कुमार सोहोनी उर्फ नरेंद्रकुमार नरहर सोहनी यांचा जन्म ३१ मार्च १९५५ रोजी ठाणे येथे झाला.
कुमार सोहोनी उर्फ नरेंद्रकुमार नरहर सोहनी हे नाट्यक्षेत्रातलं फार मोठं नाव पण त्यांच्या प्रसिद्धीझोतात न राहण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या नावाभोवती ते वलय फारसं नाही. कुमार सोहोनी यांच्या आई शोभना सोहनी या संगीत विशारद होत्या. त्यामुळे ते गायक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे कुमार सोहोनी हे लहानपणी गाणं शिकायला लागले. आई आणि वडील दोघेही राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून काम करायचे. नाटकात कामही करायचे. त्यांच्याबरोबर कुमार सोहोनी ही काम करायला लागले. लीलाधर हेगडे, निळू फुले, दादा कोंडके, राम नगरकर, वसंत बापट यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर ते संपर्कात आले. त्या मुले त्यांचा रंगमंचावरचा सहज वावर होऊ लागला आणि कदाचित तेव्हाच या क्षेत्रात काम करणार हे निश्चित झालं.
कुमार सोहनी यांचे शालेय शिक्षण ठाणे येथेच झाले. ठाणे कॉलेजमध्ये असताना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत भाग घ्यायचा आणि अंतिम फेरीमध्ये प्रथम पारितोषिक मिळवायचे हे सगळ्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या ठाण्यातल्या मित्रांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करायचं ठरवलं आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पैसे हवे म्हणून दादा कोंडके यांचा ‘मुंबईची लावणी’ हा कार्यक्रम करायचं ठरवलं. ४ मे १९७३ रोजी दिग्दर्शक म्हणून अशी कुमार सोहोनी यांची पहिली सुरुवात झाली, त्याच दिवशी ‘कला सरगम’ ठाणे या हौशी नाट्य संस्थेची स्थापना झाली.
कॉलेज शिक्षण संपवून सिव्हिल ड्राफ्ट्समनची नोकरी करत असताना त्यांनी १९७५ मध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय केलं. काही हजार मुलांपैकी फक्त २ मुलांना शिष्यवृत्ती मिळणार होती. कुमार सोहोनी यांना तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली व नाट्यदिग्दर्शन व स्टेज क्राफ्ट यांच्या प्रशिक्षणासाठी ते दाखल झाले. १९७८ मध्ये तेथील शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म आणि टेलीव्हिजनचा सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
कुमार सोहोनी हे अभिनेत्री सुहास जोशी यांना गुरुस्थानी मानतात. कुमार सोहोनी यांचे पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. ‘अग्निपंख’ हे नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसर्याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले. त्यासाठी त्यांनी ‘तेजाब’ या चित्रपटामध्ये एन. चंद्रा यांचे साहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे ‘एक रात्र मंतरलेली’ हा गूढ कथानक असलेला मराठी चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला. ते साल होते १९९०. पुढच्याच वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘आहुती’ हा चित्रपट चांगलाच गाजला. कुमार सोहनींनी २०१२ पर्यंत ‘बजरंगाची कमाल’, ‘पैसा पैसा पैसा’, ‘लपून छपून’, ‘जिगर’, ‘रेशीमगाठी’, ‘छडी लागे छमछम’, ‘निरुत्तर’, इ. सतरा चित्रपट दिग्दर्शित केले.
त्यांनी दूरदर्शनसाठी ‘कालचक्र’, ‘हिसाब’, ‘पती, पत्नी और वो’ यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन केले. तसेच त्यांनी मराठी मालिकांचेही दिग्दर्शन केलेले आहे. त्यामध्ये ‘संस्कार’, ‘किमयागार’, ‘मना घडवी संस्कार’ यांसारख्या मालिकांचा समावेश होता.
कुमार सोहनी यांना दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. दिग्दर्शन या विषयावर ‘चौकट दिग्दर्शनाची’ हे पुस्तक कुमार सोहोनी यांनी लिहिलं आहे. या क्षेत्रात येऊ बघणाऱ्या सगळ्यांनीच आवर्जून हे पुस्तक वाचायला हवं.
कुमार सोहनी यांनी आजवर नाटक, चित्रपट, मालिका धरून शंभर हून अधिक कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply