दिनमित्र म्हणजे तेजस्वी असा सूर्य आणि दीनमित्र म्हणजे दीन दुबळ्या गरिबांचा मसीहा . माझे आईचे वडील म्हणजे आमच्या ति. नानांनी माझ्या दोन नंबर मामाचे नाव दिनमित्र ठेवले होते, त्याचे नाव ठेवताना नानांना आपला मुलगा तेजस्वी होण्यासह दीन दुबळ्यांच्या मसीहा सुद्धा होईल याचा साक्षात्कार कदाचित तेव्हाच झाला असावा.
आमचा भाऊ मामा खरोखरच एवढा तेजस्वी आहे की एकदा त्याची एखाद्याशी गाठ पडली की त्या समोरच्या व्यक्तीवर मामाची छाप पडलीच पाहिजे. भाऊ मामा समोरच्याला पहिल्याच भेटीत लगेचच आपलेसे करून घेतो.
आमचे नाना नानी दोघेही ज़िल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक असूनही तेव्हाच्या पगाराच्या मानाने आई, मावशी आणि तीन मामा अशा पाच भावंडाना पोटभर खायला मिळायचे आणि वर्षभरात एखाद दुसरा कपडा मिळायचा. शाळेत जायला चपला नसायचे की अंगात घालायला नवीन कपडे नसायचे. अशाही परिस्थितीत सगळ्यांनी शिक्षण घेतले. भाऊ मामा एकोणीसशे सत्तर च्या दशकात BAMS डॉक्टर झाला आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रॅक्टिस करू लागला. अंबा नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या जांभुळपाडा या त्यावेळच्या अतिदुर्गम व आदिवासी भागात त्याची प्रॅक्टिस सुरु असताना त्याने गोर गरीब लोकांची एवढी मनापासून सेवा केली की त्या लोकांच्या आग्रहाखातर मागील चाळीस वर्षे आठवड्यातल्या प्रत्येक रविवारी न चुकता जांभूळपाड्याला पेशंट बघायला आता वयाची पासष्टी उलटली तरीही जातोय. त्याचे पेशंट पण असे आहेत की सोमवारी ताप आला तरी रविवार उजाडेपर्यंत थांबतात आणि त्यांच्या माने डॉक्टरकडूनच उपचार करून घेतात. BAMS होऊन वैद्यकीय अधिकारी बनून सुद्धा मामाला चैन पडत नव्हती, शेवटी त्याने MBBS ला ऍडमिशन मिळवली आणि MBBS पूर्ण केले.
1970 च्या दशकात MBBS डॉक्टर होणे ही खूप मोठी गोष्ट होती. डॉक्टरकीच्या दोन डिग्र्या घेऊनसुद्धा त्याला अजून काहीतरी वेगळं करायचे होते. सर्जन किंवा एम डी होण्यापेक्षा त्याने अनेस्थेटिस्ट म्हणजे भूलतज्ञ व्हायचा निर्णय घेतला आणि झालासुद्धा. DA,MBBS,BAMS अशा तीन तीन डिग्र्या मामाने मिळवल्या. मामाने अलिबाग किंवा मुंबई सारख्या शहरात सेटल होण्याऐवजी थंड हवेचे आणि निसर्गातल्या कुशीतले लोणावळा हे त्यावेळेचे लहानसे शहर निवडले. त्यावेळेस अनेस्थेटिस्ट डॉक्टर्सची संख्या कमी असल्याने आणि मामाचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुभव या सर्वांमुळे मामा लवकरच एक प्रसिद्ध अनेस्थेटिस्ट आणि लोकप्रिय डॉक्टर बनला. अचूक रोग निदान करण्यात मामाचा हात कोणताही डॉक्टर धरू शकत नाही कारण तळागाळातील गरीब आणि आदिवासी पेशंट पासून ते शहरातल्या मोठ्या व्यक्तींवर त्याने प्रॅक्टिस केली. आरोग्य अधिकारी असताना मृतदेहाचे पोस्ट मार्टेम करणे यांचा अनुभव तर त्याच्यासाठी खूपच वेगळा असायचा.
भाऊ मामा म्हणजे सगळ्या बच्चे कंपनीचा लाडका, लहान असताना आम्हा लहान भाचे कंपनीसह इतर सगळ्या लहान बच्चे कंपनीला खोड्या काढून सतावणारा, मोठा डॉक्टर असूनही आम्हा बच्चे कंपनी मध्ये आमच्याच वयाचा असल्याप्रमाणे खेळणारा. कुठल्या भाच्याला टपली मार तर एखाद्या भाच्याला रडू येईपर्यंत चिडवून चिडवून टेर खेचणार.
स्वभाव एवढा मिस्कील की एखाद्या कार्यक्रमात वगैरे गेला आणि तिथं लहान मुलं दिसली की त्यांच्याशी यंड माडताराले , इकडं पो वगैरे तेलगू कानडी असे काहीबाही न समजणारे शब्दात बोलून त्यांना हैराण करणार. हात मिळवण्यासाठी पुढे करणार आणि त्या लहान मुलाने हात पुढे केला की हा स्वतःचा हात मागे करणार किंवा इकडे तिकडे करून त्या लहान मुलांचा पोपट करणार. भाऊ मामा जिथं जिथं जाईल तिथंली बच्चे कंपनी त्याचे फॅन्स होऊन जातात.
आईच्या माहेरी मांडव्याला फार पूर्वीपासून माघी गणपती असतो. हल्ली हल्ली तर गावोगावीच काय पण घरोघरी माघी गणपती आणले जातात. पण आम्ही कॉलेजला जाईपर्यंत मामाकडचा मांडव्याचा माघी गणपती म्हणजे संपूर्ण अलिबाग प्रसिद्ध कारण मामाचे घर अलिबाग रेवस रस्त्यावर असल्याने जाणारे येणारे थांबून दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नसत. एस टी बस मधून सुद्धा लोकं हात जोडून गणपतीचे देवाला नमस्कार करायचे. मांडव्याला गणपतीत मामा सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना जमा करतो. जेवणाच्या पंगतीत स्वतः वाढायला घेतो आणि प्रत्येकाला जबदस्तीने पोट भरलेले असतं तरीही पानावर पदार्थ वाढतो आणि असा काही आग्रह करतो की त्याला खायला लावतोच.
मामा ज्या परिस्थितीत डॉक्टर झाला त्याची जाणीव त्याला अजूनही आहे त्यामुळेच त्याने कधीही तो मोठा डॉक्टर असल्याचा मोठेपणा मिरवला नाही की गर्व केला नाही. आता मर्सिडीझ मध्ये फिरतो पण कपडे लत्ते आणि राहणीमान अजूनही एकदम साधे आणि साजिरे. प्रॅक्टिस करत असताना त्याने जागा जमिनी मध्ये अशाप्रकारे गुंतवणूक केली की त्याने मर्सिडीझ सुद्धा घेतली. मांडव्याला समुद्रकिनारी बालपण घालवलेल्या मामाला समुद्र आणि वेगाचे खूप आकर्षण म्हणूनच त्याने स्वतःची स्पीड बोट सुद्धा विकत घेतली जी गेट ऑफ इंडिया हुन मांडव्याला अवघ्या आठ मिनिटात समुद्राला प्रचंड वेगाने कापत पोहचते. मांडव्याला आला की अजूनही हाफ पॅन्ट किंवा बर्मुडा घालून फिरणार. एकदा मांडव्याला शेवग्याच्या झाडावरून भरून शेंगा पाडल्या होत्या मामा आणि आम्ही बच्चे कंपनी सगळे एकत्र शेंगा पाडणे आणि गोळा करणे असं चाललं होतं, तेवढ्यात घरातल्या मोठ्यांमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि वातावरण गंभीर बनले. मामाला काय सुचलं आणि त्याने दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि त्याचे स्वतःचे पोट पुढं काढून ताशा वाजवतात तसे दोन शेंगांनी पोटावर वाजवत तोंडाने टक्का टक्कर टक्का टक्कर करायला लागला. त्याचा तो अवतार बघून गंभीर झालेल्या सगळ्या चेहऱ्यांना पोट धरून हसायची वेळ आणली होती त्याने.
मांडव्याला गेल्यावर समुद्रावर जाऊन लांब जाळे असलेला पेरा ओढून त्यातली ताजी मासळी असो की थंडीत लावली जाणारी वालाच्या शेंगांची पोपटी, मामा असला की हे प्रोग्राम ठरलेले . मामाला नुसती पिन मारायची खोटी की मामा आपण हे आणूया की करूया, की मामा लगेच तयार. शेतावर जेवण बनवणे असो की आंब्याच्या सिझन मध्ये आंबे पाडायला जाणे, मामा प्रत्येक लहान मोठ्या क्षणांचा सोहळाच करून टाकायचा.
मामाची सगळ्यात जास्त माया ही त्याच्या बहिणींवर त्यातही मावशी थोडी कडक आणि मोठी असल्याने त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या आईचे त्याला खूप लाड करता आले. माझ्या आईला तिच्या लग्नापूर्वी मामाने बुलेट चालवायला शिकवली एकोणीसशे ऐंशीचे दशक सुरु होण्यापूर्वी मामाने बुलेट घेतली होती आणि ती माझ्या आईला सुद्धा चालवायला शिकवली होती हे ऐकलं की कोणालाच खरे नाही वाटत.
