लोकसत्ता मधील नितीन देसाई यांच्या वरील लेख.
‘‘गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत मनालीला पोचलो. भल्या पहाटे माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. गुलजारजी आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्याखोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ साठलेलं दिसत होतं. पूर्वेस पहाटरंगाची मस्त उधळण होत होती. गुलजारजी म्हणाले, ‘‘नितीन, मुझे ऐसा दृश्य चाहिये।’’ त्यांच्या अपेक्षेनुसार सेट करायचा प्रयत्न मी चित्रनगरीत केला. ते आले, सेट पाहिला, काहीही न बोलता त्यांनी मला हलकेच मिठी मारली. म्हणाले, ‘‘तुम्हारे सेट को हर अँगलसे जस्टिफाय करने की कोशीश करुंगा।..’’
‘पानी पानी रे’ हे गाणं आठवून पाहा, त्यांनी आपला शब्द सत्यात उतरवला..’’ सांगताहेत भूत, वर्तमान आणि भविष्यकाळालाही साकार करणारे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई.
पुणे-मुंबई जुन्या हायवेवरून माझी गाडी ९० अंशाचं वळण घेऊन कर्जतच्या दिशेने डावीकडे वळते. अर्धा किलोमीटर आत गेल्यावर एक भव्य दरवाजा सामोरा येतो..
त्या भारदस्त दरवाजावर पाटी असते – एन्. डी. स्टुडिओ!
मी गाडीतून खाली उतरतो, त्या दरवाजाला स्पर्श करतो, खाली वाकून मातीला नमस्कार करतो.
अंगांग थरारतं माझं!
डोळ्यांसमोर उभी राहतात मागची ४०-४५ वष्रे!
वरळीची ती बी.डी.डी. चाळ, मुलुंडसारख्या उपनगरातली ती वस्ती, माझी वामनराव मोरारजी शाळा, शाळेतल्या चित्रकला स्पर्धा, नंतरचं जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला आणि तेथून रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये जाणं, वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वत:ची कलर लॅब काढणं आणि नितीश रॉय यांच्या ‘तमस’च्या सेटवरचा तो पहिला दिवस.. आणि आज ५० एकरांवर उभा असलेला आमचा भव्य एन. डी. स्टुडिओ!
..सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. त्यावेळी वाटतं, हे माझं काहीच नाही. कोणीतरी अज्ञातातून हाकारत-पुकारत, आंजारत-गोंजारत तर कधी फटकारे मारत माझ्याकडून हे सारं करवून घेत आहे. माझी त्या अज्ञात शक्तीवर अतूट श्रद्धा आहे, जिनं माझी निवड केली ह्य़ा कला क्षेत्रासाठी. त्या अनाहत नादाचा मी ऋणी आहे, जो मला सतत हाकारत असतो.
एका विशिष्ट दिशेने नेत असतो- सर्जनशीलतेच्या! हा प्रवास सतत सुरूच आहे, जेव्हापासून मला जाणीव झाली की तुझा जन्म रंगांसाठीच आहे. त्या रंगांच्या शोधात मी इथवर आलो. प्रत्येक टप्प्यावर मला जाणवत आलं की हे रंग आपलं जगणं उजळवून टाकतात, इंद्रधनुषी करतात. या रंगांच्या उधळणीवर आपलं नियंत्रण हवं नाही तर ते आपल्याला फरफटवत नेतात. या रंगांवर नियंत्रण आलं की मग मात्र ते त्या ठरावीक चौकटीत धुंद करतात, नवसर्जन देतात. या महाराष्ट्राच्या मातीचा तांबडा रंग, सह्य़ाद्रीचे काळेकभिन्न फत्तर, झाडा-झुडपांचे हिरवेगार रंग, विठोबा-रखुमाईचा गजर करत भगव्या पताका नाचवणारे वारकरी, निळंभोर आकाश या साऱ्याविषयी मी कृतज्ञ आहे. ही कृतज्ञताच मला इथवर घेऊन आली आहे. नाही तर वरळीच्या साध्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मी सव्वाशे चित्रपट, शेकडो जाहिराती, काही मालिकांची चित्रपटांची निर्मिती आणि बरंच काही अवघ्या २५ वर्षात कसा करू शकलो असतो?
