जुई पंधरा वर्षांनंतर पुण्यात आली. लग्नानंतर ती नांदेडला स्थायिक झाली होती. ऑफिसच्या एका महत्त्वाच्या मिटींगसाठी आज ती पहाटेच पुण्यातील बहिणीकडे उतरली. सकाळचं सगळं आवरुन, नाष्टा करुन बाहेर पडायला तिला दहा वाजले.
गेल्या पंधरा वर्षांत पुणे शहर पूर्णपणे बदलून गेलं होतं. नवीन इमारतींमुळे नेहमीचे रस्तेही तिला अनोळखी वाटत होते. तिने रिक्षा पकडली व रिक्षावाल्या काकांना मिटींगचं ठिकाण सांगितलं. जुईच्या मनात मिटींगचं टेन्शन होतंच. ती राहून राहून मोबाईलचं बटन दाबून किती वाजले हे पहात होती. सकाळची रहदारीची वेळ असल्याने काकांना गर्दीतून रिक्षा काढताना नाकीनऊ येत होते. तिने काकांना शाॅर्टकटने रिक्षा घ्यायला सांगितली.
अप्पा बळवंत चौकात रहदारी तुंबल्यामुळे काकांना रिक्षा नाईलाजाने थांबवावी लागली. जुईने सहज बाहेर डोकावलं, तर तिची शाळा तिला खुणावत होती. क्षणार्धात तिने निर्णय घेतला. रिक्षावाल्या काकांच्या हातावर पर्समधील नोटा काढून दिल्या व तिने रिक्षा सोडली.
फूटपाथवर चढून ती शाळेच्या फाटका समोर उभी राहिली. तिने मोबाईल सायलेंट मोडवर टाकून पर्समध्ये ठेवून दिला. तिला या शाळेत प्रवेश घेतल्यापासून ते बारावीपर्यंतचे दिवस, एखाद्या चित्रफितीप्रमाणे डोळ्यासमोरुन तरळून गेले. तिच्या आयुष्यातील निरागस, मोरपंखी, रंगेबेरंगी आठवणी जाग्या झाल्या.
वेळ कुणासाठी थांबत नसते. दहावी नंतर शाळेच्या ओढीने अकरावी, बारावी तिने इथेच केली. नंतर काॅलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडिलांच्या आग्रहाखातर दूरच्या स्थळाला तिने होकार दिला. पुणं सोडताना तिला फार जीवावर आलं होतं. तिकडे नोकरी लागली. संसारात रमल्यावर पंधरा वर्षे कशी निघून गेली, ते कळलं देखील नाही. आयुष्य बदलून गेलं. शाळेपासून दूर होती, मात्र शाळेला ती विसरलेली नव्हती. फेसबुक, व्हाॅटसअपवर शाळेतील मैत्रिणी होत्या. त्यांच्या पोस्टमधून शाळेचा उल्लेख असायचा. आठवण यायची, पण शाळा आता खूपच मागे राहिली होती. आॅफिसच्या मिटींगसाठी पुण्याला भेट देण्याची आलेली संधी, त्यामुळेच तिने सोडली नाही..
व्हरांड्यातील स्टुलावर शिपाई काका बसले होते. त्यांनी विचारले, ‘काय पाहिजे?’ जुई, शिपाईकाकांच्या या प्रश्र्नाने गोंधळून गेली. नंतर सावरुन म्हणाली, ‘मी पंधरा वर्षांपूर्वी याच शाळेत होते. ही माझीच शाळा.’ शिपाई काका हसले. त्यांना असे भरपूर अनुभव असणार, हे त्यांच्या चेहऱ्यावरुन जुईला जाणवलं. शिपाई काका म्हणाले, ‘बाईंना भेटा.’
जुई मुख्याध्यापकांच्या खोलीकडे निघाली. विद्यार्थी दशेत असताना या खोलीकडे जाताना जी भीती वाटायची, तशीच आताही वाटताना तिला हसू आलं. ती बाईंना भेटली व पुन्हा एकदा शाळा फिरुन पहाण्याची, तिची इच्छा त्यांना सांगितली. बाईंनी संमती दिली.
जुई भारावलेल्या अवस्थेत शाळेत फिरु लागली. तेवढ्यात ‘टन, टन, टन, टन’ हा ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला. सकाळची शाळा सुटली होती. इतका वेळ शांत असलेली शाळा किलबिलाटाने गजबजून गेली. जागोजागी मुलींचे थवे दिसू लागले. एकाच गणवेशातील मुली एकमेकींच्या गळ्यात हात टाकून वर्गाबाहेर पडत होत्या. जुई, त्यांच्यामध्ये स्वतःला व तिच्या मैत्रिणींना शोधू लागली. दहा मिनिटांनी शाळा पुन्हा शांत झाली.
जुईने पाचवी ते दहावी पर्यंतचे तिचे सर्व वर्ग फिरुन पाहिले. त्या त्या इयत्तांच्या बाकावर बसल्यावर तिला पूर्ण रिकामा असलेला वर्गही पूर्ण भरल्यासारखा वाटला. ती खिडकी शेजारच्या ज्या बाकावर बसायची त्या बाकावर कर्कटकने खरवडून लिहिलेली नावं शोधू लागली. सहामाही, वार्षिक परीक्षेचे दिवस तिला आठवले.
सगळे वर्ग पाहून झाल्यावर ती ‘टीचर रुम’ कडे निघाली. लहानपणी सारखी आजही तिला त्या रुममध्ये जाताना धाकधूक वाटत होती. तिने पाहिलं, तिच्या वेळचं कुणीही त्यांच्यात नव्हतं. ज्या शिक्षिका तिथे होत्या त्यांना नमस्कार करुन ती बाहेर पडली.
लायब्ररी, प्रयोगशाळा, सायकल पार्किंग, हाॅल, इ. ठिकाणी तिने मंतरलेल्या अवस्थेत भेट दिली. नंतर ती पाण्याच्या टाकीजवळ आली. लहानपणी करायची तशी हाताची ओंजळ करुन पाणी प्यायली. ते पिताना डोळ्यांत आलेले पाणी तिने तोंडावर पाणी मारुन पुसून टाकले.
तिला एकदम फ्रेश वाटू लागले. तृप्त होऊन ती शाळेच्या बाहेर पडली. भारावलेल्या अवस्थेतून, वास्तवात आली. पर्समधून मोबाईल काढला व ऑन केला. मोबाईलवर पंधरा मिस्ड काॅल व अठरा मेसेजेस येऊन पडले होते. त्याचे तिला काहीच वाटले नाही. कारण ते नेहमीचंच होतं. आज तिला पंधरा वर्षांनंतर शाळा भेटली होती. त्या अनुभवाने ती प्रसन्न झाली होती. तिने स्वतःच्या मागे शाळा दिसेल असा एक सेल्फी काढला व तिच्या व्हाॅटसअपवरील मैत्रिणींना पोस्ट केला.
रिक्षाला हात करुन मिटींगच्या ठिकाणी निघाली. मोबाइलवरुन सरांना मेसेज टाकला ‘ट्रॅफिक जाममुळे मला यायला उशीर होतोय. मी दहा मिनिटात पोहोचते आहे.’ ती मनाशी विचार करीत होती, सकाळी जर ‘ट्रॅफिक जाम’ नसती तर आजची माझी शाळा नक्कीच ‘बुडाली’ असती…
जुईने कानाला इयरफोन लावला व तिचं आवडतं गाणं लावलं…
‘दिसलीस तू, फुलले ऋतू उजळीत आशा, हसलीस तू…’
ही कथा सुमेधा आगाशे यांच्या मूळ पोस्टवर आधारित आहे.
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
७-५-२१.
Leave a Reply