तेनालीराम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते. पत्नीला गुलाबी रंग पसंत होता. तेनाली म्हणत होता, आपण सफेद रंग देऊ या. दोघांमध्ये काही केल्या एकमत होत नव्हते. पत्नीने अखेर निकराने सांगून टाकलं की, “मी ठरवलं आहे, गुलाबीच रंग द्यायचा. आणि त्याचं कारण एकच आहे, फक्त गुलाबी रंगामुळेच मी आनंदी राहू शकते.
तेनालीरामने मग वाद घालायचे सोडून दिले. त्याने बाजारात जाऊन पत्नीला दोन गुलाबी काचांचे चश्मे आणून दिले, आणि तिला म्हणाला, “होऊ दे तुझ्या मनासारखं. या चष्म्यामुळे या भिंतीच काय मी देखील तुला गुलाबी दिसेन. त्यामुळे तुझा आनंद आणखीनच वाढेल.
तात्पर्य, तेनालीरामच्या सांगण्याप्रमाणे गुलाबी काचेच्या चष्म्यामुळे घर गुलाबी होणार नव्हते, तसे केवळ भिंतीचा रंग कोणता आहे, एवढ्यावरून जीवनाचा आनंद कशात आहे, हे ठरवण्याचा निष्कर्ष काढण्यात हशील नव्हते. आपण कोणत्या नजरेने पाहतो हे महत्त्वाचे असते. काय दिसते, यापेक्षा काय पहातो याला महत्त्व असते. आनंद भिंतीच्या रंगात नसतो, पहाणाऱ्याच्या मनात असतो. त्यामुळे एवढ्या तेवढ्या कारणावरून भांडत बसण्यापेक्षा या दुष्ट-चक्रातून मुक्त होण्यासाठी वस्तुस्थितीचं आपलं आकलन उतावळेपणाने न करता चिंतन, मनन करून केले तर आपले आंतरिक समाधान वाढते.
मृगजळाकडे न धावता खरा आनंद आपल्याला वेचता येतो..
Leave a Reply