माझी मुलुंडची शाळा वामनराव मोरारजी. पहिल्याच दिवशी शाळेत जोशीबाईंनी कविता शिकवली तो दिवस आठवतोय- टप टप पडती अंगावरती, प्राजक्ताची फुले! बागेत न जाताही केशरी देठाच्या नाजूक चणीच्या पांढऱ्याशुभ्र फुलांनी माझ्या मनावर मोहिनी घातली. शब्दांनी मनात रंगांची उधळण केल्याचा तो अनुभव मला लख्ख आठवतोय! नंतरचा तास चित्रकलेचा होता. चित्रकलेच्या शिक्षकांनी कोणतेही आकार काढायला सांगितले होते. मी काय काढलं ते मला आठवत नाही, पण शिरोडकरसरांना त्यातील रेषांमागील फोर्स जाणवला असावा. सरांनी माझ्याकडून मग भरपूर मेहनत करून घेतली.
कॅम्लिनच्या प्रत्येक स्पध्रेला बसायचो, बक्षिसं मिळवायचो. माझी रंगांबद्दलची ओढ वाढत गेली. त्यात आम्ही मुळातले कोकणातले, पाचवल्याचे. प्रत्येक सुट्टीत पहिल्या दिवशी पाचवल्याला जायचं. वाटेत कोकणातल्या घाटाचं सौंदर्य अधाशासारखं पाहत बसायचं. आजचं कोकण बदलतंय, उद्यमशील बनतंय, पण मनातलं कोकण तसंच आहे! आम्ही मुलं वेगवेगळे खेळ खेळायचो. त्यात राम-रावण युद्ध, शिवाजी महाराज आणि मोगल युद्ध हे आवडते. त्यासाठी हत्यारं लागायची. ती मी झटपट तयार करायचो. धनुष्य-बाण, तलवारी, मुकुट वगरे सारे! तिथल्याच झाडांच्या फांद्यांमधून मला आकार गवसायचे. आमच्या सिनेजगतात सर्व गोष्टी वेगात कराव्या लागतात, त्याची बीजं कदाचित तिथं असावीत.
मी दहावीची परीक्षा पास झाल्यावर आई-बाबांसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जाण्याचा बेत सांगितला. वेगळी पायवाट चोखाळण्याचं शिक्षण त्यांनीच दिलं होतं. मी जे. जे.ला जाऊ लागलो. पण नंतर मी रहेजामध्ये प्रवेश घेतला, कारण मला रेल्वेप्रवास आवडत नाही. रहेजाला जायला बस होती. पण दोन्हीकडे माझ्यावर उत्तम शिक्षकांचा प्रभाव पडला. प्रभाकर कोलते आणि टिकेकरसरांचा प्रभाव जास्त होता. कोलतेसरांनी एक प्रकल्प दिला होता- ‘६४ ब्लॉक्समधल्या ५२ ब्लॉक्सचा वापर करून सर्व ब्लॉक्स भरले गेले आहेत असा आभास निर्माण करणारे चित्र तयार करणे’; आजही तो प्रकल्प कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मला उपयोगी पडतो. उपलब्ध सामग्रीतून सर्व काही निर्माण करता आलंच पाहिजे, याचा तो धडा होता. कोलतेसर कॅनव्हासच्या प्रतलावर ज्या प्रकारे रंगांची उधळण करतात, ती पाहणे, अभ्यासणे मनोज्ञ असते.
