अशा त्या रम्य क्षितिजी,
हळूहळू अंधार येई,
रात्र उगवे उजेडामाजि,–! ||८||
विरहाच्या अंधारात,
बुडालेली सर्वस्वी मी,
सूर्यराजा सोडून गेला,
किती कासावीस धरणी,–||९||
एक तुझ्या स्पर्शे रविकरा,
ती बघ रे ,- धन्य होई,
तन-मन चमकून उठे,
धरती प्रकाशमानी होई,–||१०||
चांदण्याही आता बघा,
आभाळी उगवू लागल्या,
चंद्रसाजणाची वाट पाहत,
कशा लाज लाजून गेल्या,–||११||
चांदण्याचा जथा ठेवून मागे,
चंद्रमा निघे पुढे पुढे,
सर्व पुरुष कसे सारखे,
नेहमीच मज पडते कोडे,–||१२||
दिनमणी उगवला तरी,
तू मात्र दूरस्थ,
मी दिशाहीन झाले,
राहू कशी संन्यस्त,–! ||१३||
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply