नवीन लेखन...

दिशा – पालकत्वाची

रोहन हॉल मध्ये घेऊन जायच्या सामानासाठी धावपळ करत होता. आणि त्याचे आईबाबा त्याला त्यांच्या परीने मदत करत होते. पण कुणीही इतर आजूबाजूचे त्याच्या मदतीला येत नव्हते. खरंतर रोहनला कुणाकडूनच कशाचीच अपेक्षा नव्हती. कारण आता त्याला या सगळ्याची सवय झाली होती.

श्री. रोहन दिलीप भातखंडे, राहणार पुणे वय ४० वर्ष. उत्तमरीत्या नोकरीत स्थिरावलेला, धाडसी व्यक्तिमत्व असलेला, स्वतःचं पुण्यात २ बेडरूमचं घर असलेला हुशार, समंजस मुलगा. त्याचे आईबाबा सोलापूरचे. परवाच ते पुण्याला आले होते समारंभासाठी. सगळी घरची परिस्थिती उत्तम. एवढं सगळं चांगलं असूनही रोहनचं कित्येक वर्ष लग्न ठरत नव्हतं. काहीही कारणं देऊन “यंदा कर्तव्य नाही” असे मुलींचे पालक अगदी सर्रास सांगत होते.

तसं पाहिलं तर रोहनला लहान मुलांची खूप आवड. “त्याच्या धाकट्या भावालाही त्याने अगदी प्रेमाने वाढवलं. मला सांभाळण्यासाठी काही वेगळं करायला लागलंच नाही!” असं त्याची आई सगळ्यांना अगदी आनंदाने सांगते. पण रोहनचं लग्नंच झालं नाही तर मग मुलं तर दूरच! धाकटा भाऊ मात्र आताशा लग्न करून अमेरिकेत स्थिरावला होता. त्यामुळे रोहनची आईला सदोदित चिंता भेडसावत रहायची. त्यावर तो आईला नेहमी म्हणायचा, “लग्न काय मुलं जन्माला घालायची म्हणूनच करतात का? सहचारी हवी म्हणून करतात. लग्न होईल तेव्हा होईल तू काळजी नको करू. पण असं करता करता ३२-३४ वय झाल्यावर मात्र त्याने ठरवलं आणि एक धाडसी निर्णय घेतला. तो इतका धाडसी वाटला सगळ्यांना की त्याच्या भावाने त्याच्याशी बोलणंच टाकलं आणि आईवडिलांनी पण त्याच्याशी काही काळ बोलणं कमी केलं. त्याला खूप वाईट वाटलं पण त्याने निर्णय बदलला नाही. त्याने तो खूप विचारांती घेतलेला निर्णय होता. त्याने एक मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. आईबाबांना सांगितलं तेव्हा रोहनचे बाबा काहीच बोलले नाहीत. पण आई मात्र बोलली, “अहो तुम्ही काहीच बोलणार नाही नेहमीप्रमाणे माहितेय मला. पण मी शांत नाही राहू शकत. अरे रोहन, काय हे खूळ तुझं? तू एकटा कसा सांभाळणार त्या मुलाला? प्रत्येक बाळाला आईची आणि बाबाची दोघांची गरज असते. तू आईचं प्रेम कसं देऊ शकणार आहेस. आणि लग्न ठरेल की तुझं. इतकं ही वय सरलं नाहीये तुझं. तेव्हा काय सांगशील? तुझा हा निर्णय तू बदल असं आम्हाला वाटतं.” त्यावर रोहन ने आईबाबांना अगदी जवळ बसवलं. आणि त्याने सांगायला सुरुवात केली, “आईबाबा, मला तुमचं म्हणणं अजिबातच पटत नाहीये असं नाही. पण माझ्या लग्नासाठी आपण कमी का प्रयत्न केले. आता ते नाही होत त्याला काय करणार. आणि मला त्याबद्दल काहीच वाटत नाही असं नाहीये. पण म्हणून तेवढंच डोक्यात ठेवून मी माझं आयुष्य वाया कशाला घालवू. त्यापेक्षा माझ्या आणि त्या बाळाच्या आयुष्यातली हीच तर लाखमोलाची वर्ष आहेत जेव्हा आम्ही दोघेही पूर्णपणे एकमेकांचे होऊ शकतो. आणि आईच्या सहभागाचं म्हणत असशील तर तो विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. आई तू मला सांग आम्हाला लहानपणापासून काय हवं काय नको तूच बघितलं ना? बाबा तर कायम फिरतीवर असायचे. तू नोकरी करून आम्हाला दोघांना वाढवलं आमचं अगदी सगळं मनापासून केलं. मग मी ही करेन. फरक इतकाच असेल की तू आई म्हणून केलं मी बाप म्हणून करेन. अगं तू हा विचार कर ना की माझ्यामुळे एका अनाथालयात वाढणाऱ्या बाळाला चांगलं आयुष्य मिळेल. नवी दिशा मिळेल. जे माझं नाव लावेल.. मला बाबा म्हणेल. जे शिकेल, सवरेल. ज्याचं सगळं मी अगदी मनापासून करेन.. माझ्याही आयुष्याला अर्थ मिळेल, नवीन उद्दिष्टं मिळेल. आणि असंही दुसऱ्या बाजूने विचार करा तुम्ही! जर माझं लग्न होऊन मुलं झाल्यावर, मला किंवा माझ्या बायकोला काही विपरीत झालं असतं आणि एकच राहिलं अशी वेळ आली असती तर त्या एकाने मुलांचा सांभाळ केलाच असता ना? मग मी फक्त सरळ घास न खाता डोक्यामागून हात घालून खातोय असं समजा. पटतंय का तुम्हाला? ” त्यावर रोहनचे आईबाबा गप्पच झाले. रोहनच्या विचारात तथ्य होतं पण तरी सगळे प्रश्न तसेच होते त्यांच्या सुप्त मनात. म्हणतात न कळतं पण वळत नाही. तसं झालेलं त्यांचं. तरीही रोहन ने ऐकलं नाही. त्याने दत्तक मूल घ्यायची प्रक्रिया चालू केली. कारण त्याला माहीत होतं ‘एकल पालकत्व’ द्यायच्या प्रक्रियेला थोडा उशीरच होणार. सगळी कल्पना सत्यात उतरायला तब्बल पाच वर्ष लागली. आणि उद्याच्या अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्याच बाळाचं बारसं होत. कारण रोहन ने स्वतःचं वय बघता बाळ नव्हे, तर १० वर्षांची एक छानशी मुलगी घेतली होती. मुलगी सावळी होती, नाकिडोळी नीटस होती, लाघवी आणि गोंडस होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला संपूर्ण परिस्थितीची जाणीव होती. मुलगी काहीच महिन्यांपूर्वी वयात आली होती त्यामुळे तर अजूनच तिची नाजुक कळी खुलली होती. आणि मोठी होणं म्हणजे काय हे तिला चांगलंच माहीत झालं होतं. तसं झालं नसतं तरी रोहनने या सगळ्याची तयारी करून ठेवली होती. तो मनाने केव्हाच बाप झाला होता. आता तर फक्त सोपस्कार उरकले इतकंच!

हॉल मध्ये मोजकीच जवळची माणसं आणि अनाथालयातील मुली, मुलं असे मोजून ५० जण होते. रोहन चे आईबाबा पण खूप आनंदात होते. आणि अखेर रोहनने आपल्या लेकीचं नाव “दिशा” ठेवलं. रोहन ने खूप छान नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं. थोड्या वेळाने गेल्या पाच सहा वर्षात, या निर्णयात कधीही न बोलणारे रोहनचे बाबा, याप्रसंगी मात्र दोन शब्द बोलायला उठले.. रोहन त्यांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होता. कारण आजपर्यंत ते कधीच याविषयी चांगलं किंवा वाईट काहीच बोलले नव्हते. रोहनचे बाबा म्हणाले, “आज मला थोडंसं बोलायचं आहे. आम्हाला रोहनने जेव्हा त्याच्या या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा आमच्या विशेषतः, माझ्या पायाखालची जमीन सरकली. खोटं कशाला बोलू मला त्याचा रागही आला. याला काय जमणार. मूल सांभाळणं म्हणजे खाऊ खाण्याएवढं सोप्पं नाही. साधी दत्तक घेण्याची भली मोठी प्रक्रिया बघूनच हा आपला विचार बदलेल असं वाटलं होतं. पण दुसऱ्या बाजूने एक मन सांगत होतं की आपला मुलगा वेगळा आहे. तो पहिल्यापासूनच विचारी आणि साहसी आहे. जे निवडेल ते करूनच दाखवतो. आणि आज मी मनापासून सांगतो मला रोहनचा खूप अभिमान आहे. लोकांना काहीही बोलुदेत पण असा निर्णय घेणं आणि तो रेटून धरणं ही साधी गोष्ट नाही. पण रोह्या, तू उचललेलं हे शिवधनुष्य सोप्पं नाही. तुला आई आणि बाबा दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीने पेलायच्या आहेत. आम्ही दोघे आहोत कायमच तुझ्या पाठीशी आणि मदतीला. पण एक लक्षात ठेव आई म्हणजे देवी.. तिच्यामध्ये असलेली असंख्य रूपं तुला वेळेवेळेने घ्यावी लागतील. आई आंबाबाई तुला खूप बरकत देवो. तू एक सुजाण पालक होवो आणि आमच्या नातीला आई आणि बाबा दोघांचं प्रेम तुझ्या रूपाने मिळत राहो हीच आमची सदिच्छा आणि श्रीरामाचरणी प्रार्थना. आणि बरं का लोकहो, या अनोख्या निर्णयाने दोघांच्याही आयुष्याला एक वेगळी दिशा मिळणार आहे म्हणून हे माझ्या नातीचं खास नाव आज मी जाहीरपणे सांगतो…. “कुमारी. दिशा रोहन भातखंडे.” आणि हो रोह्या तुझ्याशी लग्न करायला तयार असलेली एकतरी मुलगी नक्की असेल आणि ती लवकर मिळो.” असं म्हणून डोळ्यात पाणी आणत रोहनच्या बाबांनी रोहन आणि दिशाला कडकडून मिठी मारली. आज रोहनला खऱ्या अर्थाने आपला बाबा बापमाणुस असल्याचा अनुभव आणि बाप व्हायच्या जबाबदारीची जाणीव दोन्ही एकदम वाटत होतं आणि दोन्ही मध्ये नक्की काय मोठं हेच निवडणं त्याला कर्मकठीण जात होतं.

-सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

ll शुभम् भवतु ll

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..