दिनदयाळू अतिव कृपाळू हे श्रीगणराया
होउन कनवाळू, बालावर ठेव छत्रछाया ।।
आत्मतुष्ट मी, नीतिभ्रष्ट मी, अति मी गर्विष्ठ
स्वार्थपूर्ति मोहिनी चेटकिण, करते आकृष्ट
यत्न न केले परमार्थाच्या मर्मा जाणाया ।।
कळत-नकळतां पळत राहिलो मृगजळ पाहुन मी
हात रिक्त, विषयासक्ती झाली ना परी कमी
उशीर झाल्यावर उमगे – जीवन गेले वाया ।।
पश्चात्तापीं दग्ध भग्न मी, चूर्ण पूर्ण आशा
उदारतेच्या उदधि, दया कर मजवर तत्पुरुषा
वरदस्पर्श तव होतां, चंदन बनेल मम काया ।।
सिद्धिगणेशा, तुझिया सन्निध जीवन यापुढती
हे दंती, तव प्राप्तीनें झाली तृप्ती पुरती
कृपाप्रसादानंतर कांहिंच उरे न मागाया ।।
– – –
– सुभाष स. नाईक
Leave a Reply