रहेजामधलं शिक्षण संपताच काय करायचं हा प्रश्न नव्हताच, मी कलर लॅब काढायची ठरवली होती; त्यावेळी माझ्या बाबांनी कर्ज घेण्याचा सल्ला तर दिलाच पण वरती म्हणाले, ‘‘कर्ज जरूर काढ, टाटा-बिर्ला हेही कर्जं काढतात, पण वेळच्या वेळी त्याचे हप्ते भरून त्याची परतफेड कर.’’ वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वत:ची कलर लॅब काढली. झपाटय़ानं जम बसला. मित्र सोबत होतेच. तेवढय़ात माझ्या मामीनं कला दिग्दर्शक नितीश रॉय यांचं एक काम माझ्याकडे दिलं. मी ते किचकट काम वेळेच्या मर्यादेत दिलं. ते खूश झाले. मामीजवळ त्यांनी निरोप पाठवला, ‘‘कला दिग्दर्शनात यायचंय का?’’ मी सहजपणे ‘हो’ म्हणून गेलो. त्या एका होकारात जीवनातले सगळे होकार भरले गेले.
९ मे १९८६ रोजी मी ‘तमस’च्या सेटवर फिल्मसिटीत दाखल झालो आणि आजवर तेथेच आहे.
रॉयसाहेबांनी माझ्या हाती काही रेखाटनं ठेवली आणि मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये हात घातला. नंतरचे सलग १३ दिवस, १३ रात्री मी सेटवर होतो. हे झपाटलेपण माझ्यात पहिल्यापासून आहे. नितीश रॉय, गोिवद निहलानी, श्याम बेनेगल यांच्या सान्निध्यात ही बाब अधोरेखित झाली. बेनेगलसाहेबांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या सेटवर ४८० दिवसांपकी ४७५ दिवस सलग होतो. त्या काळात अवघे पाच दिवस मी घरी गेलो होतो. त्यातील तिसऱ्या खेपेला माझ्या यामाहा मोटारसायकलला अपघात झाला. मला हॉस्पिटलमध्ये सलाईनही लावलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी सेटवर पोचलोही होतो. बेनेगलसाहेब म्हणालेही, ‘‘यार क्या आदमी है तू, चला जा घर और आराम कर ले.’’ पण माझा आराम तो सेटच होता.
कोणताही चित्रपट किंवा मालिका (मग तो चांगला असो की टुकार) हा एक टीम एफर्ट असतो. ती संघभावना असते. तुमच्या हाती आधी स्क्रिप्ट सोपविले जाते. ते वाचून कला दिग्दर्शकाला अभ्यास करून रेखाटनं करावी लागतात. माझी पहिली स्वतंत्र मालिका चाणक्य! ती ऐतिहासिक स्वरूपाची मालिका होती. मी खूप अभ्यास केला. तो करून चर्चात भाग घ्यायचो. कला दिग्दर्शकाला त्याने तयार केलेली रेखाटनं कॅमेरामन, दिग्दर्शक, कथालेखक, पटकथालेखक, निर्माता या साऱ्यांसमोर सादर करावी लागतात. त्या चच्रेतून मग अंतिम रेखाटनं बनतात, त्यांच्या आधारे सेट उभे राहतात. त्या सेटची रंगसंगती, कलावंतांच्या कपडय़ांची रंगसंगती, पाश्र्वभूमी याचा मेळ बसवावा लागतो. पूर्वी कला दिग्दर्शकाला आपल्या देशात महत्त्व नव्हतं, पण गेल्या २५ वर्षांत कला दिग्दर्शकाचं स्थान महत्त्वाचं मानलं जातंय.
कला दिग्दर्शकाला विशिष्ट कालावधीतला संपूर्ण काळ नेपथ्यातून उभा करावा लागतो. प्राचीन काळातील एखादा किल्ला, एखादे शहर, एखादी बाजारपेठ उभी करावी लागते. आग्रा किल्ला बांधायला ३२ वष्रे लागली होती, पण ‘जोधा अकबर’साठी मला तो उभा करायला फक्त तीन महिने मिळाले होते. रायगडावरची बाजारपेठ उभी करायला आम्हाला पंधरवडा मिळाला होता, पण दोन्ही ठिकाणची विश्वासार्हता आम्ही सांभाळली होती. ते आव्हान असतं. मला आव्हानं स्वीकारायला आवडतात.
‘चाणक्य’च्या वेळी माझ्या आई-बाबांना घेऊन मी सेटवर गेलो होतो. एकेक गोष्ट आईला दाखवत होतो, ‘‘हा राजवाडा, ही बाजारपेठ, हे गुरुकुल..हे करवसुली केंद्र.’’ तिनं विचारलं, ‘‘हे ठीक आहे रे, पण तू नेमकं काय केलंस?’’ मी तिचा हात धरून सेटच्या मागच्या बाजूला गेलो, सारं समजावून सांगितलं. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. दोघांचेही समाधानी चेहरे पाहिले. त्या कृतार्थधारांतच माझं आयुष्य सामावलं गेलंय.
मी स्वतंत्ररीत्या केलेला पहिला चित्रपट म्हणजे अधिकारी ब्रदर्सचा ‘भूकंप’. माझं कला दिग्दर्शक म्हणून नाव झालं ते विधू विनोद चोप्राच्या ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’मुळे. ‘पिरदा’च्या वेळी माझं काम त्याला आवडलं होतं. ‘पिरदा’तली बोट आठवून पाहा, तो सारा सेट होता. मी त्या बोटीच्या भिंतींना असणारे अस्तरही अभ्यास करून दाखवलं होतं, त्याचा वापर दिग्दर्शकाला नीट करून घेता आला होता. विनोदनं मला ‘१९४२..’ चं स्क्रिप्ट दिलं. १९४२च्या पाश्र्वभूमीवरील तो चित्रपट. चंबा ते डलहौसी हा सारा पट्टा आम्ही फिरलो, स्केचेस केली, फोटो काढले. स्क्रिप्ट आणि क्लायमॅक्स फायनल झाला आणि आम्ही ठरविलं की सगळं शूटिंग चित्रनगरीत करायचं. एप्रिल-मे मध्ये मी चित्रनगरीतल्या परिसराचा अभ्यास करून लोकेशन ठरवलं. तिथला तलाव, त्याच्या काठावर व तलावात सेट उभा कसा करता येईल यावर नोट्स तयार केल्या. नोव्हेंबरमध्ये मीटिंग होती. टीममधल्या जुन्या लोकांना वाटलं की तलावावर सेट उभा करायचा, जेमतेम पाच-सहा वर्षांचा अनुभव असणाऱ्या या मुलावर कसा भरवसा ठेवायचा? खूप भवती न् भवती झाली. आमच्या टीमचे पाच-सहा महिन्यांचे श्रम पणाला लागलेले. माझा चेहरा उतरला. अखेर विनोद चोप्रा म्हणाला, ‘‘आपण यावर उद्या निर्णय घेऊ.’’
दुसऱ्या दिवशी नऊ वाजता मीटिंग ठरलेली. मी भल्या पहाटेच तलावाच्या काठावर जाऊन बसलेलो. विचारात मग्न. आठच्या सुमारास माझ्या खांद्यावर हात पडला आणि आवाज आला, ‘‘क्या तू भी वही सोच रहा है, जो मं सोच रहा हूँ?’’ मी उत्तरलो, ‘‘हां विनोद!’’ नऊ वाजता आम्ही जमलो. विनोद चोप्रा म्हणाला, ‘‘डिस्कशन वगरे कुछ नहीं करना है। नितीन काम कर रहा है। सब लोग अपने अपने काम में जूट जाओ।’’ आणि मग मी मागे वळून पाहिलेच नाही. गोिवद निहलानी, गुलजारसाहेब, केतन मेहता, एन्. चंद्रा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साली, विनोद चोप्रा, राजू हिरानी, इंदरकुमार, डेव्हिड धवन, आता सूरज बरजात्या, प्रभुदेवा अशा सर्व पिढय़ांतील दिग्दर्शकांसोबत काम करायची संधी मिळाली. त्या प्रत्येकानं मला काही ना काही शिकवलं.
संजय लीला भन्सालीसोबत माझा अनेक वर्षांचा ऋणानुबंध! ‘डिस्कव्हरी’च्या वेळी तो एडिटिंग करायचा. ‘देवदास’च्या वेळी आम्ही आधी झालेले नऊ ‘देवदास’ पाहिले. ते पाहिल्यावर संजय मला म्हणाला, ‘‘यासारखं आपण काहीही करायचं नाही. आपण भव्य, अतिभव्य करायचं.’’ ऐश्वर्या रायचं म्हणजे पारोचं घर केवढं तरी मोठं केलं. त्याच्या पाचपट मोठी देवदासची हवेली बनली. या प्रत्येक वेळी मला कोलतेसरांनी दिलेला ६४ ठोकळ्यांचा तो प्रकल्प उपयोगी पडला. दिलेल्या वेळेत, दिलेल्या खर्चात आणि दिलेल्या अवकाशात तुम्हाला काम करावं लागतं. हा तो धडा होता. मला वेळ वाया घालवलेला आवडत नाही. म्हणूनच सकाळी आंघोळ झाल्यावर माझ्यासमोर पांढरा शर्ट आणि जीन्सची पँट असते, ती घालायची व कामाला लागायचं. कोणते कपडे घालायचे यापेक्षा विचार करायला किती तरी गोष्टी आहेत ना! टाईम मॅनेजमेंट हवी.
गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत शोधत मनालीला पोचलो. विमानतळावर उतरताना प्रचंड बर्फ सभोवती दिसत होता. आम्हाला जवळच्या एका पर्वतावर जायचं होतं. आम्ही पाच जण होतो. गुलजारसाहेब, कॅमेरामन मनमोहनसिंग, सुदेशजी आणि आणखी एक जण! सुदेशजी आणि मनमोहनसिंग म्हणाले, ‘‘नको जाऊ या.’’ गुलजारजींना पर्वतावर जायचंच होतं, मलाही जायचं होतं. मी, ‘‘जाऊ या’’ म्हणालो आणि मग आम्ही पोचलो. रात्री गुलजारजींची शायरी ऐकली. थोडंसं उशिरा झोपलो आणि भल्या पहाटे गुलजारजीनी माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. ते आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्या-खोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ साठलेलं दिसत होतं. पूर्वेस साडेपाचच्या पहाटरंगाची मस्त उधळण होत होती. आम्ही अनिमिष नेत्रांनी ते अद्भुत पाहत होतो. पुन्हा ते कधीच दिसणार नव्हतं.
निसर्गाची तीच तर किमया आहे. तो एकदाच एखादी कलाकृती निर्माण करतो. त्याला स्वत:लाही ते दृश्य परत निर्माण करता येत नाही. कलावंतालाही तसंच असायला हवं. माझे सेट्स मी परत बनवत नाही. त्यात बदल हवाच. तसा लाल रंग माझ्या सेट्समध्ये पुनरावृत्त होताना दिसतो, पण तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारे येतो. तसा हा रंग हाताळता येणे अवघड, पण एकदा का त्याच्यावर ताबा मिळाला की त्याच्यासारखा रंग नाही. गुलजारजी म्हणाले, ‘‘नितीन, मुझे ऐसा दृश्य चाहिये।’’ नंतरचे तीन दिवस आम्ही तिथं अडकून पडलो होतो. त्या परिसरात सेट उभा करता येणं शक्य नव्हतं. गुलजारजींच्या अपेक्षेनुसार सेट करायचा प्रयत्न मी चित्रनगरीत केला. ते आले, सेट पाहिला, काहीही न बोलता त्यांनी मला हलकेच मिठी मारली, पाठ थोपटली, (आजही पाठीवर ती प्रेमळ थाप जाणवते). ते म्हणाले, ‘‘तुम्हारे सेट को हर अँगलसे जस्टिफाय करने की कोशिश करूंगा।’’ लक्षात घ्या हे गुलजारजी बोलताहेत. ‘पानी पानी रे’, हे गाणं आठवून पाहा. तो सारा सिक्वेन्स चित्रनगरीत उभा राहिलाय.
आशुतोष हाही माझा जुना मित्र. त्याच्या सर्वच चित्रपटांसाठी मी काम केलंय. ‘पहला नशा’पासून आजपर्यंत प्रत्येक! ‘पहला नशा’ आणि ‘बाजी’ हे त्याचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण त्यांची दखल मात्र घेतली गेली. ‘लगान’ हा अफलातून अनुभव. आमीर आणि आशु. दोघेही प्रतिभावंत, चिकित्सक. आम्ही लोकेशन्स शोधत फिरत होतो. ‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगवरून परत येताना अचानक भूजचा परिसर दिसला. आमीर आणि आशुतोष दोघांना मी आणखी जागा दाखवल्या. पण आम्ही भूज फायनल केलं आणि नंतर घडला तो इतिहास होता.
मी या चित्रपटसृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे यातील प्रत्येक घटकावर माझं प्रेम आहे. इथला पसा मी इथेच खर्च करतो. आज कर्जतला आम्ही स्टुडिओ उभारला. या स्टुडिओमुळे या परिसरातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला, स्थानिकांचं अर्थकारण बदललं. बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार येथे येऊन राहतात, शूटिंग चालतं. या मातीचं मी देणं लागतो, ते अल्प कुवतीप्रमाणे मी परत देण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच तर भारताचा स्वाभिमान असणाऱ्या शिवछत्रपतींवर एक मालिका माझ्या हातून घडली, बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा देता आली, स्वरांचा जादूगार असणाऱ्या बालगंधर्वावर त्याच दृष्टिकोनातून चित्रपट बनवला. तरुणांच्या आयपॉडवर बालगंधर्वाची गाणी आली, हीच मोठी गोष्ट झाली. मला सर्वच अनुभव घ्यायला आवडतात. अनेक वर्षे पडद्यामागे राहिल्यावर, पडद्यावर अभिनय करूनही पाहिला. कला दिग्दर्शनानंतरची पुढची पायरी दिग्दर्शनाची. तीही ओलांडली. यशापयश महत्त्वाचे नाही, पण प्रयत्न महत्त्वाचे असतात. ते मी करत राहतो, करत राहीन.
एक सांगू का, रंगांच्या उधळणीतच मला माझा परमेश्वर सापडतो. माझी अनुभव घेण्याची क्षमताच मुळी रंगांत आणि विविध आकारात सामावली गेली आहे. जेव्हा एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक माझ्याशी चर्चा करत असतो तेव्हाच ते कथानक माझ्यासमोर शब्दांच्या नव्हे, तर चित्राकृतींच्या माध्यमातून उभं राहतं.
रंग, आकार माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागतात. लेखन करण्यापेक्षा १०-१२ स्केचेस काढून माझ्या मनातील भाव मी पटकन व्यक्त करू शकतो. ही स्केचेस करतानाही माझ्या मनात जाणीव असते की, त्या अनुभवाला मी साक्षात करू शकत नाही, पण त्या अनुभवाचा वेध मात्र नक्की घेऊ शकतो. या वेध घेण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता सामावली गेली आहे. प्रस्तुत लेखनामध्ये वारंवार ‘मी’ हे प्रथम पुरुषी सर्वनाम येते आहे. पण मी हे जाणून आहे, यामागचा बोलविता धनी वेगळाच आहे, ‘तो’ हे सर्व करून घेत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत थोडासा बदल करून काही मांडू इच्छितो :
‘तेणे कारणें रंगेन। रंगीं अरूपाचे रूप दावीन।
अितद्रिय परि भोगवीन। इंद्रियांकरवी॥’’
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शब्दांकन-नितीन आरेकर
Leave a Reply