लोणावळ्यात सुरवातीला भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या मामाने नंतर लोणावळ्यात प्लॉट विकत घेऊन बंगला बांधला. आमच्या नातेवाईकांत कोणाचाच असा बंगला नव्हता नंतर मामाने बंगल्याच्या तळमजल्यावर छोटेसे हॉस्पिटल बनवले. हॉस्पिटल झाल्यापासून मामाकडे नेहमीच कोणी ना कोणी नातेवाईक ऑपेरेशन साठी जायला लागले कारण कोणतेही जवळचे नातेवाईक मामाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही ऑपरेशन करत नसत. मामाने एखाद्याला ऑपेरेशन करण्याचा सल्ला दिला तर त्याचे ऑपेरेशन तो स्वतःच त्याच्या ओळखीतल्या डॉक्टर्सना बोलावून करवून घेत असतो. आमची मामी पण पेशंट सह त्या नातेवाईकांची राहण्याची व खाण्याची सोय बंगल्यातच करून देते. मांडाव्यातले कोळी लोकांचा मामावर खूपच जीव कारण मामा त्यांना डॉक्टर म्हणूनच नाही तर बोटी आणि जाळे खरेदी करायला सढळ हस्ते आर्थिक मदत सुद्धा करतो. मामा मांडव्याला आला किंवा ते लोणावळ्याला गेले की मोठी आणि ताजी मासळीची भेट आलीच पाहिजे.
मामाकडे आम्ही बच्चे कंपनी जाऊन राहायला कारण आमची मामी कारण तिलाही सगळी बच्चे कंपनी गेल्यावर आनंद व्हायचा. तरीपण मामाकडे लोणावळ्याला जाऊन राहण्यापेक्षा मामा मांडव्याला आला की जास्त मजा येते.
सगळ्या नातेवाईकांना जीव लावणारा आमच्या मामाचा सगळ्यात जास्त जीव हा आमच्या नानींवर होता. नानींना किडनी स्टोन, डायबेटीस असे एक ना अनेक आजार होते. मामा आठवड्यातून एकदा तरी नानींना बघायला लोणावळ्याहून यायचा. लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखा खेळणारा आमचा भाऊ मामा जेव्हा नानी वारल्या तेव्हा एखाद्या लहान मुलासारखाच रडला. नानींचे वय झाले होते अनेक आजार सुद्धा होते, त्यांच्या जाण्याने प्रत्येकाला खूप दुःख झाले होते पण त्याहीपेक्षा जास्त दुःख भाऊ मामाचा आक्रोश बघून झाला. नानी सिरीयस आहेत हे समजल्यावर भाऊ मामा लोणावळ्याहून मांडव्याला आला आणि घराबाहेर जमलेली गर्दी बघून गाडीतून जो धावत आला आणि नानींना बिलगून जो रडायला लागला तो काही केल्या शांत होईना. स्वतःची आई सोडून गेली हे त्याला पटतच नव्हतं, मी डॉक्टर असूनसुद्धा आईला वाचवू शकलो नाही म्हणून एकसारखा टाहो फोडत होता. जरा शांत झाला असं वाटत असताना मध्येच छाती बडवून जोर जोरात ओरडायचा आई तू का गेलीस सोडून मला. मामाचा दुःखावेग, रडणे आणि डोळ्यातले अश्रु कोणालाच थांबवता येत नव्हते. मामाने डॉक्टर म्हणून कितीतरी जन्म आणि मृत्यू बघितले असतील पण स्वतःच्या आईचा वृद्धापकाळाने आणि दीर्घ आजाराने झालेला मृत्यू त्याला मान्य होत नव्हता. नानींचे अंतिमसंस्कार झाल्यावर तेरावे होईपर्यंत मामा रोज नानींची आठवणीने हमसूम हमसून रडायचा.
एखाद्या सिरीयल मध्ये भाऊ बहिणीचा भावुक प्रसंग असला की आमचा भाऊ मामा रडायला लागतो आणि रडता रडता आईला आणि मावशीला फोन करतो. मावशीच्या हातचे जेवण त्याला एवढे आवडते की जेवणाची वेळ निघून गेली तरी मावशीला तो येणार आहे म्हणून कळवतो आणि जेवण बनवून ठेवायला सांगतो, मग मावशीने काहीही बनवू दे तो तिच्यासमोर मुद्दामून बोटं चाखून चाखून खाणार. सगळ्यांना एका क्षणात आपलंसं करणारा, जीव लावणाऱ्या भाऊ मामा सारखा प्रेमळ आणि भावनाप्रधान कोणीच नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर ,
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply